एखादा लोक समुदाय किंवा त्यांच्या संस्कृतीबद्दलचे लेखण म्हणजे लोकालेख. याला लोकजीवनशास्त्र असेही म्हणतात. लोकालेखामध्ये निरीक्षण आणि सहभाग या दोन महत्त्वाच्या क्रियांचा समावेश होतो. लोकालेख कार्यपद्धतीत अभ्यासक एकाच वेळी निरीक्षणही करतो आणि निवडलेल्या अभ्यासामध्ये स्वत: सहभागीदेखील होतो. लोकालेख ही सामाजिक शास्त्रातील गुणात्मक अभ्यास पद्धतीतील एक तथ्य संकलनाचे तंत्र आहे. यामध्ये संशोधक एखाद्या विशिष्ट समुदाय किंवा संघटनेमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील सदस्यांचे वर्तन, संस्कृती, जीवन आणि परस्परसंवादाचे निरीक्षण करून त्यांच्याबद्दल व्यापक आणि सखोल माहिती गोळा करतो. लोकालेखामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा घटकावर सखोलपणे विचार केला जातो. लोकालेख पद्धतीद्वारे नवीन माहिती किंवा संशोधनासाठी आवश्यक तेवढीच माहिती गोळा करण्यापुरते मर्यादित कार्य नसून मिळविलेली माहिती लिखित किंवा दृश्य स्वरूपामध्ये मांडण्याचे कार्यदेखील केले जाते. लोकालेख पद्धतीचा वापर करून एखाद्या विषयाच्या संदर्भातील ऐतिहासिक, राजकीय आणि वैयक्तिक माहिती मिळविता येते. लोकालेखामध्ये मानवी आंतरक्रिया आणि पुनरसादरीकरण यांचादेखील समावेश होतो. क्षेत्र कामामधील सर्व संबंधित अनुभव स्पष्टपणे दाखविण्यासाठी लोकालेखामुळे सातत्य राखले जाते. लोकालेख अभ्यासक हे एखाद्या समुदायाचे सभासद नसले, तरी ते त्या समुदायात सहभागी होऊन अभ्यास करतात.
लोकालेख ही पद्धती सामाजिक मानवशास्त्र शाखेतून प्रथम विकसित होऊन संस्कृती अभ्यास, सामाजिक मानसशास्त्र, स्त्री अभ्यास, समाजशास्त्र, सांस्कृतिक भूगोल, मानवशास्त्र इत्यादी शाखांमध्ये स्वीकारली व वापरली जाते. अभ्यासक हे एखाद्या समूहांमधील काही मुख्य गोष्टी आत्मसात करून विषयाशी संबंधित लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्याशी जवळीक निर्माण करतात आणि त्यांच्याशी बऱ्याच काळपर्यंत चालणाऱ्या आंतरक्रियांद्वारे संबंधित लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास करतात.
व्याख्या : जॉन व्हॅन मॅनन यांच्या मते, ‘जेव्हा लोकालेख एखादी पद्धत म्हणून वापरली जाते, तेव्हा त्याचा क्षेत्रीय कार्याशी संबंध असतो, जे एका संशोधाकाकडून अपेक्षित असते. सामान्यत: एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ ज्यांचा अभ्यास करावयाचा आहे, अशा लोकांबरोबर ते त्यांच्यासारखेच राहतात’.
जॉन ब्रेवर यांच्या मते, ‘लोकालेख हे फक्त तथ्य संकलन पद्धती अथवा तंत्र नाही, तर तीला व्यापक अभ्यास पद्धतीही म्हणता येईल. अभ्यासाखालील समुदायाच्या स्वाभाविक, नैसर्गिक परिस्थितीत व्यापक जीवन संस्कृतीचा अर्थ लावण्याचा उद्देश ठेवून केलेला सहभागी अभ्यास म्हणजे लोकालेख पद्धत होय’.
