लक्षकेंद्री गट चर्चा ही गुणात्मक संशोधनामध्ये वापरण्यात येणाऱ्या पद्धतींपैकी एक पद्धत आहे. विल्किन्सन यांच्या मते, एका विशिष्ट विषयाबद्दल निवडलेल्या व्यक्तींच्या (समान पार्श्वभूमी, अनुभव, हितसंबंध, विशिष्ट प्रश्न इत्यादी) गटामध्ये घडवून आणलेली अनौपचारिक चर्चा म्हणजे लक्षकेंद्री गट चर्चा होय. लक्षकेंद्री गट चर्चा ही समूह मुलाखत म्हणूनही ओळखली जाते. याव्यतिरिक्त कंबेरेलिस आणि दिमित्रियाडिया हे लक्षकेंद्री गट चर्चेस ‘सामूहिक संवाद’ असे संबोधतात. किटझिंगर यांनी लक्षकेंद्री गट चर्चा ही विशिष्ट प्रश्नांवर विशिष्ट समूहाचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आयोजित केली जाते. लक्षकेंद्री गट चर्चेमध्ये विशिष्ट प्रश्न अथवा विषय घेऊन त्यावर प्रखर चर्चा केली जाते, असे म्हटले आहे. उदा., सामाजिक किंवा आरोग्यविषयक समस्या, समान दृष्टीकोन किंवा अनुभव, कल्याणकारी योजना इत्यादी. काही अभ्यासकांच्या मते, चर्चेमध्ये सहभागी झालेल्या समूहाचे एखाद्या विषयावर असलेले मत, त्यांनी लावलेले अर्थ आणि अन्वयार्थ समजून घेणे हा लक्षकेंद्री गट चर्चेचा प्राथमिक उद्देश आहे. त्याच प्रमाणे चर्चा करत असलेल्या विषयावर गटाचे एकमत व्हावे, यावर लक्षकेंद्री गट चर्चा लक्ष देत नाही, तर भिन्न मतप्रवाह, अनुभव समोर आणण्यास प्रोत्साहन देते.
लक्षकेंद्री गट चर्चा ही पद्धत एखाद्या विशिष्ट विषयावर जास्तीची अथवा अधिक सविस्तर माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये विश्लेषणाचे एकक म्हणून गटच लक्षात घेतला जातो. या पद्धतीमध्ये गटाची रचना करताना गटाचा आकार ही महत्त्वाची बाब असते. लक्षकेंद्री गट चर्चेच्या गुणवत्तेला आणि विस्ताराला अडथळा उत्पन्न होणार नाही, हे लक्षात घेऊन लक्षकेंद्री गटाची सदस्यसंख्या खूप कमी अथवा खूप जास्त नसावी. त्याच प्रमाणे चर्चा घडत आणि घडवून आणत असताना संशोधकाला चर्चा, निरीक्षण आणि महत्त्वाच्या मुद्यांची नोंद करावी लागते. त्यामुळे साधारणत: ८ ते १० लोकांचा एक गट करून लोकांना चर्चा करण्यास सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करून लक्षकेंद्री गट चर्चा केली जाते. ही पद्धत कमी खर्चाची आणि कमी वेळ लागणारी आहे. त्याच प्रमाणे मिळालेली माहिती ही तपशीलवार आणि विश्वासार्ह असते.
लक्षकेंद्री गट चर्चेचा तीन टप्प्यांमध्ये विकास झालेला दिसून येतो. इ. स. १९२० मध्ये सामाजिक शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण प्रश्नावली विकसित करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आणि १९७० नंतर बाजार संशोधकांनी ग्राहकांच्या विशिष्ट गरजा, वस्तूंविषयी तसेच प्राधान्यक्रमाविषयी जाणून व समजून घेण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी ही पद्धत वापरली. १९८० ते आजतागायत विविध संशोधकांनी व सामाजिक शास्त्रज्ञांनी आरोग्य, लैंगिक वर्तणूक आणि इतर सामाजिक समस्या समजून घेताना ही पद्धत वापरली आहे. अलीकडील काही दशकांमध्ये लक्षकेंद्री गट चर्चा ही महत्त्वपूर्ण गुणात्मक संशोधन पद्धत म्हणून सामाजिक शास्त्रांमध्ये वापरण्यास सुरुवात झाली. समाजामध्ये परिघावर ढकललेले, मौन समूह, त्यांच्या भावना, अनुभव आणि दृष्टीकोन समजून घेण्यास लक्षकेंद्री गट चर्चेमार्फत मदत होते. समूहनिष्ठ अनुभव, ज्ञान, अर्थ समजून घेण्यासाठी ही पद्धत वापरून माहिती गोळा करता येते. या पद्धतीमध्ये गटामधील परस्पर संवादाएवढाच संशोधकांची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका महत्त्वाची असते. गट चर्चेदरम्यान संशोधक विषयाची ओळख करून देतो आणि चर्चा सुरळीत चालू ठेवण्यास चालना देतो.
