सातत्याने सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे किंवा अनियमित पाऊस पडल्यामुळे किंवा काहीच पाऊन न पडल्यामुळे एखाद्या प्रदेशात निर्माण होणारी जलीयस्थिती म्हणजे अवर्षण होय. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे बहुसंख्य लोक शेतीवर आपली उपजीविका करतात. याच शेतीक्षेत्रावर आधारित अनेक रोजगार निर्माण केले जातात. त्यामुळे शेतीक्षेत्रावर अवर्षणाचा मोठा परिणाम होतो. त्यावर योग्य व लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही, तर अवर्षणाचे दुष्काळ या दुष्टचक्रात रूपांतरण होते. अन्नधान्य आणि पाणी यांची तीव्र टंचाई म्हणजे कोरडा दुष्काळ होय.

अवर्षणाचा पर्जन्यमानाच्या अभावाशी जवळचा संबंध आहे. जगभरात सर्वांत तीव्र अवर्षण परिस्थिती ही आफ्रिका खंडात निर्माण होते. त्याच प्रमाणे, दक्षिण ब्राझील, पेरू, उत्तर चिली, अटाकामा वाळवंट, आशिया खंड, सौदी अरेबिया, इराण, इराक, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया हे जगातील प्रमुख अवर्षण प्रवण प्रदेश आहेत. भारतीय वातावरण विज्ञान विभागाने निश्चित केलेले निकष व राष्ट्रीय कृषी आयोग अहवालामध्ये नोंद केल्याप्रमाणे सामान्य पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त कमतरता असेल, तर तीव्र अवर्षण आणि २५ ते ५० टक्के कमतरता असेल, तर त्यास मध्यम अवर्षण समजले जाते.

अवर्षणाची तीव्रता हे पावसाच्या कमतरतेचे प्रमाण, कोरड कालावधी आणि अवर्षणग्रस्त क्षेत्राचा आकार या तीन बाबींवर अवलंबून असते. अवर्षणाची तीव्रता निश्चित करण्यासाठी अवर्षणाचा कालावधी महत्त्वाचा असतो. मध्यम स्वरूपाचे अवर्षण जर प्रदीर्घ काळासाठी राहिले, तर त्याचा दुष्परिणाम हा अल्प व तीव्र अवर्षणापेक्षा जास्त होऊ शकतो. त्याच प्रमाणे अवर्षणाची तीव्रता ही अवर्षणग्रस्त क्षेत्राचा आकार यावरदेखील अवलंबून असते. आकाराने लहान असलेले स्थानिक अवर्षणग्रस्त भाग हे बहुदा राज्य व देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवू शकत नाही. अवर्षण ही नैसर्गिक आपत्ती असली, तरी मानवी क्रिया व मानवी हस्तक्षेप त्यास जबाबदार असतात. उदा., जंगलतोड, खाणींचा विस्तार, नैसर्गिक साधनांचा अनियंत्रित वापर, प्रदूषण, अणुचाचण्या इत्यादी. जमीन वापराच्या व्यवहारामध्ये बदल, जंगलतोड, अतिरिक्त चाऱ्याचा जनावरांकडून चरण्यासाठी वापर इत्यादींमुळे उत्सर्जित किरणांचा समतोल बिघडतो. प्रदूषण, धूर व धुके यांचे मिश्रण, मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होणारे अपायकारक वायू (कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड इत्यादी) यांमुळे तापमान बदल होऊन हवामानात बदल होतो आणि याचा परिणाम पर्जन्यमानावर होतो. जेव्हा अवर्षण या नैसर्गिक आपत्तीचा शेती व अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतो, तेव्हा दुष्काळ पडतो. पावसाअभावी पिकांवर येणारे संकट हा दुष्काळाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे.

अवर्षण प्रकार : भारतामध्ये प्रमुख तीन प्रकारचे अवर्षण आढळून येतात.

(१) वातावरणविषयक अवर्षण : हवामान व आर्द्रता यांमधील बदल, ओझोन स्तराचा ऱ्हास, जागतिक तापमान वृद्धी, प्रदूषण यांमुळे वातावरणीय बदल होऊन त्याचा अवर्षणावर परिणाम होतो.

(२) जलविषयक अवर्षण : भूपृष्ठावरील पाण्याची पातळी कमी कमी होते; तलाव, जलाशय, नद्या कोरडे पडू लागतात; अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे पर्वतरांगांतील नैसर्गिक झरे आटू लागतात; हा एक जलविषयक अवर्णणाचा प्रकार आहे.

(३) कृषीविषयक अवर्षण : पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने पिकांच्या निरोगी वाढीसाठी मातीची आर्द्रता कमी होते. पाण्याची भूजलपातळी अधिक खालावली जाते. त्यामुळे पाणी सिंचन करण्यास अडथळा येतो.

