आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात स्टॉलपर आणि सॅम्यूएल्सन यांनी मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत. उत्पादन घटकांची उपलब्धता यावर आधारित हेक्स्चर-ओहलिन सिद्धांताचा निष्कर्ष स्टॉलपर-सॅम्यूएल्सन प्रमेयामध्ये मांडला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत हेक्स्चर-ओहलिन प्रतिमानाच्या गृहितकाशी या प्रमेयाचा जवळचा संबंध आहे. एखाद्या वस्तूच्या सापेक्ष किमतीत वाढ झाल्यास ती वस्तू तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या उत्पादन घटकांच्या वास्तव उत्पन्नात वाढ होते, असे स्टॉलपर-सॅम्यूएल्सन प्रमेयात मांडले आहे.

दोन उत्पादन घटकांचा वापर करणाऱ्या आणि दोन वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा होणारा परिणाम या प्रमेयामध्ये स्पष्ट केला आहे. या सिद्धांतानुसार मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा आणि निर्यात वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादन घटकाला जास्त उत्पन्न मिळेल. आयात वस्तूच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादन घटकाला कमी उत्पन्न मिळते. याला व्यापार आणि वेतन चर्चा असे म्हणतात.

आयात स्पर्धेपासून संरक्षण देण्याच्या पातळीत बदल झाल्यामुळे कामगार आणि भांडवलदार यांच्या वास्तव उत्पन्नात होणाऱ्या बदलाचा संबंध या प्रमेयात मांडला आहे. जर आयात संरक्षण कमी केले, तर आयात वस्तूसाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ उत्पादन घटकाचे वास्तव उत्पन्न कमी होईल आणि दुसऱ्या उत्पादन घटकाचे वास्तव उत्पन्न वाढेल.

वस्तूच्या सापेक्ष किमतीत होणारा बदल आणि त्या वस्तूच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादन घटकांच्या किमतीत होणारा बदल यांतील संबंध दर्शविणे ही मूलभूत संकल्पना या प्रमेयात मांडली आहे. त्यामुळे सरकारी कर व खर्च यांचे स्वरूप कसे असावे, हे ठरविण्याचा पाया या सिद्धांताने स्पष्ट करता येतो. जकाती आणि सरकारी साह्य यांची रचना कशी असावी, हे या सिद्धांताने स्पष्ट होते.

महत्त्व :

  • जकातीमध्ये बदल झाल्यामुळे वस्तूच्या किमतीवर, तसेच त्या वस्तूच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादन घटकाच्या किमतीवर होणारा परिणाम या प्रमेयातून स्पष्ट होते.
  • विकसित देशांमधील उत्पन्नावर वाढत्या जागतिकीकरणाचा होणारा परिणाम या प्रमेयात मांडले आहे.
  • उत्पादन घटकांच्या वास्तव मोबदल्यावर जकाती आणि सरकारची व्यापार नियंत्रणे यांचा होणारा परिणाम या प्रमेयात दिसून येते.
  • उत्पादन घटकांच्या उपलब्धतेतील फरकामुळे देशांच्या व्यापाराला मिळणारा वाव याला मिळणारा प्रतिसाद या प्रमेयामध्ये स्पष्ट केले आहे.

गृहितके :

