जिचकार, श्रीकांत. (१४ सप्टेंबर १९५४ – २ जून २००४). महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षणविद, राजकीय व्यक्तिमत्त्व. बहुआयामी शैक्षणिक यशासाठी सुप्रसिद्ध. नागपूर जिल्ह्यातील आजानगाव येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण नागपूर येथे माउंट कार्मेल स्कूल व त्यानंतर एस. एफ. एस. स्कूल, एस. एफ. एस. कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर महाविद्यालय व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात त्यांनी शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळातच त्यांनी समाजकारणास सुरुवात केली होती. नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सदस्य (१९७२-७३); स्टुडंट्स असोसिएशन ऑफ मेडिकल कॉलेज, नागपूर युनिव्हर्सिटी कल्चरल सोसायटी या संस्थांचे महासचिव; स्टुडंट्स कॉसिल ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट (१९७६-७७), नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघ (१९७७-७८) या संस्थांचे अध्यक्ष अशा विविध पदावर अल्पवयातच त्यांना नियुक्ती मिळाली होती. १९७८ मध्ये युरोपीय देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय युवक शिष्टमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले होते. या सर्व उपक्रम आणि संस्थात्मक कार्यात त्यांनी त्यांच्या बुद्धिकौशल्याची चुणूक दाखविली. पुढे महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय विद्यापीठीय फी संतुलन समिती, दक्षिण-पूर्व रेल्वे सल्लागार समिती (१९७५-७७), आकाशवाणी नागपूर, युवा सल्लागार समिती, मेडिकल कॉलेज व्हिजीटर्स बोर्ड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर विधीसभा या संस्थांचे सदस्य; महाराष्ट्रातील विद्यापीठ विद्यार्थी संघ संयुक्त समितीचे महासचिव; आशिया खंडाकरिता विकसनशील देशातील युवक चळवळीचे केंद्र या संस्थेचे कार्यकारी सचिव अशा पदावरही त्यांनी यशस्वी कार्य केले. श्रीलंकेला गेलेले भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व शैक्षणिक शिष्टमंडळ (१९७५), इराकमधील बगदाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी नेत्यांची बैठक व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्रीय परिसंवादात भारतीय विद्यार्थी शिष्टमंडळ (१९८०) यांचे नेतृत्वही त्यांनी केले.

प्रारंभी भारतीय पोलिस सेवा (१९७८) व नंतर भारतीय प्रशासनिक सेवा (१९८०) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. काटोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड झाल्यापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली (१९८०).  विधानसभेत सर्वांत कमी वयाचे आमदार म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. तत्कालीन महाराष्ट्र सरकारमध्ये गृहराज्यमंत्री या पदाची जबाबदारी त्यांना मिळाली होती (१९८२-८३). सामान्य प्रशासन, महसूल, पुनर्वसन, अर्थ, नियोजन, माहिती व जनसंपर्क, वैद्यकीय शिक्षण व औषधी, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, तुरुंग, अर्बन लैंड सिलिंग इत्यादी विषयांचा कार्यभार त्यांना यावेळी मिळाला होता. हे सर्व राजकीय आणि प्रशासकीय कार्य करीत असताना शासन म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्शणाऱ्या अनेक विषयात त्यांनी कधी सदस्य, सल्लागार आणि अध्यक्ष म्हणून कार्य केले. महाराष्ट्र राज्य एन. एस. यु. आय.(अध्यक्ष, १९८०-८३), महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस (महासचिव, १९८१-८३), शासनाच्या विविध वैधानिक समित्या, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ उच्चस्तरीय समिती, सिंचन विभागात उच्चस्तरीय समिती, रिसोर्सेस मोबिलायझेशन कमिटी, संत्रा प्रक्रिया प्रकल्प समिती, राज्य ग्रंथालय परिषद, आजारी साखर कारखान्यांच्या समस्यांकरिता समिती, मुंबईतील कापडगिरण्यांच्या आर्थिक परिस्थितीवर उच्चस्तरीय समिती, विधीमंडळ ग्रंथालय समिती, राज्य कृषिमूल्य आयोग, राज्य शेती विकास महामंडळ (अध्यक्ष १९८२) इ. समित्यांवर आणि संस्थांवर त्यांनी कार्य केले .

