मानवजातीवर्णनशास्त्र किंवा लोकसमूहशास्त्र. मानवशास्त्राची अभ्यासपद्धती ही इतर सर्व विद्याशाखांपेक्षा खूप निराळी आहे. मानवशास्त्राच्या शाखांचा विचार केल्यावर हे सहजच लक्षात येते. जसे पुरातत्त्वीय मानवशास्त्रात उत्खननातून मिळणाऱ्या अस्थी वा मानवी संस्कृतीच्या अवशेषांनुसार पुरातत्त्वशास्त्राची मदत घेऊन अभ्यास केला जातो. शारीरिक मानवशास्त्रात शरीराची मोजमापे घेणे, रक्तगट तपासणे, हस्तरेखाचे ठसे घेऊन ते अभ्यासणे इत्यादी प्रयोगशाळेत होणारे काम विशिष्ट साहित्य घेऊन करावे लागते; परंतु सामाजिक मानवशास्त्र आणि सांस्कृतिक मानवशास्त्र यांची माहिती घेण्यासाठी किंवा मानवाची अगदी जीवशास्त्रीय माहिती घेण्यासाठीही अभ्यासकाला माणसांमध्ये, समाजामध्ये जावेच लागते. त्या वेळी अगदी साध्या निरीक्षणापासून ते मुलाखती घेणे, प्रश्नावली घेणे, काही काळ त्यांच्या सहवासात घालविणे इत्यादींतून मानवशास्त्रीय माहितीचे संकलन होते. त्यामुळे ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे; कारण मिळणाऱ्या माहितीची वास्तवता पाहणे, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. या सर्व अभ्यासासाठी लोकांमध्ये जाऊन अभ्यास करणे, माहिती संकलन करणे इत्यादींसाठी क्षेत्रीय कार्यांची गरज असते. क्षेत्रीय कार्यांतून समाजाची सर्व अंगाने माहिती घेतली जाते. अशी ही अभ्यासप्रणाली खूप उत्सुकताजनक, प्रसंगी अंतर्मुख करणारी आहे.
मानवशास्त्राला मानवीसमाज व मानवीसंस्कृती यांचा अभ्यास करायचा असतो आणि हा अभ्यास कोणतेही ठिकाण, काळ किंवा समाज यांचा असू शकतो. विविध काळातील वस्तूंचा, पुराव्यांचा आणि अवशेषांचा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करून संस्कृतीचाही अभ्यास केला जातो. प्राचीन मानवी संस्कृतीविषयीची माहिती अभ्यासकाला सहजपणे मिळू शकत नाही. त्यासाठी मिळणारे पुरावे आणि त्याविषयीचे अंदाज महत्त्वाचे असतात.
क्षेत्रीय कार्य परंपरा : जीवाश्म, अस्थी आणि प्राचीन अवशेष जे उत्खननातून मिळतात, त्यांचा अभ्यास प्रयोग शाळेत होतोच; परंतु शारीरिक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी किंवा सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मानवशास्त्राच्या अभ्यासकाला मानवी समाजात, समूहात जाऊन, तेथे राहूनच करावा लागतो. किंबहुना असा समाजच त्याची प्रयोगशाळा असते. वरवर पाहून किंवा प्रश्न विचारून खरी माहिती मिळत नसते, तर मनाने त्या लोकसमूहाशी एक व्हावे लागते. माहिती संकलन करणे केवळ एक तंत्र नाही, तर कलाही आहे. मानवशास्त्राच्या या परंपरेलाच ‘क्षेत्रीय कार्य परंपरा’ (फिल्ड वर्क ट्रॅडीशन) असे म्हणतात.
संस्कृतीचा अभ्यास करणारे मानवशास्त्रज्ञ हे त्यांनी पाहिलेली, अनुभवलेली आणि लोकांशी बोलण्यातून त्यांना समजलेली ती ती संस्कृती जाणण्याचा प्रयत्न करतात. पुरातत्त्वज्ञ आणि सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ या दोघांच्याही दृष्टीने संस्कृती आणि तिचा अभ्यास हा महत्त्वाचा असतो; परंतु पुरातत्त्वज्ञांच्या दृष्टीने प्राचीन संस्कृतीचे पुरावे महत्त्वाचे असतात, तर सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ हा वस्तुरूप पुराव्यांबरोबरच मानवी वर्तन अभ्यासून त्याची चिकित्सा करतो.
