रीड, वाल्टर : (१३ सप्टेंबर १८५१ – २२ नोव्हेंबर १९०२) वाल्टर रीड यांचा जन्म अमेरिकेच्या संयुक्त राज्यातील व्हर्जिनियाच्या ग्लौसेस्टर काउंटी येथे झाला. व्हर्जिनिया विद्यापीठात त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी एम.डी. पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मॅनहेटन येथील बेलेव्यू हॉस्पिटल मेडीकल कॉलेजात दुसऱ्यांदा एम.डी. पदवी प्राप्त केली. मग त्यांनी न्यूयॉर्क स्वस्त्या विभागात कामाला सुरुवात केली.
त्यांनी पीतज्वर (यलो फिवर) या रोगावर केलेले संशोधन कार्य हा वैद्यकीय क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. कार्लोस जे फिनले यांनी क्युबामध्ये केलेल्या केलेल्या कामाचा वाल्टर रीड यांनी विस्तार केला आणि हे काम प्रकाशात आले. फिनले यांनी असा सिद्धांत मांडला होता की पीतज्वर या रोगाला कारणीभूत असलेला जंतू एका डासाच्या मार्फत माणसाच्या रक्तात प्रवेश करतो. म्हणजे डास हा या रोगजंतूचा वाहक आहे. त्याने हा सिद्धांत स्वच्छता या विषयावरील आंतरराष्ट्रीय संमेलनात सदर केला होता. डासांच्या पैदाशीवर नियंत्रण हाच त्यावरती उपाय सुचवला होता. पुढे वाल्टर रीड यांनी हे सिद्धांत प्रयोगाच्या कसोटीवर तपासून बघितले.
स्पॅनिश-अमेरिकन युद्धात पीतज्वर आणि मलेरिया या रोगांनीच मोठ्या प्रमाणात अमेरिकन सैनिकांचे बळी घेतले. युद्ध संपल्यानंतर सुद्धा क्युबा आणि अमेरिकन सैनिक मोठ्या प्रमाणात या रोगांना बळी पडले. याची कारणीमीमांसा करण्यासाठी रीड कमिशन नेमण्यात आले. मेजर रीड हे या कमिशनचे अध्यक्ष होते. यात आणखीन तीन संसर्गजन्य रोगांबाबत निष्णात जेम्स कॅरोल, अरीस्टीडस आग्रामोंट आणि जेसी लाझेर. त्यांच्या प्रयोगातून हेच सिद्ध झाले की इडीस इजिप्ती या मादी डासामुळे या रोगाला कारणीभूत असलेला व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत पसरतो. हा रोग जीवाणूमुळे होतो आणि रोग्याचे कपडे परिधान केल्यामुळे होतो. या दोन शक्यता चुकीच्या असल्याचे रीड यांनी दाखून दिले. फिनले सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी त्यांनी वॉशिंगटन येथे रजेवर असतांना फिनले यांच्या संग्रहातील डासांची अंडी घेऊन त्यापासून मिळालेल्या डासांना पीतज्वर झालेल्या रोग्यांना चावू दिले आणि मग त्यांनी जेम्स कॅरोल आणि जेसी लाझेर यांना चावे घेतले. जेम्स कॅरोल या रोगातून बरे झाले परंतु जेसी लाझेर मात्र या रोगाने मरण पावले. क्युबाला परत आल्यावर त्यांनी लाझेर शिबिराची जंगलात स्थापना केली आणि आपले काम पुढे सुरू ठेवले. तेथे त्यांनी पद्धतशीरपणे असे दाखून दिले की पीतज्वर झालेल्या माणसाला जंतू संसर्ग होऊन पहिल्या तीन दिवसात जर चावला तरच तो व्हायरस दुसऱ्या सुदृढ व्यक्तीला संसर्ग करू शकतो.
रीड कमिशनने दिलेल्या आपल्या अहवालानुसार क्युबाचे गव्हर्नर मेजर जनरल लेओनार्ड वूड यांनी मेजर विलियम सी. जॉर्जस यांनी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरणाचा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. परंतु त्यात बऱ्याच सुदृढ व्यक्ती मरण पावल्या आणि हा कार्यक्रम रद्द करावा लागला. हवाना येथे डासांपासून बचावासाठी त्याने मच्छरदाणी वापरण्याचा प्रयोग केला. हवानामधील प्रत्येक इमारतीला धुरी देण्यात आली. डासांच्या प्रजोत्पादनाचे ठिकाण म्हणजे साचलेले पाणी. असे साठे नष्ट केले. पाण्याच्या पृष्ठभाग तेलाने अछादला. याचा इतका चांगला परिणाम झाला की पीतज्वर जवळ जवळ नष्ट झाला. मलेरियाचे प्रमाण देखील घटले. .
Beating Yellow fever हे रीड यांचे पुस्तक खूप गाजले परंतु त्यांच्या संशोधन पत्रिकातून त्यांनी नेहमीच फिनले यांना त्याचे श्रेय दिले आहे. जनरल लिओनार्ड वूड यांच्या शब्दात म्हणायचं तर ‘क्युबाचे अमेरिकन मिलिटरी गव्हर्नर वाल्टर रीड यांनी फिनले यांचा सिद्धांताची खात्री करून, जेन्नर यांच्या देवीच्या लशीच्या शोधानंतर, वैद्यकशास्त्राला पुढे नेण्यासाठी केलेले फार मोठे योगदान आहे’. विलियम सी. जॉर्जस म्हणतात ‘या संशोधनामुळे पनामा कालवा बांधकाम या अमेरिकेच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यात डासांमुळे होणाऱ्या मलेरिया आणि पीतज्वर या रोगांचे प्रमाण धटले आहे. १९०३ सालापर्यंत या रोगाने दगावणाऱ्या रोग्यांचे प्रमाण १० टक्के होते.’
वाल्टर रीड यांना पीतज्वर या रोगावरील त्यांच्या कामासाठी त्यांच्याच नावाने असलेले वाल्टर रीड मेडल मरणोत्तर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वाल्टर रीड ट्रॉपिकल मेडिसिन कोर्स हा त्यांच्याच नावाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. बेथेस्डा, मेरिलंड येथील द नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी केलेल्या विषमज्वर तापावर केलेल्या संशोधनावर आधारित लेखांचा संग्रह जपून ठेवलेला आहे फिलीप शोल्तर हेंच (Philip Showalter Hench) या १९५० सालच्या वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञाने वाल्टर रीड यांच्या पीतज्वरावरील संशोधनात खूप रस दाखवला. व्हर्जिनिया विद्यापीठात वाल्टर रीड यांच्या वस्तू, लेख, छायाचित्रे अशा ७५०० वस्तूंचा संग्रह फिलीप एस. हेंच वाल्टर रीड यलो फिवर संग्रहालयात उपलब्ध आहे. १९४० साली त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढण्यात आले. तसेच त्यांच्या नावाने अनेक संस्था कार्यरत आहेत.
अपेंडीक्स फुटून पेरीटोनिटीस होऊन वॉशिंग्टन डी.सी.येथे त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Walter-Reed
- https://www.com/walter-reed…yellow-fever-experimen
- https://exhibits.hsl.virginia.edu/insects/reed/
समीक्षक : मुकुंद बोधनकर