अवर्षणाचे दुष्काळात रूपांतर : राष्ट्रीय आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जागतिक स्तरावर अंदाजे ५ कोटी ५० लाख दशलक्ष लोकांना अवर्षणामुळे त्रास होतो. जागतिक पातळीवर अवर्षणाचा सामना सर्व देशांना कमी अधिक प्रमाणात करावा लागतो; मात्र प्रगत देशांत बरेचदा सरकारी कार्यक्रम आणि खासगी उपाययोजना राबवून दुष्काळ परिस्थिती व त्याची तीव्रता कमी केली जाऊन निवारण करण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे प्रगत देशांत आपणास दुष्काळ परिस्थिती दिसून येत नाही; मात्र तिसऱ्या जगामध्ये दुष्काळ परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र व भयानक होताना दिसून येते. अवर्षण या नैसर्गिक घटनेचे दुष्काळ या सामाजिक घटनेत रूपांतर होते. त्यामुळे ही केवळ नैसर्गिक आपत्ती राहत नाही. अवर्षण हे दुष्काळाचे तात्कालिक कारण आहे. अवर्षणामुळे उद्भवलेल्या दुष्काळांची संख्या जास्त असलेली दिसून येते. एकोणिसाव्या शतकामध्ये अवर्षणामुळे संपूर्ण भारतात साधारणपणे २५ मोठे दुष्काळ पडले होते. ज्यामुळे सुमारे २ ते ३.२५ कोटी लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये १९७२ मध्ये कोरडा दुष्काळ पडला होता. त्यानंतर अनेकदा कोरडे आणि ओले दुष्काळ पडून गेले; मात्र त्यांची गणना व नोंद फार कमी प्रमाणात झाली. कौन्सिल ऑन एनर्जी, एन्वार्नमेंट अँड वॉटर (सीईईडब्ल्यू) या दिल्लीस्थित संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या ५० (१९७० ते २०१९) वर्षांमध्ये अवर्षणाचे प्रमाण हे ७ पटीने वाढल्याचे नमूद केले आहे. त्याच प्रमाणे या अहवालात असे नमूद करण्यात आले की, अलीकडील काळात औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि सांगली यांसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत गेल्या दशकात पूर परिस्थिती आणि वादळ वाढीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

अवर्षणामध्ये पाणी टंचाई निर्माण होऊन उत्पादनावर परिणाम होते आणि दुष्काळ परिस्थिती ओढावते. अवर्षणाचा सर्वांत जास्त फटका हा शेती व शेतीसंबंधित उद्योगांवर पडतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक सत्तासंबंध, नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण यांमुळे दुष्काळ परिस्थिती आणखी गंभीर स्वरूप धारण करते. सरकारी शेतीविषयक व औद्योगिक धोरणे, हमी भाव नसणे, रोजगार संधींचा अभाव, कीटकनाशके, संकरित (हायब्रीड) बियाणे, खते यांमागे आर्थिक व सामाजिक घटक काम करताना दिसतात. उदा., आंतरराष्ट्रीय कीटकनाशके, बियाणे या कंपन्यांचा नफा वाढविण्यासाठी तिसऱ्या जगाकडे बाजारपेठ म्हणून बघितले गेले. या कंपन्यांनी आपली उत्पादने सवलतीच्या दराने तिसऱ्या जगात विकली. येथील राजकीय अर्थव्यवस्थादेखील पहिल्या जगातल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून कर्ज घेत असल्यामुळे हे बियाणे, कीटकनाशके शेतकऱ्यांनी विकत घ्यावे यावर भर देते. पहिल्या आणि तिसर्‍या जगातील आर्थिक, राजकीय संबंध समजून घेण्यासाठी भारतात घडवून आणलेली हरित क्रांती हे उत्तम उदाहरण आहे. बहुतांश वेळा हरितक्रांतीमधून झालेले फायदे अधोरेखित केले जातात; मात्र त्यातून झालेले नुकसान पाहिले जात नाही. हरित क्रांती तंत्रामुळे पिकांना अधिक पाणी लागते. तसेच मातीची सुपीकता कमी होणे, मातीची झीज होणे, मातीतील विषारीपणा वाढणे व मृदुजल घटणे, भूमिगत पाण्याचे प्रदूषण वाढणे, परिणामी पाण्याची टंचाई वाढून त्याचे दुष्काळात रूपांतर होण्याच्या शक्यता वाढणे यांसारखे विपरित परिणाम दिसून येतात.

