लैंगिकता ही केवळ लैंगिकसंबंधापुरती मर्यादित नसून ती लैंगिक इच्छा, आकांक्षा, विचार, अस्मिता, ओळख सत्तासंबंध इत्यादी बाबींशी संबंधित आहे. लैंगिकता विविध माध्यमांतून व्यक्त होते आणि विविध प्रकारे अनुभवली जाते. विचार, इच्छा, दृष्टीकोन, वर्तणूक, प्रचलित रिती, व्यवहार, भूमिका आणि नातेसंबंध या सर्वांतून आपली लैंगिकता व्यक्त होते. प्रत्येक व्यक्तीसाठी लैंगिकतेचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आणि तो व्यक्तीगणिक वेगवेगळा व्यक्त केला जाऊ शकतो. त्यामुळे लैंगिकतेची एक सरळ, साधी किंवा वैश्विक अशी व्याख्या दिसून येत नाही. लैंगिकतेच्या प्रकारांबद्दल विचार करताना मुख्यत्वे भिन्न लिंगी, समलिंगी, उभयलिंगी व इतर अस्मिता म्हणून बघितले जाते. भिन्न लैंगिकतेविषयी मांडणी करताना भिन्न लैंगिकता हीच प्रमाण आहे व लिंगभाव द्वैत नैसर्गिक असून भिन्न लिंगी व्यक्तीमध्येच विवाह अथवा लैंगिक संबंध असावेत, यावर भर दिला जातो. त्यामुळे विविध प्रकारे समलिंगी व इतर अस्मितांना विकृत ठरवून ज्या व्यक्ती भिन्न लिंगी समाजातील नियमांचे उल्लंघन करतात, त्यांना कलंक, मानवी हक्कांपासून वंचित अथवा भेदभाव, तसेच मानखंडनेला सामोरे जावे लागते.

ब्रिस्टोव यांच्या मते, लैंगिकता ही संज्ञा तुलनात्मक दृष्ट्या नवीन आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अंतिम टप्प्यात यूरोप आणि अमेरिका यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लिंगसंदर्भात मानवशास्त्रीय, वैज्ञानिक आणि समाजशास्त्रीय अभ्यास केले जाऊ लागल्याने लैंगिकता हा शब्द जास्त चलनात आला; तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लिंगशास्त्राच्या विकासामुळे उभयलिंगी, भिन्न लिंगी, समलिंगी आणि त्यांच्या व्यापक वर्तन (उदा., सॅडीझम आणि मॅसोचिसम) हे सार्वजनिक अवकाशात चर्चिले गेले.

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये इ. स. १८३६ मध्ये लैंगिकता हा शब्द प्रथम वापरण्यात आला. यामध्ये लैंगिकता म्हणजे ‘लैंगिक असण्याचे किंवा लैंगिक संबंध ठेऊ शकण्याचे वैशिष्ट्ये’ असा उल्लेख करण्यात आला. सुरुवातीच्या टप्प्यावर वैज्ञानिक वापरासाठी लैंगिकता या शब्दाचा वापर करताना मानवी कामुकता अशा स्वरूपात करण्यात आला. विक्स यांच्या मते, लैंगिकता ही एक काल्पनिक एकजूट (फिक्शनल युनिटी) आहे, जी अस्तित्वात नव्हती आणि काही काळानंतर भविष्यात कदाचित अस्तित्वात नसेल. लैंगिकता ऐतिहासिक दृष्ट्या आकस्मिक आहे.

लैंगिकता हा एक चिकित्सक कोटिक्रम आहे. लैंगिक इच्छा या दमन आणि मुक्तीच्या सामाजिक, सांस्कृतिक रचनेमध्ये अपरिहार्यपणे अडकलेल्या आहेत आणि समाजातील सत्तासंबंध व त्याभोवतीच्या चर्चाविश्वातून इच्छा घडविल्या जातात. लैंगिकता ही नैसर्गिक नसून ती विविध सामाजिक चर्चाविश्वातून घडत असून आपल्या आतील लैंगिक इच्छा, आकांक्षा या सामाजिक संरचनातून (कुटुंब, शाळा, कामाचे ठिकाण, धार्मिक व्यवहार, कायदा इत्यादी.) आकाराला येतात. उदा., आपल्या मनात असणाऱ्या लैंगिक भावना कशा व्यक्त करायच्या? आपल्या लैंगिक आवडी-निवडी, आपले शरीर कसे दिसावे अथवा असावे? लैंगिक संबंध आणि इच्छा या सर्वबाबी आपल्या लैंगिकतेशी संबंधित असून त्यांना विविध सरंचनेच्या माध्यमातून घडविले जाते. उदा., माध्यमांद्वारे प्रमाणित अशी लैंगिकतेची प्रारूपे लोकांसमोर उभी करतात. माध्यमे बहुतांशी वेळा एक प्रकारची ‘प्रेमकथा’ ही खरी प्रेमकथा म्हणून वारंवार दाखवितात. ज्यात स्त्री-पुरुष हे एकमेकांच्या प्रेमात पडतात, पुरुष हा स्त्रीपेक्षा वयाने मोठा, उंच, पुरुषार्थ दाखविणारा आणि भिन्न लिंगी असलेला दाखविला जातो. क्वचितच समलिंगीसंबंध अथवा इतर लैंगिक अस्मितांबद्दल माध्यमे चित्रण दाखवितात आणि चित्रण दाखविलेच, तर त्यामध्येही बहुतांश वेळा लैंगिकतेबाबत काही साचेबंद कल्पना तयार करतात. त्यामध्ये गे, तृतीयपंथीना भडक दाखविणे, त्यांच्यामध्ये काही तरी समस्या आहेत किंवा ते भिन्न लिंगीपेक्षा वेगळे आहेत, असे चित्रण केले जाते.

भारताच्या १९८० च्या दशकाच्या शेवटी एड्ससंदर्भात जनजागृती दरम्यान कायदा, वैद्यकशास्त्र, लोकसंख्या नियंत्रण व स्त्रियांवरील हिंसा या सीमारेषांपलीकडे जाऊन लैंगिकसंबंधांबाबत कायदेशीररित्या चर्चेस सुरुवात झाली. ज्या बिगरशासकीय संस्था लैंगिकता संबंधित काम करत होत्या, त्यांना या काळात आंतरराष्ट्रीय निधी प्राप्त झाला आणि जेथे लोक बोलू शकतील, तेथे यामार्फत विविध सेवा (हेल्पलाईन, सुरक्षित अवकाश) निर्माण करण्यात आले. यामुळे गैर-प्रमाणित (नॉन-नॉर्मेटिव्ह) लैंगिक अस्मितांना व्यक्त होण्यासाठी एक राजकीय अवकाश मिळाला.

दुसरे म्हणजे, नव्वदच्या दशकात पाश्चात्त्य माध्यमांचा भारतीय दूरचित्रवाहिनीमध्ये प्रवेश होय. खाजगी चॅनल्सद्वारे लैंगिकरित्या सुस्पष्ट आणि सूचक प्रतिमा दाखविण्यास सुरुवात झाली. यामुळे न बोलले गेलेले विषय सार्वजनिक अवकाशात आले. त्याच प्रमाणे लैंगिकतेचे राजकारण, साचेबंद लिंगभाव सूचित शरीरे (जेंडर कोडेड बॉडीज), स्त्री–पुरुष द्वैत, भिन्न लिंगी संबंधांचे नैसर्गिकीकरण आणि विवाहाचे संस्थीकरण इत्यादींना आव्हान उभे केले. याच काळात ३७७ कलम मागे घेण्यात यावे, यासाठी मागणी सुरू झाली. तसेच हिजडा, कोती, गे, लेस्बियन, तृतीयपंथी, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया इत्यादींच्या जीवन व नागरी स्वातंत्र्याशी संबंधित मुद्द्यांभोवती विविध प्रकारच्या राजकीय कारवाई आणि चर्चाविश्वास सुरुवात झाली.

नव्वदच्या दशकात जरी लैंगिकतासंबंधी चर्चा किंवा कृती कार्यक्रम दिसून येत असले, तरी दैनंदिन जीवनात लोकांनी शतकानुशतके वैयक्तिक पातळीवर आणि समाजात स्पष्टपणे किंवा छुप्या पद्धतीने प्रबळ नियमांचे उल्लंघन केले आहे; पण या काळातच लैंगिकतेच्या इतिहासाचा शोध घेण्यास सुरवात झाली. या सार्वजनिक चर्चाविश्वामुळे संभाव्य अस्थिर लैंगिक ओळख आणि लैंगिकतेचा संबंध इतर ओळखीशी जोडण्यावर भर देण्यात आला. याच दरम्यान क्वीर ही संज्ञा प्रचलित झाली. अनेक अभ्यासक आणि संशोधक यांनी लैंगिकता ही संज्ञा सामाजिक रचित आहे, याकडे लक्षकेंद्रित केले. याच काळात भारतीय सार्वजनिक विश्वात लैंगिकतेसंदर्भात चर्चेस सुरुवात झाली.

सर्व पुरुष आणि स्त्रिया लैंगिक सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेस सामोऱ्या जातात. या प्रक्रियेमध्ये व्यक्ती लैंगिक इच्छा, भावना, भूमिका आणि व्यवहार आत्मसात करण्यास शिकतात. लैंगिकता ही जैविक जननेंद्रियांशी संबंधित नसून लैंगिकतेचा गर्भित अर्थ हा ‘लैंगिक संबंध, सामाजिक संरचना आणि व्यवहारतून मिळणारी मान्यता, कायदेशीर व बेकायदेशीर अवकाश, तसेच चर्चाविश्व आणि प्रतिनिधित्वाचे स्वरूप यांच्याशी संबंधित असून ते लिंग आणि लिंगाधारित ओळखीचे नियंत्रण करतात. लैंगिकता हे सामाजिक आणि सांस्कृतिक रचित आहे, हे समजून घेण्यासाठी विविध अभ्यास करण्यात आले. यामध्ये केवळ आपले  लैंगिक अनुभव कशा प्रकारे घडतात, यावर प्रकाश टाकण्यात आला नाही, तर आपण त्या अनुभवाचे वर्णन आणि ते समजून कसे घेतो, यावरही प्रकाश टाकण्यात आला. ज्या वेळी व्यक्ती सामाजिक संरचनांचा विचार करतो, त्या वेळी धर्म हादेखील लैंगिकतेवर प्रभाव पाडतो व नियंत्रित करत असतो. लैंगिक नैतिकतेबाबत विविध धर्मांत शिकवण आहे. तसेच पारंपारिक, सनातनी धर्म हे हस्तमैथुन, गर्भपात, समलैंगिकता आणि विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंध यांना निषेधार्थ मानतात. जे कोणी या नैतिकतेच्या विरोधात जाईल, त्यांना शिक्षा देण्याची तजवीज केली जाते. त्यामुळे इच्छा आणि लैंगिकतेसंदर्भातील अभिव्यक्ती सांस्कृतिक दृष्ट्या स्थित आहेत आणि त्यांना संदर्भानुसार समजून घेणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे भारतीयांसंदर्भात लैंगिकतेचा सामाजिक, भौतिक संबंधांशी असलेला संबंध हा संरचनात्मक घटक आणि संरचनात्मक हिंसा यांच्या माध्यमातून लैंगिकता घडविली जाते. यामध्ये आंतरजातीय विवाहास बंदी, जाती, धर्मांचे पावित्र्य व शुद्धता आणि त्यांचे सात्यत्य सुनिश्चित करण्यासाठी स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण लादले जाते. ज्यातून पितृसत्ताक भिन्न लिंगी कुटुंबास लाभ होतो. यातून व्यक्तीच्या श्रमावर आणि मालमत्तेवर नियंत्रण मिळविता येते.

विविध टप्प्यांवर स्त्रीवादी, गे, लेस्बियन चळवळी आणि इतर सामाजिक संशोधक व अभ्यासकांनी लैंगिकता व लैंगिक अनुभव हे जीवशास्त्र आणि मानवी स्वभाव यांत रुजलेले नसून ते किचकट अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रक्रियेचा परिणाम असल्याचे नमुद करतात. उदा., प्राथमिक शाळेतील शिक्षक लैंगिकतेबद्दल बोलताना भिन्न लिंगी विशेषाधिकार अबाधित ठेवत विविध डावपेच वापरतात. या डावपेचातून भिन्न लिंगी लैंगिकता (प्रमाणित) पुनर्उत्पादित केली जाते. त्यामुळे समलिंगी, गे, लेस्बियन विद्यार्थ्यांसाठी तसेच गैर-प्रमाणित भिन्न लिंगी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करत नाहीत.

लैंगिकता ही सामाजिक बाब असून ती विविध संरचनेतून आकारास येते. पितृसत्ताक समाज जोपर्यंत लिंगाधारित भूमिकांचा अट्टाहास सोडत नाही, तोपर्यंत विशेष असा बदल समाजात घडून येणार नाही. त्यामुळे लैंगिक शिक्षण व जनजागृती यांवर भर देणे आवश्यक आहे. तसेच लैंगिकतेभोवतीचे राजकारण आणि सामाजिक आधारभूत घटक समजून घेणे आवश्यक आहे.

संदर्भ :

  • Bristow, J., Sexuality, London1997.
  • Foucault, M., History of Sexuality, US, 1976.
  • Menon, N., Seeing Like a Feminist, New Delhi, 2012.
  • Menon, N., Sexualities : Issues in Contemporary Indian feminism, New Delhi, 2007.
  • Parker, R., Sexuality, Culture and Society : Shifting Paradigms in Sexuality Research, Culture, Health and Sexuality, New York, 2009.

समीक्षक : अनघा तांबे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.