स्क्रिप्स रिसर्च : (स्थापना – १९२४) स्क्रिप्स रिसर्च या अमेरिकन संस्थेचा प्रारंभ इलेन ब्राऊनिंग स्क्रिप्स (ऑक्टोबर १९३६- ३ ऑगस्ट १९३२) या परोपकारी दानशूर महिलेने सान दियागो येथील ला जोला परिसरात केला. इन्शुलीनच्या शोधाने प्रेरित होऊन त्यांनी या संस्थेची स्थापना केली. मूळ संस्था स्क्रिप्स मेटॅबोलिक क्लिनिक या नावाने चालू झाली. नंतर मेटॅबोलिक क्लिनिक स्क्रिप्स मेमोरियल हॉस्पिटलपासून ही संस्था वेगळी झाली. वयाच्या पंचावण्णाव्या वर्षी इलेन ब्राउनिंग स्क्रिप्स यांचे निधन झाले त्यावेळी त्यांनी आपल्या मिळकतीतील तीन लाख डॉलर संशोधनासाठी मेटाबोलिक क्लिनिकसाठी राखून ठेवले होते. आजच्या काळी ही रक्कम चार ते पाच दशलक्ष डॉलर एवढी झाली असती.
स्क्रिप्स रिसर्च ही संस्था पूर्वी स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने ओळखली जायची. या संस्थेचे उद्दिष्ट व्यावसायिक नसून जैववैद्यकीय शाखेतील संशोधन व शिक्षण आहे. संस्थेचे केंद्र कॅलिफोर्नियातील ला जोला येथे असून ज्युपिटर फ्लोरिडा येथे संस्थेचे उपकेंद्र आहे. स्क्रिप्स रिसर्चच्या एकूण दोनशे प्रयोगशाळा असून त्यात दोन हजार चारशे संशोधक आणि तंत्रज्ञ काम करत असतात. जगभरातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी ही एक संस्था आहे. एका वेळी एक हजार रुग्णांवर येथे उपचार केले जातात. संस्थेशी संलग्न पन्नास संस्था आहेत. स्क्रिप्स रिसर्च ग्रॅज्युएट प्रोग्राम जगातील पहिल्या दहा जैवविज्ञानातील संशोधन, पहिल्या पाच कार्बन रसायन आणि दुसर्या क्रमांकाचे जैवरसायन विज्ञान संशोधन येथे चालते.
स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटकडे सध्या एक हजार एकस्वे, अमेरिकन फूड असोसिएशनच्या मान्यताप्राप्त नऊ उपचार पद्धती आहेत. याचा कारभार पन्नास संलग्न कंपन्यामार्फत चालतो. नेचर इनोव्हेशन मानकानुसार स्क्रिप्स रिसर्च प्रथम क्रमांकाची जगातील प्रभावी संशोधन संस्था आहे.
स्क्रिप्स रिसर्चमध्ये आंतरशाखीय संशोधनावर अधिक भर दिला जातो. त्यासाठी पाच परस्पर संबंधित विभाग येथे काम करतात. रसायनविज्ञान, प्रतिक्षमता विज्ञान, सूक्ष्मजीव विज्ञान, रेण्वीय वैद्यक आणि चेताविज्ञान. या सर्वाची, संगणकीय जैवविज्ञान आणि चेताविज्ञान यांच्याशी सांगड घातलेली आहे.
या संस्थेत एचआयव्ही /एडस लस आणि प्रतिक्षमता विषयक, चयापचय, चेताविज्ञान, प्रतिक्षमता प्रभाव, अल्कोहोल आणि अल्कोहोल व्यसन, रसायन जैवविज्ञान, परजीवी औषधविज्ञान आणि जैवऔषधी यावर संशोधन केले जाते.
संस्थेच्या २३१ प्राध्यापकांमध्ये आर्डेम पटापौटियन, के बेरी शार्पलेस , कर्ट वुद्रिच या सारखे नोबेल पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक संशोधन करतात व तिथे चाललेल्या संशोधनावर लक्ष ठेवतात.
