गौफमन, इरविंग (Goffman, Erving) : (११ जून १९२२ – १९ नोव्हेंबर १९८२). विसाव्या शतकातील प्रसिद्ध कॅनेडियन-अमेरिकन सामाजिक सिद्धांतकार व समाजशास्त्रज्ञ. इरविंग यांचा जन्म कॅनडा येथे झाला. पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते अमेरिकेत आले. त्यांनी समाजशास्त्र विषयात पीएच. डी. केली. त्यानंतर त्यांनी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ, मेरिलँड येथे अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षे काम केले. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते.
अमेरिकन समाजशास्त्रात संरचनात्मक प्रक्रियावादाचे वर्चस्व होते. त्याकाळात इरविंग यांनी समकालीन समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये स्वतःचे एक भक्कम आणि वेगळे स्थान निर्माण केले. इरविंग यांचे कार्य प्रतीक्रियात्मक आंतरक्रियावाद आणि प्रघटनशास्त्र यांमध्ये, परंतु अनिश्चित ठिकाणी येते. १९५० ते १९८० पर्यंतच्या त्यांच्या लिखाणातून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याचे कौशल्य आणि रूपक व विरोधाभास यांचे समाजशास्त्रीय आकलन व त्यावरील जबरदस्त प्रभुत्व दिसून येते. पुस्तकांमधूनच त्यांच्या अभिनयशास्त्रीय दृष्टिकोण उदयास आला. ते बंडखोर बुद्धिवादी, अपारंपरिक, प्रस्थापित समजुतीवर हल्ला करणारे विचारवंत होते. ते स्वतःची ओळख अनुभवनिष्ठतावादी किंवा सामाजिक मानसशास्त्रज्ञ म्हणून करून देत. त्याकाळातील ठोकळेबद्ध वैज्ञानिक लिखाणापेक्षा वेगळी अशी स्वतःची लिखाणाची शैली इरविंग यांनी निर्माण केली. नवीन संज्ञा निर्माण केल्या. विशिष्ट सैद्धांतिक चौकटीत स्वतःचे सिद्धांत बसवण्यास त्यांचा विरोध होता. त्यांचा सामाजिक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण आंतरक्रियावादी होता. आंतरक्रियातून ‘स्व’ आणि समाज निर्मित आणि पुनर्निर्मित होत असतात, असे त्यांचे मत होते. म्हणूनच ते प्रतीकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांतकार मानले जातात.
इरविंग यांनी अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणाची मांडणी केली. त्यामध्ये त्यांनी आंतरक्रियांचा सूक्ष्म पातळीवरील अभ्यास केला. अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणात नाटक आणि सामाजिक जीवन यांतील साम्य अधोरेखित करत लोक समाजात कसे वागतात आणि स्वत:चे प्रतिनिधित्व कसे करतात, हे दर्शविण्यासाठी त्यांनी थिएटरचा एक रूपक म्हणून वापर केला. ते सामाजिक जीवनाकडे प्रत्यक्ष रंगमंचावरील नाट्यकृती किंवा अभिनय याच दृष्टीने पाहतात. यामध्ये व्यक्ती म्हणजे अभिनेता आणि समाज हा एक मंच आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. या दृष्टिकोणानुसार व्यक्तीची ओळख स्थिर आणि स्वंतत्र नसून इतरांबरोबरील आंतरक्रियांतून घडत असते. त्यांच्या अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणातून त्यांची ‘स्व’ची संकल्पना आकार घेत असून ती संकल्पना मिड यांच्या संकल्पनावर आधारित आहे. इरविंग यांच्या अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणातील ‘स्व’ हा अभिनयकर्त्याने धारण केलेला घटक नसून रंगमंचावरील अभिनयकर्ता व त्याचे प्रेक्षक यांच्यामधील आंतरक्रियांचा परिपाक आहे. प्रस्तुत दृश्याचा नाट्यपरिणाम म्हणजे ‘स्व’ होय. हा ‘स्व’ नाटकातील आंतरक्रियांचा परिपाक असल्यामुळे तो अभिनयकृती दरम्यान खंडित होण्याची शक्यता असते. त्यांचा अभिनयशास्त्रीय दृष्टिकोण ‘स्व’ च्या निर्मितीमधील अडथळे निर्माण करणाऱ्या व त्यावर मात करणाऱ्या क्रिया-प्रक्रियांभोवती फिरतो.
