मुक्त व दूरशिक्षण ही एक अध्ययन अध्यापनाची पद्धती आहे. या पद्धतींनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रांत महाक्रांती घडविली असून ‘सर्वांसाठी उच्च शिक्षण’ हे या शिक्षण पद्धतीचे ध्येय आहे. यामध्ये अध्ययनार्थीस (विद्यार्थी) अनेक प्रकारचे स्वातंत्र दिले आहे. याला आमूलाग्र बदल (पॅराडाइम शिफ्ट) असेही म्हणतात. उदा., त्याने काय शिकावे?, त्याने कोठे शिकावे?, त्याने कोणत्या शिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे?, त्याची परीक्षा कशी घ्यावी? इत्यादी.
मुक्त शिक्षण पद्धतीचा उदय १९७० मध्ये इंग्लंड येथे मजूर पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान सर जेम्स हॅरल्ड विल्सन यांच्या काळात झाला. लंडन येथे यू. के. ओपन युनिव्हर्सिटी स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू ‘लॉर्ड क्राउथर’ होते.
यू. के. ओपन युनिव्हर्सिटी, ब्रिटनच्या अहवालानुसार, शिक्षणातील सर्वोच्च संधी समाजातील जास्तीत जास्त इच्छुक व्यक्तींना नाकारणे हे अन्यायकारक असून सामाजिक विकासाच्या दृष्टीने ते शहाणपणाचे नाही. उच्च शिक्षण ही दीर्घकाळ मुठभर लोकांची मक्तेदारी समजली जाई; पण आता शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत हक्क असल्याचे अनेक राष्ट्रांनी मान्य केले आहे. मुक्त शिक्षणात माहिती व ज्ञानाचे विवेक, शहाणपण व कौशल्यात रूपांतर केले जाते, तेही स्वयंअध्ययनातून. क्राउथर यांच्या मते, “मुक्त विद्यापीठ हे सर्व अर्थाने मुक्त असते. त्यामध्ये अभ्यासक्रम, परीक्षा, नियम, तासिका, शिक्षक, विद्यार्थी, सभासत्र कालावधी इत्यादींवर कोणतेही बंधन नसते. यामध्ये शिक्षणक्रमास वंचितांबरोबर ज्यांना ज्यांना शिक्षण घ्यावेसे वाटते, त्या सर्वांना उच्च शिक्षण घेण्याची संधी असते”. औपचारिक शिक्षण, पत्राद्वारा शिक्षण, निरंतर शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, प्रौढशिक्षण इत्यादींमधील चांगल्या अध्ययनोपयोगी तत्त्वांचा अंतर्भाव मुक्त शिक्षणात केला आहे. त्यासोबतच अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर गरजेनुसार शिक्षण, शिक्षणातील लवचीकता व स्वयंतेचा आदर इत्यादी तत्त्वांचा अवलंब करून मुक्त शिक्षणाची पायाभरणी (अधिष्ठान) केली जाते.
भौतिक साधन-सुविधेचा अभाव, वेळेची अनुपलब्धता अशा अनेकविध कारणांनी ज्यांना पारंपरिक पद्धतींनी शिक्षण घेणे शक्य झाले नाही, त्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून मुक्त शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली. पत्राद्वारे शिक्षण देणाऱ्या संस्थेचे संचालक बोर्जे होमबर्ग आणि जर्मनीतील फर्न विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आटो पीटर्स यांनी आपल्या संशोधन व अभ्यासपूर्ण अनुभवातून मुक्त व दूरशिक्षणाची पुढील गृहीततत्त्वे प्रतिपादित केली : स्वयं अध्ययन पद्धतीतून शिक्षण, मार्गदर्शनपर शैक्षणिक सुसंवादातून शिक्षण, अध्ययनार्थ्यांची शैक्षणिक स्वायत्तता, मुक्त व दूरशिक्षण ही औद्योगिक प्रक्रिया आहे.
मुक्त व दूरशिक्षणाची स्वयंगतीनुसार शिक्षण, स्वयंअध्ययनावर भर, गरजेनुसार शिक्षण, अद्ययावत संप्रेषण व माहिती तंत्रविज्ञानाचा वापर, उद्योगासारखी कार्यानंद प्रणाली, अनेकविध शैक्षणिक माध्यमांचा वापर आणि लवचीकता ही महत्त्वपूर्ण वैशिष्टे आहेत.
मुक्त व दूरशिक्षणात अध्ययनार्थ्यांविषयक आधार, आस्था आणि आपलेपणा ही महत्त्वपूर्ण तत्त्वे आहेत. अध्ययनार्थ्यांस शैक्षणिक व मानवी आधार देण्यासाठी विद्यार्थीसेवा विभागाची स्थापना करून त्यांतर्गत विभागीय केंद्र, अभ्यासकेंद्र, कार्येकेंद्र, प्रयोग परिवार इत्यादींद्वारे मानवी व भौतिक आधारसेवा पुरविल्या जातात. आपलेपणाची भावना ही प्रत्येक अध्ययनार्थीप्रती निर्माण करून अध्ययनार्थीला सकारात्मक प्रेरणा देण्याचे कार्य केले जाते; तर अध्ययनार्थीप्रती आस्था निर्माण करून, त्यांच्या शैक्षणिक समस्येबरोबरच वैयक्तिक व कौटुंबिक समस्येकडेही लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. अध्ययनार्थीस स्वावलंबी, स्वयंपूर्ण बनविणारी अध्ययन प्रणाली विकसित करणे, हे मुक्त शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. याकरिता स्वयंअध्ययनावर भर देणारी पाठ्यपुस्तके निर्माण केली जातात. त्यासाठी काही सूत्रांचा वापर केला जातो. उदा., संवादी भाषा, पाठ्यपुस्तके वाचताना अध्ययनार्थीला काही अध्ययनकृती देऊन त्यांचे वाचन साद-प्रतीसादात्मक करणे, अध्ययनार्थीला त्याच्या आकलनाचा स्वत:लाच पडताळा घेता यावा, यासाठी स्वयंमूल्यमापनाची संधी देणारे स्वाध्याय, गृहपाठ, प्रात्यक्षिके पाठ्यपुस्तकातच जागोजागी देणे इत्यादी.
स्वयंअध्ययन हा मुक्त शिक्षणाचा आत्मा असतो. अध्ययनार्थीने स्वयंप्रेरणेने, स्वयंगतीने, स्वयंरुची व क्षमतेनुसार स्वत:हून शिकणे म्हणजे स्वयंअध्ययन होय. येथे शिकण्यासाठी अध्यापकांवर अवलंबून न राहता अद्ययावत माहितीचा संग्रह करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता अध्यापकांनी अध्ययनार्थीस स्वत:हून ज्ञान मिळविण्यासाठीची प्रेरणा निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
मुक्त व दूरशिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिगत विकास योजना, प्रकल्प पद्धती, समुपदेशन, सहअध्यायी गट, सहकार्यशील अध्ययन आणि समस्या निराकरण यांसारख्या कार्यनितींचा वापर केला जातो. स्वत: ऐकणे, स्वत: बोलणे, स्वत: वाचणे, लिहणे, हिशोब करणे, अंदाज करणे, तर्क करणे, विविध शारीरिक कौशल्ये आत्मसात करणे, विविध कलांची ओळख करून देणे, रसस्वाद घेणे, डोळ्यांनी पाहणे आणि आपल्या अनुभवानुसार अभ्यासक्रम आत्मसात करणे हे मुक्त व दूरशिक्षणामध्ये करावे लागते. तथागतांचा ‘अत्त दीप भव’ हा संदेश मुक्त शिक्षणाचा गाभा आहे.
भारत सरकारने १९७४ मध्ये पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती नेमूण मुक्त विद्यापीठ स्थापनेला सुरुवात केली. या समितीच्या तत्त्वांचा व अहवालाचा उपयोग झाला. भारतातील पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना २६ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग यांनी आंध्र प्रदेशातील नागार्जूनसागर येथे केली. त्यास डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ असे नाव देण्यात आले. त्याच प्रमाणे भारत सरकारने संपूर्ण देशासाठी संसदेच्या कायद्यान्वये नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना केली (१९८५). त्यानंतर संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात एक मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार प्रगल्भ झाला. वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ कोटा (१९८७), नालंदा मुक्त विद्यापीठ पाटणा (१९८७), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक (१९८९), मध्यप्रदेश भोज मुक्त विद्यापीठ भोपाळ (१९९१), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहमदाबाद (१९९४), कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ म्हैसूर (१९९६), नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ कोलकाता (१९९७), उत्तर प्रदेश राजश्री टंडन मुक्त विद्यापीठ इलाहाबाद (१९९९), तमिळनाडू मुक्त विद्यापीठ चैन्नई (२०२२), पंडित सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठ बिलासपुर (२००५), कृष्णकांत हांडिक मुक्त विद्यापीठ गुवाहाटी (२००५), उत्तराखंड मुक्त विद्यापीठ नैनिताल (२००५), ओडिशा राज्य मुक्त विद्यापीठ संबलपुर (२०१५) इत्यादी विद्यापीठे स्थापन करण्यात आली.
समीक्षक : के. एम. भांडारकर