ग्रामीण भारतातील सामाजिक जीवनाची संरचना आणि गतिशीलता समजून घेण्यासाठीची एक महत्त्वाची संकल्पना. भारताच्या ग्रामीण सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून प्रभुत्वशाली जातीकडे पाहिले जाते. समाजाच्या अंतर्गत आणि बर्हिगत जीवनावर प्रभुत्वशाली जाती मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असतात. ग्रामीण संरचनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून जातीव्यवस्थेतील श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या उतरंडीकडे पाहिले जाते. प्रभुत्वशाली जातींचे अस्तित्व हे ग्रामीण भारताचे व्यवच्छेदक लक्षण आहे. विविध जातींमधील एक किंवा दोन जाती ग्रामीण जीवनाच्या सर्व अंगांवर आपल्या सार्वभौमत्त्वाचा ठसा उमटवितात. या जाती आपल्या काही विशिष्ट लक्षणांमुळे स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर उच्च व प्रतिष्ठित मानल्या जातात. संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारच्या प्रतिष्ठित व प्रभुत्वशाली जातींचे अस्तित्व थोड्याफार फरकाने सारखेच दिसून येते. उदा., महाराष्ट्रात मराठा, आंध्र प्रदेशात कम्मा व रेड्डी, कर्नाटकात लिंगायत व ओक्कालिंगा, केरळमध्ये नायर, उत्तर भारतात राजपुत, ठाकुर, अहिर, गवळी, जाट इत्यादी.

व्याख्या : ‘एखादी जात संख्यात्मक दृष्ट्या इतर जातींपेक्षा वरचढ ठरते आणि जेव्हा तिच्याकडे आर्थिक व राजकीय सत्तादेखील असते, तेव्हा तिला प्रभुत्वशाली जात म्हटले जाते. एखाद्या मोठ्या आणि शक्तिशाली जातीसमूहाचे स्थान स्थानिक जातीय उतरंडीमध्ये निम्न नसेल, तर ती जात अधिक सहजपणे प्रभुत्वशाली बनू शकते’.

एम. एन. श्रीनिवास यांच्या मते, ‘कोणतीही जात प्रभुत्वशाली होण्यासाठी तिच्याकडे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर शेतीयोग्य जमीन असावी, इतर जातींच्या तुलनेत संख्याबळ जास्त असेल आणि स्थानिक जातीय उतरंडीमध्ये उच्च स्थान असावे, जेव्हा एखाद्या जातीमध्ये वर्चस्वाची वरील सर्व वैशिष्ट्ये असतात, तेव्हा तिला निर्णायक वर्चस्व प्राप्त होते व अशाच जातींना प्रभुत्वशाली जात असे म्हटले जाते’.

मॅककिम मॅरियट यांच्या मते, ‘मानवशास्त्रीय संशोधनाच्या विविध अभ्यासांमध्ये प्रभुत्वशाली जातीची संकल्पना राजकीय प्राबल्यावर आधारित आहे. ज्या जातीला पारंपरिकपणे गावातील न्यायदानाची शक्ती प्रदान असलेली जात मानली जाते, तसेच धार्मिक आणि ‘दैवी शक्ती’ प्राप्त असते असे मानले जाते, अशा जातीला प्रभुत्वशाली जात संबोधले जाते’.