इरविंगच्या मते, व्यक्ती जेव्हा आंतरक्रिया करतात, तेव्हा ते इतरांना मान्य होईल असे ‘स्व’ चे प्रकटीकरण करतात. प्रेक्षक या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. या बाधा आणणाऱ्या घटकांना नियंत्रित करण्याचे कसबही अभिनयकर्त्याने प्राप्त केलेले असते. अभिनयकर्त्याची अशी अपेक्षा असते की, त्याच्या इच्छेनुरूप प्रेक्षक त्याच्या ‘स्व’ च्या प्रकटीकरणास दाद देतील आणि त्याच्या ‘स्व’ ला मान्यता देतील. अभिनयकर्त्याची अशी ही अपेक्षा असते की, प्रेक्षक स्वयंस्फुर्तीने त्याच्या इच्छेनुरूप कृती करतील. यालाच इरविंग ‘प्रभाव नियमन’ म्हणतात. यामध्ये प्रभाव टिकवण्यासाठी अभिनयकर्त्यांकडून वापरल्या जाणाऱ्या काही तंत्र आणि पद्धतींचा समावेश होतो. प्रेक्षकांना नाट्यकृती विषयीचे जाणकार होऊ नयेत म्हणून अभिनयकर्ता एका ठराविक काळाने प्रेक्षक बदलत राहतो. त्याच प्रमाणे अभिनयकर्ता नाटकातील काही नियमांचे पालन करतो. उदा., सजग राहणे, चेहऱ्यावरील हावभाव योग्य राखणे, आवाजाची पातळी राखणे इत्यादी. नाट्यकृतीचे योग्य असे नियोजन करणे आणि चांगले प्रेक्षक निवडणे या त्यातील काही पद्धती होत; परंतु इरविंग असे नमुद करतात की, यशस्वी प्रभाव नियमनात प्रेक्षक ही महत्त्वाची भूमिका निभावतात. अभिनयकर्त्याला योग्य तो प्रतिसाद देऊन आणि लक्ष देऊन ते सादरीकरणास यशस्वी बनवतात.
इरविंग यांनी आपल्या रंगमंचीय रूपकामध्ये मंचाचे दोन भाग करतात. एक, दर्शनी मंच आणि दोन, पडद्यामागील मंच. याचा वापर करून त्यांनी व्यक्तीच्या आंतरक्रियांचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, दर्शनी मंच हा असा भाग आहे, ज्यामध्ये अभिनयकर्ता आपली कला, अभिनय दाखवतो आणि त्याच्या अभिनयाचे मार्ग आणि पद्धती काहीशा निश्चित स्वरूपाच्या असतात. दर्शनी मंचामध्ये स्थळ आणि व्यक्तीगत दर्शनी भाग हे आणखी दोन घटक असतात. स्थळ म्हणजे एखाद्या ठिकाणची भौतिक स्थिती होय. स्थळाशिवाय अभिनयकर्ता आपली भूमिका पार पडू शकत नाही. व्यक्तीगत दर्शनी भागामध्ये अभिनेत्याच्या प्रकटीकरण साधनांचा समावेश होतो. ज्याद्वारे अभिनयकर्ता प्रेक्षकांना आपल्या स्थितीशी एकरूप होण्यास मदत करतो. इरविंग व्यक्तीगत दर्शनी भागाचे दृश्यस्वरूप व शिष्टाचार या दोन घटकांत विभाजन करतात. दृश्यस्वरूप यामध्ये अशा घटकांचा शिष्टाचारांचा समावेश होतो, ज्यामुळे आपल्याला अभिनेत्याचा सामाजिक दर्जा ज्ञात होतो. शिष्टाचारावरून अभिनयकर्त्यास प्राप्त परिस्थितीत कोणती भूमिका वठवायची आहे, याचे ज्ञान प्रेक्षकांना होते. अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणातून दर्शनी मंचाची दुसरी बाजू अशी की, अभिनेता बहुतेक वेळा असा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, ज्याद्वारे अभिनेता वास्तविकतेपेक्षा प्रेक्षकांच्या जास्त जवळ असल्याचा भास होतो. हे साध्य करण्यासाठी अभिनयकर्त्यास खात्री असावी लागते की, त्याचा प्रेक्षक हा त्याच्या स्वाधीन झालेला असून त्याच्या अभिनयातील खोटेपणा किंवा दिखाऊपणा प्रेक्षकाच्या लक्षात येणार नाही. अभिनयातील दिखाऊपणा लक्षात आला, तरी प्रेक्षक अभिनेत्याची त्यांनी निर्माण केलेली त्याची आदर्श प्रतिमा टिकवण्याचा स्वतःहून प्रयत्न करतील. प्रभाव नियमनासाठी अभिनयकर्त्याकडून वापरले जाणारे आणखी एक तंत्र म्हणजे गूढपणा (मिस्टिफिकेशन) हे होय. बहुतेक वेळा अभिनयकर्ता प्रेक्षक आणि स्वतःमधील संपर्काला मर्यादित करून अभिनयात एक आश्चर्यकारक संदिग्धता निर्माण करतो. अभिनयकर्ता आणि प्रेक्षक यांच्यात सामाजिक अंतर निर्माण करून प्रेक्षकांमध्ये एकप्रकारचे भय किंवा विस्मय निर्माण करतो. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाबद्दल शंका घेण्यास किंवा प्रश्न उपस्थित करण्यास वाव राहत नाही. परिणामी प्रेक्षक स्वतःहून या गूढपणा प्रक्रियेत सहभागी होतात.
