शिक्षक शिक्षण ही तुलनेने अलीकडील कल्पना असली, तरी शिक्षक व्यवसाय हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पूर्वीच्या काळी अध्यापन व्यवसायात येणारे शिक्षक हे प्रशिक्षित होतेच असे नाही. उच्च आशयज्ञान, बहुश्रुतता, सामान्य ज्ञानाची पुरेशी जाण, संवादकौशल्य, चांगल्या अभ्याससवयी इत्यादींच्या आधारे या व्यवसायात येणाऱ्या व्यक्ती चांगला शिक्षक होऊ शकत असत. त्यामुळे शिक्षक शिक्षणाची गरजच काय? असा मुलभूत प्रश्न अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ व व्यापक समाजापुढे उभा राहतो. अध्ययन ही जशी एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, तशीच अध्यापन ही देखील नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कमी-जास्त प्रमाणात ती सर्वांकडे असते. या नैसर्गिक प्रवृत्तीला विषयज्ञानाची जोड मिळाली की, चांगला शिक्षक आपोआप निर्माण होतो. अशी एक विचारधारा अस्तित्वात आहे. अध्यापनाची प्रवृत्ती ज्यांच्याकडे उच्च पातळीवर असते, ते आवडीने या क्षेत्रात येतात आणि यशस्वी परिणामकारक शिक्षक म्हणून लौकिक प्राप्त करतात. सुरुवातीच्या वाटचालीत त्यांना आलेल्या अडचणीतून, अनुभवातून ते अनेक गोष्टी शिकतात व चांगले शिक्षक होतात. या पार्श्वभूमीवर शिक्षक-शिक्षणाची खरच गरज आहे काय? असा प्रश्न उभा राहतो.

मर्यादित शिक्षण द्यायचे असेल, तर मर्यादितच शिक्षकांची आवश्यकता असते. अशा वेळी अध्यापनाची नैसर्गिक प्रवृत्ती असणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असली, तरी ती पुरेशी ठरू शकते; मात्र जेव्हा शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होते, तेव्हा मोठ्या संख्येने शिक्षकांची गरज भासते. अशा वेळी सामान्य गुणवत्तेच्या शिक्षकांबरोबरच काही वेळेस निम्न गुणवत्तेच्या शिक्षकांनाही अध्यापनाच्या व्यवसायात नियुक्त करावे लागते. त्यामधील काही शिक्षक अनुभवातून अल्पकाळात शिकतील, तर काही शिक्षकांना दीर्घ कालावधी लागतो. या सर्वांचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणे अपरीहार्य ठरते. याशिवाय अध्यापनाची प्रवृत्ती या संकल्पनेच्याही अनेक मर्यादा आहेत. या प्रवृत्तीच्या आधारे केले जाणारे अध्यापन म्हणजेच नैसर्गिक अध्यापन होय. संवादकौशल्यांच्या मुलभूत तत्त्वांवर ते आधारलेले असते; मात्र अर्वाचीन युगात शिक्षणशास्त्रामध्ये नवीन उपपत्तींची भर पडलेली आहे.

मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान अशा विविध क्षेत्रांत जी प्रगती झालेली आहे, त्याचा परिणाम अध्यापनावर होऊन नवे अध्यापनशास्त्र विकसित होताना दिसते. हे सर्व नैसर्गिक अध्यापनाच्या मर्यादित संकल्पनेत समाविष्ट होईल असे नाही. त्यासाठी खास प्रशिक्षणाची किंवा शिक्षणाच्या योजनेची आवश्यकता आहे.

व्याख्या : ‘जी व्यक्ती शिक्षकी पेशात प्रवेश करू इच्छिते, त्या शिक्षकी पेशात पारंगत होण्यासाठी योग्य ते व्यावसायिक शिक्षण देणे म्हणजे शिक्षक शिक्षण’.

‘पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या स्तरांवर परिणामकारक अध्यापन कार्य करणे व सुयोग्य नागरिक घडविण्याचे कौशल्ये ज्या शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त होते, त्याला शिक्षक शिक्षण असे म्हणतात’.

