यल्लाप्रगडा सुब्बाराव : (१२ जानेवारी १८९५ – ८ ऑगस्ट १९४८) यल्लाप्रगडा यांचा जन्म १२ जानेवारी १८९५ या दिवशी  ब्रिटिश राजवटीतील मद्रास प्रांतात, भीमावरम गावात झाला. सध्या हा भाग आंध्रप्रदेशातील, पश्चिम गोदावरी जिल्ह्यात येतो. एका तेलुगु  ब्राह्मण कुटुंबात ते जन्मले.

 यल्लाप्रगडा सुब्बाराव यांच्या नावाने  काढलेले पोस्टाचे तिकीट

त्यांचे दोन भाऊ – वयाने एक लहान आणि एक मोठा केवळ एका आठवड्याच्या कालावधीत पचनसंस्थेच्या विकाराने वारले. सुब्बाराव यांच्या भावांना मेदसंग्रहणी म्हणजे, स्प्रू – sprue, हा रोग झाला होता. स्प्रू आजारात दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. सामान्यत: उष्ण कटिबंधात राहणारी लहान मुले, मोठी माणसे याना हा रोग होतो. मेदसंग्रहणी विकारात लहान आतड्यात अन्नद्रव्ये, पाणी नीट शोषली जात नाहीत आणि रुग्ण  फार अशक्त होतो.

आंध्रप्रदेशातील राजामुन्द्रीत ( राजमहेंद्रवरम्) येथे त्यांचे प्रारंभिक शिक्षण झाले.  यल्लाप्रगडा अतिशय हुशार असूनही मनस्थितीमुळे त्यांचे, अभ्यासात मन लागेना.   वडिलांच्या आग्रहामुळे आणि शिस्तीमुळे अभ्यास करावाच लागला. त्यांना मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीनदा प्रयत्न करावे लागले. शेवटी हिंदू हायस्कूल मद्रास मधून तीन वेळा प्रयत्न केल्यावर ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.

यल्लाप्रगडा अठरा वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. पतीनिधनानंतर आईने सोन्याचे दागिने विकून त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. आई, वेंकम्मा यांचा शिकत राहिले पाहिजे हे त्याना मान्य होते. तरुण युवा सुब्बाराव यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रतीकात्मक विद्रोह दाखवण्यासाठी हातांनी विणलेला खादीचा प्रयोगशाळेत घालण्याचा कोट वापरायला सुरुवात केली. त्यामुळे नाराज झालेल्या वैद्यक महाविद्यालय प्रशासनाने एमबीबीएस पदवीपेक्षा निम्न प्रतीची ‘लायसेन्सिएट ऑफ मेडिसीन अँड सर्जरी – एलएमएस’ ही ब्रिटिश राजवटीतील भारतात असणारी पदवी दिली. एमबीबीएस पदवीपेक्षा निम्न प्रतीची एलएमएस पदवी दिली गेली होती. तेव्हा अन्याय झाला तरी जिद्द न सोडता त्यांनी आयुर्वेदिक कॉलेज मध्ये शरीररचनाशास्त्राचा अध्यापक म्हणून काम स्वीकारले. वैद्यकीय शिक्षण देत असताना सुब्बाराव यांना संशोधनात रस निर्माण झाला. त्याकाळात तेथे अतिथी प्राध्यापक म्हणून आलेल्या एका अमेरिकन डॉक्टरच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकन विद्यापीठात जायचे ठरवले. आपल्या दोन भावांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या स्प्रू रोगावर इलाज शोधून काढणे; आधुनिक ज्ञान, प्रयोगशाळा, साधने वापरून शक्य होईल हा ही विचार अमेरिकेत जाण्यामागे  होता.

दिनांक २६ ऑक्टोबर, १९२३ साली ते अमेरिकेत बोस्टनला आले. हार्वर्ड मेडिकल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन मध्ये प्रवेश घेतला. प्रा. रिचर्ड स्ट्रॉंग यांनी सहृदयतेने सुब्बाराव यांचे शिक्षण शुल्क व दैनंदिन जीवनासाठी आवश्यक मदत केली. भारतातील वैद्यकीय पदवीला मान्यता नसल्याने त्यांनी बोस्टन हॉस्पिटलमध्ये नाइट पोर्टरचे काम केले. रुग्ण आणि हॉस्पिटलचे सामान, उपकरणे गरजेनुसार हॉस्पिटल प्रांगणात हलविणे, रुग्णसेवा करणे अशी अंगमेहनतीची कामे ते करीत. अशा स्थितीत सुद्धा सुब्बाराव यांनी एटीपी हे संयुग पेशींत उर्जा स्त्रोत म्हणून उपयोगी पडते याचा शोध लावला. असे महत्त्वाचे संशोधन करूनही त्याना हार्वर्डमध्ये अध्यापक पद मिळू शकले नाही. आपल्या कष्टांचे आणि गुणवत्तेचे येथे चीज होणार नाही अशा भावनेने सुब्बाराव अमेरिकन सायनामाइड कंपनीचा एक भाग असणाऱ्या लेडरली प्रयोगशाळेत संशोधन कार्यात १९४० पासून सहभागी झाले. लेडरली आता फायझर या नावाने ओळखली जाते.

सुब्बाराव यांच्यावर दोन अमेरिकन संशोधकांचा प्रभाव पडला होता. वनस्पती शरीरक्रियाशास्त्रज्ञ बेन्जामिन मिंज डगर, आणि जीवरसायनशास्त्रज्ञ जॉर्ज हर्बर्ट हिचिन्ग्स. सुब्बाराव यांनी दुसऱ्या महायुद्ध काळात लेडरली या औषध कंपनीत संशोधन कार्य केले. एटीपीचा पेशींत उर्जा स्त्रोत म्हणून उपयोग होतो. एटीपी विघटनाने एडीपी आणि फॉस्फरिक अम्ल ही संयुगे आणि ऊर्जा बाहेर पडतात हे सुब्बाराव यांनी दाखवले. स्नायूंच्या आकुंचनासाठी ग्लायकोजन मधून ऊर्जा मिळते असा त्याकाळी समज होता. तो खोडून एटीपी विघटनाने ऊर्जा प्राप्त करून घेतली जाते. फॉस्फोक्रिॲटीन हे संयुग ही स्नायुंना आकुंचनासाठी उर्जेचा तत्काळ उपलब्ध स्त्रोत असतो. हे ज्ञान सुब्बाराव यांच्या संशोधक चमूमुळे मिळाले. एटीपी आणि फॉस्फोक्रिअॅटीन ही संयुगे सुब्बाराव यांच्या संशोधनातून माहीत झाली.

सन १९२८ मध्ये पेनिसिलीनचा शोध लागला. सुब्बाराव यांना या क्रांतीकारी औषधी प्रकारात रस निर्माण झाला. त्यांचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जगभरच्या मातीच्या नमुन्यातून कवकांचे प्रकार जमवले. त्यापैकी अॅक्टिनोमायसीन या बुरशीप्रकारच्या ए-३७७ वाणापासून क्लोरटेट्रासायक्लीन मिळवले. हे काम बेन्जामिन मिंज डगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुब्बाराव यांनी लेडरलीच्या प्रयोगशाळेत केले. टेट्रासायक्लीन हे अल्पकळातच जगातील सर्वात जास्त खप होणारे विस्तृत पट (Broad spectrum) प्रतिजैविक ठरले. १९३० मध्ये त्याना या शोधाबद्दल जीवरसायनविज्ञानातील  पीएच्.डी. मिळाली.

सुब्बाराव यांनी सायरस हार्टवेल फिस्क यांच्या बरोबर मानवी शरीरात रक्त आणि मूत्र यात किती फॉस्फरस असते ते मापण्याची पद्धत शोधली. ही पद्धत आजही थायरॉइडच्या काही विकारांचे निदान करण्यास उपयोगी पडते. ही पद्धत आजही फिस्क सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जाते.

सुब्बाराव यांनी सतत आकुंचन झाल्याने थकलेल्या स्नायूत एटीपी कमी प्रमाणात असते. विश्रांती मिळालेल्या ताज्या स्नायूत एटीपी जास्त प्रमाणात असते हे सप्रयोग दाखवून दिले. एप्रिल १९२७ च्या सायन्स या प्रतिष्ठित जर्नलमध्ये त्यांचा याविषयीचा शोधनिबंध छापून आला. एटीपीवरील कामाबद्दल त्यांना पीएच्.डी. प्रदान करण्यात आली. या संशोधन कार्याची दाखल घेऊन रॉकफेलर फौंडेशनने त्याना फेलोशिप दिली.

तसेच आपल्या भावांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मेदसंग्रहणी, रोगावर फॉलिक अम्ल उपयोगी पडेल असा शोध ही त्यांनी लावला. फॉलिक अम्ल (बी-जीवनसत्वाचा एक प्रकार) संश्लेषणाचे तंत्रही सुब्बाराव यांनीच  विकसित केले. डॉ. ल्युसी विल्स यांनी महिलांना गर्भावस्थेत फॉलिक अम्ल दिले गेले तर त्याना पांडुरोग होत नाही हे दाखवून दिले. त्यापुढील पायरी म्हणजे सुब्बाराव यांनी लेडरली कंपनीतर्फे फॉलिक अम्ल शुद्ध स्फटिकरूपात मिळवले. यकृतातून फॉलिक अम्ल मिळवणे खर्चिक होते. त्यामुळे सुब्बाराव यांनी ते कृत्रिम रीत्या प्रयोगशाळेत बनवता येईल असे पाहिले. पुढे फॉलिक अम्ल व्यापारी (घाऊक) प्रमाणात मिळवण्यासाठी ही पूर्वतयारी आवश्यक होती.

मेथोट्रेक्सेट हे बर्किटस् लिम्फोमा या कर्करोगावर आणि संधीवाताच्या काही प्रकार यावर उपचारासाठी लागणारे द्रव्यही त्यांनी शोधले. डॉ. सिडनी फार्बर यांच्या असे लक्षात आले की फॉलिक अम्ल दिल्यास पेशीविभाजनाचा दर वाढतो. मग फॉलिक अम्ल विरोधी द्रव्ये वापरून कर्करोग रोधता येईल का असा प्रयत्न करण्याचे फार्बर यांच्या मनात आले. सुब्बाराव यांनी फॉलिक अम्ल विरोधी द्रव्ये बनवण्याच्या कामात प्रगती केली आहे हे त्यांना समजले. परस्परांच्या विचार विनिमयातून अमिनोप्टेरीन हे औषध ल्युकेमिया विरुद्ध वापरून एका बालकाला फार्बर यांनी आराम मिळवून दिला. सुब्बाराव यांनी लेडरली तर्फे अमिनोप्टेरीनची निर्मिती आणि विपणन करायला सुरुवात केली.

हत्तीरोगात फायलेरियाचे सूक्ष्म सूत्रकृमी (निमॅटोडस् – वुचेरेरीया बँक्रॉफ्टी) माणसाच्या पायातील लसीका वाहिन्यांत अडकतात. लसीका द्रव (लिम्फ) साठून पाय सुजतात. डायएथिल कार्बमॅझीन लघुरूप – डीइसी – हे संयुग हत्तीरोगावर परिणामकारक औषध म्हणून लागू पडेल, हा शोधही सुब्बाराव यांनीच लावला. डीइसी हे पायपरॅझिन पासून मिळवता येते.

डीइसी माणसांप्रमाणेच कुत्रे, मांजरे यांनाही लागू पडते. डीइसी हे रासायनिक नाव असून या औषधाचे व्यापारी नाव हेट्राझान आहे. त्याचा फायलेरियाच्या सूक्ष्म गोलकृमींवर औषध म्हणून उपयोग होऊ शकेल हा कयास सुब्बाराव यांनी केला. त्यांच्या शोधक बुद्धीमुळे हेट्राझानने फायलेरियाच्या सूक्ष्म गोलकृमींची वाढ रोखणे परिणामी हत्तीरोगाच्या म्हणजे मानवी पाय हत्तीच्या पायासारखा सुजाण्याच्या आणि डोळ्यात भिंगापुढील जागेत वाढणाऱ्या ‘लोआ लोआ’ कृमींचा उपद्रव थांबविणे शक्य झाले.

सुब्बाराव यांनी व्हिटॅमिन बी-12 आणि फॉलिक अम्ल ॲनिमियाच्या दोन प्रकारावर उपचार म्हणून उपयोग पडते हे दाखवले. ते दोन प्रकार म्हणजे पर्निशियस ॲनिमिया आणि मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. यातील असाध्य मानला जाणारा पांडुरोग म्हणजे या ॲनिमिया होता पर्निशियस ॲनिमिया. मेगॅलोब्लास्टिक ॲनिमियात रक्तातील लाल पेशी आकाराने मोठ्या, संख्येने कमी आणि केंद्रक धारी असतात.

डुकराच्या यकृतातून पुरेशा प्रमाणात बी-12 मिळवून असे रोगी बरे करता येतात हे सुब्बाराव यांनी सिद्ध केले. या दिशेने मग जगभरचे अनेक संशोधक काम करू लागले आणि अन्य जीवनसत्वावर संशोधन चालू झाले.

यल्लाप्रगडा सुब्बाराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मशताब्दीला म्हणजे १२ जानेवारी १९९५ रोजी भारत सरकारने एक टपाल तिकिट जारी केले. या तिकिटातील दुसऱ्या शब्दाचा शेवट ‘row’ ब्रिटिश उच्चाराच्या धर्तीवर लिहिला गेला आहे. तसेच सुब्बाराव यांच्या कार्याविषयी आदर दाखवण्यासाठी कवकाच्या (फंगस) एका प्रजातीला ‘सुब्बारोमायसिस’ असे नाव देण्यात आले आहे.

सुब्बाराव उत्तम प्रतीचे कपडे वापरत आणि व्यक्तिमत्व प्रभावशाली राहील असे राहात पण त्यांच्या सवयी खर्चिक नव्हत्या. ते वार्ताहरांना मुलाखती, बक्षिसे, सन्मान इ. करवी होणाऱ्या प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहात. त्यांनी शंभराहून जास्त शोधनिबंध प्रकाशित केले. अनेक महत्त्वाचे शोध लावले लाखो लोकाना त्यांनी शोधलेल्या औषधांचा फायदा झाला. पण कोणत्याही शोधाच्या स्वामित्व हकासाठी त्यांनी अर्ज देखील केला नाही.

डोरन के. अंत्रिम या महिला न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकाने सुब्बाराव यांच्या कार्याविषयी असे गौरवोद्गार काढले की सुब्बाराव यांना तुम्ही ओळखत नसाल; त्यांचे नावही तुम्ही ऐकले नसेल पण बहुधा त्यांच्या कामाचा परिणाम म्हणून तुम्ही जिवंत आणि धडधाकट आहात. तुम्ही त्यांच्या संशोधनाच्या बळावरच दीर्घकाळ आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य जगत रहाल.

हृदय विकाराने त्यांचे निधन ८ ऑगस्ट १९४८ रोजी अमेरिकेत, न्यूयॉर्क राज्यात झाले. मृत्युसमयी ते फक्त त्रेपन्न वर्षांचे होते. कर्करोग, पोषणशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधीनिर्माण शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र अशा विविध क्षेत्रात प्रभुत्व मिळवून सुब्बाराव यांनी मोलाची कामगिरी केली.

द न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्यूनने त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले की यल्लाप्रगडा सुब्बाराव हे अमेरिकेतील वैद्यक क्षेत्रातील एक सर्वांत बुद्धिमान व्यक्तित्व होते. प्रख्यात अमेरिकन मासिक ‘द टाईम्स’ ने त्यांच्या सन्मानार्थ एक खास अंक काढला आणि मुखपृष्ठावर त्यांचा फोटो छापला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा