फलनिष्पत्ती अर्थसंकल्प ही अलीकडील काळात वेळोवेळी उपयोगात आणली जाणारी शासकीय संकल्पना असून या संकल्पनेने सार्वजनिक अर्थसंकल्पीय क्षेत्रात लक्ष वेधले आहे; परंतु फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाची अशी कोणतीही शास्त्रीय व्याख्या उपलब्ध नाही.

डेव्हिड ऑसबोर्न आणि टेड गेब्लर यांनी आपल्या रिइन्व्हेंटिंग गव्हर्नमेंट या पुस्तकात कार्य परिभाषा सूचविली आहे. त्यांच्या मते, फलनिष्पत्ती अर्थसंकल्प म्हणजे अशी अर्थसंकल्पीय व्यवस्था, जी निधी पुरविलेल्या कार्यक्रमाची फलनिष्पत्ती केंद्रित करते. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प ही संकल्पना अधिक लोकप्रिय करण्याचे सामान्य श्रेय ऑसबोर्न आणि गेब्लर यांना दिले जाते; मात्र त्यांच्या आधी केटनर, मारोने आणि मार्टीन यांनी त्यांच्या पुस्तकात फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाचा उल्लेख केला असून फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाचा कार्यक्रम, अर्थसंकल्पाचा एक विस्तार असा विशिष्ट संदर्भ दिला होता. त्यांनी फलनिष्पत्ती ही लक्ष व उद्देश अशा कार्यक्रमांना जोडला, ज्यामुळे प्रति फलनिष्पत्ती एकक खर्च काढला जातो.

फलनिष्पत्ती अर्थसंकल्प पद्धतीचा भर हा इतर प्रमुख सार्वजनिक अर्थसंकल्पीय पद्धतींपेक्षा गुणात्मक दृष्ट्या वेगळा आहे. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प ही फक्त सार्वजनिक अर्थसंकल्पीय असून तिचा प्राथमिक भर हा कार्यक्रमाच्या किंवा प्रकल्पाच्या फलनिष्पत्तीवर असतो. यामुळेच सार्वजनिक अर्थसंकल्पीय साहित्यात फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाला सार्वजनिक अर्थसंकल्पाचा एक नवीन प्रकार म्हणून हळूहळू ओळखले जाते. या पद्धतीला जास्त लोकप्रियता न मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याची तुलना संपादनात्मक अर्थसंकल्पासोबत केली जाते. संकल्पनात्मक दृष्ट्या फलनिष्पत्ती अर्थसंकल्प हे संपादनात्मक अंदाजपत्राचाच एक भाग असून तो उत्पादन आणि फलनिष्पत्ती यांमधील महत्त्वपूर्ण फरक ओळखण्यात असमर्थ ठरतो. काही सार्वजनिक अर्थसंकल्पाच्या अभ्यासकांच्या मते, संपादनात्मक अर्थसंकल्प हे शासन करीत असलेल्या गोष्टीसंबंधित असून फलनिष्पत्ती अर्थसंकल्पात शासनाने काय साध्य केले यासंबंधित माहिती असते.

भारतात दरवर्षी अनेक विकासोन्मुख योजना सुरू करण्यात येतात. उदा., मनरेगा, प्रधानमंत्री कौशल्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी. या योजनांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्ज केला जातो; परंतु या योजना आपली लक्ष्ये प्राप्त करण्याकरिता किती यशस्वी ठरल्या, याचे मूल्यांकन करण्याकरिता कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नव्हती. बरेचदा राबविण्यात येणाऱ्या योजना वेळेत होत नसल्यामुळे त्यांच्या खर्चात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. या अडचणींवर मात करण्याकरिता २००५ मध्ये भारतात पहिल्यांदा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प सादर केला गेला. यामध्ये सामान्य अर्थसंकल्पात विविध विभाग आणि मंत्रालयांनी आवंटित केलेल्या धन राशीचा उपयोग कशाप्रकारे केला, याचा लेखाजोखा देणे आवश्यक होते. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प सर्वच प्रकारच्या विभाग आणि मंत्रालय कार्यालयांना कार्य प्रदर्शनाकरिता मापकाचे कार्य करावे लागते. यामुळे सेवाक्षेत्र, निर्मिती प्रक्रिया इत्यादी क्षेत्रांच्या कार्यक्रमांना अधिक योग्य बनविण्यास मदत मिळते.

फलनिष्पत्ती अर्थसंकल्प हे भारतात सर्वांत जास्त उपयोगात आणले जाणारे अर्थसंकल्पीय तंत्र आहे. याचा उपयोग आपले अर्थसंकल्प तयार करण्याकरिता आणि ते वित्तमंत्रालयाकडे पाठविण्याकरिता जवळजवळ सर्वच विभाग व मंत्रालयांद्वारे करण्यात येतो. यामध्ये शासनाच्या विविध विभागांनी योजलेल्या प्रकल्पांच्या परिणामांचा समावेश असतो; परंतु त्याच बरोबर केंद्र शासन, राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था आणि समाज यांच्या भागीदारीने उभारलेल्या योजनांचाही यामध्ये समावेश असतो.

फलनिष्पत्तीवर आधारित अर्थसंकल्पाचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये प्रकल्पांची फलनिष्पत्ती ही फक्त पैशांमध्येच मोजली जात नाही, तर ती भौतिक एककामध्येसुद्धा मोजली जाते. उदा., विजेचे किलोवॅटमधील उत्पादन, पोलादाचे टनातील उत्पादन इत्यादी. हे तंत्र अधिक सर्वसमावेशक बनविण्याकरिता उपक्रमाचे लक्ष्य आणि यश गुणात्मक दृष्ट्यासुद्धा दर्शविले जाते.

प्रत्येक विभाग अर्थमंत्रालयाकडे प्राथमिक अंदाजपत्रक सादर करीत असते. ज्याचे संकलन अर्थमंत्रालयाद्वारे केले जाते. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प हे विविध विभाग आणि मंत्रालयाचे मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय खर्चाच्या प्रगतीचे पत्रक असते. यामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या विकासोन्मुख फलनिष्पत्तीचे मापन केले जाते. विभागांना किती निधी आवंटित केला गेला होता, तो योग्य कार्याकरिता खर्च करण्यात आला किंवा नाही याचाही समावेश असतो. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प प्रकल्पाच्या कामगीरीच्या मापनाचे साधन म्हणूनही उपयोग केला जातो. यामध्ये निर्णय क्षमता, उत्तम सेवा वितरण, कार्यक्रमाची कामगिरी आणि परिणामांचा आढावा घेणे, कार्यक्रमांचे लक्ष्य ठरविणे, कार्यक्रमांची परिणामकारकता सुधारणे, अर्थसंकल्पाचा खर्च युक्ततम करणे, जबाबदारी निश्चित करणे, योजनेच्या उत्तम व्यवस्थापनास मदत करणे इत्यादींचा समावेश केला जातो.

संदर्भ :

  • Lawrence, L. Martin; Kettner, Peter M.; Moroney Robert, Designing and Managing Programs : An Effectiveness-Based Approach, Los Angeles, 1999.
  • Osborne, David; Gaebler, Ted A., Reinventing Government : How the Entrereneurial Spirit Is Transforming the Public Sector, Boston, 1992.

समीक्षक : मुकुंद महाजन