सुश्रुत :  (अंदाजे ६०० ते ५१२) आयुर्वेदशास्त्रामधे अतुलनीय योगदान देणाऱ्या संशोधकांमध्ये सुश्रुताचार्यांची गणना होते. त्यांचा  कार्यकाळ इ.स.पूर्व ६०० ते ५१२ हा मानला जातो. सुश्रुत हे ऋषी विश्वामित्र याचे पुत्र होते. त्यांचा जन्म वाराणसी शहरात झाला. त्यांनी काही काळ तक्षशीला विद्यापीठामध्ये अध्ययन केले. आयुर्वेदामध्ये सुश्रुतांचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. सुश्रुत हे काशीराज दिवोदास धन्वंतरी(दुसरे धन्वंतरी) यांचे शिष्य असे मानले जातात. श्री. धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक आणि देवस्थानी मानले जाते. सुश्रुतांनी आपल्या गुरुकुलात अनेक नवीन उपचार पद्धती शोधल्या, औषधे तयार केली आणि अनेक विद्यार्थ्यांना आर्युवेदाचे शिक्षण दिले. आयुर्वेदशास्त्राच्या अध्ययन अध्यापन पद्धतीची सुरेख मांडणी सुश्रुताचार्यांनी सुश्रुतसंहिता या ग्रंथात केलेली आहे. विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे अध्ययन सुरु करण्यापूर्वी सुश्रुतांच्या नावाने शपथ घेतली जावी यासाठी आयुर्वेद वैद्यांचा आग्रह आहे. त्या(शपथे)मध्ये वैद्यकसेवेला निःस्वार्थीपणे समर्पण करीन असे वचन आहे. “शल्यतंत्रे तु सुश्रुत: (प्रसिद्ध: )|” असे म्हणले जाते. सुश्रुताचे मानवी आकलन त्याकाळी उपलब्ध साधनांचा विचार करता खूपच उच्च दर्जाचे होते, त्यामुळेच ते शल्यक्रियेत अनेक नवनवीन प्रयोग करू शकले. त्यांनी विकसित केलेल्या शल्यविषयक आणि इतर उपचारपद्धतींची यादी न संपणारी आहे. त्यातील काही उपचारपद्धती पुढीलप्रमाणे आहेत. त्वचेत खोलवर चीर पाडणे, शवविच्छेदनाद्वारे शरीराचा खोलवर वेध घेणे, शरीरातून वस्तू बाहेर काढणे, दात काढणे, छेद घेऊन जखमेतील पू अथवा पाणी काढणे, वृषणग्रंथी काढणे, मूत्रनलिका विस्तारित करणे, हर्निया शस्त्रक्रिया, प्रसूती शस्त्रक्रिया, रक्ताच्या गाठी काढणे, गुदद्वारातील गाठी काढणे, आतड्यातील अडथळे काढणे इत्यादींचा त्यात समावेश होतो. शल्यतंत्राचा अभ्यास करण्यापूर्वी विविध फळे अथवा कापड इत्यादी गोष्टींवर शस्त्रक्रियेचा अभ्यास करणे या विषयीचे वर्णनही पहायला मिळते. त्यालाच ‘योग्या’ असे म्हणत. त्याकाळी हाडांच्या रोगांवरही अनेक उपचार केले जात. त्यात ढळलेली हाडे बसविणे, मोडलेली हाडे सांधणे यांचा समावेश होता. हाडांचे वर्गीकरण आणि जखमांना हाडांनी दिलेला प्रतिसाद यांचाही अभ्यास त्यांनी केला होता. शस्त्रक्रियांचे त्यांना “आद्यजनक” मानले जाते. नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी शोधलेली पद्धती नाविन्यपूर्ण होती. नाकाची शस्त्रक्रिया श्वासोच्छवासात येणारा अडथळा दूर करण्यासाठी आणि व्यंग दूर करण्यासाठी केली जात असे. या दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया सुश्रुताचार्य यशस्वीपणे करीत. त्यामुळेच त्यांना “प्लॉस्टिक शल्यक्रियेचे जनक” असे मानले जाते. त्याकाळी विजेचा शोध लागलेला नव्हता, शस्त्रकियेला आवश्यक साधनेही तुटपुंजी होती. शिवाय भूलशास्त्रातही आजच्या एवढी प्रगती झाली नव्हती, तरीही शस्त्रक्रिया यशस्वी करणे हे एक मोठे कौशल्य होते, हे मान्यच करावे लागेल. भूल देण्यासाठीही त्यांनी काही पद्धतींचा वापर केलेला सुश्रुतसंहिता या ग्रंथात दिसून येतो. सुश्रुतसंहिता हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यावर डल्हणाचार्यांनी लिहिलेली निबंधसंग्रह टीका अतिशय प्रसिद्ध आहे. सध्या आयुर्वेद शाखेचे विद्यार्थी या ग्रंथाचा अभ्यास करतात. या संहितेत एकूण १८४ अध्याय असून त्यात ११२० प्रकारचे आजार, ७०० औषधी वनस्पती, ६४ क्षारापासून केलेली औषधे आणि ५७ प्राणिजन्य औषधांचा समावेश आहे. शल्यक्रिया आणि औषधनिर्मिती व्यतिरिक्त इतर शाखांचाही अभ्यास त्यांनी केला होता. त्यात मधुमेह, छातीतील वेदना आणि लठ्ठपणा याचा समावेश आहे. सुश्रुतांनी मधूमेहात आढळणाऱ्या लक्षणांचे वर्णन केले आहे. त्यात जास्त प्रमाणात लघवी होणे आणि लठ्ठपणा यांचा समावेश त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांना मधूमेह टाळण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे हे त्यांचे निरीक्षणही महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी निरीक्षण आणि विश्लेषणाच्या आधारे काढलेले हे निष्कर्ष महत्त्वपूर्ण आहेत.

