बटलर, ज्युडिथ, (Butler, Judith) : (२ फेब्रुवारी १९५६.). अमेरिकन सिद्धांतवादी आणि तत्त्वज्ञानाच्या एक अभ्यासक. बटलर यांचा जन्म अमेरिकेतील क्लीव्हलँड शहर, ओहिओ या राज्यात झाला. बटलर यांची आई व्यवसायाने वकील, तर वडील दंत चिकित्सक होते. शिक्षण घेत असताना बटलर यांचा तत्त्वज्ञान विषयामध्ये रस वाढत गेल्याने त्यांनी येल विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून बी. ए. (१९७८), एम. ए. (१९८२), आणि पीएच. डी. (१९८४) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्यांना गुग्नेहेम, रॉकफेलर, फोर्ड, अमेरिकन कौन्सिल ऑफ लनर्ड सोसायटीज इत्यादी शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यांनी वेस्लेयन आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठांत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे. तसेच त्या प्रिन्सटन येथील इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हान्स स्टडी आणि पॅरिसमधील इकोले नॉर्मले सुपरियर येथे त्या सहसंशोधक म्हणून काम केल्या आहे. त्या स्वतःला लेस्बियन मानतात. राजकीय शास्त्रज्ञ वेंडी ब्राऊन या बटलर यांच्या साथीदार आहेत.
बटलर या उत्तर आधुनिकतावादी तत्त्वज्ञानी असून त्यांनी क्वीर सिद्धांत, स्त्रीवादी सिद्धांकन, राजकीय तत्त्वज्ञान, सत्ता, लैंगिकता, अस्मिता व लिंगभाव अभ्यास इत्यादी विषयांबाबत प्रभावी मांडणी केली आहे. जेंडर ट्रबल : फेमिनिझम अँड द सबवर्जन ऑफ आइडेंटिटी (१९९०) आणि बॉडीज द व्हॉट मॅटर : ऑन डिस्कर्सिव्ह लिमिट्स ऑफ सेक्स (१९९३) या पुस्तकांसाठी बटलर अधिक प्रसिद्ध आहेत. ते लिंगभावाच्या पारंपरिक कल्पनेला आव्हान देतात आणि लिंगभाव सादरीकरण या विषयी प्रभुत्वशाली मांडणी करतात. स्त्री हा एकसंध कोटीक्रम होऊ शकतो का? ज्यामध्ये सर्व स्त्रियांचे अनुभव एकत्रित केले जाईल, असा प्रश्न ते उपस्थित करतात. स्त्रियांच्या एकसंध कोटीक्रमाच्या रचितामागे लिंगभावसंबंधाचे नियम काम करतात. स्त्री हा कोटीक्रम मुख्यतः सक्तीच्या भिन्न लिंगी लैंगिकतेवर आधारित आहे. त्यामुळे स्त्री हा कोटीक्रम सर्व महिलांना प्रतिनिधित्व देत नाही. रंगधारी स्त्रिया, समलिंगी, लेस्बियन स्त्रिया या एकसंध कोटीक्रमाला आव्हान निर्माण करतात.
