पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध प्रकारची नैसर्गिक भूमिस्वरूपे, तसेच मानवनिर्मित (कृत्रिम) वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांचे वर्णन व अभ्यास म्हणजे स्थलवर्णन होय. समुद्रतळावरील भूमिस्वरूपेही यात येतात. शिवाय इतर ग्रह, उपग्रह, लघुग्रह इत्यादी खस्थ पदार्थांच्या बाबतीतही स्थलवर्णन ही संज्ञा वापरतात. स्थलवर्णनासाठी एकूण भूदृश्य म्हणजे भूमिरूपांचे समूह विचारात घेतात.

खंड व महासागरांच्या द्रोणी ही सर्वांत मोठी व आद्य भूमिस्वरूपे आहेत; मात्र स्थलवर्णनात त्यांचा अंतर्भाव करीत नाहीत. कवच विरूपण, जमीन वा भूपृष्ठ वर उचलणाऱ्या वा खाली नेणाऱ्या भूपट्ट सारंचनिकीय क्रिया, झीज आणि भर, ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या अग्निज क्रिया, भूकंप या भूमिस्वरूपे निर्माण करणाऱ्या व त्यांच्यात बदल घडवून आणणाऱ्या प्रमुख प्रक्रिया आहेत. यांपैकी पहिल्या दोन दीर्घकालीन प्रक्रियांमुळे प्राथमिक भूमिरूपे,  तर झीज व भर यांच्यामुळे द्वितीयक भूमिस्वरूपे निर्माण होतात. जलप्रवाह (नद्या, ओढे, धबधबे इत्यादी), हिमनद्या, वारे, लाटा, जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान), गुरुत्व (उदा. भूमिपात), मानवासह जीव इत्यादी कारकांचा भूमिस्वरूपांवर सतत परिणाम होऊन भूदृश्य बदलत असते. भूमिजलाचेही भूमिरूपांवर अप्रत्यक्ष परिणाम होत असतात. यांशिवाय ऑक्सिडीभवन, क्षपण, जलीय विच्छेदन, तसेच कार्बनीकरण, विरघळण्याची क्रिया यांसारख्या रासायनिक प्रक्रियांनी खडक, खनिजे, कार्बनी द्रव्ये इत्यादींत बदल होऊन भूमिरूपांतही बदल होऊ शकतात.

अशाप्रकारे पर्वत, दऱ्या, निदऱ्या, कॅन्यन, घळ, खोरी, पूरमैदान, त्रिभूज प्रदेश, जलोढ, जलोढीय पंखे, डोंगरांचे उतार व माथे, पठारे, मेसा, ब्यूट, मैदाने, एस्कर, वाळवंटे, वालुकागिरी, छत्री खडक, द्रोणी, शैलभित्ती, ड्रमलिन, हिमस्थगिरी, हिमस्तर, हिमगव्हर, समुद्रकिनारे, सागरी गुहा, वालुकाभित्ती (दांडे), पुळणी, लोएस, प्रवाळभित्ती, दलदली, पाणथळ जागा, सरोवरे, जंगले इत्यादी नैसर्गिक भूमिस्वरूपे आहेत. यांशिवाय रस्ते, पूल, बोगदे, लोहमार्ग, धरणे, इमारती, वीजवाहक तारा, खाणकामाची क्षेत्रे, खेडी, गावे, शहरे, महानगरे यांसारखी नागरीकरण झालेली क्षेत्रे इत्यादी मानवनिर्मित दृश्य वैशिष्ट्येही भूमिस्वरूपांत येतात. यांपैकी अनेक भूमिरूपांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. भूमिस्वरूपे स्थलवर्णनात्मक नकाशात दर्शवितात. पूर्वी वेगवेगळ्या मोजणी (सर्वेक्षण) पद्धतीनुसार नकाशे तयार केले जात. भारतात भारतीय सर्वेक्षण संस्थेकडून वेगवेगळ्या प्रमाणांवर स्थलवर्णनात्मक नकाशे तयार केले. उदा., एका इंचास एक मैल वा १:६३,३६०; १:५०,०००; १:२,५०,००० इत्यादी. या नकाशांना भारतीय स्थलवर्णनात्मक (स्थलनिर्देशक) नकाशे असे म्हणतात. भूपृष्ठाची प्रत्यक्ष मोजणी करून सर्व प्रकारच्या भूमिरूपांची अचूक व तपशीलवार आरेखने तयार करण्याच्या शास्त्राला स्थलवर्णनशास्त्र म्हणतात.

खडकांचे रासायनिक संघटन, प्रकार व संरचना, यांच्यावर क्रिया करणाऱ्या कारकांचा व प्रक्रियांचा प्रकार, हवामान इत्यादींवर  भूमिस्वरूपांच्या उत्क्रांतीमधील सर्व घडामोडी अवलंबून असतात. यांमुळे या गोष्टींची माहिती स्थलवर्णनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. भूपृष्ठाची संरचनात्मक मांडणी, तेथील वातावरणक्रिया, जमिनीची हालचाल, टेकड्यांचे उतार, हिमानी व परिहिमानी (हिमनदी व हिमस्तराच्या भोवतालच्या भागातील) घटना, समुद्रकिनारे, कार्स्ट भूमिस्वरूप इत्यादींची माहिती स्थलवर्णनात उपयुक्त असते. त्यांवरून एखाद्या प्रदेशातील पूर्वीची भूमिस्वरूपे, तेव्हाचे जलवायुमान, झीज व भर करणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप, भूमिरूपांची सापेक्ष वये इत्यादींची अनुमाने करण्यासाठी स्थलवर्णनाचा उपयोग करून घेता येतो. भूमिरूपे व त्यांच्याशी निगडित प्रक्रिया यांचा इतिहास समजण्यासाठी स्थलवर्णनविषयक अभ्यास साहाय्यभूत ठरू शकतो. लष्करी दृष्ट्या स्थलवर्णनात्मक नकाशांना अनन्यासाधारण महत्त्व असते.

स्थलवर्णन आणि भूमिरूपे भूगोल व भूविज्ञान हे या विषयांतील महत्त्वाचे विषय आहेत. भूमिरूपांच्या निर्मितीत नैसर्गिक प्रक्रियांचा संबंध येतो. त्यामुळे नकाशा, भूमिरूप विज्ञान, मानचित्रकला व सर्वेक्षण यांच्याशी स्थलवर्णनाचा थेट संबंध येतो. शिवाय स्थलवर्णन इतर अनेक विज्ञानशाखांशी निगडित आहे. उदा., अवसाद विज्ञान, संरचनात्मक भूविज्ञान, हिमानी भूविज्ञान, जलवायुविज्ञान, जलविज्ञान, मृदाविज्ञान, परिस्थितीविज्ञान (पर्यावरण), प्लाइस्टोसीन (सुमारे ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या काळाचे) भूविज्ञान, भूरसायनशास्त्र, खनिजविज्ञान, शिलावर्णन विज्ञान, सागरी भूविज्ञान, प्राकृतिक भूगोल, जीवविज्ञान, ज्वालामुखी व भूकंपविषयक विज्ञान, द्रायुयामिकी, अभियांत्रिकी इत्यादी विज्ञानशाखांचा भूमिरूपांशी व पर्यायाने स्थलवर्णनाशी जवळचा संबंध आहे. शिवाय स्थलवर्णनासाठी हवाई छायाचित्रण, कृत्रिम उपग्रहांद्वारे केलेली निरीक्षणे, दूरवर्ती संवेदनाग्रहण तंत्रे (उदा., रडार, सोनार, सोफार इत्यादी) वगैरेंची मदत घेतात.

भूमिरूपांचा मानवी जीवनावर प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम होतो. याउलट मानवी जीवनाचाही भूमिरूपांवर परिणाम होतो. यामुळे मानवी जीवनाच्या संदर्भात स्थलवर्णनाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. गरजेनुसार माणूस भूमिरूपांशी जुळवून घेतो किंवा शक्य असल्यास त्यांत बदल करून घेतो. उदा., नद्या, दऱ्या, पर्वत, दलदली यांसारख्या दळणवळणातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी माणूस पूल, बोगदे, घाटरस्ता यांसारखे बदल करतो. मैदानी प्रदेश मानवी वस्ती व शेती यांना सोयीस्कर असून त्यांमुळे माणसाच्या राहणीमानात एकसारखेपणा येऊ शकतो. बंदर तयार करण्याच्या दृष्टीने अनुकूल नैसर्गिक परिस्थिती असलेला खडकाळ किनारी प्रदेश मासेमारी व वाहतूक यांसाठी उपयुक्त ठरतो. सुपीक किनारी प्रदेश शेतीसाठी, तर पुळण असलेला किनारा पर्यटनासाठी अनुकूल असतो. डोंगराळ प्रदेशाचा परिणाम हवामानावर होतो, तर जमिनीचा उतार तिच्या सुपीकतेवर परिणाम  करतो. विशेषत: शेती, सिंचन, खाणकाम इत्यादी जमिनीच्या उपयोगांच्या बाबतीत भूमिरूपे महत्त्वाची ठरतात. याउलट नदी, हिमनदी, महासागरातील वाळू व गाळ यांची हालचाल, नदीच्या पात्रात होणारे बदल, जमिनीची धूप, भूमिपात यांच्यावर मानवी समाजाचे होणारे परिणाम वाढत आहेत. याचा अखेरीस भूमिरूपांवर व पर्यायाने स्थलवर्णनावर परिणाम होतो. अशा रितीने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही भूमिरूपे व स्थलवर्णन महत्त्वाचे आहे.

मानचित्रकलेचा स्थूलपणे उपयोग करणाऱ्या इतर क्षेत्रांतही पृष्ठभागाच्या वर्णनासाठी स्थलवर्णन ही संज्ञा व संकल्पना वापरण्यास विसाव्या शतकात सुरुवात झाली. मस्तिष्क (मेंदू) विज्ञानासारख्या वैद्यकीय क्षेत्रात, तसेच इतर भिन्न विज्ञान क्षेत्रांतही ही संकल्पना वापरतात. मज्जाविज्ञानात मस्तिष्क प्रतिमा दर्शनासारख्या शाखेत मेंदूचा नकाशा तयार करण्यासाठी ईईजी (इलेक्ट्रोएनसेफॅलोग्राफ) टोपोग्राफीसारखी (विद्युत मस्तिष्कालेख स्थलवर्णन) तंत्रे वापरतात. नेत्रवैद्यकात डोळ्याच्या स्वच्छमंडळाच्या पृष्ठभागाच्या वक्रतेचा नकाशा तयार करण्यासाठी कॉर्नियल टोपोग्राफी (स्वच्छमंडलीय स्थलवर्णन) तंत्र वापरतात. शिवाय उरो व उदरगुहीय टोपोग्राफी, मानवी शरीर टोपोग्राफी इत्यादी संज्ञाही वैद्यकात रूढ झाल्या आहेत.

नकाशावरील वैशिष्ट्यांचे आकृतिबंध किंवा सर्वसाधारण संघटन दर्शविण्यासाठी, तसेच चलराशी (वा त्यांची मूल्ये) अवकाशात ज्या आकृतिबंधात वाटली गेली आहेत, त्या आकृतिबंधाचा उल्लेख करण्यासाठी गणितात टोपोग्राफी संकल्पना वापरतात.

समीक्षक : वसंत चौधरी