विविध कंपन्यांचे भाग, ऋणपत्रे, रोखे, प्रत्ययपत्रे इत्यादींचे क्रय-विक्रय करणारे स्थान म्हणजे समभाग बाजार (शेअर मार्केट) होय. समभाग बाजाराचा विकास आणि विस्तार हा देशाच्या आर्थिक विकासाचा निदर्शक मानला जातो. भाग बाजारात विविध उद्योग समूहांचे, कंपन्यांचे समभाग, ऋणपत्रे, रोखे, प्रत्ययपत्रे यांची खरेदी-विक्री होत असली, तरी त्यामध्ये समभागाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. समभागाचे मुखत: प्राधान्य समभाग आणि सामान्य समभाग असे दोन प्रकार पडतात.

प्राधान्य समभागाला प्राधान्य भाग, प्राधान्यकृत स्टॉक, प्राधान्यकृत भाग, प्राधान्यक्रम असलेले भाग इत्यादी नावाने उच्चारले जाते. अमेरिकेमध्ये मेरीलँड इंटर्नल इम्प्रुव्हमेंट कंपनीने इ. स. १८३६ मध्ये प्राधान्य समभागाच्या आधारे भांडवल उभारण्यास सुरुवात केली. प्राधान्य समभाग एकप्रकारचा साठा आहे, ज्यामध्ये कोणत्याही समभागांचे कोणतेही मिश्रण असू शकते. यामध्ये इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंट या दोन्हीचे गुणधर्म समाविष्ट नसून ते सामान्यत: एक हायब्रीड इन्स्ट्रुमेंट मानले जाते. प्राधान्य समभाग सामान्य समभागापेक्षा भिन्न असतात. सामान्य समभागांना कंपनीचे सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार असतो; मात्र हा अधिकार प्राधान्य समभागधारकाला नसतो. लाभांशाचे वाटप होताना मात्र प्राधान्य समभागाला सामान्य समभागापेक्षा आधी लाभांश दिला जातो. कंपनीचे दिवाळे निघाल्यास प्राधान्य समभागधारकाला त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम कंपनी मालमत्ता विकून परत करते.

प्राधान्य समभागाचे प्रकार :

  • एकत्रित प्राधान्य समभाग : कंपनीने एखाद्या वर्षी प्राधान्य समभागाला लाभांश दिला नाही, तर अशा वेळी कंपनी येणाऱ्या पुढील वर्षात किंवा ज्यावर्षी कंपनी लाभांश देण्याची घोषणा करते, त्या वेळी मागील लाभांशही कंपनीला द्यावा लागतो. प्राधान्य समभागधारकांना हा लाभांश सामान्य समभागधारकाअगोदर प्राप्त होतो.
  • बिगर एकत्रित प्राधान्य समभाग : या प्रकारामध्ये लाभांशाचा संचय होत नाही. एखाद्या वेळी कंपनीने लाभांश न दिल्यास पुढे तो कधीही प्राप्त होत नाही. सर्वसामान्यपणे कंपनीला प्राधान्य समभागधारकांना लाभांश नफ्यामधून द्यावा लागतो; मात्र एखाद्या वर्षी कंपनीला नफा मिळाला नसेल, तर त्या वेळी कंपनी लाभांश देत नाही, म्हणजेच प्राधान्य समभागधारकांचा लाभांश जमा होत नाही.
  • समभाग असणारे प्राधान्य समभाग : या प्रकारामध्ये समभागधारकांना ठरलेला लाभांश मिळतो, तर काही वेळा अटींनुसार थोडाफार लाभांश प्राप्त होतो. ज्या वेळी कंपनी आपले व्यवहार व व्यवसाय बंद करते, त्या वेळी उर्वरित रकमेमध्येसुद्धा भागधारकाला हिस्सा प्राप्त होत असतो.
  • समभाग नसणारे प्राधान्य समभाग : या प्रकारातील समभागधारकांना केवळ ठरलेला लाभांश मिळत राहतो.
  • परिवर्तनीय प्राधान्य समभाग : या प्रकारामध्ये प्राधान्य समभागाचे कालांतराने समभागधारकाच्या सहमतीने सामान्य समभागामध्ये रूपांतर होऊ शकते.
  • अपरिवर्तनीय प्राधान्य समभाग : या प्रकारातील समभागाचे परिवर्तन करता येत नसल्याने त्यांना अपरिवर्तनीय प्राधान्य समभाग म्हटले जाते.
  • विमोचन करता येण्याजोगे प्राधान्य समभाग : या प्रकारामध्ये प्राधान्य समभागधारकाला काही ठराविक काळानंतर गुंतविलेली रक्कम परत मिळते. या प्रकारामध्ये रक्कम परत करण्याचा कालावधी ठरलेला असतो. कंपनी सुरू असताना ठरविलेल्या काळानंतर समभागधारकाला गुंतवणूक केलेली रक्कम परत केली जाते; या प्रकाराला विमोचन प्राधान्य समभाग असे संबोधले जाते.
  • बिगर विमोचनप्राधान्य समभाग : बिगर विमोचन प्राधान्य समभागधारकांना कंपनी सुरू असेपर्यंत लाभांश मिळतो. या प्रकारात समभागधारकांना कंपनी सुरू असेपर्यंत गुंतवणूक केलेली रक्कम परत दिली जात नाही.

प्राधान्य समभागाचे फायदे :

  • एका वर्षातील नफा कमी झाल्यास प्राधान्य समभागधारकाला कंपनीने लाभांश देण्याचे बंधनकारक नसते, ते पुढील वर्षावर ढकलले जाऊ शकते. त्याचा कंपनीवर कोणताही निश्चित भार निर्माण होत नाही.
  • प्राधान्य समभागधारकांना मतदानाचा अधिकार नसल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाला नवीन भांडवल उभारणीसाठी प्राधान्य समभागधारकांची परवानगी घ्यावी लागत नाही.
  • प्राधान्य समभागावरील लाभांशाचा दर अगोदरच निश्चित करण्यात आल्याने कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ झाली, तरीदेखील लाभांशाचा दर अगोदरचाच राहतो. त्याचा कंपनीला फायदा होतो.
  • प्राधान्य समभागधारक कंपनीच्या मालमत्तेवर कोणतेही तारण किंवा अधिकार मागत नाहीत. भविष्यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीची अचल संपत्ती मुक्त असते.
  • कंपनीद्वारे गरजेनुसार विविध प्रकारचे प्राधान्य समभाग जारी केले जाऊ शकतात.

प्राधान्य समभागाच्या मार्गाने जमा केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर भारतात २०१५ मध्ये लेखांकन मानांकनात झालेल्या सुधारणेमुळे नियंत्रण आणले गेले. त्यानुसार विमोचनीय किंवा परिवर्तनीय प्राधान्य समभागधारकांमार्फत जमा केलेल्या भांडवलास कर्ज समजले जाते. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. हे सर्व कर्ज कंपनीच्या ताळेबंदपत्रकामध्ये दिसत असल्याने नफ्यात होणारी घट कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्राधान्य समभागाच्या मार्गाने उभारलेले भांडवल स्वस्त असते. त्यामुळे कंपनीच्या नियंत्रणावर फरक पडत नाही आणि व्यवस्थापनावरही बंधने येत नाहीत.

संदर्भ :

  • George, Heberton Evans, Jr., The American Economic Review, Vol-19, 1929.
  • Heinkel, R.; Zechner, J., The Journal of Financial and Quantitative Analysis, Vol-25, Cambridge, 1990.

समीक्षक : अनिल पडोशी