भारताच्या शिक्षणक्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था. ही केंद्र शासनाची एक स्वायत्त संस्था असून या संस्थेची स्थापना नोंदणी अधिनियम एक्सएक्सआय, १८६० नुसार २७ जुलै १९६१ रोजी नवी दिल्ली येथे झाली; परंतु प्रत्यक्ष कामकाजाला १ सप्टेंबर १९६१ रोजी सुरुवात झाली. परिषदेची स्थापना पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या केंद्र सरकारच्या सात राष्ट्रीय शासकीय संस्थांचे एकत्रीकरण करून करण्यात आली होती. त्यामध्ये केंद्रीय शिक्षण संस्था, केंद्रीय पाठ्यपुस्तक संशोधन मंडळ, केंद्रीय शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन मंडळ, माध्यमिक शिक्षणासाठी विस्तार कार्यक्रमाचे संचालनालय, मुलोद्योगी शिक्षणाची राष्ट्रीय संस्था, राष्ट्रीय मुलभूत शिक्षण केंद्र, राष्ट्रीय दृक-श्राव्य शिक्षण संस्था यांचा समावेश होता.

शालेय शिक्षणातील गुणात्मकता सुधारण्यासाठी विविध शैक्षणिक धोरणे व कार्यक्रमांबाबत केंद्र व राज्य सरकारला मदत करणे व सल्ला देणे यांसाठी परिषदेची स्थापना करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असतात. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, चार विभागांतील विद्यापीठांपैकी चार विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय मानव संसाधन खात्याचे सचिव इत्यादी या परिषदेचे सदस्य असतात.

घटक संस्था ꞉ राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकूण चार प्रमुख घटक संस्था असून  प्रत्येकांची कार्ये व विभाग वेगवेळी आहेत.

(१) राष्ट्रीय शिक्षण संस्था (एन.आय.ई.), दिल्ली ꞉ ही परिषदेची एक प्रमुख संस्था आहे. या संस्थेंतर्गत विविध विभाग कार्यरत आहेत. त्यांमध्ये कला व सौंदर्यशास्त्र शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, विशेष गरजा समूह शिक्षण विभाग, शैक्षणिक मानसशास्त्र व शिक्षणाचे अधिष्ठान विभाग, शास्त्र व गणित शिक्षण विभाग, सामाजिक शास्त्रे  शिक्षण विभाग, भाषा शिक्षण विभाग, लिंगभाव अभ्यास विभाग, शिक्षक शिक्षण विभाग, अभ्यासक्रम अभ्यास विभाग यांचा समावेश होतो.

(२) केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था, दिल्ली ꞉ या संस्थेमार्फत पर्यायी अध्ययन प्रणालीचा आराखडा तयार करणे, विकसन करणे व त्याचा प्रसार करणे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रचार करणे, शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत व्यक्तींना प्रशिक्षण देणे, राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या उपक्रमांमध्ये समन्वय साधने, परिषदेच्या घटक संस्थांना सल्ला व इतर बाबतींत मदत पुरविणे ही प्रमुख कार्ये पार पाडली जाते. संस्थेने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, केरळ व  बिहार या राज्यांमध्ये राज्य शिक्षण तंत्रज्ञान संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थेमार्फत केंद्रीय चित्रपट ग्रंथालय चालविले जाते.

(३) पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ ꞉  ही व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये संशोधन व विकसन करणारी एक शिखर संस्था आहे. यामध्ये कृषी व पशुसंवर्धन, व्यवसाय व वाणिज्य, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, आरोग्य व रुग्णसेवाशास्त्र, गृहशास्त्र व आदरातिथ्य व्यवस्थापन, मानव्यविद्या आणि शिक्षण व संशोधन या शैक्षणिक विद्याशाखांचा समावेश करण्यात आलेला आहे.