मध्यम अवर्षण परिस्थिती असली, तरी मध्यम व लहान शेतकरी, अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजूर या सर्वांवर वाईट परिणाम होताना दिसून येतो. यातून सावरण्यासाठी बहुतांश लोक कर्ज घेतात. सावकारी, जमीनदारपद्धती भारतात अस्तित्वात असल्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊन जमीनीवर, पीकपद्धतीवर आणि एकंदरीत त्यांच्या राहणीमानावर दुष्परिणाम होतो. त्याच प्रमाणे टँकर, चारा छावणीमध्ये व्यापारी व राजकीय जाळे निर्माण झाल्याचे दिसून येते. यातून साठेबाजी, मक्तेदारीला वाव मिळतो आणि अवर्षणातून निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती निवारण्याऐवजी ती व्यापाऱ्यांच्या, भांडवलदारांच्या नफ्यासाठी टिकविली जाते. दुष्काळाचे राजकारण करून काही राजकीय समूह, भांडवलदार नफा करून घेतात. त्यातून टँकर, चारा छावणी घोटाळा असे नवीन प्रश्न उत्पन्न होतात. नफेखोरी करणाऱ्यांना दुष्काळ आवडतो; मात्र गरीब जनता भरडून निघते.

अवर्षण व दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि लिंगभाव : दुष्काळामुळे अन्नटंचाई आणि उत्पन्न नुकसानीमुळे कुटुंबावर संकट ओढावते. अल्प भूधारक तसेच भूमिहीन शेतकरी यांच्याकडे इतर मिळकतीचे साधन नसल्याने कर्ज काढणे अथवा मालमत्ता विकणे असे पर्याय ते निवडतात. यातून मिळणारा पैसा अन्न आणि इतर जीवनावश्यक बाबींवर खर्च केला जातो. दुष्काळामध्ये पुरुषांचे रोजगाराच्या शोधासाठी शहराकडे स्थलांतर वाढते, तर स्त्रिया यामागे राहून मुले आणि वयस्कर लोकांची काळजी घेतात. अवर्षण परिस्थिती गंभीर असल्यामुळे स्त्रियांना दूरवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते. या संपूर्ण काळात आहाराच्या रचनेमध्ये आणि गुणवत्तेमध्ये घसरण होताना दिसून येते. मुख्यतः स्त्री आणि पुरुषांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थानानुसार दुष्काळाचा वेगवेगळा अनुभव येतो. ग्रामीण व निमशहरी भागात लोकांना, विशेषत: स्त्रियांना, दुष्काळात अन्न व पाणीटंचाई आणि त्यातून उद्भवणाऱ्या अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, असे विविध अभ्यासामधून समोर आले आहे. स्वच्छ पाण्याच्या कमतरतेमुळे व बदललेल्या आहारातील रचनेमुळे स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पाळीच्या समस्या, अशक्तपणा, ताप अशा अनेक समस्यांना स्त्रिया बळी पडतात. त्याच प्रमाणे त्यांच्यावर कामाचा बोझा वाढतो.

अवर्षणाचे परिणाम : अवर्षणाचे मुख्यता अल्पकालीन व दीर्घकालीन असे दोन परिणाम आहेत.

अल्पकालीन परिणाम : अल्पकालीन आवर्षणाची अनेक लक्षणे किंवा परिणामे दिसून येतात.

  • पिकांचे नुकसान व शेती विषयक उत्पन्नात घट होते.
  • मान्सून पावसाचे प्रमाण घटते.
  • जनावरे व इतर पशु-पक्षांचे नुकसान होते.
  • पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात घट होते.
  • जलविद्युत शक्तीच्या निर्मितीमध्ये घट होते.
  • औद्योगिक उत्पादनात घट होते.
  • जमीनीची धूप होते.

दीर्घकालीन परिणाम : दीर्घकालीन आवर्षणाची अनेक लक्षणे किंवा परिणामे दिसून येतात. (१) गरिबी व उपासमार वाढते. (२) रोगराई पसरणे व मृत्यूसंख्या वाढते. (३) उपजीविकेचे साधन नष्ट होते अथवा संधी कमी होऊन स्थलांतरामध्ये वाढ होते. (४) दुष्काळ परिस्थिती उद्भवते. (५) राहणीमानावर विपरित परिणाम होतो. (६) पर्यावरणीय बदल होते. उदा., खुरटी रोपटे, गवताच्या वाढीमध्ये घट, जमीनीची धूप होणे, मातीची आद्रता कमी होणे, पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटणे इत्यादी. (७) ओसाडीकरण किंवा वाळवंटीकरण होते. उदा., दख्खनचा काही भाग. तसेच वाळवंट वाढ, जमीनीला भेगा पडणे इत्यादी.

