मानसिक स्तरावर चालणारी एक विचार प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे व्यक्ती आपल्या अनुभवांच्या व माहितीच्या साह्याने वस्तुनिष्ठपणे विश्लेषण व परीक्षण करू शकतो. ही संकल्पना सुमारे २,५०० वर्षांपूर्वीपासूनची असून कालांतराने ती विकसित झाली आहे. असे असले, तरी चिकित्सक विचार प्रक्रियेचे मूळ बीज विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दिसतात.
आजची मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावात असल्याचे दिसून येतात. त्यामुळे त्यांना स्वत:मध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देता येत नाही. अशा वेळी त्यांना स्वत:चे अस्तित्व व कार्यक्षमता ओळखण्यास प्रोत्साहन देणे, स्व-जाणीव निर्माण करण्यास उद्युक्त करणेणे, त्यांच्याशी संवाद वाढविणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे इत्यादी शिक्षक व पालकांची मोठी जबाबदारी असते. यासाठी त्यांना मनन व चिंतन करायला लावून त्यांच्या चिकित्सक विचार परिपक्व कसे होतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिपक्व चिकित्सक विचार करणाऱ्या मुलांमध्ये स्वत:ची, कुंटुंबाची, समाजाची, आणि देशाची प्रगती करण्याची क्षमता निर्माण होत असते.
चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे पुढील कार्य पार पाडले जाते :
- चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे माहितीवर प्रक्रिया आणि सक्षम मूल्यांकन केले जाते.
- चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे समस्या सोडविता येते.
- चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे तत्कालिक परिस्थितीच्या पलीकडे विचार केला जातो.
- चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे एखाद्या विषयाकडे किंवा प्रसंगाकडे विशिष्ट उद्देशाने लक्ष दिले जाते.
- चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे विषयाच्या विविध पैलूंबद्दल प्रश्न विचारणे येथे महत्त्वाचे असते. उदा., काय, कसे, कधी, कोण, का इत्यादी.
- चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे एखाद्या सिद्धांताकडे लक्ष देणे, विचार करणे, स्वत:ला किंवा इतरांना प्रश्न विचारणे इत्यादी बाबी चिकित्सक विचार प्रक्रियेशी संबंधित असतात.
- चिकित्सक विचार प्रक्रियेद्वारे आपल्या कार्याचे विमर्षी चिंतन करणे आणि भविष्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने निर्णय घणे या प्रक्रियेत अपेक्षित असते.
चिकित्सक विचार प्रक्रियेत विमर्षी चिंतनाचा समावेश असून विशिष्ट दिशेने जाण्याची ती प्रक्रिया असते. चिकित्सक विचार करण्यासाठी सर्वांगाने विचार करणे महत्त्वाचे असते. चिकित्सक विचार प्रक्रियेच्या पुढील पायऱ्या आहेत :
- (१) ज्ञान : या पायरीमध्ये स्मरण किंवा आठविणे ही प्रक्रिया केली जाते. स्मृतीचा वापर करून आधी शिकलेल्या गोष्टी आठविल्या जातात.
- (२) आकलन : या पायरीमध्ये एखाद्या घटनेचा किंवा साहित्याचा अर्थ लावण्याची क्षमता विचारात घेऊन संबंधित माहिती समजून घेतली जाते.
- (३) उपाययोजना : उपयोजनामध्ये संकल्पना किंवा साहित्य भागात विच्छेदन करणे, त्यातून भागांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन रचना, कार्य समजावून घेणे महत्त्वाचे असते.
- (४) नवनिर्मिती : यामध्ये चिकित्स विचार करून तर्काच्या साह्याने एखादी संकल्पना, एखादे नवीन संशोधन निर्माण करण्यास मदत होते.
- (५) विश्लेषण : यामध्ये अंतभूर्त मानसिक क्रिया, गुणवैशिष्ट्ये प्रदान करणे, मानसिक क्रियांचे प्रकटीकरण या बाबी येतात.
- (६) मूल्यमापन : यामध्ये निर्धारित निकष आणि दर्जाच्या आधारे निवाडा करणे, तपासणी आणि टीकात्मक परीक्षणाचा वापर करणे, मूल्यनिर्धारण प्रक्रिया, टिका, शिफारशी अहवालाच्या रूपातून प्रकट केली जातात. नवनिर्मित भागांची जुळणी करून कार्य करू शकणाऱ्या पूर्णाची निर्मिती करणे, नियोजनपूर्वक उत्पादन करण्यासाठी घटकांची नवीन प्रारूपात रचना करणे, नवीन पद्धती, रचना, नवे प्रारूप निर्माण करणे अपेक्षित असते.
चिकित्सक विचार प्रक्रिया है कोशल्य अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विचाराला जागतिक स्तरावर महत्त्व देऊन त्याला एक जीवन कौशल्य म्हणून महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिक्षणातही त्याचा समावेश केला आहे. व्यक्तिच्या जीवनात विविध विचारांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्या अनेक विचारांपैकी चिकित्सक विचार ही एक महत्त्वपूर्ण विचार प्रक्रिया आहे.
समीक्षक : कविता साळुंके