अतिदक्षता विभाग (intensive care unit; ICU) याला इंटेन्सिव्ह थेरपी युनिट, इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट युनिट (ITU) किंवा क्रिटिकल केअर युनिट (CCU) म्हणून देखील ओळखले जाते. हे रुग्णालय किंवा आरोग्य सेवा सुविधेचा एक विशेष विभाग आहे जे सधन उपचार पद्धती प्रदान करते.

अतिदक्षता विभागामध्ये गंभीर रुग्णाची काळजी घेणारी यंत्रणा तसेच जीवघेणा आजार आणि दुखापतग्रस्त रुग्णांची पूर्तता करणारी उपकरणे असतात. ज्या रुग्णांची सतत शारीरिक देखभाल करणे आवश्यक असते, सामान्य शारीरिक कार्ये सुनिश्चित करण्यासाठी जीवन समर्थन उपकरणे आणि औषधोपचारांवर देखरेखीची आवश्यकता असते अशा रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जातात. अतिदक्षता विभागामध्ये अत्यंत प्रशिक्षित चिकित्सक, परिचारिका आणि श्वसन उपचारतज्ञ (Respiratory Therapist) असतात जे गंभीरपणे आजारी रुग्णांची काळजी घेऊ शकतात. अतिदक्षता विभागात सामान्यपणे ज्या आजारांवर उपचार केला जातो त्यामध्ये तीव्र श्वसनाचा त्रास होणारे लक्षणसमूह (Acute Respiratory Distress Syndrome), पूति आघात (Septic shock) आणि इतर जीवघेण्या परिस्थितीचा समावेश असतो.

अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या परिचारिकांकडे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाची आवश्यकता असते. गंभीर स्वरूपात आजारी रुग्णांची तसेच काही वेळा ज्यांची जिवंत राहण्याची शक्यता कमी असते अशा रुग्णांची देखील तितक्याच आत्मीयतेने व जागरुकतेने काळजी घेण्याची आवश्यकता असते. कारण आरोग्यसेवा कार्यसंघात परिचारिका हीच एकमेव अशी व्यक्ती असते जी रुग्ण आणि त्याच्या कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवते.

अतिदक्षता विभागात सामान्यत: पुढील उपकरणे असतात. विद्युत हृल्लेखक (Electrocardiograph), रक्तदाब आलक्षी (Blood pressure monitor), रक्तप्रवाहातील ऑक्सिजन मोजण्यासाठी नाडी ऑक्सिमीटर, मेंदूतील तसेच रुग्णाच्या श्वासोच्छ्वासाचे मोजमाप करणारे अन्य आलक्षी समाविष्ट असतात. यांत्रिक वातायक (Mechanical Ventilator) हे श्वासनलिकांतर्गत नलिकेद्वारे (Endotracheal Tube) श्वसनास साहाय्य करते. हृदयाच्या स्थितीवर देखरेख ठेवण्याकरिता हृदीय आलक्षी (Cardiac Monitor), शारीरिक कार्यांवर सतत देखरेख ठेवण्यासाठीची उपकरणे, शिरांतर्गत रेषांचे जाळे (a web of intravenous lines), खाद्य नलिका (Feeding Tube), नाकातून घालण्याच्या नलिका (Nasogastric tubes), चोषण पंप (Suction Pump), कॅथेटर, सिरिंज आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्राथमिक उपचार करण्याकरिता औषधांचा विस्तृत विन्यास इत्यादी.

परिचारिकेची कर्तव्ये व जबाबदाऱ्या :