प्रभुत्वशाली जातीची संकल्पना समाजशास्त्रीय अभ्यासात प्रख्यात समाजशास्त्रज्ञ एम. एन. श्रीनिवास यांनी १९५३ मध्ये प्रथमच वापरली. त्यांनी क्षेत्र अध्ययन पद्धतीचा उपयोग करून भारताच्या ग्रामीण सामाजिक जीवनाचे काही निरीक्षण नोंदविले आहेत. त्यांच्या ‘द सोशल सिस्टम ऑफ मैसूर विलेज’ या निबंधातून रामपुरा या खेडेगावाच्या केलेल्या अभ्यासातून प्रभुत्वशाली जातीची संकल्पना मांडली आहे. दक्षिण भारताच्या म्हैसूरजवळील रामपुरा या गावाचा अभ्यास करताना या गावातील ‘ओक्का लिंगा’ या अब्राह्मणी आणि शेतकरी जातीला विशेषाधिकार होते. या जातीला राजकीय सत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा असलेली आढळली. बहुजातीयता असलेल्या या गावात ‘ओक्का लिंगा’ ही जात श्रेष्ठतेच्या स्थानी होती. त्यामुळे या जातीला श्रीनिवास यांनी ‘प्रभुत्वशाली जात’ असे संबोधले. ही संकल्पना मांडताना, श्रीनिवास यांच्यावर आफ्रिकेत अभ्यासल्या जाणाऱ्या ‘प्रभुत्वशाली कुळ’ आणि ‘प्रभुत्वशाली वंश’ या संकल्पनांचा नकळतपणे प्रभाव पडला होता. ड्युमॉन्ट आणि पोकॉक या अभ्यासकांचा असा विश्वास होता की, श्रीनिवास यांनी प्रभुत्वशाली ही संकल्पना आफ्रिकन समाजाच्या अभ्यासातूनच स्वीकारली आहे. श्रीनिवास यांनी याच संकल्पनांचा आधार घेऊन भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात ‘प्रभुत्वशाली जात’ हा शब्द आर्थिक किंवा राजकीय शक्ती मिळवून देणार्‍या आणि सामाजिक उतरंडीत बऱ्यापैकी उच्च स्थानावर असलेल्या जातींसाठी वापरला आहे. श्रीनिवास यांच्या मते, प्रभुत्व असलेल्या जातीचे अस्तित्व केवळ रामपुरा गावापुरतेच मर्यादित नाही, तर देशातील इतर खेडेगावांमध्येही प्रभुत्वशाली जाती आढळतात.

प्रभुत्वशाली जात ही संकल्पना ग्रामीण भारताच्या राजकारणाची गुंतागुंत समजण्यासाठी सहायक ठरली आहे. या संकल्पनेद्वारे जातीव्यवस्थेतील तथाकथित गतीशीलता समजण्यास मदत झाली आहे. एखाद्या निम्न जातीला आपला परंपरागत दर्जा बदलून वरिष्ठ दर्जा संपादित करता येतो, हे तत्त्व मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय समाजात धार्मिक पावित्र्याच्या आधारे काही जाती श्रेष्ठ व प्रभावशाली होत्या. विविध ब्राह्मण जाती धर्म आणि अध्यात्माच्या बाबतीत श्रेष्ठ होत्या. त्यांची आर्थिक स्थिती आणि संख्यात्मक बळ कमकुवत जरी असले, तरी त्या ग्रामीण राजकारण आणि समाजकारणात श्रेष्ठत्वाचा दर्जा प्राप्त करीत. खेडेगावांमध्ये अशा धार्मिक श्रेष्ठता असणाऱ्या जातींची मते निर्णय, विचार प्रमाण मानले जात असे. गावातील सर्व समाज अशा जातींच्या वर्चस्वाला स्वीकारत असे.

आधुनिक भारतातील प्रबोधन आणि संविधान चळवळींमुळे जातीचे श्रेष्ठत्व ठरविणारा धार्मिक घटक मागे पडून तेथे एखाद्या जातीचे संख्यात्मक बळ, जमीन मालकी, सांपत्तीक स्थिती यांसारखे वैशिष्टे प्रभुत्वशाली जातीच्या निकषात महत्त्वाचे मानले जावू लागले. प्रभुत्वशाली जातीची धार्मिक शुद्धता मागे पडून त्याऐवजी आर्थिक संपन्नता, संख्याबळ, आधुनिक शिक्षण, स्थावर व जंगम मालमत्तेवरील मालकी हक्क, राजकीय सत्ता या घटकांना प्रभुत्वशाली जातीच्या संकल्पनेत महत्त्व मिळण्यास सुरुवात झाली. स्थित्यंतराच्या या प्रक्रियेमुळे  भारतातील ब्राह्मणेत्तर जातींमध्ये तथाकथित आधुनिक वैशिष्ट्ये असणाऱ्या जाती प्रभुत्वशाली बनलेल्या दिसतात. जातींच्या व्यवहरांमध्ये झालेल्या स्थित्यंतर प्रक्रियेला श्रीनिवास यांनी जातीची गतीशिलता असे म्हटले आहे. जातीच्या या महत्त्वामुळे निम्न जातीदेखील प्रभावी व श्रेष्ठत्वाचा दर्जा प्राप्त करतात.

श्रीनिवास यांची प्रभुत्वशाली जाती ही संकल्पना अमूर्त आणि अनुभवजन्य पातळीवर अस्तित्वात येते. एखाद्या जातीला तिच्या काही प्रबळ धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय सत्तेमुळे विशेषाधिकार प्राप्त होतात. त्यामुळे प्रभुत्वशाली जाती ही संकल्पना बहुआयामी आहे. एखाद्या प्रदेशातील प्रबळ जाती दुसऱ्या प्रदेशांत दुर्बल स्थितीत असू शकतात. तसेच भारताच्या स्वांतत्र्यानंतर आपण स्वीकारलेल्या संसदीय शासनप्रणालीमुळे एक व्यक्ती एक मत या तत्त्वाच्या स्वीकारामुळे आणि प्रौढ मताधिकारामुळे सर्व जातींमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली आहे. जातींचा राजकीय उद्दिष्टांसाठी वापर करण्यात येत आहे. प्रत्येक जात शासनव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यांवर दबाव टाकण्यासाठी स्वजातीच्या मतांचा वापर करत आहे. जातीला मतपेटीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक पातळीवर बहुसंख्येने मोठी असणारी व उत्पादनाच्या स्रोतांची मालकी असणाऱ्या जातीच अनेकदा स्थानिक राजकारणात पुढे असतात. प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर आणि कायदा व्यवस्थेवर प्रबळ जातींची हुकुमत असते. स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर या प्रभुत्वशाली जाती सर्वेसर्वा बनतात. ग्रामीण जीवनाच्या सर्व स्तरावर या जाती हस्तक्षेप करतात. अनेकदा जातीअंतर्गत प्रश्नांची सोडवणूक या प्रबळ जातींच्या अनुमतीनेच होते. गुन्हेगाराला शिक्षा या प्रबळ जातीतील प्रमुखाच्या मर्जीनेच दिली जाते. अशा प्रकारे या प्रभुत्वशाली जाती ग्रामीण भागात आपली सत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अंमलात आणते.

प्रभुत्वशाली जातीचा श्रीनिवास यांनी स्पष्ट केलेला आकृतीबंध थोड्याफार फरकाने संपूर्ण भारताच्या विविध प्रदेशांत आढळला. यासंबंधी काही निरीक्षणे :

  • के. एल. शर्मा यांना कानपूरजवळील एका गावाचे अध्ययन करताना असे आढळले की, या गावात ब्राह्मण जातीची संख्या अधिक आहे. ही जात धार्मिक दृष्ट्या श्रेष्ठ आहे, तरीदेखील या जातीची आर्थिक स्थिती विपन्नवस्थेत असल्याने तेथे ब्राह्मण जातीला प्रभुत्वशाली जातीचा दर्जा लाभत नाही. आता धार्मिकतेपेक्षा आर्थिकता या घटकाला स्थानिक जीवनातही महत्त्व आले. येथील ठाकूर या जातीतील बहुसंख्य लोक धनाढ्य असल्याने ही जात प्रभुत्वशालीतेच्या ठिकाणी आरुढ झालेली दिसते.
  • विलीयम वायजर यांना १९६२ मध्ये करीमपूर या गावाचा अभ्यास करताना असे आढळले की, गावात ब्राह्मण या जातीकडे बहुसंख्य शेतजमीनीची मालकी आहे. म्हणजेच धार्मिक पावित्र्यासह आर्थिक संपन्नता ही लक्षणे प्रभुत्वशाली जाती म्हणून ठरण्यास सार्थ झाली आहे.
  • ऑस्कर लेव्हीस यांनी दिल्लीजवळील रामपूर या गावी जाट जातीचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, जाट ही जात ब्राह्मणांसहित सर्व जातींवर आपले स्वामीत्व गाजविते. गावात तिची सर्वाधिक संख्या आणि जमीन मालकी असल्याने ही जाट जात तेथे प्रभुत्वशाली बनली.

श्रीनिवास यांनी १९५३ मध्ये म्हैसूर नजीकच्या रामपुरा या गांवातील ‘ओक्का लिंगा’ या जातीचा अभ्यास करताना पुढील प्रमाणे निष्कर्ष मांडला :

  • केवळ उच्च किंवा श्रेष्ठ जाती या प्रभुत्वशाली जाती म्हणून ओळखल्या जात नाही, तर इतर निम्न किंवा कनिष्ठ जातीसुद्धा एखाद्या ठिकाणी प्रभुत्वशाली जाती होऊ शकतात.
  • प्रभुत्वशाली जातीचे गावात काही प्रकार्ये असतात. या जाती यजमान व जजमान संबंधाने बांधलेल्या  असतात. रामपुरात ‘ओक्का लिंगा’ जात जजमानी जातींची स्वामी ठरते. या जातीतील लोक गावातील गरीब जातीतील लोकांना कर्ज देतात, त्यांना रोजगार देतात. या जातीमध्ये जमीनदारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते इतर जातींना जमीन कसण्यासाठी भाडेपट्टीवर देतात. तसेच गावातील प्रतिनिधी म्हणून ‘ओक्का लिंगा’ हे सत्ता स्थापन करण्याचे कार्य करतात.
  • ब्राह्मणांसहीत इतर सर्व जातीतील व्यक्तींनी गुन्हा केल्यास ‘ओक्का लिंगा’मधून शिक्षा सुनावण्याचे कार्य केले जाते. कोणत्याही जातीतील अंतर्गत तंटे, बखेले ‘ओक्का लिंगा’ जातीचा प्रमुख सोडवितो.
  • गावाच्या सार्वजनिक कल्याणाच्या कार्यक्रमांत ‘ओक्का लिंगा’ जातीची सहायता महत्त्वाची ठरते.

प्रभुत्वशाली जातीचा गावगाड्यावरील प्रभाव : प्रभुत्वशाली जाती आपल्या पारंपरिक सत्तेचा वापर करून ग्रामीण जीवनाच्या सर्व स्तरांवर आपल्या प्रभुत्वाचा ठसा कसा उमटवितात, ते पुढील मुद्यांनी अधिक स्पष्ट होईल.

  • सामाजिक क्षेत्रावरील प्रभाव : प्रभुत्वशाली जातीचे सदस्य हे आपल्या विभागात बहुल संस्कृती आणि मूल्यांचे मार्गदर्शक म्हणून वावरतात. ते नेहमी आपापल्या जातीचे पारंपरिक व्यवसाय करण्यास दुसऱ्या जातींच्या व्यवसाय करण्यावर कडक नियंत्रण ठेवतात. यासाठी ते आपल्या सत्तेचा वापर करतात. तसेच निम्न जातींच्या सदस्यांनी जर उच्च जातीच्या संस्कृतीचे अनुकरण केल्यास त्यांना जबर शिक्षा सुनावतात.
  • आर्थिक क्षेत्रावरील प्रभाव : प्रभुत्वशाली जातींचे नियंत्रण समुदायाच्या आर्थिक जीवनावर होत असते. प्रभुत्वशाली जातीचे सदस्य उच्च आणि आधुनिक व्यवसायिक शिक्षण घेतल्याने ते शासन आणि प्रशासनातील मोक्याच्या पदावर आरुढ होतात. तसेच फायदा असणाऱ्या व्यवसायांमध्ये ते अग्रेसर राहतात. विकासाच्या संसाधनांचा वापर आणि लाभ यांच्याकडेच येतो. अशा प्रकारे प्रभुत्वशाली जातींचाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर वर्चस्व असते.
  • राजकीय क्षेत्रावरील प्रभाव : ग्रामीण समाजाच्या राजकारणावर या प्रभुत्वशाली जातीचा सखोल परिणाम असतो. राजकीय सत्तेची गोळाबेरीज यांच्याच मताने व मर्जीने होते. प्रौढ मतदान पद्धतीमुळे जातीच्या संख्यात्मक बळाला महत्त्व येते. त्यांची पारंपरिक राजकीय सत्ता हळूहळू अधिक बळकट होते.

अशाप्रकारे प्रभुत्वशाली जातीच्या भुमिका ग्रामीण सामाजिक जीवनाच्या सर्व स्तरांवर प्रभाव टाकत असतात. या जाती आपल्या पारंपरिक सत्तेचा वापर सर्वत्र करताना आढळतात. आजही अनेक ग्रामीण समुदायांत प्रभुत्वशाली जातींचा प्रभाव अनुभवास येतो. यातूनच प्रभुत्वशाली जाती आणि ग्रामीण समाजकारण, राजकारण व अर्थकारण यांचा जवळचा संबंध स्पष्ट होतो.

संदर्भ :

  • Sriniwas, M. N., The Dominant Caste and Other Essays, New Delhi, 1987.
  • Dubey, S. C., India’s Changing Village, New York, 1958.
  • Mckim, Marroitt (ed.), Village India Studies in the Little Community, Jaipur, 1957.
  • Sharma, R. N., Indian Anthropology, Kanpur, 1988.
  • Das, Veena (ed), Handbook of Indian Sociology, New Delhi, 2004.
  • Kothari, Rajni (ed), Caste in Indian Politics, Hyderabad, 1972.
  • Singh, Yogendra, Social Stratification and Change in India, New Delhi, 2002.

समीक्षक : नागेश शेळके