भारतीय विमागणित संस्था : (स्थापना – १९४४) सन १९४४ साली स्थापन झालेल्या भारतीय विमागणित सभेचे २००६ साली विमागणित कायदा अस्तित्वात आल्यावर, वित्तमंत्रालयांच्या अधिपत्याखाली भारतीय विमागणित संस्थेत (भाविसं) परिवर्तन झाले. ही संस्था भारतात विमागणित व्यवसायाचे नियंत्रण करते. भाविसं ही आंतरराष्ट्रीय विमागणित अधिसंघांची १९७९ पासून पूर्ण सदस्य आहे. जगातील सर्व विमागणित संस्था हया अधिसंघाच्या छत्राखाली येतात. आंतरराष्ट्रीय विमागणित अधिसंघात वेळोवेळी ठरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक धोरणात भाविसंचा सक्रिय सहभाग असतो.
विमागणिती (ॲक्च्युरी) ही व्यावसायिक व्यक्ती, भावी घटनांचा वर्तमान काळात विमा-निगडीत संस्थेच्या आर्थिक प्रारूपांवर काय परिणाम होईल हे निश्चित करते; विम्यासंबंधी विविध क्षेत्रातील जोखमीचे विश्लेषण करते; विमाधारकांच्या आयुष्यमानाचे मूल्यांकन व विम्याच्या जोखीमीचे मूल्यांकन करते; विमापत्रांचे संकल्पन व आकारणी शुल्क म्हणजे हप्ता निर्धारित करते; विमा व्यवसायासंबंधी शिफारस केलेले दर व अटी-त्यांचे फायदे, वार्षिक परतावा आणि विमा निवृत्ती दर ठरवते. यासाठी अनुभवजन्य कोष्टके आधारभूत असतात.त्यात नियमितपणे सुधारणा केल्या जातात. विमागणिती व्यक्तीला संख्याशास्त्र, आयकर आकारणी, गुंतवणूकीमधील जोखीम, विमा-संस्थेचा फायदा अशा अनेक बाबतीतील सखोल ज्ञान आवश्यक असते. जिथे जिथे आर्थिक जोखमीचे काम आहे अशा कोणत्याही क्षेत्रात विमागणिती व्यवसाय करु शकतो. उदा. बँक, विमा-कंपनी, आरोग्याची काळजी, निवृत्तीवेतन आणि गुंतवणूक क्षेत्र.
विमागणिती हे पद मिळवण्यासाठी भारतीय विमागणित संस्था परीक्षा घेते. विमागणिताच्या परीक्षा देण्यासाठी पात्रता पदवीधर परीक्षा दिल्यानंतर विमागणित प्रवेश परीक्षा (ACET)द्यावी लागते. ही प्रवेश परीक्षा १०० गुणांची असून ऑन लाइन असते. पहिला विभाग गणित, संख्याशास्त्र व आधारसामग्रीचे अर्थबोधन या विषयांवर असतो तर, दुसरा विभाग हा इंग्रजी व तर्कावर आधारित कारणमीमांसा यावर असतो. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विमागणिती होण्यासाठी चार स्तरावर मिळून एकूण १५ परीक्षा असतात. त्यात तांत्रिक व उपयोजित भाग असतात. पहिले दोन स्तर उत्तीर्ण होताच विमागणिती भाविसंशी जोडला जातो. अधिछात्रवृत्ती मिळण्यासाठी चारही स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होणे आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. याप्रकारे भाविसंचे पूर्ण सदस्य प्राप्त झालेली व्यक्ती विमागणिती संबोधली जाते.
भाविसंचे उद्देश :- १) विमागणितिंसाठी व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण, सराव, सखोल ज्ञान, यांचा पुरस्कार करणे आणि त्यांचा दर्जा वाढवणे २) विमागणित व्यवसायाचा स्तर उंचावणे ३) विमागणित व्यवसाय करणाऱ्या सभासदांच्या कामावर नियंत्रण ठेवणे ४) विमाधारकांच्या हितासाठी, विमागणितशास्त्र व त्यांचे उपयोग याबाबत अधिक ज्ञान मिळवणे आणि आवश्यक संशोधन करणे.
शैक्षणिक व नैतिक उद्देश :- अ) जागतिक स्तरावरील स्पर्धेस पुरे पडतील असे पुरेसे प्रशिक्षित भावी विमागणिती तयार करणे, आ) सातत्याने व्यवसायिक प्रगती व्हावी यासाठी प्रशिक्षणे आयोजित करून विमागणितीची जागतिक स्तरावरील गुणवत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करणे इ) आचारसंहिता व अनुशासनात्मक कार्यपद्धती स्वीकारून विमाधारकांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे.
भारतामध्ये विमागणित व्यवसायाचा विकास, व्यावसायिकांमध्ये परस्पर संवादासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी संबंधित विषयावर व्याख्याने आयोजित करून संशोधनासाठी सोयी, सुविधा उपलब्ध करून देणे याप्रकारे भाविसं आपली उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करत असते.
संस्थेतर्फे आयुर्विम्यासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत मृत्युदर सारणी प्रसिद्ध केल्या जातात. तसेच आरोग्याची काळजी या अभ्यास गटाचे-गंभीर आजार यावरचे अहवाल सुद्धा प्रसिद्ध केले जातात. आरोग्य विमागणिती यांच्या आकलनासंबंधी आवश्यक त्या अद्ययावत संख्याशास्त्रीय पद्धती तसेच निवृत्ती वेतनासंबंधी मार्गदर्शक ठरतील असे शोधनिबंधही प्रसिद्ध केले जातात.
आयुर्विमा, सामान्य विमा, आरोग्य आणि निगा, विमागणित व्यवसाय या संबंधी मार्गदर्शन व पूरक कार्यक्रम इत्यादींचे भाविसं नियमितपणे आयोजन करते. विमा क्षेत्रातील नव्या घडामोडींची माहिती देणारे ॲक्च्युरी इंडिया हे नियतकालिक ती प्रसिद्ध करते.
संकेत स्थळ : www.actuariesindia.org
संदर्भ :
- actuariesindia.
- https://gov.in/insurance-division
- https://gicouncil.in › institute-of-actuaries-of-india
- https://www.caclubindia.com/articles/concept-of-actuary actuarial-risks-46832.asp
- mindler.com ›blog›how-to-become-an
समीक्षक : विवेक पाटकर