१९८६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड झाली होती. विधान परिषदेतही सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. या काळातही त्यांनी सामान्य प्रशासन, अर्थ, उर्जा, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार इ. खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला (१९८६-८८). १९९० मध्ये कॅनडा येथे राष्ट्रकूल सांसदीय काँग्रेसकरिता जाणाऱ्या आमदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले होते. १९८६-९२ या काळात त्यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तसेच लायब्ररी कमिटी, एस्टिमेट्स कमिटी, रूल्स कमिटी प्रिव्हिलेज कमिटी इत्यादीवर कार्य केले आहे. महाराष्ट्रातून त्यांची खासदार म्हणून राज्यसभेसाठी निवड झाली होती (२५ जून १९९२). राज्यसभेत एका दिवशी सर्वात जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे.  राज्यसभेवर खासदार असण्याच्या कालखंडात त्यांनी सांसदीय स्थायी समिती (अर्थ), सांसदीय स्थायी समिती (मनुष्यबळ विकास), संयुक्त सांसदीय समिती (पेटेंट्स), ग्रंथालय समिती, खासदारांना संगणक उपलब्ध समिती, रेल्वे कन्वेशन कमिटी, मध्य व दक्षिण-पूर्व रेल्वेच्या विभागीय समित्या इत्यादींवर कार्य केले आहे (१९९२-९९). अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे खासदारनिधीतून विकासकार्य त्यांनी केले आहे.

१९९३ मध्ये संस्कृत विद्यापीठाच्या स्थापनेकरिता शासनाच्या एक सदस्यीय समितीचे ते अध्यक्ष होते. रामटेक येथे देशातील पहिल्या व एकमेव कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे पहिले कुलाधिपती हे पद त्यांनी भूषविले आहे. नागपुरातील ‘सांदीपनी’ शाळेचे ते संस्थापक होत. राजकीय कार्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहे. आपल्या परंपरा व संस्कृतीचे रक्षण व पुनरुत्थान करण्याच्या उद्देशाने स्वतःचा विवाह त्यांनी वैदिक पद्धतीने लावला होता. शाळेमध्ये सामुहिक उपनयन, जन्माष्टमी, पोळा इ. उपक्रम ते राबवायचे. नागपूर येथे बहुचर्चित अग्निष्टोम सोमयज्ञाचे आयोजन केल्यामुळे ‘आहिताग्नी’, ‘दीक्षित’, ‘सोमयाजी’ इ. उपाधी त्यांना प्राप्त होत्या. स्पेन येथे जागतिक धार्मिक नेत्यांच्या बैठकीत हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले होते (२००३). वेद व वेदांताचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्ह्यात बाजारगावजवळील वेदपुरी येथे ‘आर्षविज्ञान गुरुकुलम्’च्या शाखेची सुरुवात त्यांनी केली आहे. शंकराचायांच्या पीठारोहण समारोहात कांचीच्या शंकराचार्याकडून त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले होते.

आरोग्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय समाजकार्य केले आहे. ‘एम फॉर सेवा’ (ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा) या सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. नॅशनल एड्स कमिटीचे सदस्य म्हणून कार्य करताना विविध ठिकाणी एड्स तपासणी शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे.  मेळघाट मधील कुपोषणासाठी मदतकार्यही त्यांनी केले. मुख्यमंत्री रोजगार मार्गदर्शन योजनेचा महाराष्ट्रभर भाषणांद्वारे प्रसार करून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ते रोजगाराविषयी सतत मार्गदर्शन करीत असत. केंद्रीय अर्थसंकल्प, राष्ट्रीय नद्या जोडणी प्रकल्प, इराक- अमेरिका युद्ध इत्यादी व अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अभ्यासपूर्ण व्याख्यान त्यांनी दिली आहेत. विविध विषयांवरील सुमारे ५२,००० पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय त्यांनी निर्माण केले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. अभ्यासपूर्ण आकडेवारीतून स्वतंत्र विदर्भाच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीची मांडणी त्यांनी केली आहे. Explorations in the Economic Theory of Socialism, White Paper on Public Finance of Vidarbha व राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकणारे गुद्दे आणि मुद्दे या तीन पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक संस्थांकडून पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. विद्यापीठातील अनेक पदव्या सुवर्णपदकांसह त्यांनी प्राप्त केल्या आहेत. विद्यापीठातील सर्वोच्च सन्मान ‘डि. लिट.’ नागपूर विद्यापीठाकडून संस्कृत विषयात त्यांना प्राप्त आहे. आंतरराष्ट्रीय रोटरी तर्फे युथ मेरिट अवार्ड, जेसी इंटरनॅशनल तर्फे चीनमध्ये टेन आउटस्टैंडिंग यंग पर्सन्स पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विद्यापीठातील अनेक पदव्या प्राप्त केल्यामुळे जगातील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. विदर्भ सहायता समिती, नागपूर फ्लाइंग क्लब, आय.आय.पी.ए., भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या संस्थांचे सदस्य तर सेंट्रल इंडिया रिसर्च फाउंडेशन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अमॅच्युअर रेडियो आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (२००३) या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

अमरावती-नागपूर महामार्गावर अपघातामुळे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : मराठी विश्वकोश वार्षिकी २००५.