भारतातील एक आदिवासी जमात. उंच डोंगराळ प्रदेशवासीय झोऊ जमातीचे लोक मणिपूर राज्यातील चंदेल आणि चूरचंदपूर या भागांत वास्तव्यास आहेत. उत्तरपूर्व भारतात ही जमात काही प्रमाणात विखुरलेली आहे. याशीवाय चीन व म्यानमार या शेजारील देशांमध्येसुद्धा या जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. झोऊ जमातीस यो, याऊ, झो, जू, झू असेही म्हटले जात. भारत सरकारने १९५६ मध्ये या जमातीस झोऊ असे अधिकृत नाव दिले आहे. झोऊ जमातीची लोकसंख्या सुमारे २९,००० इतकी आहे (२०२२).

झोऊ शब्दाचा अर्थ पर्वत किंवा पर्वतातून आलेले लोक असा होतो. हे लोक मंगोलॉईड वंशाचे असून उत्तरेकडील एका गुहेतून त्यांचे मूळ वंशज आले आहेत किंवा पू जो या ऐतिहासिक व्यक्तीकडून या जमातीची निर्मिती झाली अशी त्यांची समजूत आहे. तसेच काही झोऊ लोक आपली जमात ही बेह कुळापासून निर्माण झाल्याचे मानतात. झोऊ समुदायात १०० पेक्षा जास्त कुळी आहेत. या जमातीच्या झोऊ व पेट या उपशाखा आहेत. या जमातीत पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे.

झोऊ किंवा झू ही त्यांची मूळ मातृभाषा असून ती तिबेटी–ब्रह्मी भाषासमूहातील भाषा आहे. हे लोक परस्परांत बोलताना झोऊ भाषेचा वापर करतात. ही भाषा कुकी-चीन या बोलीसमूहातील आहे. मणिपूर राज्यात काही भागांतील माध्यमिकपर्यंतच्या शाळेमध्ये झोऊ भाषा शिकविली जाते.

झोऊ लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून ते बदली पिकांची लागवड करतात. यासोबतच शेतमजुरी, शिकार, मासेमारी, प्राणी पाळणे व विकणे इत्यादी व्यवसायसुद्धा हे लोक करतात. घरे आणि लोकसंख्येच्या आधारावर लहान वसतीला ‘खोटा’ आणि गावास ‘खुओ’ असे म्हटले जाते. त्यांच्या वसतीचा आकार फार मोठा नसतो. वस्तीत जास्तीत जास्त ५० – ६० घरे असतात; मात्र त्यांचे काही आधुनिक गावे असून त्यांत १५० – २०० पेक्षा अधिक घरे आहेत. त्या व जुन्या वसाहतीत काहीही साम्य नाही. त्यांच्या गावाचे व्यवस्थापन हे त्यांच्याच गावातल्या जेष्ठ व्यक्तींनी निवडलेल्या एका प्रमुखाद्वारे केले जाते. अशाप्रकारे झोऊ जमातीच्या प्रत्येक गावात त्यांचा एक प्रमुख असतो. त्याच्याकडे फिरती शेती करण्यासाठी जमीनीचे वाटप करण्याचा आणि डोंगरावरील जमिनी आपल्यासाठी व नातेवाईकांसाठी वाटप करणे इत्यादी अधिकार असतात. झोई लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे. ही जमात मांसाहारी आहे.

झोऊ स्त्रिया पारंपरिक रित्या ‘झोऊनिह’ हे तांबड्या व काळ्या रंगाचे वस्त्र कंबरेला बांधत असत. आजही नृत्य समारंभात या वस्त्राला विशेष स्थान आहे. या जमातीच्या स्त्रियांचा त्यांच्या घरातील आर्थिक नियोजनात मुख्य सहभाग असतो.

झोऊंवर निसर्गाचा प्रभाव असून ते नैसर्गिक गोष्टींना पूज्य मानतात. सामाजिक धार्मिकतेची प्रतिष्ठा यांच्यासाठी मुख्य मानली जाते. टोन, टोन आणि हान, तांग एह, किमुलु, खौडु आणि सिलखुप इत्यादी त्यांचे बारा पारंपरिक सण आहेत. विविध सण-समारंभात ते दहा प्रकारचे पारंपरिक नृत्य करतात. उदा., खौ, खाइ नृत्य, सैपी, खुपसु नृत्य, डोल्डेंग नृत्य इत्यादी.

बहुतांश झोऊ जमातीचे लोक ख्रिश्चन आहेत; मात्र आजही त्यांचे विवाह शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणेच होतात. त्यांच्यात विवाहाचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार दिसून येतात. तोंग विवाह (घरच्यांनी जमविलेले लग्न), नेईता (आते-मामे भावंड विवाह) अथवा पळून जाऊन केलेला विवाह. विवाहात वधूचे पालक वधूला काही वस्तू, कपडे, रजई, कुऱ्हाड, शस्त्र आणि इतर भेटवस्तू देतात.

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापूर्वी झोऊ लोक ‘सखुआ’ या पारंपरिक धर्माचे पालन करीत होते. ते मूलतः निसर्गपूजक असल्याने निसर्गातील सर्वोच्च शक्ती आत्मन व विविध अलौकिक शक्तींची पूजा करीत. त्यांच्यात बळीची प्रथा होती. आजही ख्रिश्चन धर्म स्वीकाराल्यानंतरही ते मूळ धर्मातील विधी व परंपरा पाळताना दिसतात.

आज झोऊ जमातीतील मुले-मुली शिक्षण घेत असून अनेकजण सरकारी नोकर आहेत. त्याच प्रमाणे त्यांचे राहणीमान आधुनिक पद्धतीचे दिसून येते.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Oxford, 1998.

समीक्षक : लता छत्रे