  • २ ˣ २ ˣ २ प्रतिमान म्हणजेच दोन देश, दोन वस्तू आणि दोन उत्पादन घटक (श्रम व भांडवल) यांवर प्रमेय आधारित आहे.
  • जेव्हा दोन देश व्यापारात असतात, तेव्हा प्रमेयाचा एका देशाशी संबंधित विश्लेषण असते.
  • देशामध्ये गहू आणि घड्याळे या दोन वस्तूंचे उत्पादन होते.
  • गव्हाचे उत्पादन श्रमाधिष्ठित आणि घड्याळे भांडवलाधिष्ठित आहे.
  • उत्पादन घटकांचा पुरवठा स्थिर आहे.
  • वस्तू बाजार आणि घटक बाजार यांमध्ये पूर्ण स्पर्धा आहे.
  • दोन देशांतील व्यापारशर्तीमध्ये बदल होत नाही.
  • दोन्ही वस्तूंचे उत्पादन फलन रेखीव आणि एकजिनसी आहे.
  • उत्पादन घटकांचा पूर्ण रोजगार आहे.
  • देशातल्या विविध उत्पादनक्षेत्रात उत्पादनघटक गतिक्षम आहे; मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर ते गतिक्षम नाहीत.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचा उत्पन्न विभाजनावर होणारा परिणाम या प्रमेयामध्ये स्पष्ट केला आहे. या सिद्धांतानुसार जकातीमध्ये बदल केल्यास दुर्मिळ आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या उत्पादन घटकांच्या सापेक्ष आणि निरपेक्ष उत्पन्नात बदल होऊ शकतो. सिद्धांतामध्ये असे गृहित धरले आहे की, जकातीमुळे आयात वस्तूंच्या किमतीत वाढ होईल; मात्र व्यापारशर्तीत कोणताही बदल होणार नाही. जकातीमुळे निर्यात वस्तूंच्या उत्पादनात वाढ होईल. उत्पादन घटक आयात वस्तूंच्या क्षेत्राकडून निर्यात वस्तूंच्या क्षेत्राकडे बदलले जातील. यामुळे निर्यात उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादन घटकाच्या उत्पन्नात वाढ होईल आणि दुर्मिळ उत्पादन घटकाला तोटा होईल. कोणत्याही वस्तूचा उपभोग घेतला जात असला, तरी जेव्हा आयात वस्तू तुलनेने श्रमाधिष्ठित असते, तेव्हा श्रमाला लाभ होईल आणि भांडवलदाराचे उत्पन्न कमी होईल.

निष्कर्ष : भारतासारख्या देशात निर्यात उद्योगांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या श्रम या उत्पादन घटकाचा वापर जास्त केला जातो. अशा देशात स्टॉलपर-सॅम्यूएल्सन प्रमेय लागू होऊ शकते. त्यामुळे निर्यातीमध्ये वाढ होईल आणि त्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादन घटकाच्या उत्पन्नात वाढ होईल. जकात आकारल्यामुळे मुबलक उत्पादन घटकाचे वास्तव्य उत्पन्न कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा लाभ नाहीसा होईल.

टीका :

  • लर्नर यांच्या विरोधाभासानुसार सरकारची आयात वस्तूची सिमांत उपभोग क्षमता उपभोक्त्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे उत्पन्नाचे विभाजन सरकारच्या बाजूने जास्त प्रमाणात होते. त्यामुळे आयात वस्तूच्या मागणीत वाढ होईल. त्यामुळे जकात आकारल्यामुळे आयात वस्तूंची मागणी कमी होते, हे स्टॉलपर-सॅम्यूएल्सन यांचे विधान खरे ठरत नाही.
  • स्टॉलपर-सॅम्यूएल्सन यांनी व्यापारशर्ती न बदलणाऱ्या असतात, असे गृहित धरले होते; मात्र मेट्झ्लर यांच्या विरोधाभासातून व्यापारशर्ती बदलू शकतात, हे दर्शविले आहे. व्यापारशर्तीमुळे आयात वस्तूच्या किमती कमी होतील आणि स्वदेशी बाजारातून निर्यात वस्तूच्या सापेक्ष किमती वाढतील. त्यामुळे उत्पादन घटक आयात वस्तूंच्या उत्पादनाकडून निर्यात वस्तूंच्या उत्पादनाकडे जातील. परिणामी उत्पन्नाचे विभाजन दुर्मिळ उत्पादन घटकांकडून मुबलक उत्पादन घटकांकडे वळेल.

समीक्षक : परचुरे, राजस

भाषांतर : ढेकणे, सुनील