डाल्टन, जॉन : (५ किंवा ६ सप्टेंबर १७६६ – २७ जुलै १८४४) आधुनिक अणूसिद्धांताचे जनक समजले जाणारे इंग्लिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन ह्यांचा जन्म इंग्लंडमधील कम्बरलॅंड प्रांतात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ईगल्सफिल्डस येथे जॉन फ्लेचर ह्यांच्या शाळेत झाले. परंतु डाल्टन १२ वर्षांचे असताना ही शाळा त्यांच्या मोठ्या भावाने चालविण्यास घेतली आणि डाल्टन भावाला मदत करण्यासाठी त्या शाळेत शिकवू लागले.
शिक्षक म्हणून काम करत असताना जॉन ह्यांचेवर इलिहू रॉबिनसन आणि जॉन गॉग ह्या दोघांचा प्रभाव पडला. ह्यांचेकडून जॉन ग्रीक, लॅटीन आणि गणित ह्यांच्या बरोबरच रोजच्या हवामानाची नोंदी करायला शिकले. ह्या नोंदणीसाठी लागणाऱ्या उपकरणांची बांधणी करायलाही ते शिकले. मग हवामानाच्या नोंदी नियमितपणे ठेवण्यास जॉन ह्यांनी सुरुवात केली. त्यांनी केलेल्या एकूण २०.००० नोंदी त्यांच्या रोजनिशीत सापडतात. ह्या नोंदींवर आधारित शोधनिबंध जॉन ह्यांनी मिटीअरालॉजिकल ऑब्ज़र्व्हेशंस ॲन्ड एसेज ह्या नावाने प्रसिद्ध केला. आपल्या ह्या कामातून हवामानशास्त्र शाखेचा पाया जॉन ह्यांनी घातला.
ह्याच वर्षी ते मँचेस्टर येथील न्यू कॉलेजमध्ये गणित शिकविण्यासाठी रुजु झाले. त्यानंतर थोड्याच दिवसात डाल्टन मँचेस्टर लिटररी ॲन्ड फिलॉसॉफिकल सोसायटीच्या सदस्यपदी निवडून आले. काही दिवसातच त्यांनी एक्स्ट्राऑर्डिनरी फॅक्ट्स रिलेटिंग टू दी व्हीजन ऑफ कलर्स हा आपला शोधनिबंध प्रसिद्ध केला. जॉन डाल्टन रंगांधळे होते. स्वानुभवातून आणि अभ्यासातून त्यांनी हा शोधनिबंध लिहीला होता. ह्यावरूनच रंगांधळेपणाला डाल्टनिझम असेही संबोधन मिळाले.
वातावरणातील वायूंच्या अभ्यासादरम्यान डाल्टन ह्यांनी समुद्रसपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर जाऊन तापमान व आर्द्रता ह्यांच्या नोंदी घ्रेतल्या. त्यासाठी इंग्लण्डच्या लेक जिल्ह्यातील डोंगर आणि टेकड्यांवर ते चढून जात असत. ह्या डोंगर दऱ्यांच्या उंचीची अचूक माहिती अधिकारवाणीने सांगू शकणार्यांपैकी डाल्टन एक होते.
आपल्या वायूंवरील विविध प्रयोगांच्या नोंदींच्या आधारावर त्यांनी १) वायूंच्या मिश्रणातील विविध घटक असणाऱ्या वायुंचा दाब, २) पाणी अथवा इतर द्रवपदार्थांच्या बाष्पामुळे वेगवेगळ्या तापमानाला हवेत आणि निर्वात पोकळीत निर्माण होणारा दाब, ३) बाष्पीभवनाची प्रक्रिया आणि ४) तापमान वाढवल्यावर होणारे वायूचे प्रसरण ह्या चार मुद्द्यांवरील आपले निष्कर्ष एक्सपरिमेंटल एसेज ह्या व्याख्यानातून लोकांसमोर मांडले.
डाल्टन ह्यांनी वायूंवरच्या प्रयोगांतून काढलेले निष्कर्ष नियमाच्या स्वरूपात मांडले. हा नियम डाल्टनचा आंशिक दाबाचा नियम म्हणून ओळखला जातो. ह्या नियमानुसार: एकमेकांशी रासायनिक प्रक्रिया न करणाऱ्या वायूंच्या मिश्रणाचा एकूण दाब हा मिश्रणातील वायूंच्या आंशिक दाबांच्या बेरजे एव्ह्ढा असतो. मिश्रणाचे पूर्ण आकारमान एका वायूने व्यापले असतां त्या वायूचा असणारा दाब हा त्या वायूचा आंशिक दाब होय.
ह्याच दरम्यान डाल्टन ह्यांनी हवेच्या आकुंचन आणि प्रसरणाचा वायूंच्या तापमानावर होणारा परिणाम आणि उष्मीय प्रसरण ह्याविषयीचे आपले सिद्धांत मांडले. मँचेस्टर लिटररी ॲन्ड फिलओसॉफीकल सोसायटीसाठी लिहिलेल्या आपल्या लेखातून डाल्टन ह्यांनी अणूभाराचा तक्ता प्रसिद्ध केला. ए न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी ह्या आपल्या पुस्तकातून डाल्टन ह्यांनी अणूभार आणि अणूसिद्धांत ह्यांचे विस्तृत विवेचन सादर केले. मूलद्रव्ये कशी ओळखता येतील ह्याचे विवेचन केले. अणू एकत्र येऊन रेणू किंवा मूलद्रव्यं कशी बनतात हे दर्शवणाऱ्या आकृत्याही ह्या पुस्तकात आहेत.
डाल्टनचा अणूसिद्धांत :
- मूलद्रव्यं अणूंनी बनलेली असतात.
- हे अणू अतिशय सूक्ष्म असून साध्या डोळ्यांना ते दिसत नाहीत.
- एका मूलद्रव्याचे अणू एकसमान असतात. परंतु वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळे असतात. प्रत्येकाचे वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्मही वेगळे असतात.
- अणूंचे विभाजन होऊ शकत नाही/करता येत नाही. त्याचप्रमाणे अणू निर्माण करता येत नाहीत किंवा विनाशही पावत नाहीत.
- कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भिन्न मूलद्रव्यांचे अणू संमीलीत किंवा विभक्त होताना दिसतात. अणूंचे मीलन अथवा विभक्तिकरण नेहमी पूर्णाकांच्या गुणोत्तरांत होताना दिसते.
ह्याव्यतिरीक्त डाल्टन ह्यांनी पाऊस, दंव, झऱ्याचा उगम, उष्मा, आकाशाचा रंग, परावर्तन, अपवर्तन इत्यादी विविध विषयांवर संशोधन केले. विज्ञानाखेरीज इंग्रजी भाषेच्या व्याकरणावरही त्यांनी पुस्तक लिहिले.
आपल्या कारकीर्दीत जॉन डाल्टन ह्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यांच्या कामाच्या सन्मानाप्रित्यर्थ अणूभाराचे एकक डाल्टन म्हणून ओळखले जाते. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या अकार्बनी विभागाला डाल्टन डिव्हीजन असे नाव देण्यात आले आहे. रॉयल सोसायटी ऑफ लंडन आणि रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो ह्यांच्या सदस्यपदी डाल्टन निवडून आले होते. तर फ्रेंच अकॅडमी ऑफ सायंसेसच्या विदेशी सदस्यांपैकी ते एक होते. चंद्रावरच्या एका विवराला डाल्टन ह्यांचे नाव देण्यात आले आहे. मँचेस्टर विद्यापीठाच्या शास्त्र आणि अभियांत्रिकी शाखेच्या इमारतीला डाल्टन ह्यांचे नाव देण्यात आले आहे. मॅन्चेस्टर विद्यापीठात रसायनशास्त्र आणि गणितासाठी डलल्टन ह्यांच्या नावे शिष्यवृत्या दिल्या जातात तर प्राकृतिक इतिहासाच्या अभ्यासकाला पारितोषिक दिले जाते. रॉयल मँचेस्टर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशदालनात आणि मँचेस्टर टाऊनहॉलमध्ये डाल्टन ह्यांचा पुतळा बसविलेला आहे.
वयाच्या ७७ व्या वर्षी डाल्टन ह्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/John-Dalton
- https://www.thefamouspeople.com/profiles/john-dalton-php
- https://www.biography.com/scientist/john-dalton
- https://en.wikipedia.org/wiki/John_Dalton#/media/File:John_Dalton_by_Charles_Turner.jpg
समीक्षक : सुधीर पानसे