सी. आर. राव ॲडव्हान्सड् इंस्टिट्यूट ऑफ मॅथमेटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड कंप्यूटर सायन्स (स्थापना – २००७) हैदराबाद येथे स्थापन झालेली सी. आर. राव ॲडव्हान्सड् इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमेटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड कंप्यूटर सायन्स (सीआरआरएआयएमएससीएस) ही संस्था, गणित, सांख्यिकी आणि संगणकशास्त्र ह्या विषयांत प्रगत अध्ययन व मूलभूत संशोधन ह्यांसाठी एक अग्रगण्य संस्था समजली जाते. हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरात या संस्थेची इमारत आहे. राज्य शासनाच्या अनुदानाबरोबरच खाजगी संस्था आणि व्यक्तींच्या देणग्यांच्या माध्यमातून संस्थेसाठी निधि उभा केला जातो. संस्थेचे संकेतस्थळ आहे : https://www.crraoaimscs.org/

पद्मविभूषण पारितोषिकाने विभूषित डॉ. कलियाम्पुडी राधाकृष्ण राव (सी. आर. राव) ह्यांची गणना जगातील श्रेष्ठ संख्याशास्त्रज्ञांमध्ये होते. माणसांच्या दैनंदिन व्यवहारांपासून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत, सर्व क्षेत्रांमध्ये सांख्यिकीचा उपयोग होतो, होऊ शकतो ह्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या संकल्पनेतून ह्या संस्थेने आकार घेतला. त्यांच्या लक्षणीय योगदानाबद्दल आदराने संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

गणित, सांख्यिकी आणि संगणकशास्त्र ह्या विषयांतील सर्वोत्तम व्यक्तींना सक्षम व निकोप वातावरणात एकत्रितपणे काम करता यावे तसेच ह्या तिन्ही विषयांतील ज्ञानाचा समन्वय साधून विविध क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करता यावे हे ह्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याशिवाय ह्या विषयांतील समुचित अध्ययन आणि संशोधन ह्यासाठी ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ह्या दृष्टिकोनातून ही संस्था कार्यरत आहे. संस्थेतर्फे नियमितपणे परिसंवाद, कार्यशाळा आणि मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. दरवर्षी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्टॅटिस्टिक्स ऑलिंपियाड स्पर्धापरिक्षेचे आयोजन करण्यात येते. २९ जून (पी. सी. महालनोबीस यांचा जन्मदिवस) हा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस (नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे) सीआरआरएआयएमएससीएस अनेक विशेष कार्यक्रम आयोजित करून साजरा करते.

संस्थेच्या संगणकम् नावाच्या मुखपत्रातून संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची, तसेच प्रकाशित करण्यात आलेल्या शोधनिबंधांची माहिती नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येते.

गणित व संख्याशास्त्र ह्या विषयांचे सामाजिक शास्त्रे, जीवशास्त्र ह्यांसारख्या विषयांत उपयोजन आणि आधारसामग्री विज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (Data Science & Artificial Intelligence), सांकेतिक लिपी विश्लेषण (Crypto analysis), सायबर सुरक्षा, संदेश संस्करण (Signal Processing), जैव-तंत्रज्ञान अशा अनेक महत्त्वाच्या विषयातील संशोधनासाठी उत्कृष्ट केंद्रे स्थापन करण्याचा कार्यक्रम संस्था राबवत आहे. सीआरआरएआयएमएससीएस शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांना त्यांची धोरणे ठरवण्यासाठी बहुशाखीय प्रायोजित प्रकल्प हाती घेऊन सल्ला देते.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर