क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचे कर्ज असून ते रोख स्वरूपात न मिळता ते कार्डच्या स्वरूपात मिळते. क्रेडिट कार्डचा वापर पैशाप्रमाणे केला जाऊ शकतो आणि महिना अखेरीस खर्च केलेली रक्कम व्याजासहित पेढीला परत करावे लागते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात महाजालीय पेढी (ऑनलाईन बँकिंग) आणि महाजालीय खरेदी यांमुळे क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा वेळी क्रेडिट कार्डचा वापर नेमका कोठे व कसा करावा, याची माहिती प्रत्येक कार्डधारकाला असणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्डद्वारे अनेक सेवा प्राप्त होतात. या कार्डद्वारे पेढीतील जमा रकमेपेक्षा अधिक रक्कम वापरता येते. वापरलेली रक्कम व त्यावरील व्याज निश्चित कालावधीमध्ये पेढीला परत करावी लागते. क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून पैसेसुद्धा काढता येते. गरजेची वस्तू घ्यायची असल्यास ती या कार्डद्वारे खरेदी करता येते आणि ईएमआय हा पर्यायसुद्धा उपलब्ध असते.

पेढी खात्यात नियमित व्यवहार करीत असल्यास किंवा पेढीत मोठ्या रकमेची निराकरण ठेव (फिक्स डिपॉझिट) किंवा भक्कम जमा राशी असून कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही. ऋण घेतले असल्यास त्याचे नियमित हप्ते भरत असल्यास पेढीच्या दृष्टीने तुम्ही एक चांगले ग्राहक आहात आणि तुम्ही बँकेची थकबाकी (डिफॉल्ट) करणार नाही या आधारावर पेढी तुम्हाला क्रेडिट कार्ड देऊ इच्छिते.

भारतामध्ये सुमारे ५५ अनुसूचित व्यापारी पेढ्या आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देतात. क्रेडिट कार्डची रक्कम प्रत्येक बँक वेगवेळी देत असते. क्रेडिट कार्डची किमान रक्कम रुपये २,००० इतकी असते. पेढ्या आपल्या ग्राहकांना पुढील प्रमाणे क्रेडिट कार्ड वितरित करतात : सील्वर क्रेडिट कार्ड, गोल्ड क्रेडिट कार्ड, प्लॅटीनम क्रेडिट कार्ड, महिलांकरिता क्रेडिट कार्ड, ऑटो फ्युएल क्रेडिट कार्ड, यात्रा क्रेडिट कार्ड, आयआरसीटीसी क्रेडिट कार्ड, ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड, शिल्लक हस्तांतरण क्रेडिट कार्ड, क्लासिक क्रेडिट कार्ड, टायटॅनिक क्रेडिट कार्ड, बक्षिस क्रेडिट कार्ड इत्यादी.

फायदे :

  • क्रेडिट कार्डमुळे आपल्याकडे पैसे नसतानादेखील आपण वस्तू खरेदी करू शकतो.
  • क्रेडिट कार्डद्वारे महाजालावरून वस्तू खरेदी करता येते.
  • क्रेडिट कार्डद्वारे विविध बीले भरणे, विविध तिकीट काढणे, एलआयसीचे व इतर हप्ते भरणे इत्यादी सहजपणे करता येते.
  • रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही.
  • क्रेडिट कार्डद्वारे एखादी वस्तू कर्जस्वरूपात खरेदी करता येते.
  • क्रेडिट कार्डच्या नियमित वापरामुळे त्याची नोंद होते आणि बँक व इतर कंपन्यांकडून (ज्यांच्याकडून खरेदी केली ते) क्रेडिट कार्ड धारकाला बक्षिस म्हणून काही गुण किंवा सवलती देतात. त्याचा वापर करून एखादी वस्तू कमी किमतीत घेता येते.

तोटे :

  • क्रेडिट कार्ड वापरताना रोख रक्कम भरणा करावी लागत नसल्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली जाते. ज्यामुळे बील भरण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते.
  • क्रेडिट कार्डचा भरणा वेळेत केला नाही, तर खर्च केलेल्या रकमेवर अनावश्यक व्याज (दंड) भरावा लागतो.
  • महाजालावरील क्रेडिट कार्डच्या नावाने ग्राहकांची फसवणूक वाढताना दिसून येत आहे.
  • महाजालावरील खरेदीमुळे क्रेडिट कार्डवरून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे घरातील मासिक आर्थिक व्यवस्थापन कोलमडत असते.
  • क्रेडिट कार्डचा वापर कोठे आणि कसा करावा, हे ग्राहकाला माहिती नसल्यामुळे त्याचा आर्थिक फटका त्याला बसतो.