मारविन हॅरिस आणि ऑर्ना जॉनसन यांच्या मते, ‘लोकालेख या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘लोकांचे चित्रण’ असा होतो. लोकालेख म्हणजे विशिष्ट संस्कृतिच्या चालीरिती, श्रद्धा आणि वर्तन यांचे क्षेत्रीय कार्याच्या माध्यमातून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे केलेले लिखित वर्णन होय’.
डेव्हिड एम. फेटरमॅन यांच्या मते, ‘लोकालेख म्हणजे एखादा गट किंवा संस्कृतीचे वर्णन करण्याची कला आणि विज्ञान होय. हे वर्णन मोठ्या प्रदेशातील लहान आदिवासी समूहाचे किंवा उपनगरातील मध्यमवर्गीय वर्गांचे असू शकते’.
इतिहास : लोकालेखासंदर्भात दोन प्रवाह आहेत.
(१) ब्रिटिश सामाजिक मानवशास्त्र : ब्रिटिश सामाजिक मानवशास्त्राच्या विकासाने सर्व सामाजिक शास्त्रे आणि विशेषकरून समाजशास्त्राचा लोकालेखाशी संबंध दर्शविला आहे. काही मूळ अमेरिकन समूहांच्या अभ्यासासाठी लुईस हेन्री मॉर्गनला आणि फ्रेंच मानवशास्त्रज्ञ जोसेफ-फ्रान्कोइस लाफिटॉ यांनी पद्धतशीरपणे लोकालेख पद्धती हाताळली होती. ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ ब्रेन्स्लो मालीनोवास्की यांनी अधिक सुसूत्रपणे लोकालेख पद्धती विकसित केली आणि वापरली. प्रारंभीच्या काळामध्ये ब्रिटिश लोकालेख संशोधनाने ‘प्रवासनोंदी’चे रूप धारण केले होते. जे लोक प्रवास करत असत, त्या लोकांनी प्रवासाच्या ठिकाणची आणि तेथील लोकांसंबंधीची माहिती संशोधकांना पुरविण्याचे काम केले. असे लोकालेख नोंदविताना लोकालेखाच्या अभ्यासकांना अभ्यासासाठी निवडलेल्या ठिकाणातील लोकांच्या भावनिकतेपासून तटस्थ राहावे लागत असे. स्थानिक लोकांना सहानुभूती दाखवून, त्यांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये सहभागी होऊन त्यांचा विश्वास प्राप्त करण्याच्या उद्देशाने अभ्यासकाला त्यांच्यामध्ये विलीन होऊनदेखील जाणीवपूर्वक तटस्थ राहण्याची भूमिका पार पाडावी लागत असे. त्या समुदायाचे किंवा अभ्यास विषयाचे पूर्ण सदस्यत्व धारण करण्यापासून स्वत:ला प्रवृत्त करावे लागत असे. म्हणजेच ‘संशोधकाला ज्या लोकांचा अभ्यास करायचा आहे, त्या लोकांपासून सभ्य अंतर राखण्याची अपेक्षा असते. हे अंतर मैत्री, विश्वास, समज, ओळख, खुशामत किंवा प्रेम यांमध्ये असावे लागते’. ज्या वेळी ही बंधने तोडली जातात, त्या वेळेस संशोधक त्या समुदायाचा कायमस्वरूपी सभासद होण्याचा धोका जास्त असतो. अशा पद्धतीने लोकालेख पद्धतीशास्त्र ब्रिटिश सामाजिक मानवशास्त्रामध्ये विकसित झालेले दिसते.
(२) समाजशास्त्राची शिकागो विचारशाखा : अनेक सामाजिक लोकालेख हे शिकागो शाळा किंवा संप्रदाय किंवा विचारशाखेशी जोडण्यात आले आहेत. ही विचारशाखा विसाव्या शतकामध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये उदयास आली. शिकागो विचारशाखा अभ्यासकांनी जातीमधील समाजजीवनाच्या दैनंदिन अंगांचा अभ्यास केला आहे. मुख्यत्वे त्यांनी ग्रामीण भागामध्ये राहत असलेल्या लोकांचा सामाजिक जीवनाशी असलेला झगडा यांचा अभ्यास केला आहे. आरंभीचे लोकालेख हे शिकागो विचारशाखेकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. शिकागो विचारशाखेचे लोकालेख अभ्यासक गृहितकांच्या अमूर्त स्वरूपाला विरोध दर्शवितात. अशा प्रकारे आरंभीच्या लोकालेखाच्या विकासामधील पाया बांधणीचे काम शिकागो शाळेकडून करण्यात आले होते.