शिक्षक शिक्षण पूर्वप्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विशेष शिक्षण यास्तरांवर देण्यात येते. शिक्षक शिक्षणाची ध्येये, उद्दिष्ट्ये, अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक कार्य, प्रवेशाच्या अटी, पात्रता, मूल्यमापन, परीक्षा पद्धती, मुल्यांकन, विद्यार्थी संख्या इत्यादी मुद्द्यांनुसार मूल्य बदलतात. शिक्षकांचा दृष्टीकोन, व्यक्तिमत्व विकास, शिक्षकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या स्तरानुसार बदलतात. शिक्षक शिक्षणामध्ये प्रामुख्याने सेवापूर्व शिक्षक शिक्षण आणि सेवांतर्गत शिक्षक शिक्षण या दोन प्रकारच्या शिक्षक शिक्षणाचा विचार केला जातो.

सेवापूर्व शिक्षक शिक्षण : ‘अध्यापन व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी जे प्रशिक्षण दिले जाते, त्याला सेवापूर्व प्रशिक्षण असे म्हणतात’.

सेवांतर्गत शिक्षक शिक्षण : ‘सेवेत असताना जे प्रशिक्षण दिले जाते, त्याला सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात’.

प्रशिक्षण : ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेल्या वृत्ती, ज्ञान, कौशल्य व वर्तणूक यांचा विकास होतो, त्याला प्रशिक्षण असे म्हणतात. इसवी सन १९०६ ते १९५६ या दरम्यान शिक्षकांचे प्रशिक्षण ही संज्ञा रूढ होती. त्या वेळी शिक्षकांचे अध्यापन कौशल्य विकसित करण्यावर भर होता; परंतु जसजसे शैक्षणिक तत्त्वज्ञान व मानसशास्त्र विकसित होत गेले, तसतसे प्रशिक्षणाच्या संकल्पनेत फरक पडत गेला. परीणामी शिक्षणशास्त्राची पूर्वीची बी. टी. ही पदवी १९५६ पासून बी. एड. अशी झाली.

नोकरीच्या दृष्टीकोनातून प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, हा प्रशिक्षणाचा हेतू असतो. व्यक्ती ज्या क्षेत्रातील नोकरी करणार असेल, त्या क्षेत्रात यशस्वीपणे नोकरी करण्यासठी आवश्यक असलेल्या बाबी पुरविणे हे प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये आहे. नोकरीसाठी आवश्यक असलेले कौशल्य, ज्ञान अभिवृत्ती वर्तन यांचा विकास करणे, याला महत्त्व दिले जाते. व्यक्तीला नोकरीसाठी प्रशिक्षणामुळे उत्कृष्टता प्राप्त करता येते. नोकरी यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. अध्ययन अध्यापन कार्य प्रशिक्षणात शिक्षक हा जास्त प्रभावी असतो.

शिक्षण : पूर्वीच्या काळी शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे जन्मजात बुद्धिवंत शिक्षक पुरेसे होते; परंतु जसजसा नवीन ज्ञानाचा स्फोट होत गेला, नवीन आव्हाने आली, तसे शिक्षणाचे क्षेत्र विस्तारत गेले. शिक्षककेंद्री प्रक्रियेत अध्यापन साधनाचा अभाव होता. एकाधिकारशाहीमुळे मानसशास्त्राचा अभाव होता; परंतु जेव्हा कलेला शास्राची जोड मिळाली व विद्यार्थीकेंद्री शिक्षण प्रक्रिया आली, तेंव्हा खऱ्या अर्थाने शिक्षणशास्त्राचा विकास झाला. शिक्षणशास्त्र व अध्यापनशास्त्र यांमुळे उदयोन्मुख शिक्षकांचे शिक्षण ही संकल्पना पुढे आली.