(४) क्षेत्रीय शिक्षण संस्था ꞉ केंद्र शासनाने १९६३ मध्ये विविध राज्यांमधील प्रामुख्याने अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर आणि मैसूर या ठिकाणी क्षेत्रीय शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर परिषदेच्या कृती समितीने १९९२ मध्ये केलेल्या शिफारशीनुसार क्षेत्रीय शिक्षण संस्था, शिलाँगची स्थापना ईशान्येकडील राज्यांसाठी करण्यात आली. नाविन्यपूर्ण सेवापूर्व व सेवांतर्गत शिक्षक शिक्षण कार्यक्रम व संबंधित संशोधन, विकसन  व विस्तार कार्यक्रमाद्वारे शालेय शिक्षणामध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने क्षेत्रीय शिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या. शाळा व शिक्षक शिक्षणाच्या या क्षेत्रामध्ये क्षेत्रीय शिक्षण संस्था या स्वतः प्रतिष्ठित संस्था म्हणून कार्यरत झालेल्या आहेत.

परिषदेची कार्ये ꞉  शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी परिषदेमार्फत संशोधन व विकास,  सेवांतर्गत व सेवापूर्व प्रशिक्षण आणि विस्तार सेवा व प्रसार कार्य यांच्याशी निगडित कार्ये  पार पाडली जातात. आपल्या घटक संस्थांमार्फत पुढील कार्ये पार पाडली जातात ꞉

  • शालेय शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन कार्यास उत्तेजन देणे, संशोधन कार्याचे संयोजन करणे, संशोधन कार्यास साहाय्य करणे व त्यात समन्वय साधणे.
  • शालेय शिक्षणविषयक अभ्यास, अन्वेषण व सर्वेक्षण हाती घेणे.
  • शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व शिक्षण क्षेत्रातील इतर व्यक्तींसाठी प्रगत स्वरूपाची सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षणाचे संयोजन करणे.
  • विस्तार सेवा कार्याचे संयोजन करून शिक्षण संस्था व शिक्षक यांना शिक्षणातील नवप्रवाहांचा परिचय करून देणे.
  • शिक्षणातील सुधारित तंत्रे, पद्धती व शैक्षणिक संशोधनातील निष्कर्ष प्रसारित करणे.
  • देशात शालेय स्तरावर एकसारखी शिक्षण प्रणाली निर्माण करण्याच्या उद्देशाने, अभ्यासक्रम विकास, अध्यापन साहित्य निर्मिती, नवीन अध्यापन पद्धतींचा शोध व मूल्यमापन तंत्रांचा विकास करणे, शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती व प्रकाशित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य परिषदेद्वारा केले जाते.
  • शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून राज्यस्तरीय शिक्षणविषयक संस्थांना, संघटनांना व माध्यमांना मार्गदर्शन करणे.
  • घटकसंस्थांच्या कार्यात समन्वय साधणे.
  • युनेस्को, युनिसेफ या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या संस्था यांच्याशी सहकार्य ठेवणे.
  • इतर देशांतील व्यक्तींना शिक्षणविषयक बाबींचा अभ्यास व प्रशिक्षण विषयक सुविधांची सोय करून देणे इत्यादी.

परिषदेमार्फत इयत्ता पहिली ते बारावीसाठी सीबीएसई बोर्डाची हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके, तसेच भारतीय महान व्यक्तींची जीवन चरित्रे, सर्वेक्षण अहवाल, इतर संदर्भ पुस्तके, नियतकालिके व मासिके प्रकाशित केली जातात. याच बरोबर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, अखिल भारतीय शालेय शिक्षण सर्वेक्षण, शिक्षक पुरस्कार, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन, माध्यम कार्यक्रम, संशोधन अनुदाने इत्यादी उपक्रम परिषदेमार्फत राबविले जातात.

संदर्भ ꞉

  • पारसनीस, न.  रा., शिक्षकांचे प्रशिक्षण, पुणे, २००८.
  • मोरे, चंद्रकांत; भिलेगावकर, सदानंद, संपा., शिक्षक शिक्षण, पुणे, २००८.

समीक्षक ꞉ ह. ना. जगताप