फायदे :
- नैसर्गिक पद्धत : लक्षकेंद्री गट चर्चा ही एक नैसर्गिक पद्धत असल्याचे काही स्त्रीवादी अभ्यासक मानतात; कारण ती लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवांच्या जवळ जाते. चर्चेमध्ये सहभागी गट आपल्या अनुभवांवर चर्चा, वादविवाद करतात. दैनंदिन जीवनात जी देवाणघेवाण होते आणि जी सापेक्षतः निसर्गानुसारही असते, त्याचे प्रतिबिंब चर्चा करत असताना पडते. उदा., कामगार, स्त्रियांचे प्रश्न, या गटांमध्ये होणाऱ्या क्रिया, उदा., चर्चा, वाद, स्पष्टपणे बोलणे इत्यादी, नैसर्गिकपणे घडताना दिसतात. त्यामुळे लक्षकेंद्री चर्चा घडवून आणताना एकसंध अनुभव, तसेच समूहावर भर दिला जातो.
- संदर्भासहित माहिती : सामाजिक रचनावादी, उत्तराधुनिकतावादी अभ्यासकांच्या मते, विशिष्ट सामाजिक संदर्भांच्या चौकटीतच मानवी अनुभव रचला अथवा घडला जाते. त्यातून समूह पातळीवर अर्थ निर्माण केला जातो आणि त्यातून सामूहिक अस्मिता घडतात. लक्षकेंद्री गट चर्चेमधून विशिष्ट संदर्भ प्रस्थापित केले जातात. सहभागी सदस्यांचे बहुतांश वेळा सारखे अनुभव, सांस्कृतिक, सामाजिक पार्श्वभूमी असल्याने विशिष्ट संदर्भामध्ये चर्चा घडून येते. त्यामुळे या चर्चेमधून मिळणारी माहिती ही संदर्भित करता येते. तसेच समूहाकडून प्रश्नाचे स्वरूप आणि त्यावरील उपाय यांवर सखोल माहिती मिळते.
- सत्तासंबंध : संशोधन करत असताना सत्तासंबंध काम करत असतात, हे स्त्रीवादी अधोरेखित करतात. या सत्तासंबंधामुळे बहुतांश वेळा संशोधन हे उतरंड असलेल्या नात्यांनी घडते. संशोधकांचे स्थान, शिक्षण, भाषा आणि प्रश्न विचारण्याची पद्धत यांमुळे सर्व नियंत्रण हे संशोधकाच्या हातामध्ये जाते आणि संशोधित व्यक्ती केवळ विषयाला धरून बोलते अथवा मोकळेपणाने बोलत नाही. त्यांच्यामध्ये उतरंड निर्माण होते; मात्र संशोधक आणि संशोधितांमध्ये अधिक समान आणि परस्परांना न्याय देणारे नाते निर्माण होण्यास ही पद्धत मदत करते. या पद्धतीमध्ये संशोधक हा मध्यस्थ असतो. तो आपली मते संशोधितांवर लादत नाही, तर चर्चेला एक वळण देण्याचे काम करत असतो. फ्रायमथ यांच्या मते, सहभागी गट आपल्या भाषेमध्ये चर्चा करतात. त्यामुळे संशोधकाची भाषा गटावर लादली जात नाही. तसेच संशोधितांची संख्या जास्त असल्याने ते आपले विचार, मत अधिक ठामपणे मांडतात.
- निरीक्षण करण्याची संधी : लोक गटामध्ये चर्चा करत असताना संशोधकाला तेथे उपस्थित राहून त्याच्या हावभाव, हालचाली, त्यांनी सांगितलेली माहिती यांचे बारकाईने निरीक्षण करता येते. गटामध्ये जेव्हा वाद-विवाद होतात, तेव्हा विवाद कसा विकसित होतो, अस्मिता कशाप्रकारे स्पष्ट केल्या जातात हे समजते.
- कृती संशोधन : लक्षकेंद्री गटात चर्चा ही सखोल केल्यामुळे नेमकी समस्या काय आहे, हे समजते. त्यामुळे त्यावर कोणते कृती कार्यक्रम राबवून समस्या दूर केली जाऊ शकते, याचे आकलन होते. व्हॉन यांनी लक्षकेंद्री चर्चेमुळे कृती संशोधनास वाव मिळतो. चर्चामधून मिळालेल्या माहितीचा वापर कृती संशोधनात वापरून सामाजिक बदलाला प्रोत्साहन देता येते असे म्हटले आहे.
मर्यादा :
- अत्यंत खाजगी माहिती मिळविण्यास असमर्थ : सर्वच संशोधन प्रकल्पासाठी लक्षकेंद्री गट चर्चा ही पद्धत लागू पडत नाही. जेनेट स्मिथसन यांच्या मते, असे विषय जे अत्यंत खाजगी असतात. उदा., लैंगिकता, एड्स, घटस्फोट, कौटुंबिक हिंसा, गर्भपात इत्यादींसारख्या विषयांवर लोक खुलेपणाने गटामध्ये चर्चा करत नाहीत. अशा वेळी लक्षकेंद्री पद्धत उपयोगी पडत नाही. त्याच प्रमाणे कामाची ठिकाणे, शाळा इत्यादी संस्थात्मक पातळीवरदेखील ही पद्धत उपयुक्त ठरत नाही; कारण लोक त्यांच्या सहकाऱ्यांसमोर चर्चा करण्यास नाखूष अथवा सोयीस्कर वाटत नाही. जे विषय सखोल व अत्यंत खाजगी असल्यास ही पद्धत उपयुक्त नाही. त्याच प्रमाणे जेथे समूहांमध्ये सारखेपणा अथवा मतभिन्नता मोठ्या प्रमाणात आहे, त्याठिकाणी ही पद्धत वापरता येत नाही.
- नियंत्रित वातावरण : गटांमध्ये होणारी चर्चा जरी नैसर्गिक होत असली, तरी ती एका नियंत्रित वातावरणात घेतली जाते. जर चर्चा उत्स्फूर्तपणे घडत नसेल, तर संशोधकाला त्या चर्चेला वळण द्यावे लागते. त्यामुळे त्याला कितपत नैसर्गिक मानायचे, यावरून काही अभ्यासकांमध्ये वाद असल्याचे दिसते.
- सहभागी समूहांमधील सत्तासंबंध : गट चर्चेमध्ये व्यक्ती एकमेकांवर प्रभाव टाकत असतात आणि परस्पर विनिमय व कृती करून ते चर्चेचा ओघही प्रभावित करतात. अशा वेळी गटाचे नियंत्रण अनेक व्यक्तींमध्ये वाटले जाते. चर्चा भटकू शकते असे जेव्हा वाटते, तेव्हा संशोधकाला मध्यस्थी करावी लागते. संशोधकाने योग्य वेळी मध्यस्थी केली नाही, तर गटावर वर्चस्व गाजवणाऱ्याची ज्यांना सवय असते, त्यांच्या मतांचे प्रतिबिंब चर्चेवर पडते.
लक्षकेंद्री गट चर्चा ही सोयीस्कर आणि सोपी पद्धत आहे. विविध संशोधकांनी ही पद्धत वापरून अतिशय चांगले संशोधन पुढे आणले आहे. २०२० मध्ये ऑक्सफॅम इनइक्वॉलिटी रिपोर्ट प्रकाशित झाला. हा अहवाल स्त्रियांवरील हिंसाचार आणि विनावेतन काम यांतील सहसंबंधावर प्रकाश टाकतो. या अहवालामध्ये स्त्रियांसोबत लक्षकेंद्री गट चर्चा पद्धत वापरून माहिती गोळा करण्यात आलेली आहे.
संदर्भ :
- कुमार, र., संशोधन पद्धती नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक, नवी दिल्ली, २०१७.
- Outhwaite, William; Turner, Stephen, The SAGE Handbook of Social Science Methodology, London, 2007.
- Liamputtong, P., Focus Group Methodology : Introduction and History, New York, 2011.
- Hesse-Biber, S. N.; Yaiser, M. L., Feminist Perspectives on Social Research, New York, 2003.
- osaline, Barbour; Kitzinger, Jenny, Developing Focus Group Research : Politics, Theory and Practice, London, 1998.
समीक्षक : स्नेहा गोळे