लिंग आणि लिंगभाव : लिंग आणि लिंगभाव याबाबत स्त्री-पुरुष भेद हा त्यांच्या जैविकतेमध्ये असल्याचे मत बटलर यांचे आहे. त्यामुळे स्त्रिया या जन्मजात हळव्या, नाजूक असतात, असे पारंपरिक साचे तयार केले जातात. जैविकता गटानुसार, लिंगभाव हा व्यक्तीमधील अंतर्गत गाभा आहे. स्त्री ही स्त्री असते; कारण तिच्याकडे स्त्रीचे शरीर आणि जननेंद्रिय असते, तर सामाजिक रचित गटानुसार लिंगभावामध्ये ‘जन्मजात’ असे काही नसते. हा गट लिंग जैविक, तर लिंगभाव सामाजिक असा भेद करतो. लिंगभाव वर्तणूक विशिष्ट सामाजिक वातावरणात शिकवली जाते. सामाजिक रचित गट हा दोन (स्त्री-पुरुष) लिंगाधारित ओळखीला चिकित्सक नजरेतून बघत नाही. जैविक लिंग हेदेखील सामाजिक रचित आहे. यामध्ये नैसर्गिक ओळख पुसून सामाजिक साचेबंध ओळखींमध्ये लिंग घडवले जाते. स्त्री आणि पुरुष शरीरे समाजामध्ये आधीच अस्तित्वात असून जन्माच्या वेळी लिंगाच्या आधारे वर्गीकरण करून स्त्री किंवा पुरुष असा शिक्का मारला जातो. उदा., एक्सएक्स (स्त्री) आणि एक्सवाय (पुरुष) हीच गुणसूत्रे अधिकृत मानून इतर मिश्र (एक्सएक्सवाय, एक्सओ) गुणसूत्रे, इंटरसेक्स ओळखी नाकारून स्त्री किंवा पुरुषाच्या जननेंद्रियाजवळ जाणाऱ्या ओळखीमध्ये रूपांतर करणे. लिंगभाव ठरवण्यासाठी लिंग हा प्राथमिक टप्पा नसून लिंगभाव कल्पनाही ‘लिंग’ची संकल्पना उत्पादित करते, असे बटलर मानतात.
लिंगभाव सादरीकरण : समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला लिंगभाव निवडणे एक वेळेस शक्य आहे; परंतु लिंगभाव विरहित जगणे अशक्य आहे. लिंगभाव हा बाह्य सादरीकरणाशी संबंधित आहे. लिंगभाव हा नमुना/नियम असून वर्तणुकीला नियंत्रित करतो. भिन्न लिंगी लिंगभावाचे वर्णपटल केवळ दोनच लिंगाधारित ओळखींना प्राधान्य देतो आणि इतर ओळखींना पुसून टाकतो. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून स्त्री आणि पुरुष भूमिका नियंत्रित व वठवल्या जातात आणि स्त्री-पुरुष यांनी भूमिका वारंवार वठवल्या जाव्यात अशी अपेक्षा केली जाते, असे बटलर यांचे मत आहे.
लिंगभाव सादरीकरण सिद्धांतानुसार, लिंगभाव हा दैनंदिन लिंगभाव भूमिकांच्या सादरीकरणातून घडत असतो. लिंगभाव ही स्थिर आणि सुसंगत अशी लिंगभाव ओळख नाही. लिंगभाव सादरीकरण म्हणजे समाजामध्ये मानल्या गेलेल्या प्रभुत्वशाली; लिंगाधारित ओळखी व कृतींचे अनुकरण व पुनरावृत्ती होय. भिन्न लैंगिकतेमध्ये ‘अनुकरण’ आणि ‘लिंगभाव द्वैत’ या महत्त्वपूर्ण बाबी आहेत. प्रभुत्वशाली भिन्न लिंगी ओळखी या स्वतःच्या आदर्श मानल्या गेलेल्या सातत्यपूर्ण आणि पुनरावृत्ती कृतींमधून घडत असतात; मात्र हे आदर्शत्वाचे अंतिम टोक पूर्णपणे गाठले जाऊ शकत नाही. लिंगभाव सादरीकरण हे भिन्न लैंगिकता कोटीक्रमांचा प्रतिकार करून त्यांचा विध्वंस करू शकते; मात्र ती सोपी किंवा आपोआप घडून येणारी प्रक्रिया नाही. अनेकविध लिंगभाव ओळखींना अभिव्यक्ती होण्यास अवकाश दिला गेला, तर परिवर्तन होऊ शकते, असे बटरल मानतात.
क्वीर सिद्धांत : क्वीर सिद्धांताबाबत ९० च्या दशकामध्ये अधिक चर्चा झाली. क्वीर सिद्धांतामध्ये लिंगभाव, लैंगिक व्यवहारांशी निगडित सिद्धांकनांवर भर देण्यात आला. क्वीर ही कोणत्याही स्थिर अस्मितेवर आधारित नाही. क्वीर हा असा कोटीक्रम आहे, जो सतत आकार घेत असतो. बटलर यांनी क्वीर सिद्धांतचे वर्णन ‘सामूहिक स्पर्धा’ असे करतात. त्यांच्या मते, ‘लैंगिक स्वातंत्र्य’ ही मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण बाब आहे. ते भिन्न लिंगी लैंगिकतेचा विरोध करतात. भिन्न लिंगी साचा समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरवतो अथवा त्यांच्या लैंगिक अस्मितांना पुसून टाकतो. बटलर गे, लेस्बियन यांच्या हक्कांविषयी युक्तीवाद करतात. मुख्य प्रवाही समाजाने गे, लेस्बियन समूहांना दुर्लक्षित केले. त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. क्वीर हे मुख्य प्रवाही समाजात अनुरूप नसलेले (नॉन कॉन्फॉर्मिस्ट) किंवा मतभेद असलेली वृत्ती आहे. क्वीर सिद्धांत हा लैगिंकतेमध्ये असलेल्या विविध छटा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीमध्ये असलेली विविधता यांबाबत मांडणी करतो. काही ठिकाणी क्वीर अभ्यासाच्या माध्यमातून शिक्षणक्रम चालवले जातात. जेणे करून क्वीर संकल्पनेविषयी आणि सिद्धांताविषयी ज्ञान वाढवता येईल. काही अभ्यासक क्वीर अभ्यासावर टीका करतात. त्यांच्या मते, क्वीर अभ्यास ही अचानकपणे एक ‘सेक्सी’, फॅशनेबल चौकशीची पद्धत बनली आहे. जी प्रकाशन गृह, अकादमिक क्षेत्र, निधी संस्था यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यावर काम करत आहेत. अनेकांना असे वाटते की, हा अभ्यास वैचारिक आणि राजकीय दृष्ट्या संपुष्टात येत आहे.
बटलर यांच्या लिखाणावर काही अभ्यासकांनी टिका केली असली, तरी अनेकांनी स्त्रीवाद आणि क्वीर सिद्धांत विकसित करण्यामध्ये बटलर यांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच त्यांचे काम हे काही चित्तवेधक शक्यता निर्माण करतात. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये ॲड्र्यु मेलॉन पुरस्कार, २००९ – २०१३; अडोर्नो प्राईझ, २०१२; ब्रुडनेर पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.
बटलर यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. सबजेक्ट्स ऑफ डीजायर : हेगेलियन रिफ्लेक्शन्स इन ट्वेंटीज-सेंचुरी फ्रान्स (१९८७); फेमिनिस्ट थिओराइझ द पोलिटिकल (१९९२), फेमिनिस्ट कॉन्टेन्शन्स : अ फिलॉसॉफिकल एक्सचेंज (१९९५); अँटिगॉन क्लेम : किन्शिप बिट्वीन लाइफ अँड डेथ (२०००); व्हाट्स लेफ्ट ऑफ थियरी? : न्यू वर्क ऑन द पॉलिटिकल लिटरेचर थेअरी (२०००); हेजेमोनी, कॉन्टिनजेन्सी, युनिव्हर्सिटी (२०००); अन-डुईंग जेंडर (२००४); इन प्रिकॅरिएस लाइफ ꞉ द पॉवर ऑफ मॉर्निंग अँड वायलेन्स (२००४); जेंडर ट्रबल इत्यादी.
सध्या त्या कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठात तुलनात्मक साहित्य विभागामध्ये प्राध्यापक आहेत.
संदर्भ :
- Blumenfeld, W.; Breen, M., Butler Matters : Judith Butler’s Impact on Feminist and Queer Studies, US, 2019.
- Butler J., Gender Trouble : Feminism and the Subversion of Identity, UK, 2019.
- Butler, J., Bodies That Matter : On the Discursive Limits of Sex, UK, 1995.
- Daughenbaugh, L.; Shaw, E., James d. Kirylo (ed.); A Critical Pedagogy of Resistance : 34 Pedagogues We Need to Know, US, 2013.
- Nussbaum, M., The Professor of Parody : The Hip Defeatism of Judith Butler, US, 1999.
समीक्षक : अनघा तांबे