द बर्नुली सोसायटी फॉर मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी : (स्थापना : १९७५) द बर्नुली सोसायटी फॉर मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी (बर्नुली सोसायटी) ही १९७५ मध्ये अस्तित्त्वात आलेली व्यावसायिक संघटना आहे. बर्नुली सोसायटी तीन गटांच्या प्रयत्नांतून आकाराला आली. पहिला गट म्हणजे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टॅटिस्टिक्स इन द फिजिकल सायन्स, जो १९६१ साली इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आयएसआय) मध्ये स्थापन झाला होता. सध्याच्या बर्नुली सोसायटीचा मुख्य पूर्ववर्ती हाच गट आहे. दुसरा म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्सची यूरोपियन प्रादेशिक समिती. तिसरा अत्यंत वेगळा आणि स्वतंत्र कार्य करणारा गट म्हणजे कॉन्फरन्सेस ऑन स्टोकॅस्टिक प्रोसेसेस ही समिती.
गणित तसेच इतर मानवी ज्ञान व कार्यक्षेत्रांत उज्ज्वल कर्तृत्त्वाची परंपरा दीर्घकाळ राखणारे किर्तीवंत बर्नुली कुटुंब यांचे नांव घेऊन सोसायटीने त्याचा गौरव केला आहे. या कुटुंबातील जेकब (१६५५-१७०५) म्हणजे गणिती, खगोलशास्त्रज्ञ आणि आर्स कंजेक्टंडी या चयनशास्त्र आणि गणिती संभाव्यताशास्त्रावरील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. त्यांनी संभाव्यता सिद्धांत नैतिक, राजकीय आणि अर्थशास्त्रीय समस्यांवर उपयोजित करून दाखवला. लिबनिझ-कलनशास्त्राचे ते पहिले पुरस्कर्ते होते. जेकबनी, त्यांचे भाऊ जोहान यांच्यासह (१६६७-१७४८) कॅल्क्युलस ऑफ व्हेरिएशन्स हे गणिताच्या विश्लेषणाचे क्षेत्र निर्माण करण्यात योगदान दिले. गणितातील एक महत्त्वाचा पायाभूत स्थिरांक e आणि बृहत संख्या नियमाची प्रथम आवृत्तीही जेकब यांनी शोधली. जोहान हे गणिती आणि रसायनशास्त्रज्ञ होते. अतिसूक्ष्मता कलनशास्त्राचा (infinitesimal calculus) शोध आणि लिओनार्दो ऑयलर, या सुप्रसिद्ध गणितीचे गुरू अशी त्यांची ओळख होती.
जोहान यांचा मुलगा डॅनियल (१७००-१७८२) म्हणजे, गणिती आणि तत्त्वज्ञ. द्रव यांत्रिकीमध्ये (फ्लुइड मेकॅनिक्स) गणिताचे उपयोजन करण्यासाठी आणि संभाव्यता व संख्याशास्त्र यांतील पायाभूत योगदानासाठी डॅनियल विशेष ओळखले जातात. विसाव्या शतकात कॉर्ब्युरेटर (इंधनची वाफ आणि हवा एकमेकांत मिसळणारा भाग) आणि विमानाच्या पंखांत ऊर्जा-जतन करण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान डॅनियल यांच्या बर्नुली-तत्त्वावर आधारलेले होते.
या तिघांशिवाय निकोलस पहिला, निकोलस दुसरा, जोहान दुसरा, जोहान तिसरा, जेकब दुसरा इत्यादी अनेक सुप्रसिद्ध गणिती या कुटुंबांत होऊन गेले आहेत. अशा बर्नुली कुटुंबाचा सोसायटीच्या नावात समावेश करण्यास आधुनिक संख्याशास्त्राचे सुप्रसिद्ध स्थपती, जर्झी नेमन यांचे बर्नुलींच्या योगदानाची महती सांगणारे पत्र कारणीभूत ठरले.
