भारतातील एक अग्रगण्य पत मानांकन संस्था. ही संस्था पत मानांकनाबरोबरच आर्थिक क्षेत्रातील माहितीचे संशोधन करणे, व्यवसायातील संभाव्य धोक्यांबाबत मार्गदर्शन करणे, आर्थिक ध्येय धोरणांसंबंधातील सल्ला देणे, विश्लेषणात्मक उपाय सुचविणे इत्यादी कामांमध्ये अग्रेसर आहे. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड (पतमानांकन माहिती सेवा भारत मर्यादित) याच्या इंग्रजी शब्दातील आद्याक्षरे घेऊन ‘क्रिसील’ हे नामाभिधान प्राप्त झाले आहे.

भारतामध्ये कर्जरोख्यांच्या बाजारपेठेचे अस्तित्व नगण्य होते. अशा वेळी क्रिसीलची स्थापना १९८७ मध्ये आयसीआयसीआय (इंडस्ट्रिअल क्रेडिट अँड इन्व्हेस्मेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड), यूटीआय (यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) आणि इतर वित्तीय संस्थांना बरोबर घेऊन करण्यात आली. एखाद्या उद्योगाला कर्ज पुरवठा करताना त्याची बाजारातील पत काय आहे, याबाबत अभ्यास करून बँका आणि वित्तीय संस्थांना विश्लेषणात्मक माहिती आणि सल्ला देणे, हा क्रिसीलचा मूळ उद्देश होता. पतपुरवठ्याची व्याप्ती, कर्जाच्या व्याजाची दर निश्चिती, कर्ज रोख्यांची खरेदी, कर्ज पुरविण्यातील संभाव्य धोके, जोखीम व्यवस्थापन इत्यादींबाबत माहिती पूर्ण निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदार, पतपुरवठादार, कर्जदार आणि नियामक मंडळे यांना माहिती सहायकाची भूमिका क्रिसीलद्वारे पार पाडली जाते.

क्रिसील मानांकन हे त्या उद्यमाच्या आर्थिक क्षमतेचे, व्यावसायिक कार्य कुशलतेचे आणि पत दर्जाचे निदर्शक आहे. सदर निर्देशांक व्यवसायाला आंतरिक प्रगतीतील वाव दाखवून देतो. उद्योगधंद्यांच्या पतमानांकनाबरोबरच म्युच्युअल फंडांचे मानांकन, युलिपचे मानांकन, सूक्ष्म, छोट्या, मध्यम आणि मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या उद्यमांच्या कामगिरीचे मूल्यमापन व मानांकन, अर्थव्यवस्थेचे निर्देशांक अशा विविध प्रकारचे मानांकन क्रिसीलद्वारे केले जाते. वाहन व्यवसाय, उर्जा, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे व दूरसंचार, पर्यटन, आरोग्य, किरकोळ विक्री व्यवस्थापन, उपभोग्य वस्तू अशा अनेक क्षेत्रांमध्ये मानांकन, संशोधन, विश्लेषण, व्यवस्थापन आणि सल्ले देण्याचे काम क्रिसीलद्वारे केले जाते. विविध व्यवसायांवरील अहवाल क्रिसीलद्वारे प्रकाशित केले जातात. खाजगी व्यवसायांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र व राज्यशासन, बहुपक्षीय संस्था (मल्टिलेटरल एजन्सीज) आणि विदेशी सरकार व संस्थांना क्रिसीलद्वारे सेवा पुरविली जाते.

क्रिसीलचा व्यवसाय भारताबाहेर अमेरिका, इंग्लंड, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, पोलंड, अर्जेंटिना इत्यादी देशांमध्येसुद्धा विस्तारलेला आहे. आशियाई आणि आफ्रिकी देशांतील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सेवा-सुविधा पुरविण्यासाठी क्रिसील प्रयत्नशील आहे. क्रिसीलद्वारे मलेशिया, इझ्राएल येथील पतमानांकन संस्थांना तांत्रिक साह्य पुरविले जाते. क्रिसीलचे २००५ मध्ये बहुसंख्य भागभांडवल स्टँडर्ड अँड प्युअर या कंपनीने खरेदी केले असून आता क्रिसीलवर त्याचे नियंत्रण आहे.

समीक्षक : सुहास सहस्त्रबुद्धे