अलेकझॅन्ड्रा, डेविड निल, कर्ट अंकल आणि वॅरिअर एल्विन या यूरोपीयन लोकालेख अभ्यासकांनी विसाव्या शतकामध्ये एतद्देशीय लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास केला. हे अभ्यासक बहुतकरून त्या लोकांमध्ये वास्तव्य करू लागले, त्यांची भाषा बोलू लागले आणि याच आधारे ते त्यांच्या संस्कृतीचे खोलवर अध्ययन केले. अशा लोकालेख अभ्यासकांनी अ-पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारताना आपली तात्त्विक बैठक कायम ठेवून यूरेापीय मूल्ये जपण्याचा नेहमी प्रयत्न केला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून बहुतेक सर्वच सामाजिक शास्त्रांत ‘लोकालेख पद्धती’ वापरली जाते.
लोकालेखाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात.
(१) आपल्या अभ्यासाखालील जनसमूहांमध्ये सहभागी होणे किंवा समरस होऊन विशिष्ट उद्दिष्टांच्या आधारे कोणत्या मुद्द्यांचा, परीस्थितींचा आणि वर्तनांचा अभ्यास करायचा हे ठरविणे; सुत्रीकरण करणे.
(२) सखोल, गुणात्मक माहिती निरीक्षण, असंरचित मुलाखती, व्यष्टी अध्ययन यांसारख्या तंत्रांनी संकलित करणे.
(३) संकलित तथ्यांचे विमर्शात्मक विश्लेषण करून अर्थपूर्ण रीतीने त्यासंदर्भातील निरीक्षणे, वर्तन, त्यांच्या भूमिका, मते, कथने या आधारे लोकालेख शब्दबद्ध करणे.
लोकालेखासाठी चालू असलेले प्रयत्न हे एखाद्या घटनेला आणि सर्व जाणिवांना अंतर्भूत करते. लोकालेख अभ्यासक विशिष्ट अशा क्षेत्रापासून, तेथील समुदायापासून त्याने केलेले संशोधन
वेगळे करू शकत नाही. ज्या वेळी लोकालेख अभ्यासक निरीक्षण केलेली माहिती व्यवस्थितपणे जुळवितो, त्या वेळी त्याचा अभ्यास लोकालेख म्हणून तयार होतो. लोकालेख अभ्यासकांची हस्तलिखिते लोकांच्या जीवनमार्गाची, वर्तन, भूमिकांची वर्णनात्मक आणि निष्कर्षात्मक मांडणी करतात, हे लोकालेख अभ्यासकाची शेवटची निष्पत्ती होय. विस्तारित स्वरूपाचे सहभागी निरीक्षण करणे; आपण निवडलेल्या संशोधन क्षेत्रामध्ये दीर्घकाळ व्यथित करणे; मोठ्या प्रमाणावर टीपण, कलाकृती, दृकश्राव्य चित्रफित यांसारख्या साधनांद्वारे माहिती सामग्रीचे मोठ्या प्रमाणात संग्रह करणे; अभ्यासाच्या सुरुवातीस कोणत्याही प्रकारची पूर्वग्रहदूषितता, कपोलकल्पना किंवा अगदी विशिष्ट पद्धतीनेच निरीक्षणे करण्याचा अट्टाहास संशोधकाच्या मनात असता कामा नये.
लोकालेखाचे प्रकार : लोकालेख पद्धतीचे अनेक प्रकार आढळून येतात. हे प्रकार लोकालेख कोणत्या हेतूने व कसे वापरले जातात यावरून पडलेत.
- वास्तविक लोकालेख : यामध्ये अधिक वस्तूनिष्ठपणा आणि काटेकोरपणा असतो.
