एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गांना अध्यापन करण्याची एक पद्धत. विरळ वस्तींतील प्रत्येक शाळा या दुसऱ्या शाळांपेक्षा वेगळ्या असतात. मोठ्या शाळेत वर्ग, विषय व पद्धतीनुसार शिक्षक अध्यापन करतात. याउलट, ज्या ठिकाणी पटसंख्या व सरासरी उपस्थिती अल्प असते, तेथे प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक शक्य नसल्याने दोन किंवा अधिक वर्ग एकत्र करून शिक्षकांना एकाच वेळी अनेक वर्गांना अध्यापन करण्यास सूचित केले जाते; त्यास बहुवर्ग अध्यापन म्हणतात. देशात अस्तित्वात असलेल्या प्राथमिक शाळांचे कार्य प्रभावी करण्याकरिता आणि त्यानुसार प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘खडू फळा मोहीम’ या पुरस्कृत योजनेचे हे सांकेतिक नाव आहे.

रचना व बैठक व्यवस्था : इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेमध्ये बहुवर्ग अध्यापनासाठी काही विषयांच्या बाबतीत त्या तासिकेच्या वेळी इयत्ता पहिली व दुसरीचा जोडवर्ग करून अध्यापन केले जाते. समान घटक अध्यापनासाठी इयत्ता तिसरी व चौथीचा जोड वर्ग करून अध्यापन केले जाते. कौशल्याधिष्ठित विषयाच्या अध्यापनाच्या वेळी संयुक्त वर्ग करून अध्यापन केले जाते. एका जोड वर्गाचे अध्यापन चालू असताना उर्वरित दोन वर्गांना स्वयंअध्ययनाची किंवा स्वाध्यायाची योजना केली जाते. ज्या वर्गात स्वयंअध्ययन चालू असते, त्या वर्गाचे पर्यवेक्षण वर्ग नायक किंवा गटप्रमुखामार्फत केले जाते; मात्र काही विषय किंवा विषयातील पाठ्यांश असे असतात की, जे बहुवर्ग अध्यापन करताना सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकविता येतात. उदा., परिपाठ, सामूहिक गायन, खेळ, कला, कार्यानुभव, कथाकथन इत्यादी.

अध्यापन पद्धती : प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक असेल, तर तो एका वेळी एकाच वर्गास अध्यापनाच्या प्रचलित पद्धती, तंत्रे वापरून शिकवितो व आपले अध्यापन यशस्वी करतो. बहुवर्ग अध्यापन करताना शिक्षकांवरचा भार कमी करण्याच्या दृष्टीने काही अध्यापन तंत्रे वापरली जातात. उदा., जोडवर्ग पद्धती, समान विषयातील समान घटकांचे अध्यापन, दोन वर्गांना एकत्रित करणे, वर्गनायक पद्धतीचा अवलंब, वर्गप्रमुख पद्धतीचा अवलंब, स्वाध्याय पद्धती, वैयक्तिक मार्गदर्शन, प्रकल्प पद्धती, दुबार शाळा, कमी हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गट करणे, वर्गाबाहेरील उपक्रम, जादा तास, पूरक वाचन आणि अध्यापनात समाजाचा सहभाग. एकापेक्षा अधिक वर्गांना एकाच वेळी अध्यापन करणे फक्त भारतातीलच शिक्षकांना करावे लागते असे नाही, तर विकसित देशांतही विशिष्ट परिस्थितीत अशा प्रकारचे अध्यापन केले जाते.

प्रत्यक्ष अध्यापन : बहुवर्ग अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्यभारानुसार त्याला वेळेचे नियोजन करावे लागते. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनाचा वेळ फार उपयुक्त असतो. या वेळी विविध, दृक-श्राव्य साधने, साहित्य आणि संगणकावरील कार्यक्रम यांचा प्रत्यक्ष अध्यापनात प्रभावीपणे वापर केला जातो. प्रत्येक नवीन घटक किंवा धडा प्रत्यक्ष अध्यापन करून शिकविला जातो. प्रत्येक अध्यापनात धड्यातील विविध कृती, वर्गनायकाचे कार्य, समवयस्कांची  मदत, स्वयंअध्ययनासाठी स्वाध्याय हे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढविणारे असावे लागतात.

