गरीबी, वंचितता, दुष्काळ, दारिद्र्य व भूकबळी यांचे विश्लेषण करणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. यालाच अधिकारिता तत्त्व असेही म्हणतात. या संकल्पनेचे विश्लेषण प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्रात केले जाते. प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी आपल्या अर्थशास्त्रीय संशोधनात अधिकार दृष्टीकोनाचे विवेचन केल्याचे दिसून येते.
काही लोकांना खाण्यासाठी पुरेसे अन्न उपलबद्ध नसणे हे भूकबळीचे कारण असून ते वैशिष्ट्य नाही. म्हणून भूकबळीचा विचार करताना मालकी रचनेचा विचार करणे आवश्यक ठरते. मालकी हा एक प्रकारचा हक्क किंवा अधिकार संबंधच आहे. भूकबळीचे विश्लेषण हे अधिकार चौकटीत करणे आवश्यक ठरते. हे विवेचन प्रामुख्याने दारिद्र्य आणि दुष्काळ यांतील संबंधाचे स्पष्टीकरण देण्यास खूप उपयक्त ठरते.
प्रकार : खाजगी बाजराधिष्टित अर्थव्यवस्थेत अधिकारसंबंध पुढील प्रकारचे असतात :
- व्यापाराधारित अधिकार : व्यक्ती किवा संस्थांना आपल्याकडील मालकीच्या वस्तू किंवा सेवांचा व्यापार किंवा विक्री करून दुसर्यांकडील आवश्यक वस्तू व सेवा विकत घेण्याचा आणि उपलबद्ध करण्याचा अधिकार प्राप्त होतो.
- उत्पादनाधारित अधिकार : यात आपल्या मालकीच्या किंवा दुसर्यांकडील विकत किंवा भाड्याने आवश्यक उत्पादन साधने उपलब्ध करून त्यांच्या वापरातून उत्पादित केलेल्या वस्तू किंवा सेवांवर अधिकार मिळतो.
- स्वयं श्रमाधिकार : यात स्वत:च्या श्रमशक्तीचा वापर करून निर्माण होणारा अधिकार, जो उत्पादनाधारित किंवा व्यापाराधारित असू शकतो.
- आनुवंशिक/वारसा हक्क आणि स्थलांतरित अधिकार : वारसा हक्काने पित्याकडून वारसाकडे स्थलांतरित होणार्या उत्पन्न आणि संपत्तीवरील अधिकार होय, जो आपणास आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यास मदत करतो.
विनिमय अधिकार : बाजाराधिष्टित अर्थव्यवस्थेत व्यक्ती आपली मालकी असलेल्या वस्तूच्या बदल्यात दुसर्या आवश्यक वस्तू मिळविण्यासाठी विनिमय करू शकतो. तो आपला विनिमय व्यापार, उत्पादन किंवा दोहोंच्या मिश्रणाचा वापर करून करू शकतो. आपणास आवश्यक वस्तूंचा गट मिळविण्यासाठी आपल्याकडील मालकीच्या वस्तूंची अदलाबदल किंवा विनिमय करणे म्हणजे विनिमय अधिकार होय. विनिमय अधिकार नकाशाकरण म्हणजे असा विनिमय अधिकार संच की, जो आपल्याकडील वस्तूंच्या विनिमयाच्या मोबदल्यात मिळवील याची शक्यता असते. त्याच्या उपलब्धेवर भूकबळी आणि गरीबी अवलंबून असते. व्यक्तीच्या विनिमयावर परिणाम करणार्या घटकांत पुढील घटकांचा समावेश होतो :
- व्यक्तिला रोजगार मिळणार का, तो किती कालावधीसाठी मिळणार आणि किती वेतनदरात.
- बिगर श्रम मत्ता विकून त्याला किती उत्पन्न मिळणार आणि त्या खरेदीसाठी किती खर्च येणार.
- आपल्याकडील श्रमशक्तीतून काय उत्पादन करायचे आणि कोणती साधने खरेदी करायची.
- व्यवस्थापन करणे शक्य आहे.
- उत्पादन साधनांचा खरेदी खर्च आणि त्यातून निर्माण होणार्या वस्तूंच्या विक्रीपासून मिळणारे मूल्य, सामाजिक सुरक्षितता लाभ आणि द्यावे लागणारे कर इत्यादी.
भूकबळी आणि दुष्काळ या विषयीचा अधिकार दृष्टीकोन कायदेशीर मार्गानी लोकांना उपलबद्ध होणार्या अन्न उपलबद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करतो. यात उत्पादन शक्यता, व्यापार संधी, अधिकार, सरकार आणि अन्न मिळविण्याच्या इतर पद्धती यांचाही विचार करणे आवश्यक आहे. व्यक्ती हा भूकबळी ठरू शकतो; कारण त्याच्यात पुरेसे अन्न घेण्याची क्षमता नसते किंवा भूकबळी टाळण्यात अपयश येते. भूकबळी टाळण्यासाठी अधिकार दृष्टीकोन पुरेसे अन्न उपलबद्ध करण्यात व्यक्ती अपयशी ठरते, यावर भर देऊन दुसर्या पर्यायाकडे दुर्लक्ष करतो. यासाठी समाजात कायदेशीर मार्गाने अन्न उपलबद्ध करून देणारी व्यवस्था आस्तीत्वात असणे आवश्यक ठरते; मात्र तो भूकबळीस परिणाम करणार्या सर्व घटकांचा विचार करत नाही. जसे की, बेकायदेशीर स्थलांतर (चोरी), निवडीतील अपयश (अलवचिक अन्न सवयी). अन्न मालकी हा सर्वांत महत्त्वाचा प्राथमिक हक्क असून प्रत्येक समाजात त्याच्या नियमनाचे नियम असतात. अधिकार दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तिला वस्तू अर्थात अन्न उपलबद्ध होण्यावर लक्ष केंद्रित करतो. भूकबळी हा अधिकार नसल्याचा परिणाम असल्याचे हा दृष्टीकोन सांगतो. या अधिकाराचे अपयशच पुरेसे अन्न न मिळणे आणि भूकबळी होण्यास करणीभूत ठरते.
भूकबळी फक्त अन्न पुरवठ्यावर अवलंबून नसते, तर त्याचे विभाजन समाजातील लोकांत होते हे खूप महत्त्वाचे असते. समाजातील भिन्न लोकांत अन्नाचे विभाजन कशावर अवलबून असते, याचे एक विश्लेषण आपणास अधिकार दृष्टीकोनातून मिळते. आज जगात आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती भूकबळीचा शिकार होतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरेशा अन्नाचा अधिकार नसणे होय. यात अन्न पुरवठ्याचा थेट संबध नाही. व्यक्तीची भुकबळी आणि दारिद्र्य टाळण्याची क्षमता मालकी आणि विनिमय अधिकार यांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे अन्न पुरवठ्यात झालेल्या घटीचा निश्चितच परिणाम दारिद्र्य आणि भूकबळीवर, किमती वाढून विनिमय अधिकारावर होतो. याबरोबरच काही आर्थिक बदलाचा रोजगारावर प्रतिकूल परिणाम होऊन, विनिमय अधिकारावर वाईट परिणाम होऊन गरीबी आणि भूकबळी या समस्या निर्माण होऊ शकतात.
संदर्भ :
- Cambridge Journal of Economics, Cambridge, 1977.
- Economic Political Weekly, 1976.
- Sen, Amartya, Poverty and Famines, New Delhi, 1981.
समीक्षक : मनिषा कर्णे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.