अवर्षणाचे पुढीलही परिणाम आहेत. (१) आर्थिक परिणाम : उत्पन्न घटणे, शेती आधारित उद्योगांवर विपरित परिणाम, शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होणे, जगण्याची गुणवत्ता खालावणे, पुरवठ्याची साखळी खंडित होणे इत्यादी कारणांमुळे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) कमी होते. (२) पर्यावरणावर परिणाम : अवर्षणामुळे भूजलसाठा कमी होणे; जलाशय, तलाव आटणे; वन्यजीवन विसकळीत होणे; जैवविविधतेवर विपरित परिणाम होणे; मातीच्या उत्पादकतेचे नुकसान होणे इत्यादींमुळे अवर्षणाचा पर्यावरणावर परिणाम होतो. (३) सामाजिक परिणाम : स्थलांतर वाढते; शाळेतील गळतीचे प्रमाण वाढते (विशेषत: मुलींची); गरीबीच्या प्रमाणात वाढ होते; कुपोषण, उपासमार वाढते; सामाजिक दर्जा घसरतो; आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात इत्यादी.

अवर्षणावर उपाययोजना : भारतासाठी अवर्षण व दुष्काळ नवीन घटना नाही. वेगवेगळ्या कालखंडात अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आता तिची वारंवारता वाढलेली दिसून येते. अवर्षण व दुष्काळ परिस्थितीमध्ये सुखटणकर समिती, केळकर समिती, चितळे समिती इत्यादींनी उपाययोजना व उपयुक्त अशा सूचना केल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय सिंचन आयोगाचा अहवाल (१९७२), राष्ट्रीय जल संसाधन परिषद, त्वरित सिंचन लाभ कार्यक्रम (एआईबीपी), रिपेअर, रिनोव्हेशन अँड रेस्टोरेशन ऑफ वॉटर बॉडीज इत्यादी कार्यक्रमही राबविण्यात आले आहेत; मात्र त्यांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. झपाट्याने होणारा हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, अतिरिक्त सिंचन, बांधकाम, नैसर्गिक साधन संपत्तीचा अनियंत्रित वापर इत्यादींचा परिणाम अवर्षणावर होताना दिसून येतो. यावर पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे.

  • पाण्याचे नियोजन किंवा पृथक्करण करणे.
  • जंगल व पर्यावरणाचे संवर्धन करणे.
  • रेनहार्वेस्टिंग करणे.
  • नैसर्गिक स्रोतांचे जतन व संवर्धन करणे.
  • सौरऊर्जा प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करणे.
  • जनावरांच्या चाऱ्यांचे नियोजन करणे.
  • अवर्षण भागातील परिस्थिती लक्षात घेऊन पिकांची निवड व नियोजन करणे.
  • मातीचे संवर्धन करणे.
  • जंगलतोड थांबवून जंगलांचे संवर्धन करणे.
  • प्रभावित क्षेत्रातील लोकांना सरकारने रोजगार उपलब्ध करून देणे.
  • विविध योजना राबविणे, (१२) जमीन, जंगल, पाणी संवर्धन व नियोजन यांमध्ये लोकसहभाग वाढविणे.
  • जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणणे.
  • शेतीक्षेत्राला आर्थिक स्थैर्य देणे.
  • बिगर शेती व्यवसाय व उद्योगधंद्यांचा विकास व रोजगार संधी उपलब्ध करून देणे.
  • पाटबंधारे योजना राबविणे.
  • राजकीय फायदा साधणाऱ्यांवर आळा घालणे इत्यादी.

यांव्यतिरिक्त भूपृष्ठजल, भूजलपातळी व सिंचनाचा विकास करणे, पाण्याचे विस्तृत व न्याय्य वाटप करणे, अवर्षण भागात भांडवल गुंतवणूक व रोजगार संधींमध्ये वाढ करणे, उद्योगधंद्यांना लागणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी उपाययोजना राबवून अवर्षण आणि त्यातून उद्भवणारी दुष्काळ परिस्थिती यांवर नियंत्रण मिळविले जाऊ शकते.

संदर्भ :

  • घोटाळे, विवेक; कांता, अभय, महाराष्ट्रातील दुष्काळ, पुणे, २०१६.
  • देसाई, दत्ता, महाराष्ट्रातील दुष्काळ, पुणे, १९८७.
  • साईनाथ, पी., अनु. कर्णिक, हेमंत, दुष्काळ आवडे सर्वांना, मुंबई, २०१२.
  • Economic and Political Weekly, 2018.

समीक्षक : दत्ता देसाई

https://www.ndtv.com/video/news/news/maharashtra-drought-fields-parched-261820?t=33


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.