क्षेत्रीय कार्य हे मानवशास्त्राच्या अभ्यासाचा एक अविभाज्य भाग आहे. या कार्यप्रणालीमुळेच मानवशास्त्रज्ञ इतर विषयाच्या अभ्यासकांपेक्षा खूपच वेगळा ठरतो. मानवशास्त्राच्या सुरुवातीच्या काळात हा अभ्यास फक्त आदिम समाजात केला जाई. प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने किंवा शिकाऱ्यांच्या साहस वर्णनाचे स्वरूप या अभ्यासामध्ये होते. सत्याला धरून असणारी वस्तुस्थिती यामध्ये फारशी नसे. कोणताही मानवी समाज किंवा माणूस असाच असतो का? आदिम-आद्य मानवाला कोणते कायदे होते? त्याचा धर्म कोणता होता? त्यांच्यात धार्मिक विचार होते का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मानवशास्त्रज्ञ त्यांच्यात राहून मिळवीत असे. पूर्वीचा माणूस अगदी व्यक्तीनिष्ठ होता. स्वतःची भूक आणि शारीरिक गरज भागविणे एवढेच त्याला माहिती होते. कालांतराने कुटुंबव्यवस्था झाली, टोळ्या बनल्या, समाज झाला. तो समाजावर प्रभुत्व दाखवू लागला, धर्माचा पगडा वाढला, कायद्याची चाकोरी आली, गरजा वाढू लागल्या, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आजही कितीतरी समाज, लोकसमूह, अगदी आदिम अवस्थेत जगत आहेत. या लोकांचे शहरी लोकांना नेहमीच कुतूहल वाटते. याच कुतूहलातून विविध लोकांच्या लोकजीवनाच्या अभ्यासास सुरुवात झाली. अमेरिकेतील युरोपीय वसाहती, भारतातील ब्रिटीश राजवट, युरोपातील लोकांच्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वसाहती यांतूनच मानवशास्त्रातील लोकजीवनाच्या अभ्यासास सुरुवात झाली. मिशनरी आणि प्रशासक यांनी अत्यंत हुशारीने आणि जाणीवपूर्वक असा अभ्यास सुरू केला. धर्म प्रसार किंवा प्रशासकीय सोयीसाठी हा अभ्यास असला, तरी लोकजीवनाच्या अभ्यासाची ती नांदी होती; परंतु हे अभ्यासक त्या वेळी केवळ पुस्तकी स्वरूपाची आणि ढोबळ माहिती संकलित करत. पुढे पुढे असे लक्षात आले की, जर माहितीची विश्वासार्हता अधिक हवी असेल, तर संशोधकालाच लोकांपर्यंत जावे लागेल. त्यातूनच लोकजीवनाचा खरा अभ्यास आकाराला येईल. या लोक जीवनाच्या सर्वांगीण अभ्यासालाच एथनोग्राफी (Ethnography) असे म्हटले जाते.
Ethnology या शब्दाची व्युत्पत्ती Ethnos म्हणजे लोक आणि Logos म्हणजे शास्त्र या शब्दापासून झाली आहे. त्याचा अर्थ लोकांचा किंवा लोकजीवनाचा अभ्यास, त्यांच्या चालीरीतींचा अभ्यास असा आहे. निरनिराळ्या जाती, जमातींच्या संस्कृतीमधील साम्य आणि भेद यांचे विश्लेषण होते. यामध्ये संस्कृतीच्या ऐतिहासिक अंगाकडेही बघितले जाते. लोकांच्या वर्तणुकीचा नैसर्गिक स्वरूपात होणाऱ्या अभ्यासाचा सांस्कृतिक संदर्भातून अन्वयार्थ लावला जातो. लोकजीवनशास्त्राच्या अभ्यासाचा शेवट लोकांच्या किंवा समूहाच्या सांस्कृतिक वर्तनाच्या सर्वांगिण लेखनाने होतो. यामध्ये दैनंदिन उपजीविका, कर्मकांड किंवा परंपरा, आर्थिक जीवन, सांस्कृतिक चलनवलन, मुलभूत स्वरूपाचे ज्ञान, भाषा, साहित्य, इतिहास आणि सर्व जैविक, भौतिक स्वरूपाच्या माहितीचे संकलन असते.
लोकसमूहशास्त्र ही एक अभ्यासपद्धती तसेच पद्धतीशास्त्रही आहे. अभ्यासपद्धतीत माहिती संकलनाचे तंत्र आहे, तर पद्धतीशास्त्र हे काही सैद्धांतिक आणि तात्विक साचावर आधारित असते. यामध्ये विशिष्ट पद्धतीचा संच असतो. ज्यात अभ्यासकाचा सहभाग, काय घडत आहे, आजूबाजूला कोण काय म्हणत आहे, कोणीतरी कशाबद्दल तरी काहीतरी प्रश्न विचारात आहे, चौकसपणा दाखवत त्यांतून जशी माहिती येईल त्याचे संकलन होत असते.
सामाजिकशास्त्राची एक शाखा आणि सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्राचा एक भाग म्हणून लोकजीवनशास्त्र एका प्रदीर्घ क्षेत्रीयकार्याचीच परिणीती असते. एखाद्या सामाजिक व्यवस्थेतील सामाजिक जीवन आणि संस्कृती यांविषयी लोक अथवा समाज नक्की काय करतात याचे निरीक्षण लोकजीवनवर्णन, संस्कृतीवर्णन, एखाद्या संस्कृतीची वर्णनात्मक नोंद, त्याचे विश्लेषण, जीवनाचे किंवा संस्कृतीचे वैज्ञानिक अध्ययन आणि वर्णन यांमध्ये येते. या पद्धतीच्या माध्यमातून कोणत्याही समाजाचा विशेषतः आदिम आणि प्राथमिक जीवनपद्धती जगणाऱ्या आदिवासी समाजाचा अभ्यास करतात. प्रामुख्याने यात सहभागी निरीक्षण तंत्रच अवलंबिले जाते. लिखित किंवा मौखिक भाषा आणि साहित्य हे कोणत्याही समाजाचे आणि संस्कृतीचे अंतर्गत गाभा असते. त्याचा या अभ्यासात महत्त्वपूर्ण वाटा असतो. सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांचा मुलभूत दृष्टीकोन हा लोकसमूहाचा सविस्तर, सर्वांगिण अभ्यास असाच असतो. जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा ज्या समाजाचा अभ्यास करावयाचा आहे त्या समाजात राहून, त्याचा घटक बनून अभ्यास करावा लागतो. यालाच सहभागी निरीक्षण असे म्हणतात. लोकांबरोबर त्यांच्याच भाषेत बोलणे, त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणाचा आस्वाद घेणे, त्यांच्या सवयी, रूढी परंपरा आणि रितीरीवाजांचा स्वतः अनुभव घेणे इत्यादी अंगांचा सहभागी निरीक्षण पद्धतीद्वारे अभ्यास करता येतो; मात्र यामध्ये कोणत्याही मतभेदात, संघर्षात सहभागी न होता तटस्थ दृष्टीकोन ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. क्षेत्रीय कार्यादरम्यान अभ्यासकाला समाजाच्या सर्व गटांतून, थरांतून, सर्व वयोगटातल्या स्त्री – पुरुषांकडून योग्य प्रकारचे सहकार्य आवश्यक असते. त्यातूनच त्या लोकसमूहाचे शास्त्रीय व्यापक असे विश्लेषणात्मक विवेचन आकार घेत असते.
सर्वसमावेशक दृष्टीकोन हेच मानवशास्त्राचे मुलभूत तत्त्व आहे. याची जाण लोकसमूहशास्त्राच्या अभ्यासकांनी ठेवणे गरजेचे आहे. या सगळ्यांतूनच एखाद्या समाजाचा सविस्तर, सर्व अंगाने केलेला अभ्यास ज्यात समाजाचे मूळ, त्याचे नाव, तो समाज कोठून आला, त्याचे सर्वसाधारण शारीरिक वर्णन, विवाह, धर्म, देवदेवता, सण, उत्सव, लोकांची नावे, आडनावे, राजकीय आणि आर्थिक व्यवहार इत्यादी अंगाने जमा केलेली माहिती म्हणजेच लोकसमूहाची माहिती आकाराला येते. या क्षेत्रात मानवशास्त्रज्ञ लेविस हेन्री मॉर्गन यांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक समाजाचे, समूहाचे, जाती किंवा जमातींचे एक संपूर्ण लोकजीवन असते. जमातीचे नाव, उत्पत्ती, भाषा, कपडे-लत्ते, आहार, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, जन्म-मृत्यू, लग्नादी आणि इतर सर्व जीवनविषयक घटनांचे, पैलूंचे एक दृश्य आणि अदृश्य असे स्वरूप असते. त्यातूनच व्यक्तीचे, कुटुंबाचे, समाजाचे, जीवन घडत असते. त्या लोकजीवनाच्या सर्वांगीण, सर्वव्यापी अभ्यास लोकजीवनशास्त्रात केला जातो. हे मानवशास्त्रातील सर्वांत महत्त्वाचे अंग आहे.
शिकारी आणि पर्यटक यांच्या वर्णनानंतर नैसर्गिक विज्ञानाचे अभ्यासक मानवशास्त्राकडे वळू लागले. सागरी प्राणीशास्त्रज्ञ ॲल्फ्रेड कोर्ट हॅडन, चिकित्साशास्त्रज्ञ सेलिंग मॅन, शरीरशास्त्रज्ञ इलियट स्मिथ आणि मानवशास्त्रज्ञ/भौतिकशास्त्रज्ञ ब्रॉनीस्लॉ मॅलिनोस्की यांनी स्वतःच्या निरीक्षणातून मानवशास्त्राचा अभ्यास करू लागले होते. यानंतर पूर्ण वेळ मानवशास्त्राच्या अभ्यासाला देणे सुरू झाले. लोकांत वास्तव्य करून क्षेत्रीय कार्य करण्याची पद्धत सुरू होऊन ते मानवशास्त्राचे अविभाज्य अंग बनले. सुरुवातीच्या क्षेत्रीय अभ्यासकांमध्ये मानवशास्त्रज्ञ विल्यम हॉल्स रिव्हर्स यांनी क्षेत्रीय कार्याची पद्धती ठरविली. क्षेत्रीय कार्य आणि सर्वेक्षणात्मक कार्य हे दोन्ही वेगळे केले. भारतातील ‘तोडा’ जमातीचा अभ्यास त्यांनी कार्यानुभवाने केला. रिव्हर्स यांचे विद्यार्थी मानवशास्त्रज्ञ ॲल्फ्रेड रेजिनल्ड रॅडक्लिफ-ब्राऊन यांनी १९०६ ते १९०८ या दरम्यान अंदमान बेटावर सर्वप्रथम क्षेत्रीय कार्याचा परिणामकारक रित्या उपयोग केला. एका आदिम समाजाचे सामाजिक दृष्टीकोनातून केलेले हे चित्रण खूपच अर्थपूर्ण होते. याला कारण म्हणजे या अभ्यासासाठी रिव्हर्स हे स्वतः दोन वर्षे अंदमानात जाऊन राहिले. त्यांची भाषा आत्मसात करून तेथील लोकजीवांशी एकरूप झाले. सध्याच्या काळात हा अभ्यास करताना आपण बऱ्याच तांत्रिक बाबींचा उपयोग करतो. उदा., कॅमेऱ्याच्या साहाय्याने दैनंदिन जीवनातील पद्धती-परंपरा, एखादी गोष्ट अथवा घटना आपल्याला बंदिस्त करता येते किंवा टेपरेकॉर्डरच्या साहाय्याने विविध माहिती, मते, विचार आपण ध्वनिमुद्रित करू शकतो; परंतु हे साध्य करण्यासाठीसुद्धा मानवशास्त्राच्या अभ्यासकाला लोकांशी जवळीक ठेवावी लागते. हा अभ्यासक त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवत नसतो; परंतु केवळ एक अभ्यासक म्हणून तो निरीक्षण करत असतो. तो एकटा असतो आणि स्वतःच्या समाजाचा, जातीचा, संस्कृतीचा परिणाम त्याच्या निरीक्षणावर घडत नसतो. क्षेत्रीय कार्य करणाऱ्या अभ्यासकाला निरीक्षण शक्ती मात्र अगदी उच्च असावी लागते; कारण कोणत्याही शंका किंवा प्रश्न केव्हाही, कोणालाही विचारणे आणि त्याचे योग्य स्पष्टीकरण मिळविणे शक्य असतेच असे नाही. कित्येक वेळा निरीक्षणातून बरेच संदर्भ पडताळून पहावे लागतात.
एकत्रित माहिती गोळा करणे, त्यांचे संकलन करणे, त्यांची कारणमीमांसा आणि प्रक्रिया यांचा एकत्रित अभ्यास करून समाजाचा अभ्यास होत असतो. याशिवाय क्षेत्रीय सर्वेक्षण स्वतःच्या संस्कृतीत होत आहे की, दुसऱ्या संस्कृतीचा अभ्यास करत आहोत, यालाही खूप महत्त्व असते; कारण स्वतःच्या संस्कृतीचा विशेष अभिमान किंवा दुसऱ्या संस्कृतीविषयी आकस यांमुळे संशोधनाला मर्यादा येऊ शकतात. या सर्व अभ्यास पद्धतीवरून मानवशास्त्राचे समाजशास्त्रीय स्वरूप लक्षात येते. व्हेरिअर एल्विन या ज्येष्ठ मानवशास्त्रज्ञांनी विविध आदिम जमातींचा अभ्यास करताना त्यांच्यामध्ये राहून रोटीबेटी व्यवहाराद्वारे ते त्या समाजाचाच घटक झाले होते. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरीही अभ्यासकाला किती प्रमाणात झोकून द्यावे लागते, याचे हे एक उदाहरण आहे.
क्षेत्रीय कार्याची तयारी : क्षेत्रीय कार्य हा मानवशास्त्राच्या अभ्यासाचा एक अविभाज्य भाग आहे. क्षेत्रीय कार्यातून मानवशास्त्रीय अभ्यास सुकर होतो आणि प्रश्नांची उकल होते; परंतु या कार्यासाठी अभ्यासकाची विशिष्ट प्रकारची तयारी व्हावी लागते. लोकसमूहशास्त्राच्या पद्धतीनुसार अभ्यासकाला शैक्षणिक, मानसशास्त्रीय आणि शारीरिक स्वरूपाची तयारी क्षेत्रीय कार्यापूर्वी करावी लागते.
शैक्षणिक तयारी : शैक्षणिक स्वरूपाची तयारी म्हणजे ज्या समाजात, जमातीमध्ये ज्या ठिकाणी जायचे आहे, त्याविषयी सर्व इत्यंभूत माहिती करून घेणे. यामध्ये ठिकाणाचे भौगोलिक स्वरूप, तेथे जाण्याचे-येण्याचे मार्ग, आजूबाजूची भौगोलिक संपदा, जंगले, प्राणी, वनस्पती जीवन त्या भागात असणारे आणि आपण अभ्यास करणार असणाऱ्या सर्व जाती व जमातींचे धार्मिक, सामाजिक, राजकीय जीवन यांविषयीची माहिती वाचणे, ऐकणे; आपल्या अभ्यासाची दिशा, ध्येय, आपल्यापुढील प्रश्न नक्की करणे; संशोधन आणि संकल्पनेचा आराखडा नक्की करणे; त्यावर परिणाम करणारे संबंधित असे विविध पैलू अभ्यासणे; आपल्या अभ्यासाचा उद्देश आणि ध्येय नक्की करून त्यानुसार सर्व समस्या, प्रश्न संकल्पना, शंका कुशंका दूर करणे; आपल्या सहकारी, मित्र, मार्गदर्शकांबरोबर चर्चा करून त्याचे निराकरण करणे आणि अभ्यासाला पोषक असे मुद्दे मिळविणे, नवनवीन प्रश्न तयार करून ठेवणे हे शक्य होते.
मानसिक तयारी : शैक्षणिक तयारी ही व्यावहारिक स्वरूपाची आहे; परंतु प्रत्येक अभ्यासकाला क्षेत्रीय कार्यास जाण्यापूर्वी आपण नेहमीच्या ठिकाणापासून दूर, नवख्या ठिकाणी, नवीन लोकांत जात आहोत याचे पुरेपूर भान ठेऊन मानसिक दृष्ट्या तयार राहावे लागते. एका नवीन जगात जेथे सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवन अगदी भिन्न स्वरूपाचे असू शकेल हे लक्षात घेऊन त्याला सामोरे जाणे, त्यांची संस्कृती आत्मसात करणे, त्यांच्याशी एकरूप होणे, त्यांच्या आहारी न जाता त्यांची जीवनपद्धती स्वीकारणे इत्यादी प्रकारची मानसिक तयारी करावी लागते.
शारीरिक तयारी : मानसिक तयारी झाल्यास शारीरिक तयारी सोपी जाते. क्षेत्रीय कार्यासाठी जात असलेले ठिकाण, तेथील हवा, पाणी, उपलब्ध आहार यांच्याशी जुळवून घेऊन शारीरिक तंदुरुस्ती ठेवावी लागते. योग्य ती औषधे, साहित्य क्षेत्रीय कार्यादरम्यान जवळ ठेऊन काम करावे लागते.
अभ्यासकाला क्षेत्रीय कार्यासाठी कोणत्याही समाजात गेल्यावर लगेचच माहिती मिळत नसते. आधी अभ्यासकाचा तेथील लोकांशी संपर्क व्हावा लागतो. बऱ्याच वेळा गावातील लहान मुले खूप महत्त्वाची आणि उपयुक्त ठरतात. त्यांच्याकडूनही त्यांच्या समाजाविषयी बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे, खेळणे, त्यांच्यात मिसळणे, मैत्री करणे सहज शक्य होते. त्यांच्या माध्यमातून पुढे त्यांच्या पालकांपर्यंत, गावकऱ्यांपर्यंत पोहोचता येते.
मानवशास्त्रीय अभ्यासाचे स्वरूप : संशोधक अथवा अभ्यासक ज्या संस्कृतीत-जमातीत वाढला अथवा त्याचा परिचय त्या जमातीमधील लोकांशी पूर्वीच असेल, तर अशा जमातीचा अभ्यास करण्यासाठी त्यास योग्य आणि पोषक परिस्थिती मिळते. संशोधक जर त्या जातीची भाषा जाणत असेल अथवा संशोधकाची भाषा जमातीतील कोणी जाणत असेल, तर संपर्क करून माहिती मिळविणे सोपे जाते. वयोवृद्ध व्यक्तींकडून मिळणारी माहिती अधिक व्यापक असते, तर या माहितीचा अधिक खुलासा किंवा चिकित्सक मिमांसा तेथील तरुणांकडून होते. स्त्रियांकडून मिळणारी माहिती आणि पुरुषांकडून मिळणारी माहिती किंवा त्याविषयीचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. मिळालेल्या माहितीविषयी वेळो वेळी स्पष्टीकरण किंवा खुलासा करून घ्यावा लागतो. काही वेळा माहिती देणे, खुलासा करणे ही दोन्ही कामे एकच व्यक्ती करू शकतो.
मानवशास्त्राच्या अभ्यासकाला आदिवासी जीवनपद्धतीशी पूर्णतः परिचय असावाच लागतो. त्याशिवाय मानवशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाला असे म्हणताच येणार नाही. सांस्कृतिक उत्क्रांती, विकास या सर्वांचा अभ्यास करताना अगदी आदिम स्वरूपातील समाजांचा अभ्यास करावाच लागतो. वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे समाज समाज, त्यांची रचना, विशिष्ट कार्यासाठी त्यांच्यात निरनिराळ्या संस्था किंवा संघटना कशा निर्माण होतात, त्यांचे काम कसे चालते इत्यादींचा अभ्यास करण्याचे काम मानवशास्त्रात चालते. बऱ्याच वेळेला हे काम अगदी दुर्गम भागातील आदिम ज्यांना अक्षर ओळखही नसते अशा समाजाचा अभ्यास केला जातो. मानवशास्त्रात आणि मानवशास्त्रज्ञांच्या मते क्षेत्रीय कार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फ्रँट्स बोॲस, रूथ फुल्टन बेनिडिक्ट, मार्गारेट मीड, मॅलिनोस्की, एल्विन, इरावती कर्वे, एम. एन. श्रीनिवासन, दुबे इत्यादी अभ्यासकांनी वेगवेगळ्या वसाहतींत, समाजांत जाऊन त्यांच्या भाषा, धर्म, रीतिरिवाज, विवाहपद्धती, समजुती इत्यादींविषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना जुन्या-नव्या समाज रचनेचे मूळ, त्याचे स्वरूप, त्यांच्या विकासाचे टप्पे, सामाजिक स्थित्यंतरे समजतात. प्रत्येक समाजाचे आचार-विचार आणि चालणारे व्यवहार हे निरनिराळे असतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या भौगोलिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितीच्या वेगळेपणामुळे हे आचार-विचार स्वतंत्र आणि निराळे होतात.
सध्या अस्तित्वात असलेल्या संस्कृतीविषयी अभ्यास करताना मानवशास्त्रज्ञांना निरीक्षणपद्धतीवर खूप अवलंबून राहावे लागते. मानवशास्त्राच्या अभ्यासकाला क्षेत्रीय कार्यासाठी दिवसेंदिवस, महिनोमहिने आपल्या क्षेत्र कार्याच्या ठिकाणी जाऊन राहावे लागते. आपल्याला अभ्यास करण्याच्या संस्कृतीविषयी माहिती मिळविल्यानंतर केवळ निरीक्षणातून त्याला खूप काही शिकायला मिळते. हा अभ्यासक समाजात मिसळून, त्याच्यात सहभागी होऊन आपल्या अभ्यासाला पोषक असे निरीक्षण चालू ठेवतो. सामाजिक कार्य किंवा घटनेमध्ये अभ्यासकाने प्रत्यक्ष सहभागी होऊन प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करणे म्हणजे सहभागी निरीक्षण पद्धती होय. ज्या वेळी अभ्यासक अभ्यास करायचा असलेल्या समाजाचा, जमातीचा एक घटक बनतो आणि स्वतःला एक घटकच मानतो त्या वेळीच हे शक्य होते. अभ्यासक सर्व गोष्टींत सहभागी असल्याने लोकांना तो आपल्यातीलच एक वाटतो. त्यामुळे लोकांच्या सर्व क्रिया या मोकळ्या राहतात. शिवाय समाजाची सर्व सुख-दुःखे, सर्व सदस्यांचे वर्तन यांमध्ये एक प्रकारचा मोकळेपणा राहतो. एखाद्या घटनेकडे किवा वर्तनाकडे पाहण्याचा समाजाचा किवा जमातीचा दृष्टीकोन कसा आहे, हे समजण्यासाठी प्रत्यक्ष समाजात मिसळून राहून समाजाचाच एक भाग बनावे लागते. त्यासाठीच मानवशास्त्रज्ञ जमातीत राहून क्षेत्रकार्य करतात. अभ्यासकांची ही पद्धत केवळ मानवशास्त्रातच दिसून येते. यामुळेच कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारणे किवा चर्चा करणे हे अभ्यासकास लोकांबरोबरील संपर्कातून शक्य होते. याउलट अभ्यासक समाजात सहभागी होत नसेल, तर त्याच्यात व सामाजिक घटकांत दरी निर्माण होऊन त्याने संकलन केलेली माहिती अपूर्ण असते.
ज्या वेळी अभ्यासक निरीक्षणासाठी आपल्या क्षेत्रीय कार्याच्या ठिकाणी एखाद्या समाजात, जमातीत जातो, त्या वेळी अभ्यासकाची वेशभूषा, हावभाव इत्यादी अत्यंत महत्त्वाचा असतो. कित्येक वेळा अती आधुनिक आणि शहरी पेहेरावामुळे स्थानिक लोक अभ्यासकांपासून दूर जातात. लोक पुढे येण्यास बुजतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्याप्रमाणेच राहून, त्यांच्यासारखेच होऊन, आपलेपणा वाढवावा लागतो. निरीक्षण शास्त्रशुद्ध आणि निर्दोष व्हावे म्हणून अभ्यासकाला काही पथ्ये पाळावी लागतात. सर्वप्रथम लोकांत गेल्यावर लगेच माहिती विचारण्यास सुरुवात करू नये. त्यामुळे लोक वैतागू शकतात. काही दिवस त्या लोकांत, गावात राहून त्यांच्याशी संपर्क वाढविणे, मैत्री करणे, त्यांच्याबरोबर नाचगाणी करणे, खेळ खेळणे, त्यांच्याबरोबर कामे करणे इत्यादींतून आपले निरीक्षण चालू ठेवून त्यांच्याविषयी विश्वासार्ह माहिती कोणाकोणाकडून मिळेल हे चाचपून पाहावे. हे सर्व करीत असताना निरीक्षणाद्वारे त्याला मिळणारी माहिती व अनुभव वेळो वेळी न चुकता लिहून ठेवावी. यासाठी पूरक अशी छायाचित्रे काढावीत. अशा वेळी कोणत्याही दुषित ग्रहास बळी न पडता, एकांगी गोष्टीचा विचार न करता अभ्यास करणे महत्त्वाचे असते. हा सर्व अभ्यास अती सहानुभूतीपूर्वक अथवा अतिद्वेषमूलक न होता तटस्थपणे होण्यातच अभ्यासकाचे कौशल्य आहे. त्यातूनच वास्तव परिस्थिती समोर येऊ शकते. सहभागी निरीक्षण पद्धतीच्या बरोबरीने किंवा त्याच्या मर्यादा दूर करण्याच्या दृष्टीने मुलाखतींची पद्धत हीसुद्धा वापरता येते. वेगवेगळ्या प्रकारात आणि प्रमाणात याची मांडणी करता येते. सुनियोजित रचनात्मक स्वरूपाचे किंवा रचनात्मक नसलेले अशा प्रकारच्या मुलाखती असतात. यामधुनच स्वैर संभाषण किंवा गप्पांच्या स्वरूपात बरीच माहिती संकलित होऊ शकते, असा मानवशास्त्रज्ञांचा अनुभव आहे.
