रामलिंगस्वामी, वुलिमिरी : ( ८ ऑगस्ट १९२१ – २८ मे २००१)रामलिंगस्वामी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील, श्रीकाकुलम येथे एका तेलुगु भाषिक कुटुंबात झाला. ते विशाखापट्टणममधून आंध्र विद्यापीठाची एम.बी.बी.एस आणि नंतर एम.डी. झाले. त्यानंतर ते शिष्यवृत्ती घेऊन युनायटेड किंग्डममधील ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले. रामलिंगस्वामी यांनी तेथे डी.फिल. ही आपल्याकडील पीएचडीच्या समकक्ष पदव्युत्तर पदवी मिळवली. याच विद्यापीठातून त्यांना डी.एस्सी. ही पदव्युत्तर पदवीही मिळाली. स्वीडनमधील कॅरॉलिन्स्का इन्स्टिट्यूटनेही रामलिंगस्वामी यांना सन्मानपूर्वक डी.एस्सी ही पदव्युत्तर पदवी दिली. दिल्लीतील प्रख्यात एम्स या वैद्यकीय शिक्षण संस्थेत ते विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) विभागात प्राध्यापक म्हणून बारा वर्षे कार्यरत होते. नंतरची दहा वर्षे रामलिंगस्वामी एम्सचे संचालक होते. त्यानी आयसीएमआर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालकपद भूषविले.
एम्समध्ये काम करीत असताना दूरदृष्टीने रामलिंगस्वामी यांनी संथेत न्यायवैद्यक शाखा सुरू केली. आपल्या काही युवा डॉक्टर विद्यार्थ्याना त्यांनी या नव्या अभ्यासक्रमात येण्याचे आवाहन केले. पुढे देशभर या क्षेत्राचा विस्तार झाला.
निवृत्तीनंतरही विशेष गुणवत्ताधारक प्राध्यापक म्हणून रामलिंगस्वामी एम्सच्या विकृतीशास्त्र विभागाशी संलग्न होते. रामलिंगस्वामी यांनी बालकांतील प्रथिन उष्मांक त्रुटी या मानवी पोषणासंबंधित शाखेत संशोधन केले. ते करताना त्यांना प्रायोगिक प्राणी म्हणून मानवसदृश कपींचा (चिम्पान्झी, गोरिला, ओरांगउटान, गिब्बन अशा प्राण्यांचा ) उपयोग झाला.
बालकांतील प्रथिन उष्मांक त्रुटीचा मुख्यतः यकृतावर काय परिणाम होतो याचे निरीक्षण त्यांना करायचे होते. त्यासाठी रामलिंगस्वामी यांनी कपींमध्ये प्रथिनांची आणि उष्मांकाची त्रुटी निर्माण होईल अशी उपाय योजना केली. कपींच्या यकृत पेशी विभाजनावर आणि रोग प्रतिक्षमतेवरदेखील प्रथिन उष्मांक त्रुटीचा काय प्रभाव पडतो हे त्यांना अभ्यासता आले.
कांगडा खोरे १९५६च्या सुमारास भौगोलिक दृष्टीने पश्चिम हिमालयात होते. सध्या ते हिमाचल प्रदेशात आहे. तेथील लोकांना प्रदेशनिष्ठ गलगंड ( एन्डेमिक गॉयटर) म्हणजे गळ्याला गाठी होण्याचा विकार होतो असे रामलिंगस्वामी यांच्या लक्षात आले. रोजच्या आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे अवटू ग्रंथीला (थायरॉइड) सूज येते हे त्यांना माहीत होते. या विकारावर मात करण्यासाठी एक उपाय त्यांनी शोधून काढला .
