ब्रोका पियर–पॉल : (२८ जून १८२४ – ९ जुलै १८८०) पियर-पॉल ब्रोका हे पॉल ब्रोका या संक्षिप्त नावाने अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म फ्रान्समधील सेंट फॉय ला ग्रान्दे नगरात, बंदरासाठी प्रसिद्ध अशा बोर्डो शहराजवळ झाला. सेंट फॉय ला ग्रान्दे शाळेमध्ये पॉल यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. सोळाव्या वर्षी पॉल ब्रोका वैद्यकीय शिक्षणासाठी पॅरिसला पोचले. विसाव्या वर्षी त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांना रोगनिदान आणि उपचार यांचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण पॅरिसमधील ऑपिताल दु मिदीमध्ये झाले. ज्येष्ठ मूत्रविज्ञान आणि त्वचाशास्त्रज्ञ, फिलीप रिकॉर्ड यांच्या हाताखाली त्यांनी नऊ वर्षे अनुभव घेतला. तसेच मनोविकारशास्त्रज्ञ फ्रांस्वा लुरेत यांच्याकडे बायसेत्रे रूग्णालयामध्ये एक वर्ष आणि डॉ. गर्डी यांच्या हाताखालीही त्यांनी काही काळ काम केले. पिअर निकोलास गर्डी हे, शरीरक्रियाशास्त्र, विकृतीशास्त्र, शरीररचनाशास्त्र आणि शल्यकर्म या विषयांचे प्राध्यापक होते. अचूक रोगनिदान आणि प्रभावी उपचार करणारे वैद्यक तज्ज्ञ अशी गर्डी यांची ख्याती होती. ब्रोका यांची पॅरिस मेडिकल विद्यापीठात गर्डी यांचा शिक्षणसहाय्यक या पदावर नेमणूक झाली. मानवी मृत देहांचे विच्छेदन कसे करावे हे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवणे हे ब्रोका यांचे काम होते.
ब्रोका यांनी सोसायटी ॲनाटॉमिक द पॅरिसचे संशोधक सदस्य म्हणून सहा वर्षे भरीव कामगिरी केली. पुढे त्यांनी या संस्थेचे कार्यवाह आणि उपाध्यक्षपदही भूषविले.
पुस्तकी अभ्यास बाजूला ठेवून अनेक चळवळी करत असतानाच त्यांना वैद्यकीय पदवी मिळाली. त्यांनी पदवीसाठी लिहिलेला प्रबंध कर्करोगाच्या गाठी शरीरात कशा पसरत जातात याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारा होता. प्रत्यक्ष अनुभवांची भर घालून या विषयाचा ब्रोका यांनी विस्तार केला आणि दोन खंडांत कर्करोगाच्या गाठी – ट्युमर्सवर ग्रंथ प्रसिद्ध केला. सोसायटी सर्जरी द पॅरिसचे ते अध्यक्ष झाले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवत असताना चार वर्षे त्यांनी अध्यापन शास्त्राचाही अभ्यास केला आणि त्यातील स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन ते प्रोफेसर अॅग्रेजे झाले. पॅरिस मेडिकल विद्यापीठात त्यांची शल्यक्रियातज्ञ आणि पॅरिस मेडिकल हॉस्पिटलचे शल्यक्रिया शास्त्राचे विशेष प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. नंतर ब्रोका या विभागांचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. आणि नंतर अगदी त्यांचा मृत्यू होईपर्यंत सेंट अंत्वाइन, पिती आणि नेकर, येथील रुग्णालयांचे कामही त्यांच्या अधिपत्याखाली होत राहिले.
पॉल ब्रोका यांना प्रशासकीय कामाची आणि संशोधनाची आवड होती. मानववंशशास्त्र आणि विकृतीशास्त्र हेही त्यांच्या आवडीचे विषय होते. जगाच्या विविध भौगोलिक भागांतील, निरनिराळ्या वंशांच्या मानवसमूहांत कवटीचे आकारमान किती असते याचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या मेंदूंच्या आकारमानात फरक असतो का हे ही त्यांनी तपासले. मानववंशशास्त्रात मोजमापे करण्याचा, त्याद्वारे संशोधनात अत्यावश्यक अशी आकडेवारी मांडून अचूकता वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कवटीच्या मापनासाठी वीस भिन्न उपकरणे ब्रोका यांनी शोधून काढली आणि वापरायला सुरुवात केली.
मानवमितीचा – पैलू पूर्णतः नवा नसला तरी ब्रोका यांनी त्याचे वैज्ञानिक महत्व जाणून रोजच्या व्यवहारात तिचा नियमित आणि जाणीवपूर्वक वापर सुरू केला.
निरोगी आणि बोलण्यात बिघाड असलेल्या मानवी मेंदूत काही वेगळेपणा दिसतो का याची ब्रोका यांनी निरीक्षणे केली. अशी निरीक्षणे आणि काही प्रयोग केल्याने त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे मेंदूच्या पुढच्या मोठ्या भागात, मोठ्या मेंदूच्या (सेरेब्रमच्या) एका विशिष्ट भागात रचनादोष असेल तर बोलण्यात विकृती येते. अडखळत बोलणे, वाक्यातील शब्द गाळणे, बोलताना दोन शब्दांमध्ये अनैसर्गिक विलंब असणे अशा त्रुटी किंवा विकृती आढळतात. या लक्षण संचाला वाचाघात (aphasia) असे म्हणतात. ब्रोका यांनी वाचाघातामुळे मरण पावलेल्या रोग्यांचे निरीक्षण केले तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे वाचाघात झालेल्या रोग्यांच्या मोठ्या मेंदूच्या पुढच्या भागात, डाव्या बाजूला एका क्षेत्रात रचनात्मक बिघाड – उदाहरणार्थ जखमा झालेल्या दिसतात. या बिघाडाचा परिणाम म्हणून बोलण्यात विकृती येते.
ब्रोका यांनी वाचाघाताचा एक मरणासन्न रोगी बायसेत्रे हॉस्पिटलच्या शल्यकक्षात तपासला. त्याचे नाव लुईस व्हिक्टर लबॉर्न होते. त्याला तिसाव्या वर्षी वाचाघात झाला. ब्रोका यांनी तपासणी केली तेव्हा रोग सुमारे वीस वर्षे जुनाट होता आणि सतत वाढत जाऊन गंभीर झाला होता. लुईसचे वय आता एकावन्न वर्षे झाले होते. लुईसला पक्षाघातही झाला होता आणि त्याच्या पायाला पुवाने भरलेल्या गंभीर जखमा झाल्या होत्या. ब्रोका यांना तो फार दिवस जगेल असे वाटले नाही. लुईसला त्या काळी उपलब्ध वेदनाशामक औषधे आणि जखमा भरून येण्यासाठीचे उपचार करून ते थांबले असते. परंतु वाचाघाताच्या या रोग्याचे एक वैशिष्ट्य ब्रोका यांच्या ध्यानी आले. ते म्हणजे लुईसला बोलणे फार कठीण होई. त्याच्या मनात भराभर अनेक विचार येत. ब्रोका यांना ते सांगण्याचा प्रयत्न ही लुईस करी. परंतु त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडणे अशक्य होई. त्याला फक्त दोन अक्षरी एकच शब्द बोलता येत असे. ती अक्षरे किंवा शब्द म्हणजे टॅन, आणि हा शब्द बोलताना तो टॅ….न असा मध्ये जागा सोडून बोलत असे. टॅ….न या शब्दाचा उच्चार तो वेगवेगळ्या सुरात करीत असे. लुईस हावभाव करून, आवाजात चढउतार करून, देहबोलीने टॅ….न आशयघन करण्याचा प्रयत्न करीत असे. आपल्या एक शब्दीय शब्दसंपत्तीतून आपण नीट व्यक्त होऊ शकत नाही याचा त्याला फार त्रास होई. काही वेळा अतिशय रागावल्यावर प्रक्षुब्ध मनःस्थितीत मात्र तो एखाद दुसरा अपशब्द ही उच्चारू शके.
त्याकाळी ब्रोका आणि इतर अनेक वैद्यकतज्ज्ञ, चेताशास्त्रज्ञ मेंदूच्या विशिष्ट भागात विशिष्ट कार्ये चालतात का याचा विचार करत होते. सोसायटी ऑफ अँथ्रॉपॉलॉजी, पॅरिस हा विविध विज्ञानशाखांतील तज्ज्ञांचा चर्चा करण्याचा मंच होता.
मृत्यूनंतर लुईसचे शव विच्छेदन केल्यावर त्याच्या मेंदूच्या पुढच्या भागात डाव्या बाजूला कोंबडीच्या अंड्याएवढ्या आकाराचा खळगा आढळला. मेंदूचा हा ठराविक भाग शब्दोच्चारासारख्या एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित असतो याचा पुरावा ठरला. सिफिलीस म्हणजे गरमी या लैंगिक रोगामुळे ही जखम झाली होती असेही लक्षात आले.
अर्थात ब्रोका यांना लुईस व्हिक्टर लबॉर्न या एकाच उदाहरणावर वरून निष्कर्ष काढणे संशोधनाच्या शिस्तीत बसणारे वाटले नाही. त्यामुळे त्यांनी लुईसच्या निधनानंतर पुढील दोन वर्षात असे आणखी आठ रुग्ण शोधले. त्यापैकी लाझारी लेलॉन्ग नामक, चौऱ्याऐंशी वयाच्या रूग्णाला पाच अर्थपूर्ण शब्द बोलता येत. ते पाच शब्द म्हणजे – होय, नाही, नेहमी, तीन आणि स्वतःचे नाव – लेलो ( लेलॉन्ग म्हणता येत नसे म्हणून लेलो). कालांतराने अशा रोग्यांची संख्या पंचवीसपर्यंत पोचली.
यातील निवडक बारा रोग्यांच्या निरीक्षणावर आधारित ब्रोका यांनी शास्त्रीय निबंध प्रकाशित केला. त्यातून स्फूर्ती मिळून युरोपमधील अनेक संशोधकांनी भाषेचा शारीरिक रचना आधार शोधण्याचा प्रयत्न केला. अशा प्रयत्नांतून आता ब्रोका क्षेत्र – शब्दाचा अर्थ कळणे, योजना आखणे, समोरच्या प्राण्याच्या हालचालीचा अर्थ लावणे, इतरांच्या हालचालींची नक्कल करणे – यातही मदत करते हे समजत आहे.
ब्रोका यांनी अभ्यासलेल्या वाचाघात प्रकारातील प्रत्येक रोग्यात शब्द उच्चारण्यात अडचणी होत्या. परंतु शब्द समजण्यात, भाषेच्या आकलनात मात्र या रोग्यांना अडचण नव्हती. त्यामुळे अशा वाचाघात प्रकाराला अभिव्यक्ती वाचाघात किंवा ब्रोका वाचाघात असे नाव ठेवण्यात आले. ब्रोका वाचाघाताच्या रोग्यांचे मृत्युनंतर शव-विच्छेदन केल्यावर त्यांच्या मेंदूच्या पुढच्या भागात तिसऱ्या वळीवरच्या ठराविक जागीच जखमा आढळल्या. अशा सर्व रूग्णांच्या डाव्या बाजूस मेंदूत विशिष्ट ठिकाणी बिघाड होता.
ब्रोका यांनी वाणीशी – मुख्यतः बोलण्याशी संबंधित क्षेत्र मेंदूपृष्ठावर असते हा महत्वाचा शोध लावला. हे क्षेत्र मोठ्या मेंदूच्या तिसऱ्या वळीवर वसलेले असते हेही त्यांना समजले. साहजिकच मेंदूपृष्ठावरील या क्षेत्राला ब्रोका क्षेत्र असे नाव ठेवण्यात आले. अर्थात आधी यांची वळी मग ब्रोका यांचे केंद्र आणि शेवटी ब्रोका क्षेत्र असा नामकरणाचा प्रवास झाला. बहुसंख्य माणसांच्या मेंदूपृष्ठावर ब्रोका क्षेत्र एकाच म्हणजे डाव्या बाजूला असते. हा शोध लागेपर्यंत मेंदूचे दोन अर्धभाग एकसमान असतात अशी समजूत होती. तिला ब्रोका यांच्या कामामुळे प्रथमच तडा गेला.
भाषा आकलन, वाणी आणि शब्दोच्चरण यांचे ज्ञान वाढले. तेव्हा हे समजत गेले की या गुंतागुंतीच्या क्रिया केवळ ब्रोका यांच्या क्षेत्रात नियंत्रित होत नाहीत. मेंदूतील इतर अनेक भाग या कामात सहभागी असतात. परंतु उच्चार करणे, आवाज काढणे, बोलणे यात लागणाऱ्या स्वरयंत्रातील ध्वनीनिर्मिती कामाचे नियंत्रण मुख्यतः ब्रोका क्षेत्र करते.
ब्रोका शरीररचना शास्त्र, वैद्यक, मानववंशशास्त्र अशा विषयांचे जाणकार मानले जात. वैचारिक ज्ञानधारणेखेरीज त्यांनी या क्षेत्रांत संशोधनाद्वारे मोलाची भर घातली होती. मुडदूस (रिकेट्स) या रोगात बालकांची हाडे दुबळी होतात. या विकाराचा संबंध पोषणातील त्रुटींशी असतो हे ब्रोका यांनी दाखवून दिले. आपल्या शरीरातील दात, नखे, कास्थी किंवा कूर्चा (cartilages) हे भाग कडक वाटले तरी जिवंत असतात. त्यांना अन्य मऊ अवयवांप्रमाणेच रक्ताभिसरणातून पोषण मिळते. हे ब्रोका यांना समजले होते. जिभेच्या घशाकडील बाजूस पूर्वी माहीत नसलेला एक संधिबंध (लिगामेंट), प्लीहेच्या पेशीना केंद्रक असते, यकृत रचनेचे अनेक तपशील ब्रोका यांच्यामुळेच ठाऊक झाले. अन्य काही मानववंशशास्त्रज्ञांना कॉकेशियन वंशाचे लोक जात्याच अधिक बुद्धिमान असतात असे वाटे. परंतु ब्रोका यांनी या मताला शास्त्रीय आधार नाही असे सांगितले. तोपर्यंत माहीत नसलेले जरा मोठ्या आकाराचे मानवावशेष – हाडे सापडली. ती रोगामुळे अपसामान्य आकाराची झाली आहेत की नव्या अज्ञात मानव जातीची असा वाद निर्माण झाला. तेव्हा ब्रोका यांनी ती अद्याप अज्ञात मानव जातीची आहेत असा निर्वाळा दिला. पुढे तो खरा ठरला. इंका संस्कृतीच्या अभ्यासकांनी ब्रोका यांना काही कवट्या दाखवल्या. त्यांचे निरीक्षण करून एवढ्या प्राचीन काळी युरोपियन, दक्षिण अमेरिकेत पोचण्यापूर्वी मेंदूवर जटील शल्यक्रिया केल्या जात असा अचूक निष्कर्ष ब्रोका यांनी काढला.
शल्यक्रिया करताना ते क्लोरोफोर्म, कार्बन-डाय-ऑक्साईडसारखे पदार्थ वापरत. शल्यवेदना कमी व्हाव्या यासाठी संमोहनाचा उपयोग प्रथमच करणाऱ्यांपैकी ते एक होते. या बाबींची त्यांनी पद्धतशीर टिपणे ठेवली. संमोहनाचा शल्यक्रिया करताना फारसा फायदा झाला नाही हे निरीक्षण त्यांनी नोंदून ठेवले आहे. काही वेळा रक्तवाहिन्याचा थोडा भाग अतिशिथिल होतो फुगतो, फुटू ही शकतो. या विकारावर ‘ऑन अन्यूरिझम्स अँड देअर ट्रीटमेंट हा सुमारे एक हजार पानी दीर्घनिबंध त्यांनी लिहिला. या दीर्घ निबंधामुळे ते फ्रेंच वैद्यकजगतात प्रसिद्ध झाले. शारीरिक मानववंशशास्त्र, वंशशास्त्र अशा विषयांचे दोनशे तेवीस निबंध ब्रोका यांनी प्रकाशित केले.
पॅरिसमधील आयफेल टॉवरमध्ये फ्रान्समधील अतिमहत्वाच्या बहात्तर व्यक्तींची नावे नोंदली आहेत. त्या यादीत पॉल ब्रोका अकराव्या क्रमांकावर आहेत. पॅरिसमधील पियर आणि मारी क्युरी संग्रहालयात ब्रोका यांनी अभ्यासलेल्या रोग्यांचे टिकवून ठेवलेले मेंदू आजही पहायला मिळतात.
फ्रेंच लोकसभेच्या सर्वोच्च सल्लागार मंडळावर कायमस्वरूपी विज्ञान प्रतिनिधी सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुर्दैवाने या पदावर ते सहा महिनेच काम करू शकले.
मेंदूत रक्तस्राव होऊन पॉल ब्रोका वयाच्या छ्प्पन्नाव्या वर्षी निधन पावले.
संदर्भ :
- https://brainstuff.org/blog/victor-leborgne-patient-tan-brocas-aphasia
- https://www.britannica.com/science/Broca-area
- https://history-of-psychology.readthedocs.io/en/latest/broca.html
- https://www.wonders-of-the-world.net/Eiffel-Tower/Pantheon/Paul-Broca.php
समीक्षक : मद्वाण्णा मोहन