समीर अमीन (Samir Amin) : (३ सप्टेंबर १९३१ – १२ ऑगस्ट २०१८). थोर सामाजिक व राजकीय विचारवंत, ईजिप्शियन फ्रेंच मार्क्सवादी अर्थतज्ज्ञ, वैश्विक व्यवस्थाप्रणालीचे एक विश्लेषक. समीर अमीन यांचा जन्म कैरो (ईजिप्त) येथे झाला. त्यांची आई फ्रेंच व वडील ईजिप्शियन असून दोघेही व्यवसायाने वैद्यक होते. समीर अमीन यांचे बालपण व तारुण्य पोर्ट सईद (फ्रान्स) येथ गेले. शाळेत शिकत असतानाच ते राजकीय घडामोडींशी जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ईजिप्शियन विद्यार्थी कम्युनिस्ट आणि राष्ट्रवाद यांमध्ये विभागले गेले. त्यांनी ईजिप्तमध्ये ब्रिटिश साम्राज्याविरोधात जोरदार वातावरण असतानादेखील फॅसीझम आणि जर्मनीतील नाझीविरोधात राजकीय भूमिका घेतली. त्यांनी शत्रूचा शत्रू आपला मित्र अशी भूमिका नाकारली. त्यांनी १९८८ मध्ये यूरोपकेंद्रितता नावाची महत्त्वाची संकल्पना मांडली. याबरोबरच ते परावलंबन सिद्धांताचे उद्गाता म्हणूनही ओळखले जातात.

समीर अमीन यांच्या वैचारिक योगदानाने इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञान, संस्कृती, धर्माचे समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा बहुविध विषयांना कवेत घेतले आहे. याबरोबरच त्यांनी साम्राज्यवाद, असमान वितरण, विकासातील समकालीन दृष्टीकोनातील समीक्षा, माओवादी विचारांची प्रस्तुतता, कृषीविषयक बदल, इस्लाम धर्म आणि आधुनिकता इत्यादी विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या लेखणीने आफ्रिका, लॅटिन अमेरिका व अशिया खंडातील बुद्धीजीवीना जोडण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर समीर अमीन यांचे वैचारिक योगदान बहुमोलाचे आहे. वेगवेगळ्या निमित्ताने त्यांनी भारताला वारंवार भेटी दिल्या.

समीर अमीन हे तिसऱ्या जगातील सर्वांत महत्त्वाचे आणि प्रभावशाली विचारवंत आहेत. त्यांनी १९५७ मध्ये फ्रँकोइस पेरॉक्स यांच्या देखरेखीखाली आपला पीएच. डी.चा प्रबंध सादर केला. ज्याचे शीर्षक ‘द ओरिजिन ऑफ अंडरडेव्हलपमेंट : कॅपिटलिस्ट अॅक्म्युलेशन ऑन अ ग्लोबल लेव्हल’ असे होते; परंतु काही कारणास्तव ते बदलून ‘पूर्वभांडवलवादी अर्थव्यवस्थांच्या आंतरराष्ट्रीय एकात्मतेचे संरचनात्मक परिणाम’ असे वेगळे दिले. यामध्ये त्यांनी तथाकथित अविकसित अर्थव्यवस्था बनविणाऱ्या यंत्रणेचा सैद्धांतिक अभ्यास केला. त्यांच्या सैद्धांतिक अग्रगण्य भूमिकेकडे अनेकदा दुर्लक्ष केले गेले; कारण त्यांचा १९५७ चा प्रबंध विस्तारित पुस्तक स्वरूपात १९७० पर्यंत (जागतिक स्तरावरील संचय) प्रकाशित झाला नव्हता. आपला प्रबंध पूर्ण केल्यानंतर ते कैरोला गेले. तेथे त्यानी १९५७ ते १९६० या काळात सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक मॅनेजमेंट’साठी संशोधन अधिकारी म्हणून काम केले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या बोर्डवर राज्याचे प्रतिनिधित्व केले. त्याच वेळी कालव्याचे राष्ट्रीयीकरण, १९५६ चे युद्ध आणि असंलग्न चळवळीच्या स्थापनेशी संबंधित अत्यंत तणावपूर्ण राजकीय वातावरणात त्यांनी स्वतःला बाजूला केले. त्यांनी कम्युनिस्ट पक्षात सहभाग घेतला, जो त्या वेळी गुप्त होता. त्यामुळे कामकाजाची परिस्थिती अत्यंत कठीण झाली.