गलगंड झालेल्या रुग्णांना रोजच्या आहारात आयोडीन क्षारयुक्त आहार दिला तर चांगला परिणाम होईल असे त्यांना वाटले. या विकारावर मात करण्याचा एक स्वस्त, सोपा, व्यावहारिक उपाय त्यांना सुचला. तो म्हणजे स्थानिक लोकांच्या रोजच्या आहारात पोटॅशियम आयोडाइड आणि पोटॅशियम आयोडेट हे क्षार अति अल्प प्रमाणात मिसळावे. प्रत्येक कुटुंब, कितीही गरीब असले तरी मीठ खातेच. हे माहीत असल्यामुळे नेहमीच्या वापरातील मिठात पोटॅशियम आयोडाइड आणि पोटॅशियम आयोडेट ही संयुगे त्यांनी मिसळली. असे मीठ रोज थोडे खाणा-यांना गलगंड होतो का, होत असल्यास गलगंडाचा आकार व प्रकार कोणता असतो अशा बाबींची त्यांनी स्थानिक लोकसंख्येची आकडेवारी मिळवून सुमारे पाच वर्षे अभ्यास केला. नमुना निवड एक लाख शाळकरी मुले होती.
बालकांना झालेला गलगंड बरा होऊ शकतो असा निष्कर्ष त्यांना काढता आला. रामलिंगस्वामी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली ही अभ्यास मोहीम १६ वर्षे वेगवेगळ्या गटांनी पुढे नेली. (आता आयोडीनयुक्त मिठामध्ये सोडीयम आयोडेट मिसळले जाते)
अभ्यास गटांनी एक लाख शाळकरी विद्यार्थ्यांच्या समूहाचा पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांच्या मूत्राच्या नियमित तपासण्या करण्यात आल्या. त्यातून आयोडीनयुक्त मीठ रोज थोडे खाल्याने शरीरातील आयोडीनची मात्रा वाढून ती सामान्य पातळीपर्यंत पोचल्याचे दिसले. सुशिक्षित समाजाने ठरवले तर गलगंड हा अगदी कमी पैशात पण सातत्याने प्रयत्न करीत राहिल्यास बरा होऊ शकणारा रोग आहे. रामलिंगस्वामी यांनी स्वानुभवावरून हा मुद्दा वारंवार ठासून सांगितला.
रामलिंगस्वामी यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी कंट्रोल प्रोग्रॅमची स्थापना झाली. या मोहिमेचा पुढील दोन वर्षातच डोंगरी भागातील सत्तावीस कोटी लोकांना फायदा मिळाला. जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे डोळ्यांचे नुकसान होते. डोळ्यातील शंकू आणि दंड पेशींची रचना बिघडून दृष्टी खालावते. हा शोधही रामलिंगस्वामी यांचाच. याखेरीज भारतीय बालकांमध्ये होणारा यकृत काठिण्य (लिवर सिरॉसिस) रोगही रामलिंगस्वामी यांनी अभ्यासला. अन्नमार्गातील रक्त यकृत प्रतिहारी शीरेतील (पोर्टल व्हेन) रक्तदाब काही कारणाने वाढतो. अशा वाढलेल्या रक्तदाबाचे चुकीचे निदान यकृत काठिण्य रोग -सिरॉसिस- म्हणून केले जाते. चुकीच्या निदानामुळे चुकीचे उपचार केले जात होते. बालकांना पुढील अनेक वर्षे त्याचा त्रास सहन करावा लागत होता. या परिस्थितीत सुधारणा होणे रामलिंगस्वामी यांची कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यामुळे शक्य झाले.
सन १९५५-५६ मध्ये दिल्लीत काविळीची मोठी साथ पसरली. कावीळ अनेक भिन्न कारणांमुळे होऊ शकते. दिल्लीतील कावीळ विषाणूजन्य प्रकारची होती हे त्यांच्या लक्षात आले. तो विषाणू ‘हिपॅटायटिस-इ’ प्रकारचा आहे हे रामलिंगस्वामी यांना समजले. काविळीचा विषाणूंशी संबंध आणि त्याची यकृत विकृतीत परिणती ही रामलिंगस्वामी यांच्या निरीक्षणांतून सिद्ध झाली. त्याखेरीज हिपॅटायटिस–बी प्रकारच्या विषाणूचा यकृत कर्करोगाशी (लिवर कार्सिनोमा) संबंध दाखवणे या कामगिरीसाठी त्यांना जागतिक आरोग्य संघटनेकडून खास समित्यांवर तज्ज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यांपैकी एक होता अभ्यासगट आणि दुसरी संस्था होती इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर’.
