रुग्णाच्या श्वसन मार्गातील वायुप्रवाह नियंत्रित करणाऱ्या यंत्राला यांत्रिक वातायक (mechanical ventilator) असे म्हणतात. चिंताजनक स्थितीत असणाऱ्या रुग्णाची अस्वाभाविक श्वसनक्रिया स्वाभाविक रीतीने व्हावी याकरिता वातायकाचा उपयोग केला जातो. गंभीर रुग्ण सेवेचा अविभाज्य भाग व प्राण वाचविणारे उपकरण म्हणून वातायकाचा विचार केला जातो. इतिहासातही कृत्रिम रीत्या श्वसन देण्यासंदर्भातील उदाहरणे आढळतात. वातायक संलग्न रुग्णाच्या परिचर्येत सहभागी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना यांत्रिक वातायकाची संरचना व कार्यपद्धती यांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. या विभागात कार्य करणाऱ्या परिचारिकेने वैद्यकीय व शल्यक्रिया परिचर्या या विषयात पदव्युत्तर पदवी घेणे आवश्यक असते, तसेच अतिदक्षता विभागातील शुश्रूषेचा विशेष अभ्यास केलेला असावा.
यांत्रिक वातायकाच्या कार्यानुसार त्याचे विविध प्रकार पडतात. दाब आधारित वातायक (pressure cycled ventilator), आकारमान आधारित वातायक (volume cycled ventilator), काल आधारित वातायक (time cycled ventilator). एकाच यंत्राद्वारे वरील सर्व कार्य होऊ शकतील असे वातायक देखील सध्या उपलब्ध आहेत. रुग्णाच्या श्वसनसंस्थेतील स्नायूंत शिथिलता येणे, वायुमार्ग तसेच मज्जातंतू प्रक्रियेत अडथळा निर्माण होणे, हृदय व फुप्फुसांचे आजार, मोठी शस्त्रक्रिया, स्नायू शिथिल करणाऱ्या औषधांचा अतिवापर, दीर्घ बेशुद्धावस्था (coma) इत्यादी कारणांमुळे रुग्णास वायुवीजन देण्याची आवश्यकता निर्माण होते.
वातायक संलग्न रुग्ण परिचर्या :
- सर्वप्रथम रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना नियोजित उपचाराविषयी माहिती देऊन संबंधित कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी घ्यावी.
- रुग्णाचे श्वसनकार्य सुधारावे याकरिता वेळोवेळी रुग्णाच्या फुप्फुसांतुन येणारे आवाज, श्वसनसलिकेत अनावश्यक साचलेले द्रव पदार्थ (बेडका), कृत्रिम श्वसनासाठी लावलेली नलिका तसेच रक्तातील वायू व ऑक्सिजनचे प्रमाण यांकडे विशेष लक्ष ठेवावे. वरील क्रियांमध्ये काही अस्वाभाविक आढळल्यास त्याची नोंद करून ठेवावी व डॉक्टरांना संपर्क साधावा.
- श्वसनक्रिया सहज होण्याकरिता रुग्णाचा श्वसनमार्ग मोकळा असणे आवश्यक असते. परिचारिकेने शोषण यंत्र व नलिकांचा उपयोग करून सर्व द्रव काचेच्या भांड्यात काढावा. हे भांडे रिकामे करून जंतुनाशकाने नियमित स्वच्छ करावे. काही वेळा द्रव काढण्याआधी छातीची भौतिक चिकित्सा (chest physiotherapy) करणे आवश्यक असू शकते. अशावेळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून द्रव काढावा. या चिकित्सेमुळे रुग्णाच्या फुप्फुसांची क्षमता वाढते व श्वसन मार्गातील द्रव मोकळा होऊन सहज बाहेर काढता येतो.
- रुग्णाच्या श्वसनमार्गातील अनावश्यक द्रव काढत असताना त्याला जंतुसंसर्ग होणार नाही याकडे परिचारिकांना विशेष लक्ष द्यावे लागते. वेळोवेळी घशातील द्रवाचा नमुना तपासणीसाठी द्यावा, अशा वेळी नेहमी हस्तस्वच्छकारी द्रव्याचा (sanitizer) वापर करावा, निर्जंतुक पद्धतीचा व साहित्यांचा वापर करावा; रुग्णाला वापरण्यात येणारी मूत्रशलाका (foley catheter) वेळेवर रिकामी करावी; रक्तवाहिन्यांमध्ये लावलेल्या नलिकांची काळजी घ्यावी. या सर्व बाबींमुळे जंतुसंसर्ग रोखण्यास साहाय्य होते.
- वातायकाचा रुग्णाच्या प्रकृतीवर काही दुष्परिणाम होत आहे का, याचेही निरीक्षण करून नोंद ठेवावी. रुग्णाच्या रक्तातील विद्युत विश्लेष्याच्या (electrolytes) पातळीत झालेला बदल तपासावा, ज्यामुळे रक्तातील अल्कलीचे प्रमाण समजते. वातायकामुळे श्वसनात अडथळा निर्माण होणे, हृदयाच्या ठोक्याची लय बदलणे, रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी-अधिक होणे, रक्तदाबात चढ-उतार यांसारख्या बदलांचे निरीक्षणे करून नोंदवावीत.
- रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, याकरिता रुग्णाच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. शक्य तितक्या लवकर अन्ननलिकेत नळी टाकून अन्नपुरवठा करावा. रुग्णाचे वजन, सेवन व उत्क्षेपण (intake and out put), जठर व आतड्यांतील आवाज, जठरातील द्रवात रक्त साकळल्याची काही लक्षणे इत्यादींची नियमित निरीक्षणे नोंदवावीत आणि आवश्यकतेनुसार तसेच आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार द्यावा.
- वातायक संलग्ण रुग्ण बऱ्याच कालावधीसाठी झोपलेल्या स्थितीत असल्याने, त्याला शय्या व्रण होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी परिचारिकेने पुढील काळजी घ्यावी : प्रत्येक दोन तासांनी रुग्णाची स्थिती बदलावी, पाठीला मसाज देऊन दाब बिंदूंचे (pressure points) निरीक्षण करावे, बेडशीट व डायपर नियमित बदलावे, रुग्णाला नेहमी गरम व आल्ददायक बिछाना द्यावा इ.
वरील बाबींकडे लक्ष देत असतानाच रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणे देखील आवश्यक असते. त्यांच्या सर्व शंकांचे योग्य प्रकारे निरसन केल्यास त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होतो व शुश्रुषा देणे अधिक सुलभ होते. वातायक संलग्ण रुग्णाला बरे करण्यात परिचारिकेची भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण असते.
संदर्भ :
- Black J. M.; Hawks J. H. Text book of Medical – Surgical Nursing, ed. 8th, vol-1, India, 2009.
- Kuruvilla, Jaya, Essentials of Critical Care Nursing, ed. 1st, New Delhi, 2007.
- Williams, Lippincott; Wilkins, Handbook of Diseases, ed. 9th, 2003.
समीक्षक : लामखेडे, राजेंद्र