स्क्रिप्स रिसर्चमध्ये सध्या संधिवात ह्रुमॅटोईड आरथ्रॉइटिस आणि त्याची दाहजन्य स्थिती यावर अडालिमुमाब , बेलिमुमाब लुपस आजारावर, हेअरी पेशी रक्त कर्करोग, हिमोफिलियासाठी रक्त गोठ्णातील आठवा घटक , बालकातील श्वसन विकार उत्पन्न करणारा पृष्ठ सक्रियक, बालकातील फुफ्फुस कर्करोग, चेतासंस्थेचा एक दुर्मिळ न्यूरोब्लास्टोमा विकार, मायलीन आवरणाचा मल्टिपल स्क्लेरोसिस विकार यांच्यावरील उपचार करण्यात यश मिळवले आहे.
स्क्रिप्स रिसर्च या संस्थेने पेशीतील मोठे रेणू आणि त्यांची पेशीरचना (Macromolecular and cellular structure) या संबंधी पदवी अभ्यासक्रम सुरू केला. या नंतर तीन वर्षात रसायनविज्ञान अभ्यासक्रम सुरू झाला. नंतर आंतरशाखा अभ्यासासाठी उत्तेजन देणारा अभ्यासक्रम सुरू झाला. पुढे काही वर्षांनी ज्युपिटर फ्लोरिडामध्ये नव्या ठिकाणी तीनशे विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले. रसायनविज्ञान आणि जैवविज्ञानातील डॉक्टरेटच्या संशोधनाची सोय नव्या ठिकाणी करण्यात आली. सध्या स्क्रिप्स रिसर्च, क्लिनिकल आणि भौतिक परीक्षणासाठी भौतिक विज्ञानातील संशोधकांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आखणी करीत आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहाय्याने पीएच्.डी. आणि डी.फील देण्याची सोय या अभ्यासक्रमात केलेली आहे. स्केग्ज कुटुंबाच्या आर्थिक मदतीतून या अभ्यासक्रमाचे नाव स्केग्ज ग्रॅज्युएट स्कूल ऑफ केमिकल अँड बायोलोजिकल सायन्सेस असे बदलण्यात आले आहे.
स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि इतर अमेरिकन शासकीय संस्था भरीव मदत करतात. याशिवाय अमेरिकन कॅन्सर सोसायटी, अमेरिकन हार्ट असोसिएशन, सिस्टिक फायब्रॉसिस फाउन्डेशन, ल्यूकेमिया अँड लिम्फोमा सोसायटी आणि ज्युवेनाइल डायबेटिक असोसिएशन त्यांच्या सम्बंधित संशोधनास निधी पुरवतात.
वैयक्तिक देणग्या व खाजगी संस्थांचा स्क्रिप्स रिसर्च मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात. उदा बिल अॅन्ड मेलिंडा गेटस फाउंडेशन, अर्नॉल्ड अॅन्ड मेबल बेकमान फाउण्डेशन, पीईडब्ल्यू चॅरिटेबल ट्रस्ट , एलिसन मेडिकल फाउन्डेशन आणि हॅरोल्ड डोरिस फाउंडेशन वगैरे .
अमेरिकेतील संशोधन संस्था संशोधनातून मिळवलेल्या एकस्वाचा वापर नव्या संशोधनासाठी व निधी उभा करण्यासाठी वापरत असल्याने नव्या उपचार पद्धती व रुग्ण बरे करण्यासाठी निधीची कमतरता भासत नाही. एखाद्या कॉर्पोरेट उद्योगाप्रमाणे संशोधन कार्य अखण्ड चालू राहते. एकदा संशोधनातून विकसित झालेली पद्धत वापरणे सुलभ झाले म्हणजे सामान्य व्यक्तीच्या आटोक्यात उपचारांचा खर्च येऊ शकतो. स्क्रिप्स संस्था हे अशा संस्थेचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी