महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नांदेड येथील एक प्रसिद्ध विद्यापीठ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे हे पूर्वी उपकेंद्र होते. या विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ कायद्यान्वये १७ सप्टेंबर १९९४ रोजी करण्यात आली. विद्यापीठास मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत विद्यापीठास मान्यता असून त्यास नॅक पुनर्मूल्याकंन ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे. ‘सा विद्या या विमुक्तये’ हे विद्यापीठाचे बोधवाक्य असून विद्यापीठाचे गीत प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांनी लिहिले आहे. जनार्धन वाघमारे हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांनी विद्यापीठाच्या उभारणीत अव्याहत परिश्रम घेतले.
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांचे आहे. विद्यापीठ परिसर ५९५ एकरमध्ये वसले असून या परिसरास ‘ज्ञानतीर्थ’ या नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे लातूर व परभणी येथे दोन उपकेंद्र आहे, तर हिंगोली येथे न्यू मॉडेल डिग्री कोलेज आहे. कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास आणि संशोधन केंद्र किनवट येथे आहे. विद्यापीठाशी चार जिल्ह्यांतून ३०० महाविद्यालये संलग्नित असून १४६ शिक्षणक्रम कार्यान्वित आहेत. १.६३ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेशित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही विद्यापीठाची गुणवत्ता पोहोचलेली आहे. पाच देशांतून ७० पेक्षा जास्त परदेशी विद्यार्थी शिक्षणक्रम पूर्ण करीत आहेत. विद्यापीठातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. अनेक विद्यार्थी हे शासकीय व निमशासकीय संस्थेमध्ये मोठ्या पदांवर कार्य करत आहेत. व्यापार, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संशोधन इत्यादी क्षेत्रांमध्ये या विद्यापीठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करीत आहेत.
विद्यापीठ परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत; पदव्युत्तर अधिविभाग; ७ वसतिगृहे; कुलगुरू निवासस्थान; कर्मचारी, अधिकारी व प्राध्यापक यांची निवासस्थाने; सुसज्ज ग्रंथालय; तलाव, विहिरी, शेततळे व बागबगीचे आहेत. विद्यापीठात १४ संकुले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, श्री गुरु गोविंद सिंह अध्यासन संकुल, स्त्री अभ्यास केंद्र ही अध्यासन आणि अभ्यासकेंद्र आहेत. कोविड १९ संशोधन केंद्र हे मूल्यांकन होऊन एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असलेले स्वा. रा. ती. म. विद्यापीठ हे देशातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले असून या प्रयोगशाळेत कोरोना नमुना स्वॅब तपासणी केली जाते. येथे डे केअर सेंटर व एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. विद्यापीठाने नुकतेच विद्यापीठ परिसरात जलसिंचनावर खूप मोठे कार्य केलेले आहे. त्यामध्ये अनेक शेततळे, विहीर पुनर्भरण करून हरित विद्यापीठ झाले आहे.
ध्येय : उच्च शिक्षणातून ज्ञानाचे अधिग्रहन करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आदर्श व्यक्तिमत्त्व, मूल्यवर्धन, न्याय, निष्ठा, निर्भयता जोपासणारा समाजातील आदर्श, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे. ‘प्रबुद्ध विद्यार्थी : अपार सामर्थ्याचा स्रोत’ हा विद्यापीठाचा दृष्टीकोन आहे.
मुलभूत मूल्ये :
- उत्कृष्टता : विद्यापीठ आपल्या कार्यक्षेत्रात व सर्व क्षेत्रांत उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी वचनबद्ध आहे.
- सुसंस्कृतपणा : विद्यापीठ सुनिश्चित करते की, प्रामाणिकपणाचे पालन आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या वातावरणात आणि नैतिकतेच्या उच्चतम मानकांवर शिक्षण आणि संशोधन केले जाईल.
- उत्तरदायित्व : नियम आणि कार्यपद्धतीनुसार विद्यापीठ कार्य करते आणि विद्यार्थ्यांसह सर्व भागधारकांना जबाबदार असेल.
- सहानुभूती : विद्यापीठाला समाजातील दुर्बल घटक आणि दिव्यांगजनांच्या परिस्थितीची जाणीव आहे.
- पारदर्शकता : संबंधित माहिती भागधारकांसह सामायिक केली जाते.
- नि:पक्षता : विद्यापीठ लिंग, सांस्कृतिक आणि सामाजिक सर्वसमावेशकतेमध्ये समानतेने उभे आहे.
उद्दिष्टे :
- नवीन कल्पना, संशोधनाची आवड, नेतृत्व, कार्यतत्परता आणि तत्त्वज्ञान यांतून नवनिर्मिती करणारे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे.
- उत्कृष्ट अभ्यासक्रमाद्वारे शैक्षणिक अनुभव प्रदान करून समाज आणि देशाच्या गरजा भागविणे.
- कौशल्य विकास, सर्जनशीलता, क्षमता आणि उपयोगिता यांना प्रोत्साहित करून उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे.
- संशोधन व विकास प्रकल्पांवर काम करणे आणि मूळ व अंतरविद्याशाखीय क्षेत्रांतील विकास प्रकल्पांवर सल्लामसलत करणे.
- शैक्षणिक व संशोधन संस्था मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आणि शैक्षणिक व संशोधन संस्थांशी सहयोग करणे.
- सामाजिक-आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यात सहभाग घेऊन समाजाच्या सेवेत योगदान देणे. दर्जेदार शिक्षणासाठी आणि राष्ट्रनिर्मितीत संलग्न महाविद्यालये वाढविणे आणि प्रोत्साहन देणे इत्यादी.
विद्याशाखा व अभ्यासक्रम : विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर संधोधन उच्च शिक्षण दिले जाते. विद्यापीठामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय या चार विद्याशाखांतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधीशास्त्र, औषधनिर्मितीशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रविज्ञान, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नाट्य व संगीतशास्त्र, वृत्तपत्रविद्या, संदेश व दळणवळण, माहितीशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, कृषी रसायन, व्यवस्थापन, उपयोजित रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, यांत्रिकी, पर्यावरणशास्त्र, आहारविज्ञान, गृहशास्त्र, तंत्रविज्ञान, भुगोलशास्त्र, औद्योगिक रसायन, गणित, सूक्ष्म जिवशास्त्र, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, प्राणिशास्त्र, इत्यादी विषयांचे अध्यापन केले जाते.
अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन : विद्यापीठाद्वारे विद्यार्थीकेंद्री अनुदेशन पद्धतींचा वापर केला जातो. शालेय अर्धवर्ष (सेमिस्टर) पद्धतीनुसार चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस) पद्धतीनुसार विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलेव्हरी (एसआरपीडी) या ईमोड प्रणालीचा वापर केला जातो. परिस्थितीनुसार विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाजालावर (ऑनलाईन) आणि प्रत्यक्षात या दोन्ही प्रणालींद्वारे घेतली जाते. विद्यार्थ्यांचा हजेरी अहवाल पर्यवेक्षकांकडून महाजालकावर भरून घेतला जातो. वेळेत निकाल लावण्याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची परंपरा आहे.
संशोधन : अध्ययन-अध्यापनाबरोबरच संशोधन क्षेत्रातही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विविध संशोधन कार्यासाठी विविध संस्थांकडून विद्यापीठास अनुदान दिले जाते. विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने मुतखडा या आजारावर संशोधन केले आहे. त्यावर उपाय म्हणून डिसोकाल या नावाचे औषध तयार केले असून ते अत्यंत प्रभावी असल्यामुळे त्याचे पेटेंट केले आहे.
राष्ट्रीय सेवायोजना, राष्ट्रीय छात्रसेना व क्रिडा विभाग : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबीर, रक्तदान शिबीर, एड्स जनजागृती अभियान, आपत्ती व्यवस्थापन शिबीर, वृक्षारोपण, बेटी बचाओ अभियान, साक्षरता अभियान, वन्यजीव सप्ताह इत्यादी उपक्रमांबरोबर विविध शासकीय कार्यक्रमांत विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र शासनाच्या निर्मलग्राम, जलयुक्त शिवार, पाणी अडवा पाणी जिरवा, जल साक्षरता इत्यादी उपक्रमांतही विद्यापीठाचा सहभाग आहे. क्रिडा विभागामार्फत विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. टेबल टेनिस, क्रिकेट, खो-खो, मल्लखांब, कुस्ती, कराटे इत्यादी खेळांचे प्रशिक्षण विद्यापीठात दिले जाते. एन. सी. सी. विभागामार्फत सैन्य भरती प्रशिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त, देशभक्ती, जीवनमूल्ये व जीवनकौशल्यांचे शिक्षण दिले जाते. एन. सी. सी.साठी विद्यापीठ परिसरातच विभागीय कार्यालय आहे.
दूरशिक्षण केंद्र : उच्च शिक्षणापासून वंचित असणाऱ्या १८ ते २३ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या ग्रामीण व शहरी भागातही जास्त असल्याने नोकरी, कामधंदा करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने स्वतंत्र दूरशिक्षण विभाग सुरू केला आहे. या विभागाने अल्पावधितच उत्तुंग कामगिरी केली असून सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी, बी. ए., बी. कॅाम, एम. ए., एम. कॉम. इत्यादी अभ्यासक्रमांत शिकत आहेत. या केंद्राच्या वतीने अभ्यासकेंद्र कार्यरत असून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी स्वयंअध्ययन साहित्य पुरविले जाते.
संस्थांशी करार : जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ व्हिज्युअल अँड पर्फॉर्मिंग आर्ट, कोलोंबो, श्रीलंका; हानयांग युनिव्हर्सिटी सोल, कोरीया; नॉर्मल युनिव्हर्सिटी, फिलिपीन्स; नॉर्थन युनिव्हर्सिटी कंबोडिया; गॅलेली कॉलेज ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंट सोसायटी, इझ्राएल; गोरँटोला युनिव्हर्सिटी, इंडोनेशीया; नागरी युनिव्हर्सिटी, जकार्ता या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी जैव तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान इत्यादींच्या संशोधनासाठी सामंजस्य करार केले आहेत. परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केल्यामुळे संशोधन, ज्ञानप्रसारण व रोजगारवाढीस चालना मिळून विद्यापीठ जागतिक स्तरावर नावारूपास येत आहे.
ग्रंथालय : विद्यापीठामध्ये सुसज्ज ग्रंथालय आहे. ग्रंथालयात सुमारे ८० हजारांपेक्षा जास्त छापील ग्रंथ व महत्त्वाची कागदपत्रे असून यांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भातील अत्यंत दुर्मिळ पुस्तके व कागदपत्रे आहेत. तसेच ९२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलस आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यु. जी. सी./इन्फोनेट/इन्फिल्बनेट या अंकीय (डिजिटल) ग्रंथालयाशी विद्यापीठाचे ग्रंथालय जोडले आहे. इन्फिल्बनेट केंद्रामध्ये सुमारे ३,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक्स जर्नल्स व माहिती उपलब्ध आहेत. ग्रंथालयात ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग (ओपॅक) प्रणाली उपलब्ध असून आंतरजालीय प्रयोगशाळेद्वारा (इंटरनेट लॅबद्वारा), नोंदणीकृत प्रबंध (थेसिस रजिस्ट्रेशन्स), दुर्मिळ ग्रंथ व दस्तऐवज उपलब्ध आहेत.
मूल्यांकन : अध्ययन-अध्यापन, संशोधन व समाजातील वंचित घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. नॅक, एन. आय. आर. एफ. यांसारख्या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थांकडून विद्यापीठाचे मूल्याकंन झाले असून नॅककडून विद्यापीठास ३.०६ एवढ्या सीजीपीएसह ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. ई-गव्हर्नन्स, आभासी किंवा महाजालीय शिक्षण, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया यांमध्ये संगणकीय प्रणालीचा प्रभावी वापर, कॅशलेस व्यवहार इत्यादींमुळे विद्यापीठाचे प्रशासन गतिमान बनले आहे.
विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, व्याख्याने व चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाते. विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय युवामहोत्सव, अश्वमेघ, अविष्कार संशोधन स्पर्धा, इंद्रधनुष्य, क्रिडामहोत्सव इत्यादी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात.
विद्यापीठातील प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यापीठाद्वारे जॉबफेअर व अनेक कंपन्यांसाठी परिक्षेत्र मुलाखतीचे (कँम्पस इंटरव्ह्यू) आयोजन केले जाऊन या कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये परिक्षेत्र मुलाखतीद्वारे आयसीआयसीआय, विप्रो, एशियन पेंट्स, रिलायन्स, ॲपटेक व इतर नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
समीक्षक : एच. एन. जगताप