चांगले जीवन जगणे, समाजातील सर्वांगीण विकास साधणे यास शिक्षण असे म्हणता येईल. समाजासाठी सशक्त, ज्ञानी, सुयोग्य नागरिक तयार करणे, हा शिक्षणाचा हेतू आहे. व्यक्तीला योग्य जीवन जगता येण्यासाठी व समाजात एकत्रितपणे समायोजित होण्यासाठी गुणात्मक बाबी पुरविणे हे शिक्षणाचे वैशिष्ट्ये आहे. व्यक्तीला समाजात केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता जीवनात समायोजित होण्यासाठी शिक्षणात ज्ञानाचा, अभिवृत्तीचा, मुल्यांचा विकास करणे याला जास्त महत्त्व दिले आहे. शिक्षणाने समाजाच्या परंपरा, मुल्य, नीती, नियम समजून घेऊन समाजाबद्दलच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते व त्यातून उत्कृष्ट नागरिक घडविला जातो. जीवन अर्थपूर्ण व सुंदर बनविण्यासाठी शिक्षणाची गरज असते. शिक्षणात शिक्षक व विद्यार्थी दोघेही एकाच पातळीवर असतात.

उद्दिष्टे : शिक्षक शिक्षणाच्या उद्दिष्टांत (१) शिक्षक प्रशिक्षणाची संकल्पना समजून घेणे; (२) शिक्षक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करणे; (३) विविध स्तरांवरील शिक्षक प्रशिक्षणाच्या समस्या जाणून घेण्याची दृष्टी विकसित करणे; (४) शिक्षक प्रशिक्षणात नवीन प्रवाह आणण्यासाठी प्रायोगिक वृत्तीचा विकास करणे; (५) शिक्षक प्रशिक्षणातील नवीन प्रवाह, तंत्र, पद्धती समजून घेणे; (६) शिक्षणाचे ध्येय, आशय पद्धती तसेच सामाजीक, मानसिक घटक समजून घेण्यास सक्षम करणे; (७) विविध वयोगटांतील मुलांचा शारीरिक, सामाजिक, बौद्धिक, सौंदर्यात्मक, भाषिक, सांस्कृतिक, भावनिक आणि त्यासंबंधित घटकांचा विकास कसा होतो, हे समजून घेण्यास सक्षम करणे; (८) विशेष गरजा असणाऱ्या अध्ययनार्थींना पद्धती व साहित्याची माहिती करून घेण्यासाठी तयार करणे; (९) नवीन अभ्यासक्रमानुसार विषय शिकविण्याची क्षमता विकसित करणे; (१०) स्वयंअध्ययनासाठी प्रवृत्त करणे; (११) समावेश शिक्षण पद्धतीत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याची क्षमता निर्माण करणे; (१२) गुणवत्ता वाढीसाठी कृतीसंशोधन करण्याची क्षमता निर्माण करणे; (१३) खाजगी व्यवसायाविषयी योग्य दृष्टीकोन व कौशल्यांचा विकास करणे; (१४) अध्ययनार्थींमध्ये स्वंय अध्ययन, संदर्भ घेण्याचे कौशल्य, गटकार्य, चिकित्सक विचारसरणी, तार्किक विचार क्षमता, संकल्पना प्राप्ती, वेगवेगळ्या पद्धतीद्वारे मिळविलेला ज्ञानाचा उपयोग, प्रकल्प कार्य, स्वाध्याय इत्यादीं विषयी मार्गदर्शन करण्याची क्षमता विकसित करणे ही होत.

महत्त्व : शिक्षक शिक्षणाचे महत्त्व पाहत असताना राष्ट्रीय विकासावर गुणवत्तेच्या विविध घटकांचा  परिणाम होतो. त्यात शिक्षकाची गुणवत्ता, चारित्र्य व कार्यक्षमता हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षण व्यवसायाला गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा सतत पुरेसा पुरवठा करणे, त्यांची व्यावसायिक तयारी ही गुणवत्तापूर्ण करणे, त्यांच्या सेवाशर्तींची पूर्तता करणे आणि शैक्षणिक सोयी सुविधांचा प्रसार व शिक्षकांचा दर्जा वाढविण्यासाठी अद्ययावत शिक्षक शिक्षणाची व्यवस्था करणे इत्यादींना अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिक्षकी पेशामध्ये शिक्षकाला निरनिराळ्या भूमिकांमधून जावे लागते. शिक्षक केवळ ज्ञानग्रहण करणारा नसून विद्यार्थ्यांना अध्ययन प्रवृत्त करणारा व वेगवेगळे अध्ययन अनुभव देणारा असला पाहिजे. संस्कृतीचा वारसा संक्रमित करणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे यांसाठी शिक्षकाला प्रयत्नशील राहणे गरजेचे असते. तसेच सामाजिक वास्तवतेचे भान ठेवणारा, परिवर्तनाबाबत जागरुक असलेला व राष्ट्राचे भवितव्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा शिक्षक घडविण्याचे कार्य शिक्षक शिक्षणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचे असते. म्हणून आज विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी शिक्षक शिक्षणाची गरज आहे. शिक्षक घडविण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षक शिक्षणाचे खूप महत्त्व आहे.

