धार्मिक आधार असलेली एक बँकिंग व्यवस्था. ही बँक इतर पारंपरिक बँकेप्रमाणेच एक बँकिंग व्यवस्था आहे. इस्लाम धर्मातील तत्त्व बाजूला न सारता या बँकिंगची उभारणी झाली आहे. इस्लाम धर्मातील कुराण या पवित्र ग्रंथात सांगितलेले तत्त्व या बँकिंगचा आधार आहे. त्यानुसार व्याज (रीबा) घेणे व देणे हे निषिद्ध मानले गेले आहे. मुख्यतः इस्लामिक देशांमध्ये इस्लामिक बँकांची स्थापना झालेली आहे.
इतिहास : काही अभ्यासकांच्या मते, इस्लामिक बँकिंगची उत्पत्ती सातव्या शतकात इस्लाम धर्माच्या अगदी सुरुवातीस झाली आहे. इस्लामचे संस्थापक मुहंमद पैगंबर यांची पत्नी खदीजा ही एक व्यापारी होती. तिने समकालीन इस्लामिक बँकिंगमध्ये वापरलेल्या अनेक तत्त्वांचा उपयोग करून आपल्या व्यवसायासाठी काम केले.
पाकिस्तानातील ग्रामीण भागात आधुनिक इस्लामिक बँकिंग प्रणालीचा पहिला प्रयत्न १९५० मध्ये झाला. ‘हज’ या तीर्थक्षेत्राला बिनव्याजी पैसे देण्यासाठी १९६३ मध्ये मलेशियात ‘ताबंग हाजी’ नावाची वित्तीय संस्था निर्माण झाली. १९७२ मध्ये कैरोच्या नसीर सोशल बँकेची, १९७५ मध्ये इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेची आणि १९७८ मध्ये जॉर्डनच्या इस्लामिक बँकेची स्थापना झाली. दुबई इस्लामिक बँक ही पहिली आधुनिक वाणिज्य इस्लामिक बँक १९७९ मध्ये स्थापन करण्यात आली. तसेच पहिली इस्लामिक विमा कंपनी सूदान येथे १९७९ मध्ये स्थापन करण्यात आली.
कार्यप्रणाली : इस्लामिक बँकिंग ही एखाद्या संस्थेसारखी आहे. या बँकेत ग्राहकाला आपल्या मर्जीनुसार पैसे टाकता येतात व काढताही येतात. या बँकिंगमध्ये बचत खात्यावर म्हणजेच आपण जमा केलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जात नाही; मात्र या रकमेच्या वापरातून बँकेला काही फायदा झाला, तर इस्लामिक बँक आपल्या ग्राहकांना भेटीच्या (हिबा) स्वरूपात काही पैसे देते.
पारंपरिक बँक व इस्लामिक बँक यांमध्ये महत्त्वाचा भेद म्हणजे ही बँक कर्जावरील व्याजाच्या स्वरूपात नफा मिळवीत नाही, तर गुंतवणुकीतून नफा प्राप्त करते. इस्लामिक बँका निष्पक्षपात सहभागीता प्रणालीचा उपयोग करतात. एखाद्या ग्राहकाला व्यवसायासाठी ही बँक कर्ज देते; मात्र त्या कर्जावर व्याज आकारत नाही. ग्राहकाने उभारलेल्या व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातील एक हिस्सा ग्राहक स्वखुशीने बँकेला देतो. जर व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर कोणत्याही प्रकारचा नफा मिळाला नसेल, तर तो ग्राहक बँकेत कर्जाच्या मूळ रकमेशिवाय जास्तीची रक्कम जमा करत नाही. अशा वेळी बँकेला कोणताही नफा किंवा तोटा होत नाही. या बँकिंगमध्ये भांडवल उभे करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जात असले, तरी दारू, बॉम्ब, बंदूक, डुकराच्या मांसाचा व्यापार, अश्लिल चित्रफित इत्यादी समाजविघातक व्यवसायांकरिता ही बँक भांडवल उभे करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची मदत करत नाही.
वित्तपुरवठा करण्याचे प्रकार :
- वादिह (सेफकिपिंग) : ग्राहकाला आपल्याजवळील रोख रक्कम किंवा इतर मालमत्ता बँकेकडे सुरक्षित ठेवण्याकरिता जमा करता येते. या व्यवस्थेमध्ये बँक ग्राहकाला त्याची रक्कम किंवा मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची हमी देते. ग्राहकाला आपली सुरक्षित ठेवी केव्हाही काढता येते. बँक या सुरक्षित ठेवीवर शुल्क आकारू शकते, तर कधी ग्राहकाला पैसे भेट स्वरूपात देते.
- मुदारबाह (प्रॉफिट शेअरिंग) : मुदारबाह हा गुंतवणूकदार (राब-उल-माल) आणि उद्योजक यांच्यातील नफा वाटणी करार आहे. यामध्ये गुंतवणूकदार भांडवल पुरवितो, तर उद्योजक व्यवस्थापनाची जबादारी किंवा प्रत्यक्ष व्यवसाय चालवितो. इस्लामिक न्यायशास्त्रात प्रत्येकाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत. उद्योजकाच्या व्यवस्थापनामध्ये गुंतवणूकदाराला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ही जबाबदारी पूर्णपणे उद्योजकाची आहे; मात्र आपले पैसे योग्य रीतीने गुंतविले जावे, यासाठी गुंतवणूकदार काही अटी निश्चित करू शकतो. या व्यवसायातून झालेला नफा कराराप्रामाणे दोघांमध्ये वाटून घेतला जातो. जर तोटा झाला, तर तो गुंतवणूकदाराला सहन करावा लागतो. अशा वेळी उद्योजकाला आपल्या श्रमाचा मोबदला मिळत नाही. इस्लामिक बँकेत मुदारबाह वैयक्तिक आणि संयुक्त स्वरूपाचा आहे. पहिल्या प्रकारात बँक ही एखाद्या व्यावसायीकाला किंवा उद्योगाला अर्थसाह्य करते, तर दुसऱ्या प्रकारामध्ये संयुक्त मुदारबाह बँक व गुंतवणूकदार यांच्यात असतो.
मुदारबाहचे अल मुदरबाह अल मुकायदा आणि अल मुदरबाह अल मुताबाह असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात गुंतवणूक करणारा भागीदार हा व्यवसाय निश्चित करतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये व्यवसाय निश्चित करण्याबाबत भागीदार उद्योजकाला पूर्ण स्वातंत्र्य देत असते; परंतु उद्योजक हा गुंतवणूकदाराच्या संमतीशिवाय कोणालाही पैसे देऊ शकत नाही. एक गुंतवणूकदार एका व्यवहाराद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्तींशी मुदारबाह करार करू शकतो. या व्यवहारामध्ये नुकसान झाल्यास ते गुंतवणूकदाराचे होते. उद्योजकाने खरेदी केलेले सामान पूर्णपणे गुंतवणूकदाराच्या मालकीचे आहेत आणि उद्योजक केवळ नफा मिळवतानाच त्याचा वाटा विकत घेऊ शकतात.
- मुराबाहा (कॉस्ट प्लस प्रॉफिट) : या व्यवस्थेंतर्गत बँक विक्रेत्याजवळून निश्चित किमतीत एखादी वस्तू खरेदी करते. या वस्तूवर झालेला खर्च व काही लाभ किंवा नफा जोडून ती वस्तू दुसऱ्याला विकली जाते. म्हणजेच मुराबाहामध्ये खरेदी-विक्री व्यवहारातून नफा मिळविला जातो. इस्लामिक बँक येथे फक्त एक मध्यस्थी किंवा दलालाची भूमिका निभावते.
- मुशाराकाह (जॉइंट व्हेंचर) : गुंतवणूकदार व ग्राहक संयुक्तपणे मालमत्ता, उपकरण विकत घेतात किंवा एखाद्या व्यवसायात भाग घेतात. यांच्यात गुंतवणुकीच्या प्रमाणात मालकी हक्क ठरतो. तसेच गुंतवणूकदार व ग्राहक तोट्यातील गुणोत्तर प्रमाणात नुकसानही वाटल्या जाते; मात्र ग्राहक जसजसा गुंतवणूकदाराच्या रोख्यांचा (शेअर) एकक विकत घेतो, त्याप्रमाणात गुंतवणूकदाराला देय असलेले भाडे कमी होते. शेवटी सर्व एकक ग्राहक विकत घेतो, तेव्हा त्या मालमत्तेवर संपूर्ण मालकी किंवा हक्क ग्राहकांचा होतो.
- इस्तिस्ना (विक्रीव्यवहार) : इस्तिस्ना हा एक विक्रीचा व्यवहार आहे. या व्यवहारामध्ये वस्तूची निर्मिती होण्यापूर्वीच देवाण-घेवाण केली जाते. खरेदीदाराला आवश्यक असलेल्या विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी निर्मात्याला सांगितले जाते. इस्तिस्नामध्ये सर्व पक्षांच्या संमतीने किंमत निश्चित करून व्यापारी मालाचा इतर आवश्यक तपशील पूर्ण केला जातो.
- इस्त़ीजर : इस्त़ीजर म्हणजे वस्तू वेगवेगळ्या प्रमाणात खरेदी करणे होय. इस्लामिक न्यायशास्त्रात इस्त़ीजर हा एक करार आहे. जेथे खरेदीदार वेळोवेळी काही वस्तू खरेदी करतो; मात्र प्रत्येक वेळी वस्तूची किंमत ठरविली जात नाही. एकाच वेळी मुख्य करार करून नियम व अटी निश्चित केल्या जातात.
