कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी (स्थापना – १९४५) कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी (सीएमएस) ही गणिताचे अध्ययन व प्रसार, गणिती विद्वत्तावृद्धी आणि उपयोजन ह्यांसाठी वाहून घेतलेल्या, कॅनडामधील व्यावसायिक गणिततज्ञांची संघटना आहे. ती कॅनडीअन मॅथेमॅटिकल काँग्रेस ह्या नावाने  अस्तित्वात आली परंतु संस्थेचे स्वरूप विना-नफा, सेवाभावी संस्था असे असल्यामुळे बऱ्याच विचार-विनिमयानंतर १९७९ मध्ये कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी हे तिचे नवे नाव स्विकारण्यात आले. तिचे मुख्यालय ओटावा येथे असून संकेतस्थळ www.cms.math.ca असे आहे.

सीएमएस संस्था विशेष करून गणितात संशोधन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे आणि संशोधनाचे निष्कर्ष पुढे आणणे आणि सर्व स्तरांवरील गणिताचे अध्यापन सक्षम करण्यासाठी संबंधित संस्था आणि प्रशासन यांत संवाद घडवणे व जनमानसात गणितात रस निर्माण करणे अशी उद्दिष्टे गाठण्यासाठी कार्यरत आहे.

ही संस्था कॅनडीअन अप्लाइड अँड इंडस्ट्रीअल मॅथेमॅटिक्स सोसायटी (सीएआय्एम्एस्), सोसायटी ऑफ ॲप्लाइड अँड इंडस्ट्रीअल मॅथेमॅटिक्स अशा अनेक क्रमश: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्न आहे, तसेच इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स युनियन (आयएमयु), इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ इंडस्ट्रीअल अँड अप्लाइड मॅथेमॅटिक्स (आयसीआयएएम) ह्यांची सभासद आहे. कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी आपल्या अनेक प्रकाशनांमार्फत गणितात रस असलेल्या समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते. ती प्रकाशने अशी आहेत : १) परिपूर्ण आणि दीर्घ शोधलेखांसाठी कॅनडीअन जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स आणि संक्षिप्त शोधलेखांसाठी कॅनडीअन मॅथेमॅटिकल बुलेटीन ही दोन प्रमुख नियतकालिके २) ‘कॅनडीअन मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड’ व ‘इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड’ ह्यांसारख्या स्पर्धा परिक्षांच्या प्रशिक्षणासाठी उपयुक्त अशी तंत्रे व आव्हानात्मक गणिती प्रश्न यांचा समावेश असलेल्या क्रक्स मॅथेमॅटीकोरम नियतकालिकाचे दर वर्षी दहा अंक निघतात.३) माध्यमिक शालेय गणित शिक्षणात भर घालण्यासाठी अ टेस्ट ऑफ मॅथेमॅटिक्स (एटीओएम्) ही पुस्तिकांची मालिका. ४) स्प्रिंगर प्रकाशनाबरोबर सीएमएस बुक्स इन मॅथेमॅटिक्स ही विद्यापीठ स्तरावर आणि संशोधनास उपयुक्त पाठ्यपुस्तके. ५) सोसायटीच्या संदर्भातील सर्व सूचना, पारितोषिकांविषयी घोषणा, नोकरीविषयीच्या जाहिराती आणि बातम्यांसाठी ‘द सीएमएस नोट्स’ हे वर्षातून सहा वेळा प्रसिद्ध होणारे वार्तापत्र कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी स्टुडंट्स कमिटी ह्या विद्यार्थी समिती शाखेची स्थापना १९९९ मध्ये झाली. ह्या समितीचे सर्व काम विद्यार्थी पाहतात. कॅनडातील इंग्लिश किंवा फ्रेंच भाषेतून शिक्षण घेतलेले गणितातील पदवीधर तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कॅनडीअन अंडरग्रॅजुएट मॅथेमॅटिकल कॉन्फरन्स तसेच इतर उपक्रमातून एकत्र आणणे आणि त्यांना प्रकाशनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे ह्या समितीचे उद्दिष्ट आहे. ही समिती नोट्स फ्रॉम द मार्जिन हे मासिक प्रकाशित करते.  दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कॅनडीअन अंडरग्रॅजुएट मॅथेमॅटिकल कॉन्फरन्सची कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी प्रायोजक आहे. तसेच सीएमएसचे महिला सदस्य ‘कनेक्टींग विमेन इन मॅथेमॅटीक्स ॲक्रॉस कॅनडा’ ह्या कार्यशाळेचे आयोजन करतात. अशा उपक्रमांतून पीएच्.डी. करणाऱ्या युवा कॅनडीअन महिलांना तज्ञांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन मिळेल असे बघितले जाते. ‘कॅनडीअन ओपन मॅथेमॅटिक्स चॅलेंज’ ह्या सीएमएसतर्फे घेतल्या जाणाऱ्या शालेय स्पर्धेत चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी कॅनडीअन मॅथेमॅटिकल ऑलिंपियाडसाठी आणि तेथून इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाडसाठी निवडले जातात.प्राथमिक शाळा व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात ‘कॅनडा मॅथस कॅंप’ सारखी गणित शिबिरे सीएमएस आयोजित करते. सीएमएसतर्फे दरवर्षी दिले जाणारे प्रमुख पुरस्कार असे आहेत : 1. गणिती संशोधनात अतिशय उल्लेखनीय योगदान दिलेल्या गणितज्ञांच्या सन्मानार्थ जेफ्री-विल्यम्स पुरस्कार· 2. कॅनडामध्ये गणित शिक्षणात योगदानासाठी ऍड्रिअन पौलियट पुरस्कार· 3. गणितात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलेसाठी क्रेजर-नेल्सन पुरस्कार· 4. गणितात उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या तरुण गणितज्ञांसाठी कॉग्झेटर-जेम्स पुरस्कार

कॅनडामधील शाळा, महाविद्यालये आणि संशोधन स्तरापर्यंत गणितात रुची निर्माण करणे, ती टिकवणे आणि आपापल्यापरिने गणितात भर घालण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात सीएमएस कटिबद्ध आहे, हे तिच्या विविध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून स्पष्ट होते. त्यामुळे गणित क्षेत्रात कॅनडाला पुढे नेण्यात तिचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. सध्या तिचे १२००हून अधिक सदस्य आहेत.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.