वात, पित्त व कफ यांना आयुर्वेदात त्रिदोष म्हणतात. हे तीन घटक मानवी शरीराच्या अंतर्बाह्य अस्तित्वाला व क्रियांना कारणीभूत असतात. गर्भनिर्मितीच्या पहिल्या क्षणापासून हे तीन दोष शरीरात विशिष्ट प्रमाणात व अनुपातात उपस्थित असतात. त्यांच्या तर-तमतेमुळे प्रत्येक शरीरात आपल्याला वैविध्य व वैशिष्ट्य दिसते. यालाच त्या व्यक्तिची प्रकृती किंवा दोषप्रकृती म्हणतात.

त्रिदोषांच्या वर्णनात सांगितल्या प्रमाणे या ठिकाणी तीन दोषांमधली तरतमता, हे त्यांच्यातले असंतूलन भासू शकते. परंतु, या तरतमतेमुळे शरीरात रोज घडणाऱ्या क्रियांमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होत नाही, त्यामुळे ही तरतमता दु:खदायक नसते. या उलट प्रत्येकाच्या ठिकाणी स्वभावत:च असलेली दोषांची तरतमता ही त्या व्यक्तीच्या शरीर वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य व त्याच्या शरीरात घडणाऱ्या क्रियांसाठी कारणीभूत व आधारभूत असते. म्हणून या तरतमतेस विकृती न मानता प्रकृती म्हटले जाते. परंतु, जर कधी प्रकृती निर्मितीसाठी ज्या प्रमाणात व अनुपातात दोष एकत्र आले असतात त्या प्रमाणात व अनुपातात बदल घडला तर ते असंतूलन ठरते. याला विकृती म्हणतात, ज्यामुळे रोग होतात.

एकंदरीत सात प्रकारच्या प्रकृती असतात. वात, पित्त व कफ यांपैकी एकेकाच्या प्रबलतेमुळे तयार होणारे तीन प्रकार म्हणजे अनुक्रमे वातज, पित्तज व कफज प्रकृती. त्यांना एकदोषज प्रकृती म्हणतात. तीन दोषांपैकी कुठल्याही दोघांच्या प्राबल्याने तयार होणारे आणखी तीन प्रकार म्हणजे वातपित्तज, पित्तकफज व कफवातज प्रकृती. यांनाच द्वंद्वज प्रकृती असेही म्हणतात. तर तीनही दोषांच्या प्राबल्यामुळे तयार होणारी सातवी प्रकृती जिला समप्रकृती असेही म्हणतात. प्रत्येकाच्या ठिकाणी असणाऱ्या विशिष्ट शरीर मानस लक्षणांवरून वैद्य रूग्णाची प्रकृती ओळखतात. रोग्याला तपासण्यासाठी ज्या दहा मुद्यांचा विचार केला जातो त्यात प्रकृतीचा अंतर्भाव आहे. या दहा मुद्यांना दशविध परिक्षा म्हणतात. रूग्णाच्या प्रकृतीनुसार त्याचा रोग किती कालावधीत बरा होईल याचा अंदाज बांधण्यात येतो. याशिवाय रूग्णास कोणते औषध द्यावे, कोणते पथ्य सांगावे हे देखील प्रकृतीवरून ठरविण्यात येते.

प्रकृतीची निर्मिती गर्भ तयार होण्याच्या पहिल्या क्षणापासूनच होते. गर्भाच्या निर्मितीसाठी स्त्रीबीज व पुरूषबीज यांचा संयोग होत असताना जे दोष प्रबल असतात, त्यांची अभिव्यक्ती पुढे प्रकृती म्हणून होते. तीन दोषांपैकी नेमके कुठले दोष प्रबल ठरावे हे संयुक्त होणाऱ्या स्त्री व पुरूषबीजाच्या स्वत:च्या प्रकृतीवर अवलंबून असते. याशिवाय त्यावेळी गर्भाशयात जे दोष प्रबल असतील व बाहेरच्या वातावरणात जे महाभूत प्रबल असतील त्यांवर सुद्धा प्रकृतीकारक दोषांचे प्राबल्या अवलंबून असते. या सर्वांच्या एकत्रित प्रभावाने तीन पैकी एक किंवा दोन किंवा तीनही दोष प्रबल होऊन त्या गर्भाची व अंतत: त्या व्यक्तीची प्रकृती ठरते. या सात प्रकृतींपैकी सम प्रकृतीची व्यक्ती सहसा आजारी पडत नाही; तर एकज किंवा द्वंद्वज प्रकृतींच्या व्यक्तीचा आजारी पडण्याकडे कल जास्त असतो. माणसाची ही प्रकृती जन्मभर कायम असते, त्यात बदल होत नाही.

पहा : कफदोष, दोष (त्रिदोष), पित्तदोष, वातदोष.

संदर्भ :

  • चरक संहिता — विमानस्थान अध्याय ८, श्लोक ९५.
  • चरक संहिता — विमानस्थान अध्याय ६, श्लोक १३, १४, १५.
  • सुश्रुत संहिता — शारीरस्थान अध्याय ४, श्लोक  ६१, ६२, ७८, ७९.

समीक्षक : जयंत देवपुजारी