महाराष्ट्रातील नासिक येथील एक प्रसिद्ध तसेच भारतातील पाचवे मुक्त विद्यापीठ. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा तसेच सर्व सामान्याला, नोकरी, व्यवसाय सांभाळून पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक घटकाला आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या कायदा २० अन्वये १ जुलै १९८९ रोजी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठास १९५६ च्या ‘विद्यापीठ अनुदान आयोगʼ (University Grants Commission – UGC) कायद्याच्या कलम १२ (ब) अन्वये मान्यता देण्यात आली. विद्यापीठास संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले असून डॉ. राम ताकवाले हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाची तात्त्विक बैठक, भूमिका आणि वैशिष्टे प्रतिबिंबीत होणारे ‘विद्यापीठ गीतʼ कवी कुसुमाग्रज यांनी लिहिले आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरीʼ हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य असून शिक्षणाची संधी घराघरात पोहोचविण्याचे बोध त्यातून व्यक्त होते. हे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठांपेक्षा वेगळे आहे. राज्यामध्ये नासिकव्यतिरिक्त नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, पुणे आणि मुंबई याठिकाणी विद्यापीठाची सात विभागीय केंद्रे आहेत, तर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यात अनेक अभ्यासकेंद्रेही सुरू आहेत. ई. वायुनंदन हे विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू, तर दिनेश भोंडे हे कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत.

सुरुवातीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र फक्त महाराष्ट्र राज्यापुरतेच मर्यादित होते; मात्र कालांतराने विद्यापीठात सुधारणा आणि कार्यक्षेत्राचा विस्तार होऊन आज देशातीलच नव्हे, तर विदेशातूनही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येथून शिक्षण घेत आहेत. सामान्य माणसास प्रगतीची दालने खुली होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील असे व्यावसायिक, उदारमतवादी अभ्यासक्रम, आधुनिक संप्रेषण तंत्रज्ञान, दूरशिक्षपद्धतीचा अंगीकार  करून जास्तीतजास्त लोकांना शिक्षणप्रवाहात आणने इत्यादी शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करून हे विद्यापीठ ‘लोकविद्यापीठ’ होण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. या विद्यापीठात शालाबाह्य व आंतरजालांद्वारे (Internet) अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची शैक्षणिक उद्दिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहेत : (१) समाजातील अप्रगत घटक आणि ग्रामीण जनता – विशेषत:  ग्रामीण महिला – यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष पुरविणे; (२) राज्य, संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर शैक्षणिक अभ्यासक्रमांची सांगड घालणे; (३) अत्याधुनिक, शैक्षणिक व संज्ञापन तंत्रांचा उपयोग करून नवोपक्रमशाली, लवचिक आणि खुल्या शिक्षणाची प्रणाली विकसित करणे तसेच तिचा प्रसार करणे; (४) निरंतर शिक्षण व विस्तार शिक्षण पुरविणे; (५) प्रौढांना आधुनिक तंत्रविद्येचे ज्ञान देऊन त्यांच्या कौशल्यात वाढ करून बदलत्या तांत्रिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे; (६) शिक्षण, भाषा, सामाजिक शास्त्रे, दूरशिक्षण, शैक्षणिक तंत्रज्ञान व प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांत पदव्युत्तर पदवीकरिता शिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध करून देणे इत्यादी.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास राज्याच्या व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायद्यांन्वये प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्रे देण्याचे कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आहेत. विद्यापीठाने सर्वस्तरीय शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्याची दक्षता घेतली असून त्यामध्ये प्रमाणपत्र ते पदव्युत्तर व संशोधन पातळीपर्यंत विविध प्रकारचे शिक्षणक्रम कार्यान्वित केले जाते. त्यांचे अभ्यासक्रम हे इतर मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांशी समकक्ष आहेत. विद्यापीठाद्वारे उच्च माध्यमिक परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यापीठाची पूर्वपरीक्षा शिक्षणक्रमानुसार पदवीचे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करू शकतात. विद्यार्थांची गुणवत्ता शास्त्रीय व पारदर्शी मूल्यमापन आणि परीक्षा पद्धतीद्वारे करण्यात येते. विद्यापीठाने आखलेले लघु अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रवृत्त करणारे आहेत. अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्यानंतर गुणपत्रिकेच्या प्रमाणित प्रती विद्यार्थ्यांनी सादर केल्यानंतर विद्यापीठामार्फत प्रमाणपत्रे देण्यात येतात. ही प्रमाणपत्रे देण्याकरिता पदवीदान समारंभाची आवश्यकता नसते. हे विद्यापीठ असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज, एशियन असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीज, कॅनडा येथील कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग यांसारख्या मुक्त विद्यापीठीय चळवळीशी संबंधित संघटनांचे सभासद आहे. विद्यापीठामध्ये कृषिविज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र, संगणकशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, सामाजिकशास्त्रे व मानव्यशास्त्र, निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान या आठ विषयांचे विभाग कार्यरत आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पारंपरिक शिक्षणाबरोबरच अनेक विशेष उपक्रम कार्यान्वित केले आहेत :

  • कारागृहांतील कैद्यांच्या जीवनात सकारात्मक व रचनात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांना शैक्षणिक संधी मिळावी या उद्देशाने राज्यातील नागपूर, कोल्हापूर, नासिक आणि पुणे येथील केंद्रीय कारागृहामध्ये अभ्यासकेंद्रांची स्थापना केली.
  • भारतीय सैनिक आणि राज्याचे पोलीस यांना उच्च शिक्षण संपादन करण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली आहे.
  • अस्थिव्यंगांना (अंधांना) शिक्षणाची संधी मिळाली, तर ते एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये श्रेष्ठ होऊ शकतात, या उद्देशाने विद्यापीठाने त्यांच्याकरिता विविध-विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती करून त्यांना शिक्षणात अनेक सवलती दिल्या आहेत.
  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांचे कौशल्य विकसित व्हावे, याकरिता विद्यापीठाद्वारे प्रशिक्षण दिले जाते.
  • दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य, स्वच्छता आणि माहितीतंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण देण्याकरिता फिरते वाहन योजना राबविली आहे.
  • आदर्श गाव निर्मितीकरिता खेडे दत्तक योजना राबवीत आहे.
  • सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, कुसुमाग्रज, लोककवी वामनदादा कर्डक या महान व्यक्तींच्या कार्यांचा व विचारांचा प्रसार करण्याकरिता अध्यासन केंद्र सुरू केले आहे. तसेच यश निर्माण, यश उद्योग, यश उन्नती इत्यादी महत्त्वपूर्ण प्रकल्पही विद्यापीठाद्वारा चालविले जातात.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे स्वतंत्र वेबरेडिओ असून त्याद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. यामध्ये यशवाणीच्या माध्यमातून शिक्षणक्रमासंदर्भात माहितीप्रसारण, प्रश्नोत्तरे, मार्गदर्शन इत्यादी प्रसारित केले जातात. याचा इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही लाभ होतो. विद्यापीठाद्वारे संवादपत्रिका, ज्ञानगंगोत्री आणि मुक्तविद्या ही तीन वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिक प्रकाशित केली जातात.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला आपल्या गुणवत्तापूर्ण कार्यामुळे असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी या संस्थेकडून ‘क्वालिटी ऑफ लाईफʼ तसेच ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स  डिस्टन्स लर्निंग एक्सपिरियन्सʼ हे दोन महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाले असून तिचा जगातील मेगा ओपन युनिव्हर्सिटीच्या यादीत समावेश झाला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे दरवर्षी पुढील पुरस्कार दिले जातात : (१) नवोदित कवींना ‘विशाखा काव्य पुरस्कारʼ. (२) नवोदित कथाकारास ‘बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कारʼ. (३) सामाजिक कार्यात विशेष योगदान देणाऱ्या महिलेस ‘रूक्मिणी पुरस्कारʼ. (४) शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती/संस्थेस ‘डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कारʼ. (५) समाजातील वंचित व दुर्लक्षित व्यक्तींच्या विकासाकरिता कार्य करणाऱ्या महिला/संस्थेस ‘श्रमसेवा पुरस्कारʼ. (६) दूरशिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तीस ‘ज्ञानदीप पुरस्कारʼ. तसेच विद्यापीठाद्वारे ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारʼ ही देण्यात येतात.

संदर्भ :

  • लिंबाळे, शरणकुमार, ज्ञानगंगा घरोघरी, नासिक, २०००.

समीक्षक – अनंत जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा