व्यक्तीला स्वतःच्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याचे कौशल्य म्हणजे स्व-जाणीव. या कौशल्यामुळे व्यक्तीला स्वतःची आवड-निवड, भावना व वृत्ती यांबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो; म्हणजेच तिला ‘स्व’ ची जाणीव होते. या जाणिवेमुळे व्यक्तीला आपल्या जीवनाचा व अस्तित्वाचा खरा अर्थ समजून घेता येतो. पर्यायाने तिच्यामध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान व समाधान मिळविण्याची क्षमता प्राप्त होते. ‘स्व’ जाणिवेमुळे जीवन यशस्वी व सुखी होण्यास मदत होते.

विल्यम जेम्स यांनी इ. स. १८८० मध्ये सर्वप्रथम ‘स्व’ या संकल्पनेचा उल्लेख केला. त्यानंतर मेरी काफीन्स यांनी इ. स. १९१५ मध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या, कूफ कोफका यांनी इ. स. १९३५ मध्ये व्यक्तीच्या बोधावस्थेच्या आधारे, कुली व मिल यांनी सामाजिक आंतरक्रीयातून, हिलगार्ड यांनी इ. स. १९४९ मध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या ‘स्व’ जाणिवेचे महत्त्व विशद केले आहे.

‘स्व’ जाणिवेची गरज : (१) शाळेत विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व’ जाणीव निर्माण केली, तर त्यांना स्वतःची आवड-निवड ओळखता येते. (२) प्रत्येक व्यक्तीला स्वतःमधील कमतरता किंवा उणिवा, मर्यादा लक्षात घेण्यासाठी ‘स्व’ जाणीव निर्माण होणे गरजेचे असते. (३) ‘स्व’मधील गुणांची किंवा क्षमतांची ओळख झाल्यावर योग्य दिशेने प्रगती करण्यासाठी ‘स्व’ जाणीव उपयोगी ठरते. (४) ‘स्व’ जाणिवेने न्यूनगंडाची भावना कमी करण्यास मदत होते. (५) विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीस लावण्यासाठी ‘स्व’ची जाणीव उपयुक्त ठरते. (६) विद्यार्थ्यांमधील अती आत्मविश्वास कमी करण्यासाठी ‘स्व’ जाणीव उपयुक्त असते. (७) स्वयंशिस्त लावण्यासाठी ‘स्व’ जाणीव निर्माण करण्याची गरज आहे. (८) नियमितपणा, वक्तशीरपणा, परस्परसहकार्य व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘स्व’ जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे.

‘स्व’ जाणीव निर्माण होण्यासाठी दुसऱ्यांच्या भूमिकेत शिरून विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. एखादे कार्य किंवा एखादा विषय निवडण्यासाठी ‘स्व’ जाणिवेचा उपयोग होतो.

‘स्व’ जाणिवेसाठी प्रयत्न : शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व’ जाणीव विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी (१) विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण, दोष, मर्यादा कोणते आहेत, याचा शोध घ्यावा. (२) विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून शिक्षकांनी त्यांना समजून घ्यावे. (३) विद्यार्थ्यांना वेळोवेळी येणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सकपणे विचार करण्याची सवय रुजवावी. (४) विद्यार्थ्यांमध्ये परिस्थितीमुळे ताण-तणाव आल्यास शिक्षकाने विचारविनिमय करून त्या ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावी. (५) परस्परसहकार्याने कोणतेही काम करण्याची सवय लावावी. (६) कठीण प्रसंगी निर्णय घेताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गाचा अवलंब करण्यास शिक्षकाने प्रवृत्त करावे.

‘स्व’ची जाणीव असणाऱ्या व्यक्तीमध्ये अनेक गुण किंवा योग्यता असते. ज्या व्यक्तीला ‘स्व’ची जाणीव असते, त्या व्यक्तीला आपल्या सुप्त गुणांचा विकास साधता येतो. कोणत्या ठिकाणी काय बोलले पाहिजे, हे तो व्यक्ती जाणतो. आपल्या बोलण्या किंवा वागण्यामुळे इतरांना त्रास होत आहे, असे त्याला समजताच तो तसे करणे टाळतो. अशा व्यक्तीला स्वत:ची क्षमता, मर्यादा, स्वयंमूल्ये व ध्येयाची जाणीव असते. त्यामुळे तो व्यक्ती त्याला ज्या गोष्टी जमतात, त्याच करतो; तो आपला वेळ निरर्थक वाया घालवीत नाही. त्याला सुख-दु:खांवर मात करता येते. अशा व्यक्ती स्वत:च्या कार्याचे वेळोवेळी मूल्यमापन करून काही तरी नवीन शिकत असतात आणि स्वत:ची प्रगती करीत असतात. कोणताही निर्णय घेताना ते विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यांचा स्वत:वर ठाम विश्वास असतो.

‘स्व’च्या जाणिवेविषयी लोक, विशेषतः विद्यार्थी, सर्वसामान्यपणे गोंधळलेले असतात. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना, विचार, वेगळेपणा आणि मर्यादा यांची जाणीव करून दिली, तर ते स्वतः योग्य रीतीने वागतील त्यांना उज्ज्वल यश मिळेल. ‘स्व’च्या जाणिवेचे कौशल्य प्राप्त केल्यामुळे स्वयंशिस्त, नियमितपणा, वक्तशीरपणा, परस्परसहकार्य, जबाबदारीची जाणीव इत्यादी वैशिष्ट्ये विकसित होतात. स्वतःला ओळखणारी मुले भविष्यकाळात समाजाचा विकास घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावितात.

व्यवस्थापनशास्त्रामध्ये ‘स्व’ जाणीव निर्माण होण्यासाठी ‘स्वॉक’ तंत्राचा अवलंब केला जातो. इंग्रजीतील ‘एस’ हे अक्षर ‘स्ट्रेंथ’ अर्थात व्यक्तीची बलस्थाने दर्शविते; ‘डब्ल्यू’ हे अक्षर ‘विकनेस’ अर्थात शक्तीच्या उणिवा दर्शविते; ‘ओ’ हे अक्षर ‘ऑपोर्च्युनिटी’ अर्थात व्यक्तीसाठी उपलब्ध असलेल्या संधी दर्शविते आणि ‘सी’ हे अक्षर ‘चॅलेंजेस’ अर्थात शक्तीसमोरील आव्हाने दर्शविते.

विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व’ची जाणीव निर्माण करणे केवळ शिक्षकाचीच भूमिका किंवा कर्तव्य नसून शाळा, शिक्षण, समन्वयक, कुटुंब, मित्रपरिवार, समाज इत्यादी घटकांकडूनसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व’ची जाणीव निर्माण केली जाऊ शकते.

समीक्षक : के. एम. भांडारकर