आंतरराष्ट्रीय संपर्क आणि सहभाग यातून संभाव्यताशास्त्र (प्रसंभाव्य प्रक्रमांसह) आणि गणिती संख्याशास्त्र यांची प्रगती व्यापक पातळीवर साधणे, हे बर्नुली सोसायटीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यात सैद्धांतिक संशोधने आणि त्यांच्या उपयोजनाचा विकास; या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मंडळींच्या अंतर व बाह्य वर्तुळांत ज्ञानाचे वितरण आणि सर्व स्तरांवरील गणिती अध्यापन पद्धतींमध्ये सुधारणा घडविणेही अंतर्भूत आहे.
भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती, चलन समस्या किंवा राजकीय निर्बंधांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी बर्नुली सोसायटी विशेष प्रयत्नशील असते. यामुळे जगभरांतील गणिती-संख्याशास्त्रज्ञ आणि संभाव्यताशास्त्रज्ञ यांना सोसायटीच्या सर्व कार्यक्रमांत सहभागी होण्याची, समान संधी मिळते. बर्नुली सोसायटीचा एक महत्त्वाचा उद्देश असाही आहे की, शैक्षणिक संस्थांत कार्यरत असणारे संख्याशास्त्रज्ञ किंवा संभाव्यताशास्त्रज्ञ यांची शेतीशास्त्र, वैद्यकशास्त्र, हवामानशास्त्र, औद्योगिक इत्यादी संस्थांतून काम करणाऱ्यांशी थेट वैचारिक देवाणघेवाण सुकर करून देत जोपासणे. सध्या सोसायटीकडे सत्तर देशांचे प्रतिनिधित्व करणारे जवळपास एक हजार सदस्य आहेत. संस्थेचे कार्यालय हेग, नेदरलँड येथे आहे.
बर्नुली सोसायटीची दोन अधिकृत द्वैवार्षिक शास्त्रीय प्रकाशने आहेत : बर्नुली जर्नल आणि स्टोकॅस्टिक प्रोसेसेस अँड देअर ॲप्लिकेशन. (हे एल्सेव्हियर कंपनी प्रकाशित करते.) बर्नुली जर्नल सांख्यिकी आणि संभाव्यताशास्त्र यांतील महत्त्वपूर्ण घडामोडींचे सर्वंकष तपशील उत्कृष्ट शोधनिबंध/लेखांसह उपलब्ध करते. स्टोकॅस्टिक प्रोसेसेस अँड देअर ॲप्लिकेशन या नियतकालिकामधून प्रसंभाव्य प्रक्रमांवरील सिद्धांत आणि त्यांचे उपयोजन याच्याशी संबंधीत शोधनिबंध प्रकाशित होतात. संकल्पना आणि तंत्रे तसेच गणित, विज्ञान आणि अभियांत्रिकी यांच्याशी निगडीत संशोधने प्रसिद्ध करण्यावर या नियतकालिकाचा विशेष भर असतो.
बर्नुली न्यूज हे द्वैवार्षिक वार्तापत्र बर्नुली सोसायटीचे कामकाज आणि नवी उपक्रमशीलता यांचे तपशील प्रकाशित करते. बर्नुली सोसायटी आयएसआयच्या कार्याचा व्यापक आढावा आणि त्यांची संख्याशास्त्रज्ञांना उपयुक्त ठरू शकेल अशी माहिती वार्तापत्रातून देते. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स इन प्रोबॅबिलिटी, इलेक्ट्रॉनिक जर्नल ऑफ प्रोबॅबिलिटी, इलेक्ट्रॉनिक जर्नल ऑफ स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी सर्व्हेज, आणि स्टॅटिस्टिक्स सर्व्हेज ही आंतरजालाने प्रसारित होणारी शास्त्रीय प्रकाशने बर्नुली सोसायटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स यांच्या सहकार्याने चालवली जातात. स्टॅटिस्टिक्स सर्व्हेजला ‘द अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन आणि द स्टॅटिस्टिकल सोसायटी ऑफ कॅनडाचे सह-प्रायोजकत्व लाभले आहे.
बर्नुली सोसायटी स्वतः किंवा इतर संस्थांच्या मदतीने सर्वोत्तम कामांसाठी दरवर्षी आठ पारितोषिके देते. तसेच स्थानिक आणि जागतिक पातळीवरील आयोजित परिषदांतून प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या नांवे ठेवलेली व्याख्याने देण्यासाठी संबंधीत विषयातील ज्येष्ठ तज्ज्ञांना सन्मानासह आमंत्रित करते.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर