संशोधक संशोधन करताना माहितीच्या स्रोताचा जो एक लहान संच निश्चित करतो, त्यास नमुना निवड असे म्हणतात. नमुना निवड हे व्यक्ती अथवा लोकसंख्या निवडीबाबतचे तंत्र आहे. संशोधन करत असताना विषय व्यापक असल्यामुळे सगळ्या घटकांचा किंवा लोकसंख्येचा समावेश संशोधन प्रकल्पात करता येत नाही. त्यामुळे नमुना निवड करून संशोधित बहुसंख्य किंवा विशिष्ट घटकांचे योग्य प्रतिनिधित्व साकारले जाईल या निकषावर नमुन्याची निवड केली जाते. मोठ्या गटातून प्रातिनिधिक स्वरूपाचा लहान गट निवडणे म्हणजे नमुना निवड होय. उदा., भात शिजला आहे की, नाही हे बघण्यासाठी काही भाताची शिते आपण दाबून बघतो, म्हणजेच नमुना निवडतो आणि त्याच्या चाचणीवरून अनुमान काढतो.

संशोधनात संख्यात्मक वा संमिश्र संशोधनपद्धतीचा अवलंब केल्यास कोठे ना कोठे नमुना निवड आवश्यक ठरते. नमुना निवडीतून संशोधक करत असलेल्या संशोधित समूहाचे प्रतिनिधित्व समोर मांडता येते. नमुना निवड करत असताना पुढील दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतल्या जातात. एक, संशोधनलक्ष विश्वातील (रिसर्च युनिव्हर्स) एकूण लोकसंख्येचे समतोल प्रतिनिधित्व आणि दोन, निष्कर्षांची विश्वसनीयता व स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी नमुना आकाराने पर्याप्त असणे.

नमुना निवड निःपक्षपाती, उद्देशपूर्ण आणि तर्कशुद्ध तसेच पूर्वग्रहविरहित, विश्वसनीय व संदर्भयोग्य व्हावी यासाठी काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास नमुना निवडीतून मिळणारी माहिती अचूक आणि परिपूर्ण असण्याची शक्यता कमी राहते. लोकसंख्येचे संपूर्ण प्रतिनिधित्व करणारा नमुना न निवडल्याने नमुना त्रुटी निर्माण होतात. यामुळे विश्लेषणांती निघणारा निष्कर्ष हा संपूर्ण लोकसंख्येला लागू होत नाही. कोणताही पाहणी नमुना ठरवत असताना आपण एकूण अवलोकनक्षेत्र हेतुपूर्वक नमुन्यापुरते मर्यादित करत असतो, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे नमुना हा एकूण संशोधनपर विश्वाचा प्रातिनिधिक असावा, याबाबत दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे.

लेव्हिन आणि रुबिन यांच्या मते, सांख्यिकीशास्त्रज्ञ लोकसंख्या हा शब्द केवळ लोकांची गणना करण्यापुरताच मर्यादित न ठेवता, अभ्यासासाठी निवडलेल्या लोकसंख्येशी संबंधित इतर पैलूंसाठीदेखील (व्यक्तीविशेष, भौतिक वस्तू, नैसर्गिक साधनसंपत्ती) वापरतात. एकूण लोकसंख्येतून निवडलेल्या ठराविक भागाला किंवा हिश्शाला उद्देशून नमुना हा शब्द वापरतात. क्रोच आणि हौस्डेन यांच्या मते, मोठ्या लोकसंख्येतून चाचणी आणि विश्लेषणासाठी निवडलेला मर्यादित समूह म्हणजे नमुना. ‘लोकसंख्या’ ही अस्थायी व अगणित असल्याने तिची वैशिष्ट्ये स्पष्ट, अचूकरित्या आणि निसंदिग्धपणे टिपण्यासाठी नमुना निवड चोखंदळपणे करण्याची आवश्यकता असते. उदा., कामगार आणि त्यांचे प्रश्न असा संशोधनाचा विषय असेल, तर त्यांच्या रोजगाराचे स्वरूप कोणते, त्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी कशी इत्यादी तपशील नमुना निवडीसाठी निश्चित करूनच संशोधन सुरू करावे.

काही संशोधन अभ्यास हे सामान्यीकरणावर भर देतात. संशोधन विश्वच जर लहान असेल (उदा., शाळेतील आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांची महिन्याची हजेरी), तर सर्वांचे सरासरी काढून सामान्यीकरण केले जाऊ शकते; मात्र विशाल लोकसंख्येच्या विशिष्ट समस्या किंवा लोकांची मते याबाबत अभ्यास असल्यास सामान्यीकरण लागू करणे कठीण बनते. संशोधनाची व्याप्ती, वेळेची मर्यादा, खर्च इत्यादी लक्षात घेता तसे करणे शक्यही नसते. त्यामुळे प्रातिनिधिक रूपात विषयाची पडताळणी करणे आवश्यक ठरते. उदा., भाजी विक्रेत्यांचे त्यांच्या व्यवसायातील अनुभव आणि आव्हाने या विषयांशी निगडित संशोधन असेल, तर अशा वेळी जे भाजी विक्रेते आहेत, त्यांच्यातील काही निवडक भाजी विक्रेत्यांचा संशोधनाची उद्दिष्ट्ये, व्याप्ती व शोधप्रश्नांच्या अनुषंगाने गट किंवा उपगट निवडून संशोधनाच्या संदर्भांची पूर्तता करावी.

नमुना आकार : पाहणीतील एकूण लोकसंख्या जर लहान असेल, तर सर्वांची पाहणी करणे योग्य ठरेल. लोकसंख्या जर मोठी परंतु एकसंध असेल, तर त्याचा लहान नमुनाही (एकूण संख्येच्या किमान १० टक्के) पुरेसा पडू शकतो; मात्र लोकसंख्या मोठी व तिच्यात विविधता असेल, तर नमुन्याचा आकार असा निवडावा जेणेकरून सर्व वैविध्याचे समाधानकारक प्रतिनिधित्व साधले जाऊ शकेल. महाजालीय शिक्षणक्रमांबद्दल संशोधन असेल, तर त्यांची पोच जाणण्यासाठी केवळ लाभार्थ्यांची नमुनानिवड पुरेशी ठरणार नाही. एकूण वस्तुस्थिती जाणणयासाठी आंतरजालीय सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांचादेखील प्रमाणबद्ध समावेश नमुन्यात असणे गरजेचे ठरते.

फायदे :

  • कमी खर्चीक व वेळेचा अपव्यय वाचतो.
  • चुका कमी होण्याची शक्यता जास्त असते, तसेच मार्गदर्शक म्हणून काम करते.
  • माहितीचे संकलन अचूक आणि जलद गतीने होते.
  • नमुना निवडीमुळे सखोल व परिपूर्ण माहिती मिळण्यास मदत होते इत्यादी.

पद्धती : नमुना निवड ही दोन व्यापक प्रकारांमध्ये विभागली आहे.

(१) संभाव्यता निवड पद्धत : लोकसंख्येतील प्रत्येक घटक नमुन्यात निवडले जाण्याची संभाव्यता/शक्यता ज्या नमुना निवड पद्धतीत असते, त्या पद्धतीस संभाव्यता नमुना पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये पुढील प्रकारांचा समावेश होतो.

  • यादृच्छिक नमुना निवड (रँडम सॅम्पल) : या प्रकारामध्ये लोकसंख्येतील प्रत्येक एककास (व्यक्तीस) नमुना निवडीमध्ये निवडले जाण्याची समान संभाव्यता/शक्यता असते. उदा., लॉटरी पद्धत. यामध्ये कोणताही पूर्वग्रह न ठेवता, जाणीवपूर्वक निवड न करता रँडम पद्धतीने नमुना ठरविला जातो. यामुळे लोकसंख्येतील सर्व व्यक्तींना नमुन्यामध्ये समाविष्ट होण्याची सामान संधी राहते.
  • नियमबद्ध नमुना निवड (सिस्टिमॅटिक सॅम्पल) : यामध्ये लोकसंख्येतील एककाला विशिष्ट अनुक्रम देऊन निवडीची संख्या ठरविण्यात येते. यामध्ये लोकसंख्येच्या घटकांची यादी करून त्यांना क्रमाने लावून निवड करतात. उदा., समजा एकूण लोकसंख्या १,००० आहे. त्यातील १० टक्के लोकसंख्या निवडून त्याचे पुढे नियमबद्ध पद्धतीमध्ये विभाजन करायचे असल्यास १०० ही संख्या येते. त्यातून १ ते १० मधील कोणताही एक क्रमांक निवडून समान अंतराने पुढील नमुना निवड करत जावी. जसे की, १ ते १० मधील ५ हा क्रमांक निवडला आहे, तर पुढील यादीतील (१० च्या फरकाने) १५, २५, ३५ …९५ असे क्रमांक निवडून नमुना निवड करण्यात येते.
  • स्तरीय नमुना निवड (स्ट्रॅटिफीड सॅम्पल) : ही पद्धत स्वस्पष्टीकरणात्मक आहे. ज्या वेळी लोकसंख्या एक स्तरीय (एकसंध) नसते, त्या वेळी ही पद्धत अवलंबली जाते. उदा., एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्यविषयक अभ्यास करायचा असल्यास, संशोधकाला अशा वेळी स्तरीय पद्धत अवलंबून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या स्तरांनुसार वेगवेगळ्या गटांची प्रतिनिधिक निवड करून त्यांचा नमुना तयार केला जातो.
  • बहुस्तरीय नमुना निवड (मल्टिस्टेज सॅम्पल) : लोकसंख्येच्या एका गटाच्या अंतर्गत दुसरा गट, दुसऱ्या गटाच्या अंतर्गत तिसरा गट असे गट जेव्हा अस्तित्वात असतात, तेव्हा ही पद्धत वापरली जाते. उदा., महाराष्ट्रातील शाळांच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यासाठी यादृच्छिक पद्धतीने प्रथम जिल्ह्यांची निवड केल्यानंतर त्याच पद्धतीने तालुक्यांची व नंतर शाळांची निवड अभ्यासासाठी केली जाते.
  • गुच्छा पद्धत (क्लस्टर सॅम्पलिंग) : समान गुणधर्म अथवा लक्षणे असलेल्या लोकांच्या समूहाची निवड या पद्धतीत केली जाते. जसे की, विशिष्ट भूप्रदेशातील मुलींच्या शाळा, अंगणवाडी सुविधा असलेली गावे, क्षयरोगींचा समूह इत्यादी.

(२) असंभाव्यता निवड पद्धत : असंभाव्यता निवड पद्धत ही संशोधकाच्या सोयीशी व निर्णय क्षमतेशी निगडित आहे. या पद्धतीमध्ये संशोधक स्वतःच्या ज्ञानाने व सोयीनुसार नमुना निवडतो. याचे प्रकार पुढील प्रमाणे :

  • प्रासंगिक/सहजप्राप्त नमुना : या पद्धतीला सोयीस्कर नमुना निवड असेदेखील म्हणतात. यामध्ये संशोधक वेळ, खर्च या सर्व बाबींचा विचार करून त्याला जे योग्य वाटेल, त्या नमुन्याची निवड करून संशोधन करतो.
  • सहेतुक निवड पद्धत (पर्पसिव्ह सॅम्पलिंग) : या पद्धतीत संशोधक आपल्या उद्दिष्टांनुसार नमुना निवड करतो. ज्यातून उद्दिष्टपूर्ती होत नाही, त्याची निवड टाळतो. उदा., एखाद्या सरकारी योजनेचा फायदा घेणारे १० लोक आहेत. यातील केवळ ५ लोकांचाच अभ्यास करायचा असे जर संशोधकाने ठरविले, तर हे ५ जरी त्याने यादृच्छिक पद्धतीने निवडले, तरी एकूण नमुनासंख्येची निश्चिती तो हेतूपूर्वक करतो.
  • निर्दिष्टांक नमुना पद्धत (कोटा सॅम्पलिंग) : लोकसंख्येत लिंग, जात, वर्ग अशा अनेक एककांनुसार जे गट असतात, त्यांचे लोकसंख्येमध्ये किती प्रमाण आहे हे पाहून संशोधक प्रमाणानुसार त्या त्या गटाचा हिस्सा ठरवितो. उदा., शिक्षकांमधील पर्यावरण जागृती तपासण्यासाठी स्त्री व पुरुष शिक्षक वेगळे करून त्यातून संशोधक स्वतःच्या सोयीनुसार नमुना निवड करतो.
  • बॉल पद्धती (स्नोबॉल सॅम्पलिंग) : या पद्धतीला साखळी पद्धतदेखील म्हटले जाते. या पद्धतीमध्ये संशोधक संशोधित व्यक्तीकडून दुसऱ्या संशोधित व्यक्तीचा संदर्भ घेऊन त्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती संकलित करत जातो. उदा., घरकाम करणाऱ्या स्त्रियांविषयी संशोधन करत असता, संशोधक एखाद्या घरकामगार स्त्रीमार्फत तिच्या संपर्कातील अन्य एखाद्या घरकामगार महिलेचा संपर्क मिळवितो व अशा नमुनानिवडीतून माहिती संकलित करत जातो. जोपर्यंत संशोधकास पर्याप्त माहिती मिळत नाही अथवा त्याने निर्धारित केलेला नमुना पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया तो चालू ठेवतो.

चपखल नमुना निवडीतून आपल्याला एखाद्या समस्येच्या तीव्रतेची, लोकांमधील जात, लिंग वा प्रदेशवार मतभिन्नतेची वा विशिष्ट उपाययोजनेची वयोगटानुसार, आर्थिक स्तरीकरणानुसार लाभार्थ्यांविषयी अद्ययावत संख्यात्मक माहिती मिळून आपले आकलन संशोधनपर विषयाबाबत अधिक सुस्पष्ट होण्यात क्वचितच मदत होते.

संदर्भ :

  • बिहारी, ब., शिक्षणातील संशोधन : संकल्पनात्मक परिचय, १९९७.
  • Aggarwal, Y. P., Better Sampling, New Delhi, 1998.
  • Best, J.; Kahn, J., Research in Education, New Delhi, 1992.
  • Corbetta, P., Social Research : Theory, Methods and Techniques, New Delhi, 2003.

समीक्षक : महेश गावस्कर