आर्थिक व सामाजिक नियोजन आखणे, नियोजनातील धोरणे आखणे आणि राष्ट्रीय पातळीवर नमुना सर्वेक्षण करणे यांसाठी स्थापन करण्यात आलेले एक शासकीय कार्यालय. भारत सरकारने १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची स्थापना केली. त्यानंतर मार्च १९७० मध्ये या कार्यालयाची पुर्नरचना करण्यात येऊन तिचे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनामध्ये करण्यात आले. अलिकडच्या काळात या संघटनेचे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयात करण्यात आले आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयांतर्गत चार विभाग कार्यरत आहेत ꞉
(१) पाहणी आराखडा व संशोधन विभाग (सर्वे डिझाईन अँड रिसर्च डिव्हिजन – एसडीआरडी) ꞉ एसडीआरडीचे मुख्यालय कोलकाता येथे असून या विभागाचे मुख्य कार्य पाहणी नियोजन व अहवालाचे विश्लेषण करणे आहे.
(२) क्षेत्रिय ऑपरेशन विभाग (फिल्ड ऑपरेशन डिव्हिजन – एफओडी) ꞉ याचे मुख्यालय नवी दिल्ली व फरिदाबाद येथे असून या विभागाचे मुख्य कार्य आर्थिक व सामाजिक पाहणी करणे, औद्योगिक आकडेवारी, किमती गोळा करणे इत्यादी आहे.
(३) माहिती विश्लेषण विभाग (डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन – डीपीडी) ꞉ माहिती विश्लेषण विभागाचे मुख्यालय कोलकाता येथे असून या विभागाचे मुख्य कार्य नमुना सर्वेक्षणाच्या माहितीचे विश्लेषण प्रक्रिया व प्रसारण करणे आहे.
(४) समन्वय व प्रकाशन विभाग (को-ऑर्डिनेशन अँड पब्लिकेशन डिव्हिजन – सीपीडी) ꞉ समन्वय व प्रकाशन विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून या विभागाचे मुख्य कार्य एनएसएसओच्या विभागामध्ये समन्वय घडवून माहिती प्रकाशित करणे आहे. या विभागाद्वारे वर्षातून दोन वेळा सर्वेक्षण अंक प्रकाशित केले जाते.
एनएसएसओचे उद्देश ꞉
- नमुना सर्वेक्षणाद्वारे देशाची आर्थिक, सामाजिक जनसंख्यकीय, औद्योगिक आणि कृषीसंबंधित खात्रीशीर व सातत्यपूर्ण आकडेवारी गोळा करणे.
- राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या निर्देशाने पूर्णपणे काम करणे.
- एनएसएसओमार्फत घरगुती सर्वेक्षण, उपक्रम सर्वेक्षण, ग्रामसुविधा आणि भूमी व पशुधन गणना ही चार प्रकारची नमुना सर्वेक्षणे केली जातात.
- एनएसएसओमार्फत सर्वेक्षण या नावाने एक द्वैवार्षिक जरनल प्रकाशित केले जाते. एनएसएसओमार्फत दरवर्षी फेऱ्यांच्या स्वरूपात विविध विषयांवरील राष्ट्रीय पाहणी सर्वेक्षण केले जातात.
(अ) सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणात घरगुती उपभोग खर्च, रोजगार व बेरोजगारांची आकडेवारी, भूमी व पशुधन धारणा, सामाजिक उपभोग (शिक्षण, आरोग्य इत्यादी), दारिद्र्य, बाल कामगार साक्षरता, गैर कृषी उपक्रम इत्यादींचा समावेश आहे.
(आ) साधारणत: दर पाच वर्षांनी घरगुती उपभोग खर्चाच्या आकडेवारीचे पंचवार्षिक सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी नमुना मोठा घेतला जातो.
(इ) वार्षिक औद्योगिक सर्वेक्षणासाठी आकडेवारीचे संकलन केले जाते.
(ई) कृषी उत्पन्नाचे सर्वेक्षण केले जाते.
(उ) केंद्रीय सांख्यिकी संघटनेमार्फत ग्रामिण व शहरी मूल्यांची माहिती एकत्रित केली जाते.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयामध्ये महानिदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे मुख्य असून ५ उच्चशिक्षित पदाधिकारी, केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित विभागातील ५ माहितीतज्ज्ञ आणि मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी असतात.
लेखक : बोबडे, मंजुश्री
समीक्षक : मनीषा कर्णे