हिप्पोक्रेटिस : (अंदाजे – इ.स.पूर्व ४६० ते ३७०) हिप्पोक्रेटिस यांचा कार्यकाल हा इ.स. पूर्व ४६० ते ३७० वर्षे असा मानला जातो. त्यांचा जन्म कोस या ग्रीक बेटावर झाला. त्यांना वैद्यकशास्त्राचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यांच्या वडलांचे नाव हेराक्झिडस होते. ते व्यवसायाने वैद्य होते. हिप्पोक्रेटिस यांनी वैद्यक शास्त्रात दिलेले योगदान मूलभूत स्वरुपाचे असून त्याचा आवाका खूप मोठा आहे. त्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रात त्यांचा धन्वंतरीप्रमाणे बोलबाला आहे. त्यांनी रोगांचा उगम नैसर्गिक कारणांमुळे होतो. त्याचा देवाच्या कोपाशी काही संबंध नाही असे प्रतिपादन केले. त्यांनी लक्षणावर आधारीत रोगनिदनाचा पाया घातला. या त्यांच्या निरीक्षणामुळे वैद्यकशास्त्र स्वतंत्रपणे विकसित करणे शक्य झाले. कारण धर्मापासून ते वेगळे होण्यास मदत झाली. साहजिकच रोग निदान आणि उपचार यांना वैज्ञानिक पद्धती आणि विचारांचे अधिष्ठान लाभले. त्यामुळे वातावरणीय घटकांबरोबरच आहार आणि सवयी यांचाही रोगनिदानासाठी उपयोग होऊ लागला. रोगनिदान आणि उपचार पद्धती त्यांनी विकसित केली. ही पद्धती कटाक्षाने पाळली जावी यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यांनी रोगनिदान आणि उपचाराच्या नोंदी ठेवण्याची पद्धत विकसित केली. अशा नोंदी या अचूक आणि व्यक्तिनिरपेक्ष असाव्यात असा त्यांचा आग्रह असे.

त्याकाळी असणाऱ्या समजूतीमुळे शरीराच्या रचनेचा अभ्यास करण्यात अडचणी होत्या, तरीही त्यांनी केलेले निदान आणि लक्षणे अचूक ठरली. आपल्या निरिक्षणातून त्यांनी रोगांचे वर्गीकरण केले. वर्गीकरण जुनाट (दीर्घकालीन), स्थानिक आणि साथींचे असे होते. त्यांनी हिप्पोक्रेटस कॉर्पस हा ग्रंथ लिहिला अशी धारणा आहे. हा ग्रंथ त्यांच्यानंतर लिहिला असावा किंवा त्याला अनेकांनी योगदान दिले असावे असाही एक मतप्रवाह आहे. या ग्रंथामधे माहिती, व्याख्याने, संशोधन टिपणे आणि तत्त्वज्ञान विषयक लिखाण आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ सामान्य वाचक आणि वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ या दोघांसाठीही उपयुक्त आहे. त्याकाळी वैज्ञानिक पाया मजबूत नव्हता तरीही हिप्पोक्रेटीस यांनी केलेले रोगनिदान आणि उपचार समर्पक असे होते. त्याचे उदाहरण म्हणजे गुदद्वाराच्या विकारावर त्यांनी केलेले उपचार. हे विकार पित्तामुळे होतात अशी त्यांची धारणा होती.यावर उपचार म्हणून तापलेल्या लोखंडी सळईने जाळण्याची पद्धती त्यांनी विकसित केली. आजही अशा गाठी नष्ट करण्यासाठी जाळणे, आवळणे आणि कापणे या पद्धतीचा वापर होतो. त्यांच्या ग्रंथामधे स्पेकल या उपकरणाची नोंद आढळते. या उपकरणाचा उपयोग उपचारासाठी होत असे.

हिप्पोक्रेटिस यांनी वैद्यकशास्त्रात केलेले संशोधन हे मूलभूत स्वरूपाचे आहे. त्यांनी आपले निष्कर्ष निरिक्षणाच्या आधारे काढले. या निरिक्षणात शरीराचे तापमान, होणाऱ्या वेदना, शरीराची हालचाल, मलावरोध, आहार इत्यादींचा समावेश होता. वैद्यकशास्त्र हे स्वतंत्रपणे विकसित होण्यासाठी शरीरात होणाच्या बदलांचा अभ्यास आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी केलेले हे प्रतिपादन वैद्यकशास्त्राच्या विकासाला आधारभूत असेच होते. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रत्यय आजही वैद्यकशास्त्रात पहावयास मिळतो. बाह्य लक्षणावरून त्यांनी कलेले निदान आजही उपयुक्त ठरते, सुजलेल्या बोटांचा संबंध फुफ्फुसाशी आणि हृदयरोगाशी असतो हे त्यांचे निरीक्षण महत्त्वपूर्ण असेच आहे. अशा बोटांना ‘हिप्पोक्रेटस फिंगर्स’ असे संबोधन आहे. दीर्घकालीन आजार, अतिसार, अतिउपास यामुळे दिसणाऱ्या चेहऱ्यास ‘हिप्पोक्रेटिक फेस’ असे म्हणतात. हे मृत्यु समीप आल्याचे लक्षण मानले जाते. श्वासनलिकेत होणारा आवाज हा नळीतून जाणाऱ्या पाण्याच्या आवाजाप्रमाणे वाटतो. या आवाजाला हिप्पोक्रेटिक ध्वनी असे संबोधन आहे. मोडलेली हाडे सांधण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या ताणाचे प्रमाण ठरविणाऱ्या तक्त्याला हिप्पोक्रेटिस यांचे नाव आहे. टोपीच्या आकाराच्या बँडेजला (गुंडाळी) हिप्पोक्रेटिस यांचे नाव आहे. चेहऱ्यावरील स्नायुचे नियमित आकुंचन होत राहिल्यास चेहऱ्यावर हास्यभाव दिसतात याला हिप्पोक्रेटिस हास्य असे संबोधन आहे.

हिप्पोक्रेटीस यांनी डॉक्टरांचे वर्तन हे वादातीत आणि इतरांना आदर्शवत असावे असे आग्रहाने सांगितले आहे. डॉक्टरांच्या ठायी गुणवत्ता, चारित्र्य आणि कारुण्य यांचा संगम त्यांना अपेक्षित होता. त्यांच्या या प्रतिपादनाचा प्रत्येक पदवीधारकाला हिप्पोक्रेटिस शपथ देऊन केला जातो. हिप्पोक्रेटिस यांनी रोगनिदानासाठी पाहणे, ऐकणे आणि वास घेणे यांचा उपयोग केला. या पद्धती आजही उपयुक्त आहेत. हिप्पोक्रेटिस यांनी निदानाबरोबर विविध शस्त्रक्रिया आणि औषधे यांचाही शोध घेतला. हिप्पोक्रेटिस यांना आपल्या जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागला. ग्रीक राज्यव्यवस्थेशी त्यांचे मतभेद झाले. त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. तरीही त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायात खंड पडू दिला नाही, भारतीय वैद्यकशास्त्रात सुश्रुताचे जे स्थान आहे तेच स्थान यूरोपीय वैद्यकशास्त्रात हिप्पोक्रेटिस यांचे आहे.

संदर्भ :

समीक्षक : अनिल गांधी