- कबुलीजबाबात्मक लोकालेख : यामध्ये अभ्यासकांच्या क्षेत्रीय अनुभवांना महत्त्व देतात.
- जीवन इतिहासात्मक लोकालेख : यामध्ये एका व्यक्तीच्या गतकालावर भर देतात.
- आत्म लोकालेख : यामध्ये एखाद्या व्यक्तीचे त्याच्या सांस्कृतिक संदर्भात प्रतिबिंबित आत्मपरीक्षण अभ्यासतात.
- सूक्ष्म लोकालेख : यामध्ये एखाद्या समूहाच्या विशिष्ट सांस्कृतिक बाबींवर लक्ष केंद्रित करतात.
- व्यष्टी अभ्यासात्मक लोकालेख : यामध्ये एखाद्या व्यक्ती अथवा समूहाच्या सांस्कृतिक कृती-प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करतात.
- चिकित्सक लोकालेख : यामध्ये एखाद्या वंचित समूहाच्या सत्ता, संपत्ती यांसंबधीच्या बाबींचा सांस्कृतिक अभ्यास करून विकास, बदलांवर लक्ष केंद्रित करतात.
- स्त्रीवादी लोकालेख : यामध्ये स्त्रियांच्या दुय्यमतेच्या, परावलंबनाच्या सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास समतेच्या मांडणीच्या हेतूने करतात.
- उत्तराधुनिक लोकालेख : यामध्ये हे पारंपरिक विज्ञान चौकटींना आव्हान देऊन विमर्शात्मकता, समूहांप्रती असलेले उत्तरदायित्व यांना विस्तारणारा अभ्यास करतात.
लोकालेख अभ्यासक हा आपल्या लिखाणाच्या संदर्भात वातावरण, सामाजिक संबंध, ओळख आणि जागतिक दृष्टिकोण हाताळतात. तो आपले लेखन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विभागत असतो. याच प्रकरणांमधील शीर्षके ही त्या प्रकरणांचा मुख्य उद्देश दर्शवितात. त्यांना प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे त्यांचे लिखाण वर्णनात्मक स्वरूपाचे असते. अशा प्रकारच्या लिखाणामध्ये वैयक्तिक लिखाण-चरित्रे, जीवनकथा किंवा आत्मकथा आणि स्वानुभव यांचा समावेश असतो. कालानुक्रमे लिहिलेल्या घटना आणि रोजनिशी यांचादेखील यामध्ये समावेश होतो. प्रवासवर्णने, वाङ्मयीन प्रकार (उदा. कादंबऱ्या, लघुकथा, कविता, नाटके इत्यादी) यांचा वापर लोकालेख लेखनामध्ये केला जातो. लोकालेख लेखनासाठी साह्यभूत ठरणाऱ्या साधन-सामग्रीच्या आधारे लोकालेख लेखनाचे प्रकार ओळखता येतो.
लोकालेख आणि सहभागी निरीक्षण : लोकालेख आणि सहभागी निरीक्षण या दोन्हींच्या संकल्पनेमध्ये बरेचसे साम्य आहे. मानवशास्त्रात सुरुवातीच्या काळात सहभागी निरीक्षणे अभ्यासली गेली, जी लोकालेख म्हणून मांडली गेली. लोकालेख आणि सहभागी निरीक्षण यांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. (१) निरीक्षण करणारी व्यक्ती आणि लोकालेख अभ्यासक एखाद्या गटामध्ये किंवा समुदायामध्ये विशिष्ट कालावधीसाठी तेथील लोकांची वर्तणूक आणि त्यांच्यामधील संभाषण जाणून घेण्यासाठी सहभागी होतात. (२) सहभागी निरीक्षक आणि लोकालेख अभ्यासक संबंधित अभ्यास विषयासंबंधी माहिती संकलित करण्यासाठी मुलाखत आणि लिखित दस्तऐवज यांचा वापर करतात. या प्रक्रियेमध्ये निरीक्षकाला अधिक महत्त्व प्राप्त होते; तथापि लोकालेख संकल्पना वरील दोन्ही पद्धतीला एकाच दर्जाने विचारात घेतात.
