थिल्स्टेड, शकुंतला हरकसिंग : (१९४९ -) शकुंतला थिल्स्टेड यांचा जन्म त्रिनिदादमधील सान फर्नांडोजवळ असलेल्या रिफॉर्म नावाच्या लहानशा शहरामध्ये झाला. दहाव्या वर्षी त्यांनी नेपारिमा मुलींच्या शाळेत शिक्षण घेणे सुरू केले. थिल्स्टेड यांनी वेस्ट इंडीज युनिव्हर्सिटी सेंटऑगस्टाईन येथून ट्रॉपिकल अ‍ॅग्रिकल्चर शाखेतील पदवी मिळवली. टोबॅगो येथील कृषि खात्यात त्यांना लगेचच काम मिळाले. कृषि खात्यातील त्या पहिल्या महिला कर्मचारी होत्या. डेन्मार्कमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना लवकरच फिजिऑलॉजी ऑफ न्यूट्रिशन या विषयात पीएच्. डी. मिळाली. ही पदवी त्यांना रॉयल व्हेटर्नरी अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून देण्यात आली होती. या विद्यापीठात त्या असोसिएट प्रोफेसर पदापर्यंत पोहोचल्या.

थिल्स्टेड यांनी बांगला देश आणि कंबोडिया येथील लहान आकाराच्या माशातील पोषण मूल्यावर संशोधन केले. हे लहान मासे तेथील स्थानिक व्यक्तींच्या आहाराचा भाग होते. बांगला देश अ‍ॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि डेन्मार्कमधील युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने हे संशोधन चालू झाले होते. लहान आकाराच्या या माशामध्ये उच्च दर्जाचे आवश्यक सूक्ष्म पोषक घटक आणि मेदाम्ले उपलब्ध असल्याचे त्यांना आढळले. बालकांच्या सुरुवातीच्या हजार दिवसात या पोषक घटकामुळे त्यांची बोधन क्रिया व मेंदूची वाढ होण्यास मदत होते. बालकांना हे पोषण मातेच्या दुधातून मिळते. मातेला आवश्यक पोषण या माशातून उपलब्ध होते. त्यांच्या संशोधनातून थिल्स्टेड यांनी कमी उत्पन्न गटातील लक्षावधी व्यक्तींसाठी पोषणविषयक अन्न उपलब्ध होण्यासाठी नवा मार्ग  शोधण्याचे ठरवले. कंबोडियामध्ये ग्रामीण लोकसंख्येचा मोठा भाग भातशेतीतील माशावर अवलंबून असायचा. भातशेती ज्यावेळी नसेल तेंव्हा कोरड्या हंगामात त्याच पाण्यात मासे उपलब्ध कसे होतील यावर त्यांनी संशोधन करायचे ठरवले.

थिल्स्टेड यांचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम पाण्याच्या साठ्यामध्ये मासे बहुसंवर्ध (poluculture) पद्धतीने वाढवण्यास उत्तेजन दिले. या पद्धतीत लहान मोठ्या असमान आकाराच्या माशांची एकत्रित पैदास, पाण्याचे लहान तलाव, घरापुढील-मागील डबकी, मोठे तलाव आणि एव्हढेच नाही तर चक्क भातशेतीमध्येसुद्धा त्यांनी मत्स्यपालन केले. एका प्रचलित समजुतीनुसार लहान आकाराचे मासे मोठ्या माशांच्या सहवासात टिकाव धरू शकत नाहीत. मात्र  प्रत्यक्षात बहुसंवर्ध पद्धतीत मत्स्यउत्पादन पाचपट वाढले. मत्स्य गुणवत्ता, विविधता आणि उत्पादन या सर्व बाबतीत उपलब्ध पाण्यातील नैसर्गिक अन्न पुरेसे आहे याची खात्री त्यांना होती. या सर्वांचा विचार करून बांगला देश प्रशासनाने पाण्यात कीटकनाशके वापरून पाणी स्वच्छ करण्यास बंदी घातली. त्यामुळे नैसर्गिक माशांच्या प्रजातींचे आपोआप संरक्षण झाले. स्थानिक मत्स्यसंघ आणि खाजगी संस्था यांच्या मदतीने थिल्स्टेड यांनी स्वस्त परवडणार्‍या किमतीत पौष्टिक मत्स्य उत्पादने विकसित केली. स्तनदा माता व वाढत्या वयाच्या मुलांसाठीसुद्धा ही उत्पादने योग्य आहेत. त्यांच्या या उत्पादनांनी पचन मार्गातील शोषण अधिक वेगाने होते. त्यातून अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. भात आणि पालेभाज्यामधील लोह आणि जस्त शोषण्यास मदत होते हे दाखवून दिले.

सन २०१० पासून थिल्स्टेड या (CGIAR – Consultative Group on International Agricultural Research) आंतरराष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र सल्लागार मंडळाच्या मलेशिया केद्रातील जागतिक प्रमुख मंडळाच्या सदस्या आहेत. त्यांच्या संशोधनासाठी यूएस अ‍ॅग्रिकल्चर डिपार्टमेंट, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी-युनिसेफ आणि बिल व मेलिंडा गेटस फाउंडेशन यांनी आर्थिक मदत केलेली आहे. थिल्स्टेड या युनायटेड नेशन्स फूड सिस्टीम समिट सहसंयोजक आहेत. शाश्वत आणि न्याय्य अन्न उपलब्ध करण्यासाठी हा संघ बांधील आहे. त्या स्वत: युनायटेड नेशन ओशन सायन्स दशकामध्ये शाश्वत विकास योजनेमध्ये सहभागी आहेत. त्याचा एक भाग पोषणविषयक कृती मसुदा बनवणार आहे.

शकुंतला हरकसिंग थिल्स्टेड यांचे नाव २०२१ च्या वर्ल्ड फूड प्राइज़साठी नुकतेच जाहीर झाले आहे. हा पुरस्कार त्यांच्या पोषण, मत्स्य आणि जल पोषणातील जागतिक पातळीवर संशोधन केल्याने देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वर्णन नोबेल पुरस्कार फॉर फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चर असे करण्यात येते. दरवर्षी नॉर्मन बोरलॉग फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो.  थिल्स्टेड या हा पुरस्कार मिळवणार्‍या सीजीआयएआर (CGIAR) संशोधकातील पंचविसाव्या, सातव्या महिला आणि पहिल्या आशियाई वंशाच्या संशोधक आहेत.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी