ऐंशीच्या दशकातील अत्यंत लोकप्रिय असा गणिती खेळ. हंगेरियन वास्तुविशारद एर्नो रुबिक यांच्या बुद्धिमत्तेतून १९७४ मध्ये या घनाचा जन्म झाला. विद्यार्थ्यांना त्रिमितीय वस्तूंचे व्यवस्थित आकलन व्हावे याकरिता त्यांनी या घनाची निर्मिती केली ‍होती.

सहा पृष्ठभाग व त्या प्रत्येक पृष्ठभागावरील 3 x 3 घनाकार अशा एकूण 26 घनाकारांनी मिळून तयार झालेल्या, सहा रंगांनी युक्त असलेल्या रुबिक घनाच्या बाजू फिरवून लहान घनांच्या जागा बदलता येतात. सहा पृष्ठभाग व सहा वेगवेगळे रंग यामुळे ते पृष्ठभाग फिरवत राहिल्यास 432,52,00,32,74,48,98,56,000 (अंदाजे 4.3 x 1019) इतक्या रचना शक्य आहेत. मात्र एका पृष्ठभागावर एकच रंग दिसेल अशा प्रकारे सहाही पृष्ठभागांची रचना करणे, याला रुबिक घन सोडवणे असे म्हणतात.

गणिताचा आधार घेत कमीत कमी वेळा बाजूंच्या हालचाली करून रुबिक घन सोडविण्यासाठी शोधलेली नियमावली “दैवी गणनविधी” (God’s Algorithm) या नावाने ओळखली जाते; तसेच रुबिक घनाच्या बाजूंच्या कमीत कमी ज्या हालचालींमुळे रुबिक घन सोडवता येतो त्या हालचालींच्या संख्येला “दैवी क्रमांक” (God’s number) म्हटले जाते. 3 x 3 x 3 रचना असणाऱ्या रुबिक घनासाठी 20 ही संख्या ‘गॉड्स नंबर’ म्हणून ओळखली जाते. जागतिक पातळीवर विविध प्रकारचे रुबिक घन सोडवण्याच्या स्पर्धाही ‘वर्ल्ड क्यूब असोसिएशन’मार्फत भरविल्या जातात. 3 x 3 x 3 रुबिक घन आतापर्यंत सर्वांत कमी म्हणजे 3.47 सेकंदांत सोडविण्याचा विश्वविक्रम युशेंग डू या चीनमधील व्यक्तीने २४ नोव्हेंबर २०१८ रोजी स्थापन केल्याची नोंद या संघटनेने केली आहे.

गणित विषयातील गट सिद्धांत (Group Theory) या महत्त्वाच्या उपविषयाशी रुबिक घनाचा जवळचा संबंध दिसून येतो. गट सिद्धांतामधील काही व्याख्या आणि लाग्रांझचे प्रमेय यांचा उपयोग करून रुबिक घन सोडविण्यासाठीचे अनेक यशस्वी प्रयत्न गणितज्ञांनी केले आहेत. रुबिक घनाच्या 3 x 3 x 3 रचनेच्या अभ्यासावरून 4 x 4 x 4 ते अगदी 33 x 33 x 33 अशा रचना असलेल्या खेळांचा शोध लावला गेला. संगणकीय आज्ञावलींमार्फत रुबिक घन सोडविणे यंत्रमानवांनाही शक्य झाले आहे; त्यांच्याही स्पर्धा घेतल्या जातात. अधिक मितींमधील आभासी रुबिक घनसुद्धा उपलब्ध आहेत. लहान मुलांची स्मरणशक्ती, हात व डोळे यांतील समन्वय आणि मनाची एकाग्रता यांच्या विकासासाठी रुबिक घन हा गणिती खेळ साहाय्यक मानला जातो.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/topic/Rubiks-Cube

समीक्षक : विवेक पाटकर