लोकालेखाला एक संशोधन पद्धती म्हणून वापरताना संशोधकाला पुढील गोष्टींवर अधिक भर द्यावा लागतो.
- काही विशिष्ट कालावधीसाठी संशोधकाने समाजाच्या (संशोधनाशी संबंधित) सभासदांचे निरीक्षण करण्यात तल्लीन होणे.
- हे निरीक्षण विशिष्ट कालावधीसाठी निरंतर चालविणे.
- संशोधकाने स्वत:ला संभाषणामध्ये आणि ऐकण्यामध्ये गुंतविणे.
- एखाद्या गटाबद्दलचे दस्तऐवज गोळा करणे.
- विषयाशी संबंधित लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास करून त्या लोकांची वागणूक समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
- सदर सर्व प्रक्रियेवर विस्तारित लेख किंवा दस्तऐवज तयार करणे.
सहभागी निरीक्षण पद्धत : सहभागी निरीक्षणाची पद्धत एखाद्या छोट्या एकजिनसी समाजाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. लोकालेख अभ्यासक एखाद्या समाजाच्या अभ्यासासाठी त्या समाजामध्ये बराच काळ वास्तव्य करतो, त्या समाजाची स्थानिक भाषा अवगत करतो आणि त्या समाजाच्या दैनंदिन जीवनामध्ये सहभागी होऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो. लोकालेख अभ्यासक सहभागी निरीक्षणाच्या माध्यमातून एखाद्या समाजाचा जीवनक्रम तपासणारा निरीक्षक म्हणून भूमिका बजावत असतो. सहभागी निरीक्षणातून मिळविलेली माहिती ही स्थानिक लोकांचा दृष्टिकोण समोर ठेवून मिळविलेली असते. लोकालेख अभ्यासकांना त्यांची निरीक्षण कौशल्ये आणि सामाजिक सहभाग दाखविण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धत म्हणून ’सहभागी निरीक्षण’ पद्धतीची मदत होते.
लोकालेख अभ्यासकाची भूमिका : लोकालेख अभ्यासकाची भूमिका ही सक्रिय आणि निष्क्रिय अशा दोन वेगवेगळ्या अंगांनी पाहता येते. ज्या वेळी संशोधकाला सक्रिय भूमिका पार पाडायची असते, त्या वेळी त्याला अभ्यास विषयाशी संबंधित अनेक लोकांशी संवाद साधणे, अभ्यास विषयाशी संबंधित लोकांच्या मुलाखती घेणे आणि अभ्यास क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कृती करणे या गोष्टींचे आचरण करावे लागते. अभ्यासकाने या गोष्टींचे आचरण करून केलेल्या संशोधनाला ‘सक्रिय भूमिकेतून केलेले संशोधन’ असे म्हणतात. याउलट, ज्या वेळी अभ्यासकाला त्याच्या अभ्यास विषयाशी संबंधित क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष गुंतवून घेण्यास वाव नसेल किंवा त्याला सक्रिय सहभागी होण्यात अपयश येत असेल, तर ती भूमिका निष्क्रिय म्हणून ओळखली जाते.
लोकालेख अभ्यास करण्यामागे संशोधकाच्या अनेक भूमिका असू शकतात. वसाहत काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी लोकालेख हे राजपत्रे आणि जनगणनेबरोबर वसाहतवादी वर्चस्व प्रस्थापित करण्याचे तंत्र म्हणून वापरले. वसाहतोत्तर काळात वंचित, विखुरलेल्या समुदायांच्या, आदिवासींच्या संस्कृती आकलनासाठी आणि विकासासाठी असे अभ्यास झाले. वर्तमान काळात अनेक हेतूने विविध समूह, समुदायांच्या गुणात्मक, संख्यात्मक अभ्यासासाठी समूहातील सांस्कृतिक व्यवस्था, सामाजिक -सांस्कृतिक संदर्भ, प्रक्रिया आणि त्यातील अर्थ यांचा शोध घेण्यासाठी हे अभ्याससाधन सर्व सामाजिक शास्त्रांमध्ये वापरले जाते.