इरविंग यांनी आपल्या अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणात पडद्यामागील मंच ही संकल्पना मांडतात. दर्शनी मंचामध्ये दबून राहिलेल्या कृती किंवा अनेकविध प्रकारच्या अनौपचारीक कृती यांचा समावेश पडद्यामागील मंच यामध्ये होतो. अभिनय कृती सफल होण्यासाठी अभिनयकर्त्याने प्रेक्षकांना पडद्यामागील मंचाला जाण्यापासून रोखणे आवश्यक असते. भूमिका अंतर (रोल डिस्टंस) या संकल्पनेत इरविंग हे एक व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यात करीत असलेल्या विविध प्रकारच्या भूमिकांविषयी बोलतात आणि नाट्यकृती यशस्वी होण्यासाठी काही वेळा व्यक्ती स्वतःला ती करत असलेल्या भूमिकांपासून कसे वेगळे करते ते दर्शवितात. असे आपण करीत असलेल्या भूमिकांपासून आंतर राखणे हे व्यक्तीच्या सामाजिक दर्जाचे कार्य आहे, असे इरविंग म्हणतात.
इरविंग यांच्या अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणामुळे प्रतिक्रियात्मक आंतरक्रियावादाला एक वेगळा विकल्प मिळाला. सामाजिक आंतरक्रिया या मूलतः सामाजिक अटींमध्ये बद्ध असतात. त्यामुळेच त्या समाजशास्त्रीय अभ्यासासाठी पात्र असतात, हे दाखवून देऊन त्यांनी समाजशास्त्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. समाजशास्त्रातील परंपरा या केवळ त्यांचे अनुसरण करण्यासाठी नसून सर्जनशीलपणे वापरून वेळो वेळी पुनर्मांडणी करण्यासाठी आहेत.
इरविंग यांचा खरा अभ्यास विषय व्यक्ती नसून समूह आहे. त्यामुळे त्यांच्या विश्लेषणाचा मुलभूत घटक व्यक्ती नसून समूह आहे. समूह हा व्यक्तींचा असा संघ किंवा गट आहे, जो एखादी विशिष्ट नाट्यकृती किंवा अभिनय करण्यास परस्पर सहकार्य करतो. त्यामुळेच अभिनयशास्त्रीय दृष्टिकोणातून त्यांनी केलेले विश्लेषण हे अभिनयकर्ता आणि प्रेक्षक यांच्या संबंधाबद्दल नसून समूहाबद्दल आहे. या समूहातील प्रत्येक सदस्य दुसऱ्या सदस्यावर अवलंबून असल्याने संपूर्ण अभिनयकृतीच कोसळू शकते. प्रत्येक अभिनयकर्त्यास स्वतःच्या कार्याची आणि भूमिकेची जाणीव असते. अशा समूहांना ते ‘सिक्रेट सोसायटी’ म्हणतात.
इरविंग यांची ‘कलंक’ (स्टिग्मा) ही संकल्पना महत्त्वाची आहे. कलंक म्हणजे वास्तवातील सामाजिक प्रतिमा आणि आभासी सामाजिक प्रतिमा यांमधील अंतर होय. कलंक या संकल्पनेद्वारे त्यांनी सामान्यतेचे आणि मुख्य सामाजिक प्रवाहापासून तात्पुरते किंवा अधिक प्रमाणात वगळले गेलेल्या घटकांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले. कलंक हा दोन प्रकारचा असतो असे ते प्रतिपादित करतात. एक, बदनामी करणारा ‘लांच्छनास्पद कलंक’. यामध्ये अभिनयकर्त्याच्या सामाजिक प्रतिमा आणि आभासी सामाजिक प्रतिमा यांमधील अंतर प्रेक्षकांना माहित असते आणि अभिनयकर्तासुद्धा ते गृहीत धरूनच वागत असतो. या प्रकारच्या कलंकात मुख्यत्वे शारीरिक व्यंग, एका पायाने अधू असणे इत्यादींचा समावेश होतो. दोन, लांच्छनस्पद कलंक. यामध्ये सामाजिक प्रतिमा आणि आभासी सामाजिक प्रतिमा यांमधील आंतराविषयी प्रेक्षक पूर्णतः अनभिज्ञ असतात. उदा., समलैंगिकता. अशा वेळी प्रेक्षकांना ही गोष्ट कळू नये म्हणून अभिनयकर्त्याला विशेष दक्षता घ्यावी लागते.
इरविंग यांच्या सिद्धांतावर त्यातील अनाकलनीय, गूढ घटकांमुळे टीका झाली. तसेच सूक्ष्म घटकांकडे लक्ष केंद्रित करीत असताना ते संरचनाकडे दुर्लक्ष करतात, अशीही टीका त्यांच्यावर झाली; परंतु आंतरक्रियांद्वारे दैनंदिन पातळीवर समाज कशाप्रकारे निर्मित होत असतो, हे दाखवून देणारे इरविंग यांच्या सिद्धांताचे समाजशास्त्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी अपारंपरिक अशा स्वतःच्या संशोधन पद्धती विकसित केल्या, ज्यामध्ये ते प्रवीण होते; परंतु त्यांच्या या संशोधनपद्धतींची एक विशिष्ट कार्यपद्धती नसल्यामुळे त्या पुढे शिकवणे कठीण झाले; तथापि त्यांचे सिद्धांत आणि संकल्पना सामाजिक शास्त्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊन ते लोकप्रिय ठरले.
समाजशास्त्रातील सिद्धांतात दोन प्रमुख वैचारिक प्रवाह आहेत. त्यातील एक दृष्टिकोण सामाजिक संरचना महत्त्वाचा मानतो आणि सामाजिक वास्तवाचे स्वरूप वस्तुनिष्ठ असते, असे प्रतिपादित करतो. साहजिकच अशा संरचनात्मक प्रकार्यावादी सिद्धांतांमध्ये व्यक्तीला कमी महत्त्व दिले जाते; परंतु त्याविरुद्ध प्रघाटनाशास्त्र, लोकपद्धतीशास्त्र, प्रतीकात्मक आंतरक्रियावाद हे सैद्धांतिक प्रवाह व्यक्ती आणि व्यक्तीची जाणीव याला महत्त्वाचे मानतात. सामाजिक वास्तव हे वस्तुनिष्ठ नसून व्यक्ती ते घडवत असतात. इरविंग हे या व्यक्तीनिष्ठ प्रवाहातील विचारवंत आहेत. समाज निर्मितीच्या प्रक्रियेतील व्यक्तीचे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी सामाजिक आकलनात महत्त्वाची भर घातली. ‘स्व’ ची संकल्पना आणि ‘स्व’ चे समाजातील प्रकटीकरण हे त्यांच्या सिद्धांताचा गाभा आहे. त्यामुळेच त्यांचे सिद्धांत constructivism आणि व्यक्तिनिष्ट समाजशास्त्रात महत्त्वाचे आणि दिशादर्शक ठरतात.
इरविंग यांनी अनेक पुस्तके लिहिली. दी प्रेझेंटेशन ऑफ सेल्फ इन एव्हरीडे लाईफ, १९५९; ॲसिलम्स, १९६१; इन्काऊंटर, १९६१; बिहेविअर इन पब्लिक प्लेस, १९६३; स्टिग्मा, १९६५; इंटरॅक्शन रिच्युअल, १९६७; स्ट्रॅटेजिक इंटरॅक्शन, १९६९; फ्ररेम ॲनॅलिसिस, १९७४; जेंडर ॲडव्हरटाइजमेंट्स, १९७९ इत्यादी.
संदर्भ :
- Appelrouth, Scott, and Laura Desfor Edles, Classical and contemporary sociological theory : Text and readings, 2020.
- Cuff, Edward C., Perspectives in Sociology, 2006.
- Goffman Erving, The Presentation of Self in Everyday Life, London, 1978.
- Goffman Erving, Asylums : Essays on the Social Situation of Mental Patients and other inmates, 1968.
- Ritzer George, The Sociological Theory, 2011.
समीक्षक : रमेश कांबळे