समीर अमीन यांना १९६३ मध्ये इन्स्टिट्युट आफ्रिकन डी डेव्हलपमेंट इकॉनॉमिक एट डी प्लॅनिफिकेशन (आयडेप) मध्ये फेलोशिपची ऑफर देण्यात आली. त्यांनी त्यात अनेक संस्था निर्माण केल्या, ज्या कालांतराने स्वतंत्र बनल्या. उदा., आफ्रिकेतील सामाजिक विज्ञान संशोधन विकास परिषद. त्याची कल्पना लॅटिन अमेरिकन कौन्सिल फॉर सोशल सायन्सेसच्या मॉडेलवर झाली. वर्ल्ड सोशल फोरम उभारण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. त्यांनी १९७० पर्यंत पॉइटियर्स, डकार आणि पॅरिस (पॅरिस VIII, विन्सेनेस) विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर ते आयडेपचे संचालक बनून १९८० पर्यंत जबाबदारपूर्वक नेतृत्व केले. नंतर आयडेप सोडून ते डकारमधील थर्ड वर्ल्ड फोरमचे संचालक बनले. समीर अमीन यांच्या जीवनात आणि विचारसरणीत आर्थिक व्यवस्थापन, संशोधन आणि राजकीय संघर्ष असे तीन क्रियाकलाप एकमेकांशी घट्ट गुंफलेले आहेत.

समीर अमीन यांना परावलंबनाचा सिद्धांत (डिपेंडन्सी थिअरी) आणि वैश्विक व्यवस्था प्रणाली सिद्धांताचे (वर्ल्ड सोशल सिस्टिम थिअरी) प्रणेते मानले जाते; परंतु ते स्वतःला जागतिक ऐतिहासिक भौतिकवादी  विचारप्रवाहाचा भाग समजत. त्यांनी १९५७ मध्ये त्यांच्या पीएच. डी.च्या प्रबंधातून अवलंबित्वाची महत्त्वाची संकल्पना पुढे आणली. त्यांच्या मते, तथाकथित विकसित अर्थव्यवस्थांना स्वतंत्र एकके म्हणून न मानता ते जागतिक भांडवली अर्थव्यवस्थेतील इमारतीच्या विटांसारखे आहेत. जागतिक भांडवली अर्थव्यवस्थेत गरीब राष्ट्रांवर, जे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये परिघावर आहे, त्यांना सतत केंद्रामध्ये असलेल्या विकसित राष्ट्राच्या गतिशीलतेचे पुनरुत्पादन संरचनात्मक समायोजन करण्यासाठी दबाव आणला जातो, यालाच पुढे परावलंबनाच्या सिद्धांताशी जोडले गेले.

समीर अमीन यांचा परावलंबनाचा सिद्धांत हा इतरांपेक्षा वेगळा मानला जातो. त्यांनी जागतिक भांडवली अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप, जागतिकीकरण प्रक्रियेतसुद्धा उत्तर आणि दक्षिण देशांमधील विकासाचे स्वरूप व गती यांच्यातदेखील कसा गुणात्मक फरक आहे, हे दाखवून दिले. उत्तर आणि दक्षिण अशा दोन भौगोलिक टोकांमध्ये ध्रुवीकरण घडते. अगदी रशियाच्या विघटनानंतरही व शीतयुद्ध संपल्यानंतरसुद्धा या द्वैताला रोखले गेले, असे मत त्यांनी मांडले. जागतिक भांडवली अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या विकसित देशांची अर्थव्यवस्था एकात्मिक व एकसंघ असते, तर परिघावरील अविकसित देशांमधील भांडवली अर्थव्यवस्था विस्कळीत असते. केंद्रातील देशांच्या भांडवली अर्थव्यवस्थेत उत्पादन, वितरण यंत्रणेत ज्याप्रकारे एकवाक्यता असते, तशी परिघावरिल भांडवली अर्थव्यवस्थेत भिन्नता दिसून येते. त्यांच्या मते, विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेत अंतर्गत बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेएवढेच महत्त्व असते. बऱ्याच वेळेस उत्पादन व वितरणाचे व्यवहार त्यांच्या अंतर्गत बाजारपेठेतच होतात. काही प्रमाणातच अर्थव्यवहार बाहेरच्या बाजारपेठेशी होत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी पुरवठ्यामध्ये चढ-उतार झाले आणि त्यामधील संतुलन बिघडले, तरी एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. याउलट, परिघावरील विकसनशील अर्थव्यवस्थेत निर्यातीला अवास्तव महत्त्व दिले जाते. या देशांमधील अर्थव्यवस्थेत दोन परस्परविरोधी धोरणांना राबविले जाते.

काही औद्योगिक क्षेत्रांना निर्यात वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या औद्योगिक क्षेत्राचे अंतर्गत बाजारपेठेतील व्यवहाराचे प्रमाण नगण्य असते, तर दुसऱ्या स्तरावर उत्पादन क्षेत्रासाठी बंधने लादली जातात व वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवले जाते. या दोन घटकांमध्ये फारशी देवाणघेवाण होत नाही. तसेच एकाच्या विकासाचा किंवा लाभाचा प्रभाव दुसऱ्यावर होताना दिसत नाही. निर्यातीवर भर देणाऱ्या क्षेत्रातील बराचसा नफा विकसित देशांमध्ये जातो, तर दुसऱ्या क्षेत्रात (उदा., शेतीसारख्या क्षेत्रात) भांडवल संचय होऊ शकत नाही. म्हणून उत्पादन तंत्रात सुधारणा करण्यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूकदेखील होऊ शकत नाही. जागतिक भांडवलदारी व्यवस्थेशी जोडल्या गेलेल्या क्षेत्रावर आर्थिक मंदी किंवा समृद्धीचा लगेचच परिणाम दिसून येतो. कधीकधी या घटकाकडे समृद्धी ओसंडून वाहत असते, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनासाठी मागणी घटली, तर अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट येते, तिचा विकास खुंटतो किंवा ती अर्थव्यवस्था कोसळते, असे महत्त्वपूर्ण मत समीर अमीन यांनी व्यक्त केले आहे.

समीर अमीन यांच्या मते, विकसनशील देशांमध्ये द्वीस्तरीय अर्थव्यवस्था ही मूलभूत उद्योग आणि उत्पादनाच्या अभावामुळे निर्माण होत असते. अशा देशांतील उत्पादकांचा तात्काळ नफा मिळेल, अशा हलक्या- फुलक्या वस्तूंच्या उत्पादनावर भर असतो. यामुळे मूलभूत उद्योगांचा विकास होत नाही. अशा उद्योगांसाठी लागणारी भांडवली गुंतवणूकही उपलब्ध नसते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा भाग रस्ते, वीज, पाणी इत्यादी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर खर्च केला जातो. हा खर्च केला, तरच तिथल्या शासनव्यवस्थेला सर्वसामान्य जनतेचे पाठबळ मिळते; अन्यथा ते अल्पमतात येतात. अशा देशांतील उद्योगधंद्यांना सतत विकसित देशांतून भांडवल मिळवावे लागते. म्हणूनच तिसऱ्या जगातील परिघावरील विकसनशील देशांची परावलंबनाच्या या चक्रातून सुटका होत नाही. परावलंबनाचा सिद्धांत अशा पद्धतीने समीर अमीन यांनी विशद केला आहे.

समीर अमीन ३१ जुलै २०१८ पर्यंत डकारमध्ये राहत होते. त्याना फुफ्फुसाचा कर्करोग झाला असल्याचे निदान होऊन त्याना पॅरिसमधील रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र तेथेच त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • धनागरे, द. ना.,संकल्पनाचे विश्व आणि सामाजिक वास्तव, पुणे, २००५.
  • Amin Samir, Eurocentrism, 1989.
  • Amin Samir, Capitalism in the Age of Globalization : The Management of Contemporary Society, 2014.

समीक्षक : प्रियदर्शन भवरे