वंशावळ इतिहास पद्धती : या पद्धतीत प्रत्येक कुटुंबात जाऊन त्याची सविस्तर वंशावळ संबंधित माहिती घेणे आवश्यक असते. यामध्ये कुटुंब आणि कुटुंबातील व्यक्तींची अगदी बारीकसारीक, परंतु सविस्तर माहिती मिळविणे हा हेतू असतो. त्यामुळे कुटुंबाची वंशावळ, नातेसंबंध, रोटीबेटी येथपासून अगदी सर्व प्रकारची कौटुंबिक माहिती गोळा करणे अभ्यासकास शक्य होते. या माहितीवरून तुलनात्मक आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करून काही निश्चित अनुमाने काढणे शक्य होते. गोळा केलेली माहिती अपुरी वाटल्यास पुन्हा कुटुंबात जाऊन प्रश्न विचारून माहिती संकलित करता येते. विविध चिन्ह आणि खुणा वापरून कुटुंबातील लग्न आणि नातेसंबंध दर्शविता येतात.
तुलनात्मक अभ्यासपद्धती : मानवशास्त्रज्ञांसाठी जगातील संपूर्ण मानवी समाज त्याची प्रयोगशाळा असते. वेगवेगळ्या मानवी समाजात आणि गटात कोणते फरक आहेत, काय साम्य आहे, त्याची करणे काय आहेत इत्यादींची तुलना करून अभ्यास केला जातो. एमील द्यूरकेम या मानवशास्त्रज्ञांनी या पद्धतीचा प्रथम अवलंब केला; मात्र फक्त याच अभ्यासपद्धतीचा वापर केला, तर त्यातून फारसे काहीच साध्य होत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटना, रूढी इत्यादी पद्धतींचा अर्थ वेगवेगळ्या समाजात वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे रॅडक्लिफ-ब्राऊन या मानवशास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत सर्रास वापरणे योग्य नाही, तर त्याच्या साहाय्याने इतर पद्धतींचाही अवलंब करावयास हवा.
कार्यशोधक पद्धती : मॅलिनोस्की, रॅडक्लिफ-ब्राऊन या मानवशास्त्रज्ञांनी संस्कृतीमधील कार्यतत्त्वाचा विशेष अभ्यास करून त्यावर भर दिला. मॅलिनोस्की यांनी ऐतिहासिक अभ्यासपद्धतीपेक्षा संस्कृतीच्या कार्यात्मक स्वरूपाला अधिक महत्त्व दिले. रॅडक्लिफ-ब्राऊन यांच्या मते, आदिवासींच्या कोणत्याही समारंभाचा उद्देश हा सामाजिक ऐक्य आणि सामाजिक अस्तित्व टिकविण्यासाठी असतो. ब्राऊन यांच्या अभ्यासामुळे संस्कृतीच्या कार्यात्मक स्वरूपाचे महत्त्व वाढले. याच अनुषंगाने मर्टन या मानवशास्त्रज्ञांनी कार्याचे व्यक्त आणि अव्यक्त असे दोन प्रकार मानले. मानवशास्त्रज्ञ रॉबर्ट गॉर्डन यांच्या मते, एखादा अभ्यासक एखाद्या फुलाविषयी लिहिताना त्याचा रंग, गंध, पाकळ्या यांविषयी लिहील; परंतु मानवशास्त्राचा अभ्यासक एकूणच मळा, मळ्यातील फुले आणि मग फुलांविषयी बोलेल; कारण अधिक विस्तृतपणे बोलण्याची, लिहिण्याची मानवशास्त्रज्ञाला सवय असते.
मुद्रण पद्धती : क्षेत्रीय कार्यासाठी मानवशास्त्रज्ञ विविध समाजात, जमातीत जात असतात. त्या वेळी त्या त्या जमातीतील लोकांकडून दिली जाणारी माहिती त्यांच्याच मातृभाषेतून लिहून घेणे योग्य होते. लोकांची भाषा आत्मसात करून त्यांची उत्तरे आपल्या भाषेत लिहून घेणे, हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. त्यामुळे लोकांच्या माहितीचे त्यांच्याच भाषेत मुद्रण करणे सोयीचे असते. आपल्याच भाषेत आपल्याच समाजाविषयी माहिती सांगायची असल्याने लोक स्वखुशीने माहिती तर देतातच शिवाय प्रत्येक संस्कृती आपापल्या भाषेत अधिक खुलत असल्याने विशेष शब्द, म्हणी, वाक्प्रचार इत्यादींच्या साहाय्याने सांस्कृतिक वर्णन अधिक यथार्थ होते. अभ्यासकाला लोकांची भाषा जरी समजत नसली, तरीही त्यांच्याच उच्चारानुसार त्यांची भाषा आपल्या लिपीत लिहून घेत असल्याने जशीच्या तशी माहिती मुद्रित केली जाते आणि नंतर पुन्हा भेटून माहिती गोळा केली जाते. दुभाषाच्या मदतीने याचे संदर्भ जाणले जातात. माहितीचा अर्थ जाणून सत्यता पहिली जाते. त्यांच्यातील भाषिक अन्वयार्थ समजून घेऊन त्याचे भाषांतर केले जाते. या भाषिक पद्धतीचा उपयोग स्थानिक संस्कृतीच्या अभ्यासाचे साधन म्हणून आणि लोकांच्या भाषेची मांडणी करण्यासाठी उपयोग होतो. एखाद्या जमातिच्या संस्कृतीच्या सर्व अंगांचा परिणाम लोकजीवनावर होत असतो. याची जाण अभ्यास करताना अभ्यासकाने ठेवण्याची गरज असते; कारण या सर्व संघटनांचा एकमेकांवरील परिणाम, त्यांचा संबंध महत्त्वाचा असतो.