क्षेत्रीय कामातील नोंदी : सहेतुकपणे अभ्यासासाठी समूह निवडणे; त्या समूहात आपला स्वीकार होईल असे वातावरण तयार करणे; त्या समूहात सहभागी होऊन निरीक्षणे, संवाद, चर्चा, मुलाखती इत्यादींद्वारे माहिती संकलित करणे; त्यावरील अभ्यासाखालील लोकांची मते, प्रतिक्रिया जाणणे; आपली विमर्शात्मकता वापरून शास्त्रीय पद्धतीने लोकालेख त्यांचे शब्द, वर्तन, भूमिका, परिस्थिती आणि संशोधनाची नितीतत्त्वे यांचे भान ठेऊन लिहून काढणे असे महत्त्वाचे टप्पे लोकालेखात असतात.
मानवी स्मरणशक्तीच्या मर्यादेमुळे लोकालेख अभ्यासकांना त्यांच्या निरीक्षणावर आधारित महत्त्वाचे मुद्दे किंवा नोंदी करणे क्रमप्राप्त असते. त्या नोंदी या निरीक्षणादरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या, त्याबाबत आणि लोकांच्या वर्तनाबाबत असतात. या सर्व नोंदींचे विस्ताराने लोकालेखामध्ये रूपांतरण करता येते. जे काही पाहिले किंवा ऐकले त्या सर्व गोष्टींची निश्चित स्वरूपात नोंद करणे आवश्यक असते. यासाठी खालील सर्वसाधारण तत्त्वांचा वापर केला जातो.
- नोंदी किंवा मुद्दे संक्षिप्त स्वरूपात असतील, तरीही ते पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर लगेच नोंद करणे आवश्यक असते.
- दिवसभरामध्ये जे काही घडले, त्यांच्या पूर्ण विस्तारित नोंदी दिवसाच्या शेवटी करणे. यामध्ये ठिकाण, कोण सहभागी झाले, कशाने आदान-प्रदान झाली, दिनांक, वेळ यांच्या नोंदी करणे आवश्यक आहे.
- निरीक्षणाच्या नोंदी करण्यासाठी (पूर्वपरवानगीने) आधुनिक साधनांचा वापर करावा. उदा., टेपरेकॉर्डर यामुळे सविस्तर नोंदी मिळतात.
- नोंदी या सुस्पष्ट असाव्यात. तुम्हाला काय घडले याबाबत संदेह निर्माण होता कामा नये.
लोकालेख तंत्र व्यक्ती-समूहाच्या वर्तनावर आणि संस्कृतीवर भर देत असले, तरी सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भांत सर्व मानवी वर्तन, प्रक्रिया आणि लोकमानस टिपण्याची क्षमता ते राखते. विशिष्ट सामाजिक घटनांचे स्वरूप, परिस्थिती आणि कारणे अर्थपूर्ण रीतीने शोधण्यावर ते भर देते. अर्थात अनेक मर्यादांमुळे कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण, परिपूर्ण वर्णन लोकालेखाद्वारे देता येत नाही. त्यामुळे संशोधक बऱ्याच वेळा लोकालेखाबरोबर अन्य तंत्रांचा आधारही घेत असतात.
संदर्भ :
- Agar, Michael, The Professional Stranger : An Informal Introduction to Ethnography, Cambridge, 1996.
- Douglas, Mary; Baron, Isherwood, The World of Goods : Toward and Anthropology of Consumption, London, 1996.
- Erickson, Ken C.; Donald, D, Stull Doing Team Ethnography : Warnings and Advice, Beverly Hills, 1997.
- Hymes, Dell, Foundations in sociolinguistics : An Ethnographic Approach, Philadelphia, 1974.
- Kottak, Conrad Phillip, Window on Humanity : A Concise Introduction to General Anthropology, New York, 2005.
- Miller, Daniel, Material Culture and Mass Consumption, London, 1987.
- Van, Maanen John, Tales of the Field : On Writing Ethnography, Chicago, 1988.
समीक्षक : संजय सावळे