इस्त़ीजर दोन प्रकारचे आहेत. पहिल्या प्रकारात खरेदीचा सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर किंमत निश्चित होते. दुसऱ्या प्रकारात किंमत आगाऊ निश्चित होते; परंतु खरेदी वेळोवेळी करण्यात येते.
- इजाराह (हायर पर्चेस) : हा भाडेपट्टी करण्याचा एक करार आहे. या करारामध्ये एखाद्या व्यक्तिची मालमत्ता ही दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने वापरण्याची परवानगी बँक देते. ही परवानगी देताना कालावधी व भाडे ठरविले जाते.
- वाकालाह (एजन्सी) : यामध्ये बँक ही एका दलालाची भूमिका पार पाडते. एखाद्या व्यक्तीला आपले पैसे व्यवसायामध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवायचे असेल, तर त्या गुंतवणूकदाराच्या वतीने विशिष्ट अटीनुसार दुसऱ्या व्यावसायीकाला किंवा ग्राहकाला पैसे देण्यासाठी विचारते. त्यानंतरचा हा करार पूर्ण झाला, तर सर्व आर्थिक व्यवहार व बँकेची जबाबदारी पार पाडण्यासाठी बँकेला काही शुल्क द्यावा लागतो.
- कार्द (इंटरेस्ट फ्री लोन) : या प्रकारामध्ये ग्राहकाला बँक विशिष्ट कालावधीकरिता कर्ज उपलब्ध करून देते; मात्र या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याजदर आकारले न जाता बँकेला फक्त मुद्दल परत करावी लागते. मुद्दल परत घेते वेळी बँक कोणत्याही प्रकारची अट न ठेवता ग्राहक आपल्या इच्छेनुसार अतिरिक्त रक्कम बँकेला देऊ शकते.
- हिबा (गिफ्ट) : इस्लामिक बँक ही इतर पारंपरिक बँकेप्रमाणे बचत ठेवीवर व्याज देत नाही; मात्र या बचत ठेवीमुळे बँकेला काही आर्थिक लाभ झाला, तर ही बँक आपल्या स्वेच्छेने ग्राहकाला हिबा म्हणजेच काही पैसे भेट म्हणून देऊ शकते.
नैतिक व सामाजिक मूल्ये असलेली बँक : इस्लामिक बँक ही इस्लाम धर्मातील नीतिमूल्यांवर आधारित आहे. त्यामुळे ही बँक नैतिक व सामाजिक कार्ये पार पाडते. इस्लामिक बँक ही धर्मादाय संस्थांना देणग्या, तसेच गरीब ग्राहकांना विशेष सेवा देते. जर एखाद्या ग्राहकाला प्रकृती स्वास्थासाठी रुग्णालयामध्ये जाण्याची आवश्यकता असेल, तर बँक त्या ग्राहकाला नफामुक्त कर्ज देते.
अनेक इस्लामिक देशांमधील पारंपरिक बँकेत इस्लामिक बँकिंगचा एक विभाग उघडलेला आहे. तसेच चीन, युनायटेड किंग्डम, अमेरिका, जर्मनी या देशांमध्येही पारंपरिक बँकेत इस्लामिक बँकिंगचा एक स्वतंत्र विभाग आहे. भारतामध्ये रघुराम राजन यांनी २००८ मध्ये वित्तीय क्षेत्रावरील आपल्या अहवालात इस्लामिक बँकिंगची सुरुवात केली होती; मात्र भारतीय रिझर्व बँकेने (आर.बी.आय.) शरिया देशाच्या तत्त्वांवर बँकिंग व्यवस्था सुरू करण्याच्या प्रस्तावावर पुढील कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या आणि वित्तीय सेवांसाठी समान संधींचा विचार केल्यानंतर भारतीय रिझर्व बँकेने हा निर्णय घेतला.
इस्लामिक बँकिंग सेवांमध्ये सर्वच घटाकांतील ग्राहक प्रवेश करू शकतात. पारंपरिक बँक आणि इस्लामिक बँक अशी ग्राहकांना पर्यायी व्यवस्था निर्माण होते. देशातील गरिबी दूर होण्यासाठी या इस्लामिक बँकेची मोठ्या प्रमाणात मदत होते. इस्लामिक बँक ही ग्राहकहित व समाजहित जपणारी जगातील एकमेव बँक आहे.
संदर्भ : M. Kabir Hassan; Lewis, Mervyn K., Handbook of Islamic Banking, UK, 2007.
समीक्षक : स्नेहा देशपांडे