एखाद्या व्यक्तीकडून एखादे शारीरिक कार्य पार पाडताना ते कार्य त्याच्याकडू होणार की, नाही हे त्याच्या शारीरिक क्षमतेवरून सिद्ध होत असते. एखादा व्यक्ती शारीरिक थकवा न येता दैनंदिन कार्ये अगदी सहजरित्या पार पाडत असेल, तर त्याची शारीरिक क्षमता सुदृढ असल्याचे समजले जाते. एखाद्या व्यक्तीची शारीरिक क्षमता त्याचे वय, खाणपाण, आरोग्य, व्यायाम, शारीरिक ठेवण इत्यादींवरून दिसून येते. सुमारे ६० वर्षांत शारीरिक शिक्षण हा शिक्षणातील वेगळा भाग न राहता व्यक्तीच्या विकासातील एक अविभाज्य घटक झाला आहे. शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००० मध्ये शारीरिक शिक्षणाची प्राथमिकपासून ते महाविद्यालयापर्यंत विविध उद्दिष्टे दिली आहेत. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांचे शारीरिक आरोग्य, ताकद व एकूण शारीरिक सुदृढता वाढविणे हे होय.

बालकाच्या वयानुसार, परिपक्वतेनुसार त्याच्या आंतर्द्रियांचा विकास होणे आवश्यक आहे. बालकाचे वय वाढत असताना त्याच्या पचनसंस्थेचा योग्य विकास होत जातो. केवळ मऊ दूधभातासारखे अन्न पचतापचता त्याला वाढीप्रमाणे कठीण व जड अन्न पचविता येऊ लागते. अशा तऱ्हेने पचनसंस्थेबरोबरच त्याच्या शरीरातील इतर संस्थाचाही विकास होत जातो. तसेच बालकाच्या वयानुसार त्याच्या नाक, डोळे, कान, घसा, स्नायू इत्यादींच्या क्षमतेचाही विकास होत जातो.

मानवाची कार्य करण्याची शारीरिक क्षमताही त्याच्या तंदुरुस्त शरीरावर व शरीरातील अवयवांची हालचाल करणाऱ्या स्नायूंच्या गती व कार्यक्षमतेवर अवलंबून असते. शरीरात कार्य करणाऱ्या स्नायूंच्या अनेक संस्था कार्यरत असतात. सर्व स्नायूंच्या सर्वच व्यवहारावर हाडांचा सांगाडा नियंत्रण ठेवत असतो. अशा प्रकारे मानवी शरीर, त्याची कार्य करण्याची क्षमता, हालचाल ही निसर्गनिर्मित असून मानवी शरीर हे एक अद्भूत असे चलयंत्र आहे. त्याच्या कार्य करणाऱ्या क्षमतेस शारिरिक शिक्षण असे संबोधले जाते.  त्यात प्रामुख्याने शारीरिक सदृढता व तिचे अनेक घटक यांचा समावेश असतो.

विभागणी : शारीरिक क्षमतेची विभागणी सात विभागांत करता येते.

(१) स्नायूंची शक्ती : स्नायूंच्या आकुंचन व प्रसरण पावण्याच्या शक्तीचा यात विचार करण्यात येतो.

(२) स्नायूंची सहनशक्ती : यात स्नायूंच्या कार्य करण्याच्या पात्रतेची लक्षणे येतात.

(३) रक्ताभिसरण व श्वसन सहनशक्ती : यात रक्ताभिसरण व श्वसन संस्थेच्या मर्यादेचा विचार समाविष्ट होतो.

(४) स्नायूंची ताकद : यात कमीत कमी वेळात स्नायूंची जास्तीत जास्त ताकद निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा समावेश होतो.

(५) दिशाभिमुखता : शरीरात अतिवेगात शरीराची दिशा किंवा शरीरस्थिती बदलण्याचा यात समावेश होतो. थोडक्यात, चपळतेचा यात विचार होतो.

(६) गती : शरीराच्या वेगवान हालचालीची दखल यात घेतली जाते.

(७) लवचिकता : शरीरातील सांध्यातून होणाऱ्या हालचालीची दखल यात घेण्यात येते.

यांशिवाय हृदय, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, रक्तवाहिन्या इत्यादींवरही शारीरिक कार्यक्षमता अवलंबून असते. शारीरिक शिक्षणामध्ये शारीरिक सुदृढता, शारीरिक विकास करण्यासाठी शारीरिक कार्यक्षमतेस प्राधान्य दिले आहे.

संदर्भ :

  • आलेगांवकर, प. म., शारीरिक शिक्षण, पुणे, २००६.
  • जर्दे, श्रीपाल आ., शारीरिक शिक्षणाचा इतिहास, भाग -१ व २, कोल्हापूर, १९९५.

समीक्षक : रघुनाथ चौत्रे