घ्यायची काळजी :

  • प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्डच्या बिलाच्या एकूण रकमेच्या केवळ ५ टक्के रक्कम भरणे अनिवार्य असते; मात्र आर्थिक भूर्दंड वाचविण्यासाठी संपूर्ण रक्कम भरावी.
  • जर पूर्ण रक्कम भरली नाही, तर उरलेल्या रकमेवर ३-४ टक्के दराने व्याज वसूल केला जातो.
  • क्रेडिट कार्डद्वारा खरेदी केलेली रक्कम ४५ दिवसांपर्यंत बिनव्याजी असते; मात्र पूर्वीची थकबाकी शून्य असावी.
  • क्रेडिट मर्यादेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम क्रेडिट कार्डवर शक्यतो खर्च करू नये.
  • इतर कर्ज घेताना आर्थिक पत आणि क्रेडिट कार्डद्वारे केलेले व्यवहार पाहून कर्ज दिले जाते. त्यामुळे कर्जाचा जादा लाभ घेता येण्यासाठी क्रेडिट कार्ड मर्यादित स्वरूपात वापरावे.
  • रोख रकमेवर व्याज शुल्क कालावधी मिळत नसल्यामुळे क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढणे टाळावे.
  • क्रेडिट कार्डच्या बिलाचा भरणा मुदतीनंतर केल्यास दिवसागणिक व्याज वाढत जाते.
  • क्रेडिट कार्डबद्दल मोठ्याप्रमाणात महाजालावर फसवेगिरी दिसून येत असल्यामुळे आपले क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवावे.
  • आपल्या उत्पन्नापेक्षा कमी मर्यादा असणारे क्रेडिट कार्ड घ्यावे.
  • सुरुवातीला क्रेडिट कार्डद्वारे फक्त १०० रुपयांचा व्यवहार करून बिलाची वाट पाहावी. यामुळे बिलाची तारीख माहित होईल.
  • जास्त क्रेडिट दिवस मिळविण्यासाठी १५ तारखेनंतर क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार कारवा. असे केल्यास बिलाची पुढील महिन्यातील ३० दिवस मिळत असल्यामुळे ग्राहकाला सुमारे ४० ते ४५ दिवस क्रेडिट मिळेल.
  • सायबर कॅफेवर कधीही क्रेडिट कार्डचा वापर करू नये.
  • क्रेडिट कार्डबद्दलची कोणतीही माहिती कोणासही पुरवू नये. उदा., ओटीपी, पासवर्ड.
  • कार्ड हरविल्यास त्वरित कार्ड बंद करून घ्यावे.
  • कोणत्याही कारणास्तव कार्ड बंद करताना आपल्यावरील थकबाकी असलेली रक्कम नील (शून्य) करूनच ते बंद करावे. अन्यथा ते कार्ड कार्यरत असल्याचे गणल्या जाऊन त्याचे बिल वाढत जाते. उदा., जर कार्ड धारकावर ५० पैसे बाकी असताना त्याने कार्ड बंद केल्यास त्यास एक वर्षानंतर सुमारे २-३ हजार रुपये बिल येऊ शकते.
  • कार्ड घेताना कमी व्याजदर असलेल्या पेढीकडूनच ते घ्यावे इत्यादी.

डेबिट कार्ड : भारतामध्ये क्रेडिट कार्डधारकांची संख्या हळूहळू वाढत असली, तरी डेबिट कार्डची मागणी जास्त असल्याने डेबिट कार्डधारकांचीच संख्या जास्त आहे. डेबिट कार्ड हे भ्रमणध्वनीतील प्रिपेड सीमसारखे असते. जर त्यात रक्कम असेल, तरच आपण इतरांशी संपर्क करू शकतो. त्याच प्रमाणे जर आपल्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक असेल, तरच आपण डेबिट कार्डद्वारे व्यवहार करू शकतो. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमध्ये फरक आहे.

समीक्षक : ज. फा. पाटील