शरिरातील रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला असे मानले जाते. सुश्रुत यांनी हृदय आणि त्याच्याशी संबंधित जीवनावश्यक द्रव्याचे वर्णन केले आहे. सुश्रुत संहितेत हृदयशूल या विकाराचे वर्णन आहे. त्यांनी हृदयवेदनेचे केलेले वर्णन समर्पक असेच आहे. या वेदनेचे स्थान वैशिष्ट्ये आणि वेदना निर्माण होण्याची कारणे याचे वर्णन त्यांनी केले आहे. ताणामुळे अशा वेदना निर्माण होऊ शकतात हे निरीक्षणही विचारप्रवर्तक असेच आहे. ताणवृद्धीच्या वाढीची लक्षणे याविषयी त्यांनी भाष्य केले आहे. ‘वातरक्त’ ही त्यांनी वापरलेली संज्ञा वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात सांधे सुजणे, वेदना आणि संधीची अकार्यक्षमता ही लक्षणे आढळतात. सुश्रुतांनी दिलेले हे योगदान अॅलोपॅथी शास्त्रातील अग्रणी हिप्पोक्रेटीस यांच्यापूर्वी दिडशे वर्षे अगोदर होते. यावरून सुश्रुतांचे मोठेपण अधोरखित होते. सुश्रुत यांच्यानंतर शंभर वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या संहितेचे अरबी भाषेत भाषांतर झाले. तिथून ते यूरोपमधील देशांमध्ये गेले. सुश्रुतांनी विकसित केलेल्या तंत्रांचा अभ्यास इटलीमधे केला गेला. ब्रिटीश शरीरचिकित्सकांनी भारतात येऊन सुश्रुतांनी विकसित केलेल्या शल्यतंत्राचा भारतात कसा उपयोग केला जातो हे पाहण्यासाठी भेटी दिल्याचे उल्लेख आढळतात. अठराव्या शतकात जटलमन्स मँगोझिन या नियतकालिकात भारतीय ऱ्हायनोप्लास्टीवर आधारीत लेख प्रसिद्ध झाला. प्लॉस्टीक सर्जरीचे तंत्र सुश्रुताएवढे कुणालाही अवगत नव्हते, हे विज्ञानाच्या इतिहासावर नजर टाकली तर दिसून येते. कॉन्स्टेनटाईन यांनी भारतातील प्लास्टिक सर्जरी समजून घेण्यासाठी भारतात वास्तव्य केले. नाक तुटल्यामुळे आलेले व्यंग घालविण्यासाठी नाकाच्या शस्त्रक्रियेत सुश्रुतांनी गालाच्या त्वचेचा वापर केला. मृदू कातडी वापरल्यास ती टिकून राहत नाही हे ध्यानात आल्यानंतर कपाळावरील त्वचेचा वापर सुरु झाला. या शस्त्रक्रियेत त्वेचचा जो भाग वापरला जातो त्याला “इंडियन फ्लॅप” अशीही संज्ञा वापरली जाते. तसेच या ग्रंथात ग्रंथ सोप्या पद्धतीने समजण्यासाठी आवश्यक तंत्रयुक्तींचाही विचार आहे. विविध प्रकारचा आहार आणि त्याचे गुणही वर्णन केलेले आहेत.

संदर्भ :                         

समीक्षक : मेघना बाक्रे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.