हेकेल, अर्न्स्ट हाइन्राइच : (१६ फेब्रुवारी, १८३४ – ९ ऑगस्ट, १९१९) अर्न्स्ट हेकेल यांचा जन्म त्या काळच्या पॉट्सडॅम, प्रुशिया म्हणजे सध्याच्या उत्तर जर्मनीत झाला. त्यांना सागरी प्राणीशास्त्रात विशेष रुची होती. परंतु घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी बर्लिनमध्ये वैद्यकीय शिक्षण व नंतर जेना विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली. त्यांनी काही काळ वैद्यकीय व्यवसायही केला. नंतर वडलांच्या संमतीने इटलीला जाऊन रंगचित्र कामाची हौस भागविली. त्यात गोडी वाटल्याने पुढे तेच जीवनकार्य म्हणून स्वीकारावे असा विचार केला. परंतु पुन्हा त्यांच्या सागरी प्राणीशास्त्र प्रेमाने उचल खाल्ली आणि ते मेसिना या इटलीतील सिसिली भागात येऊन रेडिओलॅरिआ (radiolaria) नामक एकपेशीय, दृश्यकेंद्रकी जीवांचे संशोधन करण्यात मग्न झाले. या जीवांची कवचे स्फटिकांसारखी प्रमाणबद्ध आणि विलोभनीय असतात. हेकेल यांनी त्यांचे दीर्घ काळ निरीक्षण केले. त्यामुळे त्यांना असे वाटू लागले, की जेव्हा आदिजीव निर्माण झाला तेव्हा तो उत्स्फूर्तपणे अकार्बनी रासायनिक पदार्थांच्या स्फटीकीकरणाने झाला असावा.
हेकेल यांनी चार्ल्स डार्विन यांचे ऑन द ओरिजिन ऑफ स्पिसीस हे पुस्तक वाचले. त्यातील मुद्दे त्यांना पटले. पुढील सुमारे दहा वर्षे त्यांना वायव्य आफ्रिकेतील कॅनरी बेटांना, नॉर्वे देशातील क्रोएशियात संशोधनासाठी जाण्याचा योग आला. ते श्रीलंका आणि इंडोनेशिया येथेही गेले होते. इंग्लंडमध्ये गेले तेव्हा चार्ल्स डार्विन, चार्ल्स लायल, थॉमस हक्स्ली या उत्क्रांती क्षेत्रातील अग्रेसर तज्ज्ञांशी भेटून त्यांना चर्चा करता आली. त्यांनी आयुष्यभर डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे जोरदार समर्थन केले. जनसामान्यांसाठी आणि तसेच विशेषज्ञांच्या सभांमध्ये वेळोवेळी भाषणे केली. सोप्या भाषेत डार्विनचा उत्क्रांतीवाद समजावून सांगितला. जेना, येथे लोकांना उत्क्रांतीबद्दल शिकता यावे म्हणून त्यानी एक खास वस्तुसंग्रहालय स्थापन केले.