प्रकार : शिक्षक शिक्षणात मुख्यत्वे सेवापूर्व शिक्षक शिक्षण आणि सेवांतर्गत शिक्षक शिक्षण या दोन प्रकारांचा समावेश होतो.

सेवापूर्व शिक्षक शिक्षण : शिक्षकी पेशाचे ज्ञान व व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी जे शिक्षण दिले जाते, त्यास सेवापूर्व शिक्षक शिक्षण असे म्हणतात. शिक्षकी व्यवसायात येण्यापूर्वी प्राप्त केलेली पदवी व प्रमाणपत्र या शिक्षणाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला शिक्षकी व्यवसायासाठी पात्र  करणे म्हणजेच सेवापूर्व शिक्षक शिक्षण होय. त्यामध्ये डी. एड., बी. एड., एम. एड., बी. पी. एड., एम. पी. एड., बी. एड. स्पेशल., डी. एस. इ., एम. फिल., पी. एचडी इत्यादी प्रकारच्या शिक्षणक्रमांचा समावेश होतो.

सेवांतर्गत शिक्षक शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील समस्या नेहमी बदलत राहणाऱ्या आहेत. आधुनिक काळातील विद्वत्त ज्ञानशाखातील किंवा प्रवाहातील तत्त्वांच्या आधारे या समस्यांचा विचार करून सध्याच्या परिस्थितीत काय उपाययोजना करता येईल, अशा तऱ्हेची क्षमता निर्माण करणारे शिक्षण म्हणजे सेवांतर्गत शिक्षक शिक्षण होय. त्यामध्ये नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण, आशय समृद्धी प्रशिक्षण, पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण, शिष्यवृत्ती प्रशिक्षण, गणित संबोध प्रशिक्षण इत्यादी प्रकारच्या प्रशिक्षणांचा समावेश होतो.

सेवांतर्गत शिक्षक शिक्षणामुळे शिक्षकांमध्ये ज्ञान व कौशल्यांचा विकास होतो. संदर्भ साहित्य व अभ्यासपूरक साहित्य निर्माण  करता येते. प्रगत अभ्यासाची प्रेरणा मिळते. नोकरीत बढती मिळते. व्यवसायातील व्यक्तिची ओळख होते. शिक्षणाची गुणवत्ता वाढ होते. अध्यापन पद्धतीत सुधारणा होते. शिक्षणपद्धतीत एकसूत्रता आणता येते. नवीन बदल समजतात. सेवांतर्गत शिक्षक शिक्षण पारंपरिक विद्यापीठातील दूरशिक्षण विभाग व मुक्त विद्यापीठाद्वारे उपलब्ध आहे.

संदर्भ :

  • अध्यापन आणि अध्यापक शिक्षण, य. च. म. मू. विद्यापीठ नाशिक, २०१२.
  • कक्कड, गायकवाड, शिक्षण व अध्यापक शिक्षण, पुणे, २००८.
  • चव्हाण, इसावे, पाटील, कदम, थिगळे, शिक्षक शिक्षण, नाशिक, २०१०.
  • नरवणे, मीनल, भारतातील शैक्षणिक आयोग व समित्या १८१३-१९९७, पुणे, २००८.
  • पारसनीस, न. रा., शिक्षकांचे प्रशिक्षण, पुणे, २००४.
  • साळुंके, कविता व पाईकराव, वि., शिक्षण आणि अध्यापक शिक्षण : विकीर्ण चिंतन, नाशिक, २००८.
  • Fifth survey of Educatioanl Resesarch  vol II, New Delhi, 1988-1992.
  • Husen, T., International Encyclopedia of Education, 1994.

समीक्षक : ह. ना. जगताप