प्रश्नावली पद्धती : समाजात गेल्यावर किंवा लोकांत मिसळल्यावर त्यांना सहज समजेल अशा सोप्या शब्दांत प्रश्न विचारून माहितीचे संकलन केले जाते. त्याआधारावर संस्कृतीची माहिती मोठ्या प्रमाणवर जमा केली जाते. वंशावळ पद्धतीबरोबर जोडून या पद्धतीतून संस्कृतीची रचनाही समजू शकते.
जनगणना किंवा खानेसुमारी : हा माहिती संकलानाचा अगदी योग्य मार्ग आहे. हे राष्ट्रीय कार्य एक साधे सर्वेक्षण वाटत असले, तरी कुटुंबाविषयी सर्वंकष आणि सांख्यिकीय स्वरूपाची सर्व माहिती या पद्धतीद्वारे उजेडात येते.
दैनंदिन टीपण लेखन : व्यक्तिगत अनुभव, भावभावना, निरीक्षण यांची सुरेख गुंफण व्यक्तीच्या दैनंदिनीतून मिळते. माहिती संकलनात राहिलेल्या त्रुटी अथवा अपुरी माहिती जोडण्यासाठी दैनंदिनीचा खूप उपयोग होतो. लॉग बुक हे माहिती संकलनाचे हे एक महत्त्वाचे साधन आहे.
छायाचित्रण : छायाचित्र किंवा चलतचित्रण या साधनांद्वारे समाजाच्या विविध पद्धती, प्रथा, परंपरा, कर्मकांड इत्यादींची माहिती पुराव्यानिशी जतन होऊ शकते. या पुराव्यावरून परिस्थितीतील किंवा काळानुसार झालेले बदल, स्थित्यंतरेसुद्धा अभ्यासात येतात.
अभ्यासकाला ज्या जमातीविषयी अभ्यास करावयाचा आहे त्याच्याविषयी पूर्वी जी माहिती संपादित केली गेली आहे ती पूर्ण माहिती करून घेणे गरजेचे असते. मिळणारी माहिती कितीही क्षुल्लक असली, तरी त्याची सविस्तर नोंद सर्व तपशिलासह ठेवणे गरजेचे असते. तसेच कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी त्याचे परीक्षण करणे गरजेचे असते. या अभ्यासपद्धतीत अभ्यासक समाजाच्या सतत संपर्कात असल्यामुळे समाजाचा एक भाग होणे, मैत्रीपूर्ण संबंधामुळे भावनिक दृष्ट्या तो गुंतू शकतो. मार्गारेट मीड किंवा मॅलिनोस्की यांसारखे अभ्यासक अगदी तटस्थपणे काम करू शकले; परंतु इतरांसाठी हे अगदीच कठीण काम आहे. त्याप्रमाणेच सतत संपर्कामुळे अभ्यासकांकडून काही वेळा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते किंवा गावात, वस्तीमध्ये दोन गट असले, तर त्यानुसार अभ्यासक एखाद्या गटाकडे ओढला जाऊ शकतो. त्यामुळे त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये भाषेची अडचण असू शकते; कारण माहिती दुभाषकला विचारून, पडताळून पाहावी लागते. जेव्हा अभ्यासकाला त्या समाजाची भाषा समजू लागते, तेव्हा त्याच्या निरीक्षणाला आधार प्राप्त होतो.
संदर्भ :
- आठवले, दिपाली, भारतीय समाजाचे मानवशास्त्र, मुंबई, १९९९.
- कुलकर्णी, शौनक, आदिम, पुणे, २००२.
- मेहेंदळे, य. श्री., मानवशास्त्र : सामाजिक सांस्कृतिक, पुणे, १९६९.
- शारंगपाणी, म. यु., सामाजिक मानवशास्त्र, पुणे, १९८०.
- Kashi, Eswarappa; Malik, Ramesh, Theory and Practice of Ethnography, Delhi, 2007.
- Marvin & Harris, The Rise of Anthropological Theory, 1968.
- Konopinski, Natalie, Doing Anthropological Research, London, 2014.
समीक्षक : म. बा. मांडके