हेकेल यांनी जर्मनीतील जेना येथे प्राणीशास्त्र विषयातील एक प्रबंधिका तेथील विद्यापीठात सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘प्रिवातदोझेंत (privatdozent)’ म्हणजे जर्मनी आणि अन्य काही देशांत आवश्यक असा महाविद्यालयात अध्यापन करण्यासाठी लागणारा परवाना मिळवला. हेकेल यांची तुलनात्मक प्राणीशास्त्राचे सहप्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पदोन्नतीने ते नंतर प्राध्यापक पदाला पोहोचले. निवृत्त होईपर्यंत सत्तेचाळीस वर्षांचा काळ ते जेना येथेच राहिले. हेकेल यांना भ्रूणशास्त्राचे सखोल ज्ञान होते. विविध प्राण्यांच्या भ्रूणांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले होते. त्यातून हेकेल यांच्या असे लक्षात आले की मासे, बेडूक, कासव, पक्षी, मानव असे प्राणी एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न दिसतात. परंतु त्यांचे भ्रूण बरेचसे सारखे दिसतात. जेवढा कोवळ्या वयाचा भ्रूण तेवढे त्याचे अन्य जातीच्या प्राण्यांच्या भ्रूणांशी साम्य जास्त. अगदी सुरुवातीच्या अवस्थांतील माशांचा, बेडकांचा, पक्ष्यांचा, मानवाचा भ्रूण, कोणता कोणाचा हे ओळखणे कठीण एवढे एकमेकांसारखे दिसतात. हेकेल यांच्या या निरीक्षणाने डार्विनच्या उत्क्रांती तत्त्वाला बळकट पुष्टी मिळाली. जर का निसर्गाने प्रत्येक प्रकारचा प्राणी स्वतंत्रपणे निर्माण केला असेल तर त्यांचे भ्रूण वेगवेगळ्या रचनेचे असायला हवे होते. अतिप्राचीन भूतकाळात एकसंघ असणारा प्राणीगट विविध भूभागांत विखरत गेला. भिन्न परिस्थितीला अनुकूल असे बदल त्या प्राण्यांत घडले. असे अनुकूल बदल घडलेले प्राणी जीवनसंघर्षात टिकून राहिले. जे बदलले नाहीत ते अल्पसंख्य होऊन कालांतराने लुप्त झाले. ही तर्कसंगती अचूक होती. यावरून त्यांनी भ्रूणाचा पुनरावर्तन सिद्धांत मांडला. यानुसार भ्रूणामध्ये त्याच्या इतिहासाची पुरुरावृत्ती होत असल्याचे प्रतिपादन केले. उदा., मानवी भ्रूणामध्ये भ्रूण विकासामध्ये कल्ले असतात. ते भ्रूण विकासात नष्ट होतात.
जीवाणूंची – अकेंद्रकी (प्रोकॅरिओटा) जीवांची मोनेरा अशी स्वतंत्र सृष्टी असावी असे हेकेल यांना वाटे. या सृष्टीचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत हेकेल यांना एकपेशीय दृश्यकेंद्रकी जीवांची सृष्टी सापडली. तिला त्यांनी प्रोटिस्टा असे नाव दिले. अनेक नवे जीवप्रकार सापडल्यावर सृष्टी ऐवजी अधिक्षेत्र (डोमेन) असे नाव हल्ली वापरले जात आहे. मानवी उत्क्रांतीशी संबंधित महत्त्वाचे जीवाश्म सध्याच्या इंडोनेशियाच्या भूभागात सापडतील असे त्यांनी नमूद केले. ते भाकीत युजीन द्यूबॉं याना जावा मॅन होमो इरेक्टसचे जीवावशेष सापडल्यावर खरे ठरले. त्यांनी स्वतःचा एक अंदाज नोंदून ठेवला. तो म्हणजे पेशीचे केंद्रक आनुवंशिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. हेकेल यांनी द जनरेशन ऑफ वेव्हज इन स्मॉल व्हायटल पार्टिकल्स हे पुस्तक लिहिले. त्यात वंशवृक्ष (tree of life) ही कल्पना मांडली आणि चित्रित केली. सामायिक पूर्वजांपासून शाखा फुटल्याप्रमाणे नवनवीन सजीव गट विकसित होत जातात. शेजारच्या आकृतीत दिसत आहे तशी ही क्रिया पुन्हा पुन्हा होत राहिल्याने जैवविविधता वाढत राहते. हेकेल यांच्या मते जीवसातत्य राहण्यासाठी सजीवांत प्लास्टिट्युड्स नावाचे बारीक कण असतात, ते पुढच्या पिढ्यांत संक्रमित केले जातात.
