मंदाक्रांता वृत्त : मंदाक्रांता हे अक्षरगण वृत्त आहे. श्लोकातील प्रत्येक चरणात येणाऱ्या अक्षरांची संख्या, त्यांचा लघु-गुरुक्रम यावर वृत्ताचे लक्षण ठरते. हे अक्षरगणवृत्ताच्या प्रकारांतील समवृत्त प्रकारचे वृत्त आहे. ज्याचे चारही पाद एकसारखे असतात ते वृत्त म्हणजे समवृत्त. हे वृत्त वेदांमध्ये आढळत नाही. या वृत्ताची बऱ्याच साहित्यशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली लक्षणे म्हणजेच व्याख्या आपल्याला आढळतात. गंगादासांनी रचलेल्या छंदोमंजरी या ग्रंथामध्ये या वृत्ताचे लक्षण पुढीलप्रमाणे केलेले आढळते – “मन्दाक्रान्ताऽम्बुधिरसनगैर्मोभनौतौगयुग्मम्।” (छंदोमंजरी). मंदाक्रांता वृत्ताच्या प्रत्येक चरणात अथवा पादात एकूण १७ अक्षरे येतात. प्रत्येक चरणात अंबुधि४ समुद्र, रस६ रस आणि नग ७ पर्वत याप्रमाणे चौथ्या, त्यापुढील सहाव्या आणि त्यापुढील सातव्या अक्षरांवर वर यति येते. यति म्हणजेच किंचित थांबण्याची जागा. सर्व चरणांत मभनततगग असे गण असतात.

हे गण पुढील प्रमाणे-

  • मगण – | | |
  • भगण – | S S
  • नगण – S S S
  • तगण – | | S
  • तगण – | | S
  • ग – एकगुरूअक्षर S
  • ग – एकगुरूअक्षर S

उदा.   शान्ताका  रंभुज  गशय  नंपद्म  नाभंसु  रेशं

| | ||SS SSS || S | | S SS

मंदाक्रांता वृत्तातील मुख्यभाव म्हणजे मंदत्व. मन्देनआक्रामतिसामन्दाक्रान्ता। म्हणजेच जी मंदपणे चालते/जाते ती मंदाक्रांता. मंदत्व म्हणजेच प्रशमता, शांतता, उदासीनता, कोमलता, संथता, इ. भाव. हे विविध भाव प्रकट करण्यासाठी विविध कवींनी या वृत्ताचा वापर केला आहे.

शान्ताकारंभुजगशयनंपद्मनाभंसुरेशं विश्वाधारंगगनसदृशंमेघवर्णंशुभाङ्गम्।

लक्ष्मीकान्तंकमलनयनंयोगिभिर्ध्यानगम्यं वन्देविष्णुंभवभयहरंसर्वलोकैकनाथम्॥

या श्लोकामध्ये एक भक्तिरसात्मक आध्यात्मिक शांतरस कवीने कौशल्याने प्रकट केला आहे. विश्वाचा आधार, शांत आकार आणि योगिजनांना ध्यानाद्वारे समजणाऱ्या विष्णूचे अत्यंत शांत, नीरव आणि निराकार स्वरूपाला या वृत्ताद्वारे आणखीच गंभीरता आलेली दिसते. कालिदासाने या वृत्ताचा सर्वात चांगला वापर केलेला आहे. हे वृत्त कालिदासनेच निर्माण केले असे देखील म्हटले जाते.

कश्चित्कान्ताविरहगुरुणास्वाधिकारात्प्रमत्तःशापेनास्तङ्गमितमहिमावर्षभोग्येणभर्तुः।

यक्षश्चक्रेजनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरुषुवसतिंरामगिर्याश्रमेषु॥१॥

मेघदूताच्या पहिल्याच श्लोकात संपूर्ण काव्याचा एक उदासीन, संथ, शांत असा भाव प्रकट होतो. कांतेच्या म्हणजेच प्रिय पत्नीच्या विरहामुळे व्यथित झालेल्या कश्चित यक्षाची उदासीनता, गुरूच्या शापाने अस्ताला गेलेल्या महिम्यामुळे उत्पन्न झालेले दुःख, सीतेने स्नान करून पवित्र केलेल्या पाण्याची पुण्याई आणि वृक्षांच्या स्निग्ध सावलीची शांतता इथे जाणवते.

तस्मिन्नद्रौकतिचिदबलाविप्रयुक्तःसकामी नीत्वामासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः।

आषाढस्यप्र(श)थमदिवसेमेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयंददर्श॥२॥

मेघदूताचा दुसरा श्लोक निसर्गाचं कोमल मंदत्व, त्याची प्रशमता यांचं वर्णन करतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाचा आवाज असूनही अनुभवाला येणारी शांतता इथे जाणवते. शिक्षेमुळे संथ गतीने पुढे सरकणारे महिने मंदाक्रांता वृत्ताच्या संथ लयीमुळे अनुभवाला येतात. आषाढाच्या शांत दिवसांमध्ये डोंगरांवर उतरून येणारे ढग एखाद्या मदस्रावी हत्ती प्रमाणे दिसतात. श्लोकामध्ये अपेक्षित असणारी संथ गती मंदाक्रांता वृत्तामुळे अधिक परिणाम साधते. कालिदास हा निसर्ग कवी म्हणून ओळखला जातो. निसर्गाला बोलते करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे आणि त्याला ती कला अवगत आहे. संपूर्ण मेघदूतातून निसर्ग आणि मंदाक्रांता वृत्त यांचा खूप सुंदर संगम जाणवतो. अश्याप्रकारे मंदाक्रांता वृत्ताने भारतीय काव्य परंपरेतील एक खूप महत्त्वाचे वृत्त म्हणून स्थान प्राप्त केले आहे.

संदर्भ : 

  • त्रिपाठी, ब्रह्मानंद,  छंदोमंजरी (चतुर्थ संस्करण), वाराणसी १९९०.