कर्बयुक्त समावेशक (Crbonaceous Matter) म्हणून पारंपरिक पद्धतीत कोळशाची भुकटी (Coal Dust) वापरली जात असे. परंतु आता खास रीतीने कृत्रिम रीत्या तयार केलेली कार्बनयुक्त समावेशके उपलब्ध असून तीच वापरली जातात. कर्बयुक्त समावेशके वापरण्याचा उद्देश कास्टिंगचा पृष्ठभाग सुधारणे व स्कॅबिंगचे (Scabing) दोष कमी करणे हा आहे. द्रव धातूरस साच्यात ओतला की, साच्याचा पृष्ठभाग गरम होतो व रेतीतील कार्बनयुक्त पदार्थामधून (बाष्प; Volatile matter) बाहेर पडायला सुरुवात होते. या क्रियेदरम्यान कार्बनयुक्त पदार्थ मऊ होतो व त्याचा साच्यावर काजळीसारखा एक सूक्ष्म थर तयार होतो. ही क्रिया कास्टिंगच्या पृष्ठभागाचे घनीभवन होईपर्यंत चालू राहिली पाहिजे.
कर्बयुक्त समावेशकाचे घटक : १) राख – ५ % जास्तीतजास्त, २) बाष्पयुक्त घटकाचे प्रमाण – ५०-६० %, ३) सल्फर – ०.१२ % जास्तीतजास्त. कर्बयुक्त समावेशक वापरास योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी पुढीलप्रमाणे चाचण्या कराव्या लागतात –
अ) राखेचे प्रमाण (Ash Content) : मुशीचे वजन करणे – त्यामध्ये ०.५० ग्रॅम कार्बनयुक्त समावेशक घ्यावे. मफल भट्टीत ठेवावे. तापमान वाढवतवाढवत ९८०० सेल्सिअसपर्यंत न्यावे; त्या तापमानास अर्धा तास ठेवावे. बाहेर काढून गार झाल्यावर मुशीचे वजन करावे.
राखेचे प्रमाण = 100xc/0.50
A – रिकाम्या मुशीचे वजन, B – ९८०० डिग्री सेल्सिअस जाळल्यानंतर मुशीचे व राखेचे एकत्रित वजन, C = B-A राखेचे वजन.
ब) बाष्पयुक्त घटकाचे प्रमाण (Volatile matter) : मुशीचे ०.५० ग्रॅम समावेशकासहीत वजन करावे. त्यावर बेंझीनचे दोन-तीन थेंब टाकावे व ९२५० सेल्सिअस तापमानास ठेवावेत. मुशीवर झाकण ठेवावे.
V.M. = cx100/0.50
A – मुशीचे समावेशकासहीत वजन, B – ९२५० सेल्सिअसला जळाल्यानंतर येणारे मूस + समावेशकाचे वजन, C =A-B
क) सल्फरचे प्रमाण : ०.५० ग्रॅम समावेशकाचे वजन करून घेणे. स्टॉलीनच्या उपकरणाचा उपयोग करून सल्फरचे प्रमाण काढणे.
संदर्भ : Richard W. Heine; Carl R. Loper, Philip, C. Rosenthal, Principles of Metal Casting, Tata McGraw-Hill Education, II edition, 2001.
समीक्षक : प्रवीण देशपांडे