भारतातील बहुसंख्य गरोदर महिलांना आहारातून आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात लोह मिळते. परिणामी त्यांना पंडुरोग म्हणजे ॲनिमिया होतो. विकसनशील देशांतील स्त्रियांमधील पंडूरोगाचे सर्वात मुख्य कारण त्यांच्या आहारात लोह कमतरता असते हे आहे. रामलिंगस्वामी यांच्या निरीक्षणांतून हे कारण सिद्ध झाल्यावर अर्थातच गरोदर स्त्रियांमधील पंडुरोग समस्येवर मात करण्याचा प्रयत्न झाला. नॅशनल न्यूट्रिशनल ॲनिमिया कंट्रोल प्रोग्रॅम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा गट स्थापण्यात आला. त्याचे नेतृत्व रामलिंगस्वामी यांच्याकडे आले.
सर्वांसाठी आरोग्य ही मोहीम २००० साली आकारास आली. तेव्हा रामलिंगस्वामी यांनी वैद्यकीय शिक्षणात बदल घडवून आणले. ते विकसनशील देशांतील जनतेच्या आरोग्य विषयक गरजांनुरूप कसे होईल याची काळजी घेतली.
रामलिंगस्वामी यांनी केवळ मानवी कुपोषणाशी संबंधित दोनशेपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले. ते इंडियन फिजिशियन; ब्रिटीश जर्नल ऑफ डरमॅटॉलॉजी, क़्वार्टरली जर्नल ऑफ एक्स्पेरिमेंटल फिजिऑलॉजी अँड कॉग्नेट मेडिकल सायन्सेस; जर्नल ऑफ न्यूरॉलॉजिकल सायन्सेस; नेचर; लॅन्सेट; ॲनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन; ॲनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन ऑफ न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सेस; अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन यांसारख्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रकाशित झाले.
त्याखेरीज उष्णकटिबंधातील यकृत रोग, विकसनशील देशांतील वैद्यक शिक्षण आणि संशोधन विषयक धोरणे यावरही त्यांनी विपुल लिखाण केले.
एम्समध्ये रामलिंगस्वामी यांनी एक आंतरराष्ट्रीय विद्वतसभा आणि तिला जोडून कार्यशाळा आयोजित केली होती. ‘थायरॉक्सीन अँड ब्रेन डेव्हलपमेंट’ या विषयाभोवती सभेचे कार्यक्रम गुंफले होते. या सभेमुळे त्यांचे कार्य जगभर परिचित झाले. त्यामुळे रामलिंगस्वामी यांच्या कामाची महती माहीत होत गेली. त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय समित्यांवर पाचारण करण्यात आले.
पॅथॉलॉजिकल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ पॅथॉलॉजी, अमेरिका, न्यूट्रिशनल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन यांचे सन्माननीय सदस्यत्व रामलिंगस्वामी यांना बहाल करण्यात आले. रशियन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांनीही त्यांना सदस्यत्व दिले होते.
रोममध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय विद्वत्सभेचे सेक्रेटरी-जनरल पद त्यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेने सोपवले होते. जिनिव्हातील हेल्थ रिसर्च फॉर डेव्हलपमेंट या विशेष कृतीदलाचे अध्यासनपद त्यांच्याकडे होते. कॅनडातील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट रिसर्च सेंटरच्या नियामक मंडळाचे ते सदस्य होते.
भारतातही इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टस अँड मायक्रोबायॉलॉजिस्टस, इंडियन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन यांचे ते क्रियाशील सदस्य होते. रामलिंगस्वामी यांनी इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे अध्यक्षपद भूषविले. रामलिंगस्वामींनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्म्युनॉलॉजीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना वाटुमल ॲवॉर्ड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचा बसंती देवी अमिरचंद पुरस्कार, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
त्यांचे निधन प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने झाले.
संदर्भ :
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2555234/
- https://academic.oup.com/ajcn/article-abstract/27/1/96/4716548
- https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/2894501/
- http://repository.ias.ac.in/56808/
- https://apps.who.int/iris/handle/10665/51934
समीक्षक : मोहन मद्वाण्णा