जोडवर्ग करणे : इयत्ता पहिली ते चौथी किंवा इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांच्या शिक्षकांना समान घटक (दोन वेगळे वर्गास) सलगरित्या शिकविता येतात; मात्र अशा वेळेस इतर दोन-तीन वर्गांना वर्गनायक, वर्गप्रमुख किंवा स्वाध्याय कार्डांचा उपयोग केला जातो.

समान घटकांचे अध्यापन : या अध्यापन तंत्रात २ इयत्ता एकत्र करून विषयांमध्ये असणारे समान घटक शोधून शिकविले जाते. उदा., गणित – बेरीज, वजाबाकी; भाषा – कथाकथन;  गायन – सामूहिक गायन; कार्यानुभव इत्यादी. असे विषय व त्यातील घटक घटकांतील पाठ्यांश शोधून एकापेक्षा अधिक वर्गांना संयुक्तरित्या एकत्र शिकवावे. असे विषय घटक/पाठ्यांश अध्यापन करते वेळी वर्गनायक किंवा वर्गप्रमुखाचा उपयोग करून घेता येतो.

वर्गनायक पद्धतीचा अवलंब : वर्गनायक पद्धत ही खास भारतीय पद्धत आहे. ही पद्धत इतर देशांनी भारतापासून घेतली. वर्गनायक म्हणजे एक लहान शिक्षकच. एक शिक्षकी शाळेमध्ये शिक्षक ज्या वेळी इयत्ता तीसरी व चौथीच्या वर्गांवर अध्यापन करीत असतात, त्या वेळी इयत्ता पहिली व दुसरी या वर्गांवर वर्गनायक शिक्षकाची भूमिका निभवीत असतो. त्यामुळे शिक्षकाचे कार्य सुकर होण्यास मदत होते. वर्गनायक निवडताना शक्यतो त्याच वर्गातील निवडावा. एकच न निवडता प्रत्येक विषयात त्यांच्या क्षमतेनुसार नेमणूक करता येते. परिस्थितीनुसार व त्यांच्या कुवतीनुसार वर्गनायक बदलता येतात.

वर्गनायक निवड : वर्गनायकाची निवड करताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो त्या पुढीलप्रमाणे :

  • वर्गनायकामध्ये घटक समजून घेण्याची तयारी करून घेण्याची क्षमता असावी.
  • त्याच्यात समवयस्कांना अध्ययन घटक समजून घेण्यास प्रवृत्त करण्याची कुवत असावी.
  • संकोच सोडून शिक्षकाकडून संकल्पना समजून घेण्याची तयारी असावी.
  • अध्ययनासाठी वर्गाची तयारी करून घेण्याची क्षमता असावी.
  • दिग्दर्शनाचे, अध्यापनाचे कौशल्य असावे.
  • सौजन्य, सहकार्य, संभाषण व नेतृत्व इत्यादी गुण त्याच्यात असावेत.

वर्गनायकांची कामे : किरकोळ वर्गकाम मार्गी लावणे, वर्गात शिस्त लावणे, स्वयंअध्ययनाचे कार्य करून घेणे, स्वयंअध्ययनाचे पर्यवेक्षण करणे, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे, कार्य पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकाला माहिती देणे इत्यादी.

वर्गप्रमुख पद्धती : वर्गनायक हा त्याच वर्गातील हुशार विद्यार्थी असतो, तर वर्गप्रमुख वरच्या वर्गातील नेतृत्वगुण करणारा हुशार व समंजस विद्यार्थी असतो. अध्यापन करताना प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वर्गनायक न नेमता केवळ वर्ग प्रमुखाचे साहाय्य घेऊन शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गांच्या अध्यापनाचे कार्य चालू ठेवता येते.

वरीलप्रमाणे विविध तंत्राचा, विविध पद्धतीचा उपयोग करून बहुवर्ग अध्यापनाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता येते. विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या मदतीशिवाय अध्ययन करता यावे व शिकलेल्या भागाचे दृढीकरण व्हावे, या तत्त्वांचा विचार करून वेगवेगळे उपक्रम तयार करून बहुवर्ग अध्यापन प्रभावी, आनंददायी मनोरंजक करता येते.

समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.