 • अतिशय गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे अचूक, तपशीलवार अहवाल आणि नोंदीचे परीक्षण करणे व नोंदी ठेवणे.
 • रुग्णांच्या स्थितीत दिसणारी लक्षणे आणि चिन्ह व त्यावरील बदलांचे परीक्षण करणे व ते डॉक्टरांना कळविणे.
 • रुग्णांची स्थिती ओळखण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी रंगनिदानविषयक चाचण्यांचे अहवाल तयार करणे
 • रुग्णांची वैद्यकीय माहिती व महत्त्वाच्या लक्षणांचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे व त्याचे दस्तावेज तयार करणे.
 • रुग्णांचा वैद्यकीय इतिहास आणि मूल्यांकन निष्कर्षाचे निरीक्षण करणे.
 • रुग्णाच्या शुश्रूषेचे नियोजन करणे, त्याविषयी मूल्यमापन करून परिणामकारकता तपासणे, आवश्यकतेनुसार नियोजन करूनोवा पुरविणे (Replanning), तसेच नोंद करणे.
 • संपूर्ण रुग्णसेवा योजनांबद्दल आरोग्य सेवा कार्यसंघ सदस्यांशी सल्लामसलत करणे व समन्वय साधणे.
 • रुग्णाच्या प्रतिसादाने व शर्तींनुसार रुग्णाच्या उपचार योजनांमध्ये सुधारणा करणे.
 • जंतुदोष (Sepsis) किंवा आघात / बेशुद्धावस्था (Shock) सारख्या रुग्णांच्या स्थितीमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास व निरीक्षण करणे.
 • डॉक्टरांच्या आदेशानुसार औषधांचे अंतःशिरा द्रव (intravenous liquid) रुग्णास देणे त्याच्यावर देखरेख ठेवणे व नोंद करणे.
 • रुग्णामध्ये, अंत:शिराद्रव (Intravenous fluids) आणि विद्युत अपघटनी असंतुलन (Electrolyte Imbalance) यासारख्या उद्भवणाऱ्या समस्या शोधण्यासाठी रुग्णाच्या रक्ताद्रच्यातील विद्युत अपघटनी पदार्थांचे परीक्षण आणि लघवीचे प्रमाण (Urine Output) यांचे निरीक्षण करणे.
 • आहार आणि शारीरिक हालचालींसह रुग्णांच्या आरोग्याच्या सर्व बाबींचे परीक्षण करणे.
 • रुग्णाच्या जखमांवर उपचार करणे आणि त्यास आरोग्य संवर्धन करण्यास मदत करणे.
 • रुग्णाच्या गरजेनुसार विविध तपासण्या करण्यासाठी रुग्णास तयार करणे आणि या प्रक्रियांमध्ये चिकित्सकांना मदत करणे. उदा., श्वसनीदर्शन (Bronchoscopy), आंतरदर्शी (Endoscopic), श्वासनलिकांतर्गत नलिकानिवेशन (Endotracheal Intubation), पर्यायी हृद्-ताल वर्तन (Elective Cardioversion) इत्यादी.
 • रुग्णाची वेदना पातळी आणि उपशामक औषधांच्या आवश्यकतेचे मूल्यांकन करणे.
 • मूल्यांकन माहिती आणि ओळखलेल्या गरजा यावर आधारित गंभीर आजारी रुग्णांसाठी परिचर्येला प्राधान्य देणे.
 • अतिदक्षता विभागातील परिचारिका धमनी रक्त चाचणी घेण्यात सक्षम असावी तसेच त्या संबंधित अहवालाचे योग्य वर्णन करता यावे.
 • अतिदक्षता विभागातील परिचारिकेने जी सी एस (Glasgow coma scale) आणि रुग्णांच्या स्थितीची मूल्यांकन क्षमता याबद्दल पुरेशी माहिती ठेवावी.

प्रशासकीय जबाबदारी :

 • वातायक (Ventilator), आलक्षी आणि इतर प्रकारची वैद्यकीय उपकरणे योग्य रीत्या कार्य करतात हे सुनिश्चित करणे.
 • वापरल्यानंतर उपकरणे किंवा इतर साधने व्यवस्थित साठवली आहेत याची खात्री करणे.
 • सदोषीत उपकरणे किंवा साधने ओळखणे व ते दुरुस्तीसाठी रवाना करणे.
 • अतिदक्षता विभागातील कार्यसंघाच्या सहकारी सदस्यांसोबत सहयोग ठेवणे.
 • रुग्ण उपचारादरम्यान परिचर्येची मानके आणि शिष्‍टाचार वापरून गुणवत्तापूर्वक सेवा देणे.
 • आवश्यकतेनुसार रुग्णसेवेव्यतिरिक्त व्यवस्थापक आणि धोरणकर्ते म्हणून कार्य करने तसेच प्रशासकीय कर्तव्ये पार पाडणे.
 • हस्तक्षेप आवश्यक आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची पातळी बघणे आणि कुटुंब सदस्यांना समुपदेशन करून परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रेरणा देणे.
 • रुग्णास आरोग्य सेवा देताना वकिलाची भूमिका निभावणे.
 • रुग्ण कुटुंबातील सदस्यांना शिक्षण आणि साहाय्य प्रदान करणे.
 • विभागातील सर्व दस्तऐवज नोंदणी करणे.

संदर्भ :

 • Jose, Greesha, Medical Surgical Nursing, 2017.

समीक्षक : सरोज उपासनी