त्यांनी लिहिलेल्या ‘जनरल मॉर्फोलॉजी ऑफ ऑर्गनिझम्स’ या दीर्घ शोधनिबंधात त्यांनी एक जीवशास्त्रातील सर्वस्पर्शी मुद्दा मांडला. तो म्हणजे उत्क्रांती हा एक सर्व काळातील सर्व जीव प्रकारांना जोडणारा धागा आहे. ‘जनरल मॉर्फोलॉजी ऑफ ऑर्गनिझम्स’ ही पुस्तिका अन्य जीवशास्त्रज्ञांपेक्षा सर्वसाधारण वाचकांनाच जास्त आवडली. पुढे थियोडोसियस डॉबझान्स्की या मूळच्या रशियन परंतु नंतर अमेरिकेत कार्यरत राहिलेल्या शास्त्रज्ञाने Nothing in biology makes sense except in the light of evolution हे पुस्तक लिहिले. गर्भवाढीच्या काळात तो प्राणीविशेष (individual animal) आपल्या संपूर्ण प्राणीजातीच्या उत्क्रांतीत कोणकोणत्या अवस्थांतून मार्गक्रमण करतो त्यातून जणू तो वंशेतिहासच जगतो. या निष्कर्षाला त्यांनी ‘पुनरावर्तन सिद्धांत’ (Biogenetic law) असे नाव दिले.
डॉक्टर, प्राध्यापक, चित्रकार, सागरी प्राणीशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, निसर्गतज्ञ अशा अनेक भूमिकांत हेकेल वावरले. त्यांनी इकॉलॉजी, फायलम आँटोजेनी, ‘प्रॉटिस्टा, फायलोजेनी असे अनेक नवे शास्त्रीय शब्द रूढ केले. शेकडो नव्या जातींचे वर्णन केले. त्याना योग्य नावे दिली. जमिनीवरील आणि सागरी प्राण्यांची शंभराहून जास्त रंगीत चित्रे काढली. त्यांचे संकलन करून आर्ट फॉर्म्स ऑफ नेचर हे पुस्तक प्रकाशित केले. विश्वाचे कोडे – द रिडल ऑफ युनिव्हर्स नावाचे तत्त्वशास्त्राचे पुस्तक लिहिले. तसेच शिक्षणशास्त्रात उपयोगी पडेल असे फ्रीडम इन सायन्स अँड टीचिंग हे पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी लिहिलेल्या द हिस्टरी ऑफ क्रिएशन या ग्रंथात त्यांनी आदिमानवाच्या स्थलांतराचे मार्ग (routes) कोणते असावे याचा अंदाज बांधला आहे. पुस्तकांखेरीज त्यांनी चार दीर्घ शोधनिबंध ही लिहिले. रेडिओलॅरिया, सायफोनोफोरा, मोनेरा, कॅलकॅरियस स्पॉन्जेस अशा अपृष्ठवंशीय प्राणी गटांवर त्यात विवेचन केले आहे. भारत, मलेशिया, श्रीलंका या देशांतील प्रवासाचे मुख्यतः विज्ञान विषयक अनुभवांचे वर्णन करणारी चार सचित्र पुस्तके लिहिली. त्यांचे बहुतेक लिखाण जर्मन आणि इंग्लिश भाषांत उपलब्ध आहे.
ज्यू वंशाच्या लोकांनी जर्मन संस्कृतीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी लिहिल्यामुळे हेकेल यांनी नाझी पक्षाचा रोष सहन केला, पण आपले म्हणणे बदलले नाही.
अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्यत्व, द कैसर विल्यम – दुसरे यांच्यातर्फे विशेष सन्मान, लिनियन सोसायटी ऑफ लंडनचे डार्विन –वॉलेस पदक असे सन्मान मिळाले.
जेना येथे त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- https://esajournals.onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1890/0012-9623-94.3.222
- https://www.britannica.com/biography/Ernst-Haeckel
- https://ucmp.berkeley.edu/history/haeckel.html
समीक्षक : मोहन मद्वाण्णा